कुडाळ : कुडाळ हायस्कूलमधील १९८७-८८च्या दहावीच्या बॅचने तीस वर्षांनंतर ‘पुन्हा एक दिवस हायस्कूलचा’ अनुभवला. अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून ते थेट वर्गातील धूमशानापर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात या सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले. आपल्या सर्व गुरुवर्यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वादही त्यांनी घेतले.
आपण कितीही मोठे झालो, वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मौज काही वेगळी असते. आपली शाळा आणि शाळेतील ते सोनेरी दिवस कोणी विसरू शकत नाही; पण काळ कधी थांबत नाही. सरलेले दिवस पुन्हा येत नाहीत. तरीही कुडाळ हायस्कूलच्या १९८७-८८च्या दहावीच्या बॅचने शाळेतील त्या आठवणी तब्बल तीस वर्षांनी पुन्हा जागवल्या ‘एक दिवस हायस्कूलचा’ या उपक्रमाद्वारे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मीना देसाई यांनी या बॅचच्या काही मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. अनेक मित्र-मैत्रिणी हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि ‘गेट टुगेदर’ची संकल्पना पुढे आली. दिवस ठरला रविवार, १४ मे.
त्या दिवशी सकाळपासूनच कुडाळ हायस्कूलचे आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागले होते. दूर दूर गेलेले सर्व जण एकमेकांना भेटत होते. सेल्फी काढत होते. सर्वांचा एक युनिफॉर्म ठरला होता. मुलांसाठी कुर्ता आणि मुलींसाठी साडी आणि सर्वांच्या डोक्यावर मराठमोळा फेटा. गळ्यात ओळखपत्र. सर्वांचा नाश्ता झाल्यावर ढोलावर काठी पडली. ताशा कडाडू लागला आणि मिरवणुकीने सर्व जण शिक्षकांसोबत प्रार्थनेच्या ठिकाणी गोळा झाले. शाळेत असताना व्हायची तशी घंटा वाजली. सर्व जण एका रांगेत उभे राहिले. तेव्हाचे मुख्यध्यापक का. आ. सामंत यांनी सूचना दिल्या आणि सावधान-विश्राम झाल्यावर राष्ट्रगीत आणि प्रार्थनासुद्धा झाली. त्यानंतर शाळेच्या आवारातील नाना-नानी पार्कला या साऱ्यांनी भेट दिली. अगदी लहान होत तिथल्या खेळण्यांचा आनंदही घेतला. मग शिक्षकांसोबत एक ग्रुप फोटो काढण्यात आला. नंतर सारे एका हॉलमध्ये जमले. हॉलच्या भिंतीसुद्धा विद्यार्थ्यांचा नावांनी कलात्मकरीत्या सजल्या होत्या. औक्षण करून आणि फुले उधळून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. नितीन मुतालिक यांच्या तबलावादनाने आणि कथ्थक नृत्यांगना प्रीती सावंत-शिंदे यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थित नसलेल्या डॉ. शिरीष शिरसाट यांच्यासारख्यांनी थेट परदेशातून व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. काहींनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. या वेळी उपस्थित गुरुजनांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. काही विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. नरेंद्र पडते यांनी तर या सर्वांवर कविताही केली. त्यानंतर शिक्षकांनीही या बॅचच्या आठवणी जागवून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमासाठी मकरंद अणावकर, मीना देसाई, आनंद मर्गज, प्रसाद दळवी, अमोल सामंत, प्रीती सावंत, एस. व्ही. राणे, दीपक कदम या साऱ्यांनी मेहनत घेतली होती. शाळेनेही या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी या वेळी आपली ओळख करून देताना शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मीना देसाई-घुर्ये, अॅड. अमोल सामंत, अंजली काणेकर, प्रीती सावंत-शिंदे यांच्यासह त्यांच्या बच्चेकंपनीनेही बहारदार नृत्ये सदर करून उपस्थितांना ताल धरायला लावला. ‘यारो दोस्ती बडी ही अजीब’ या गाण्यावर मग सारेच जण ठेका धरत एकत्र आले. तब्बल तीस वर्षांनंतर भरलेल्या या वर्गाची तिथेच मधली सुट्टी झाली; पण त्यानंतर शेवटचे तासही खेळण्या-बागडण्यात कधी गेले ते कळलेच नाही. पुन्हा एकदा भेटायचे वचन एकमेकांना देत हायस्कूलचा तो एक अनोखा दिवस सरला होता.