Ad will apear here
Next
‘पुस्तके वाचायला हवीतच; पण माणसे आणि निसर्गही वाचायला हवा’
‘वाचता वाचता आम्ही घडलो’ परिसंवादात मान्यवरांचा सूर
रत्नागिरी : ‘वाचनसंस्कृती वाढवायची असेल, तर आपणच प्रयत्न करायला हवेत. पुस्तके वाचायला हवीतच; पण त्याचबरोबर माणसे वाचायला हवीत. निसर्ग वाचायला हवा. वाचनात वैविध्य हवे. स्थानिक लेखकांचे कौशल्य ओळखून त्यांचे साहित्यही आपण वाचायला हवे,’ असा सूर ‘वाचता वाचता आम्ही घडलो’ या रत्नागिरी ग्रंथोत्सवातील परिसंवादात मान्यवरांनी काढला. 

ग्रंथालय संचालनालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने शासकीय विभागीय ग्रंथालयात लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात रत्नागिरी ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी (२९ डिसेंबर २०१८ रोजी) दुपारी अडीच वाजता हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. लेखिका आणि प्राध्यापिका डॉ. निधी पटवर्धन, रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिशासी सुहास विद्वांस आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत परांजपे हे मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले होते. 

परिसंवादात बोलताना डॉ. निधी पटवर्धन‘स्वतःचे इंद्रधनुष्य स्वतःलाच तयार करावे लागते’
‘खूपसे ऊन आणि थोडासाच पाऊस अशी परिस्थिती प्रत्येकाच्याच आयुष्यात असते. मग त्यात पुस्तके येतात, माणसे येतात, निसर्ग येतो. या गोष्टी वाचून स्वतःचे इंद्रधनुष्य प्रत्येकाला स्वतःलाच तयार करावे लागते आणि आयुष्यात रंग भरले जातात,’ अशा शब्दांत डॉ. निधी पटवर्धन यांनी जीवनाचे इंगित सांगितले. पुस्तके, माणसे, निसर्ग यांच्या वाचनातून आपण कसे घडत गेलो आणि त्यातून स्वतःला कसे वाचू लागलो, याची गोष्ट डॉ. निधी पटवर्धन यांनी आपल्या मनोगतात उलगडली. 

‘लहानपणीच पुस्तके वाचायची सवय लागली. पुस्तके वाचायला लागल्यानंतर मी लेखकांना पत्रे लिहू लागले. रवींद्र पिंगे आणि विजय तेंडुलकर यांना लिहिलेल्या पत्रांना त्यांनी पाठवलेली उत्तरे जपून ठेवली आहेत. त्यातूनच मग स्वतःला लिहायची गोडी लागली,’ असे त्यांनी सांगितले. ‘कविता आतून आली पाहिजे. पुस्तकातून जीवनाची तत्त्वे सापडतात. आपल्यावर वारशातून संस्कार येतात. त्यांचे बीज अंकुरण्यासाठी वेळ द्यावा लागतो,’ असे डॉ. पटवर्धन म्हणाल्या. ‘निसर्ग वाचायला मला वडिलांनी शिकविले. त्यातून मी पक्षी, प्राण्यांवर प्रेम केले. रानवाटा धुंडाळल्या. त्यांचा जीवनप्रवास जवळून पाहिल्यानंतर अनेक गोष्टी उलगडत गेल्या. माणसाला सगळ्यात प्रिय असलेली गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य हे निसर्ग वाचायला लागल्यावर कळले,’ असेही त्यांनी सांगितले.

‘माणसे वाचायला लागल्यावर खूप काही शिकायला मिळाले. आपण कमी गरजांमध्ये राहू शकतो, हे नंदुरबारच्या आदिवासींकडून शिकले. माणसांशी खरेपणाने जोडले जातो, हृदयाची भाषा कळते, तेव्हा बंध जोडले जातात,’ असेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. आपण कुठेही जाताना आपल्यासोबत कायम पुस्तक असल्याचे आणि वेळ मिळाला की ते वाचत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

विचार मांडताना सुहास विद्वांस

‘वाचनाला बंधमुक्त करायला हवे’
‘वाचनाची संकल्पना बंधमुक्त करायला हवी. आपण वाचनाला विविध प्रकारच्या बंधनांत अडकवून ठेवले आहे. अमुकच वाचतो, तमुकच वाचले पाहिजे, असे निर्बंध वाचनावर घातले जातात; मात्र हा अॅटिट्यूड बदलायला हवा,’ असे मत सुहास विद्वांस यांनी व्यक्त केले.

‘मी स्वतः इंग्रजी माध्यमात शिकल्याने मराठीपेक्षा माझे इंग्रजी वाचन अधिक आहे; पण मराठी पुस्तकेही मी खूप वाचली. आमच्या वडिलांनी कोणत्याही प्रकारचे निर्बंध त्यावर घातले नव्हते. त्यामुळे जे हाताला मिळेल ते वाचत गेलो. मुक्त वाचनाचा नक्की फायदा होतो. प्रत्येक भाषेची मजाही वेगळी असते. तसेच प्रत्येक प्रकारच्या पुस्तकाची मजा वेगळी असते. त्यामुळे वाचनात वैविध्य हवे,’ असे विद्वांस म्हणाले. आपण स्वतः रजा घेऊन, शासकीय ग्रंथालयात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटनेबद्दलचा ग्रंथ वाचून काढल्याची आठवणही त्यांनी सांगितली. त्यातूनच त्यातील प्रत्येक गोष्टीमागे किती सखोल विचार केलेला आहे, हे उलगडले, असे ते म्हणाले. आपण स्वतः गुजराती भाषेतील पुस्तकेही वाचत असल्याचे त्यांनी सांगितले.

विचार व्यक्त करताना प्रशांत परांजपे‘स्थानिक साहित्यिकांचे साहित्य तालुक्याच्या ग्रंथालयात हवे’
‘प्रत्येक तालुक्यातील साहित्यिकांची यादी तालुक्याच्या ग्रंथालयांमध्ये हवी. तसेच त्यांची शक्य असतील तेवढी पुस्तकेही या ग्रंथालयांत हवीत. त्यातूनच स्थानिकांचे कर्तृत्व आपल्याला समजेल. त्यांचे साहित्य आपल्याला कळेल. त्यांना आपणच मोठे केले पाहिजे. तालुक्यातील साहित्यिकांच्या यादीसाठी ‘कोमसाप’ आपल्याला मदत करील. पुढच्या वर्षीच्या ग्रंथोत्सवापर्यंत आपण या गोष्टींपैकी काही तरी मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवू या,’ असे आवाहन प्रशांत परांजपे यांनी केले. 

‘भरपूर वाचले पाहिजे, वाचलेल्यातून वेचले पाहिजे. वाचनाला स्थिरता येणे ही काळाची गरज आहे. डॉ. अब्दुल कलाम यांनी उद्याच्या पिढीकडून महासत्ता घडविण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी मुलांनी काय वाचले पाहिजे, यावर लक्ष हवे. सध्याच्या काळात मोबाइलवरील मेसेजेस स्क्रोल करत वाचन केले जाते. त्यात काय वाचले जाते, हे वाचकांना कळतच नाही. केवळ टिक्स किंवा लाइक्स मिळाले, की समोरच्याने वाचले असे वाटते; पण ते खरे नसते. हे बदलायला हवे,’ अशी कळकळ प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केली. 

‘संत गाडगे महाराजांसारख्याचे विचार लोकांनी नीट न वाचल्यामुळे आजची गलिच्छ परिस्थिती उद्भवलेली आहे. ती आपण बदलायला हवी. त्यासाठी निसर्गही वाचायला हवा. निसर्गावर होणारे अत्याचार वाचायला हवेत आणि ते थांबवायला हवेत,’ असे आवाहन त्यांनी केले.

ग्रंथोत्सवात काढण्यात आलेली रंगावली

कवी केशवसुत यांनी १८९०मध्ये वणंद येथील झोपाळ्यावर बसून लिहिलेली कविता, तसेच १९२०मध्ये लोकमान्य टिळक यांनी आपल्या पत्नीच्या माहेरी लाडघरला लिहिलेले पत्र अशा अनेक गोष्टी दापोलीला आपल्या विशेष संग्रहालयात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘वाचनसंस्कृती पुढे नेण्यासाठी अशा गोष्टींचा वारसा जपून ठेवायला हवा. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील लेखकांच्या पुस्तकांचे दालन त्या तालुक्यातील, जिल्ह्यातील ग्रंथालयांत असायला हवे,’ असे त्यांनी सुचविले. वाचनसंस्कृती वाढविण्याबरोबरच वसुंधरारक्षणाचा वसा जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी विजयकुमार जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गौरी सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे श्री. बिर्जे यांनी आभारप्रदर्शन केले. 

ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी मान्यवर

ग्रंथप्रदर्शन पाहताना मान्यवर

उद्घाटन, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन
तत्पूर्वी, सकाळी ग्रंथोत्सवाचे उद्घाटन झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विलास कुवळेकर होते. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथोत्सवानिमित्त रत्नागिरी शहरातून सकाळी ग्रंथदिंडीचे आयोजनही करण्यात आले. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन साहित्यिका नमिता कीर यांच्या हस्ते करण्यात आले. ही ग्रंथदिंडी मारुती मंदिर येथीस छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून लोकमान्य टिळक स्मारक मंदिरापर्यंत काढण्यात आली होती. ग्रंथोत्सवानिमित्त लोकमान्य टिळक स्मारक मंदिर परिसरात ग्रंथप्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

(परिसंवादातील मान्यवरांच्या मनोगताची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत..)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZJOBV
Similar Posts
‘लोकांची पावले साहित्याकडे वळविण्याचे काम ग्रामीण साहित्य संमेलने करतात’ कोट : ‘साहित्य संमेलने केवळ साहित्यापुरतीच मर्यादित नसतात, तर संस्कृतीशीही निगडित असतात. संस्कृती लोकांसमोर आणण्याचे काम ही संमेलने करतात. पुस्तके आणि साहित्याचे विविध प्रकार ग्रामीण भागातील नागरिक आणि मुलांपर्यंत संमेलनाच्या माध्यमातून पोहोचतात. त्यामुळेच साहित्याकडे पावले वळवण्याचे आणि लोकांमधून आस्वादक घडविण्याचे काम संमेलने करतात
गुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे असावे रत्नागिरी : ‘गुरू आणि शिष्याचे नाते कसे असावे, तर श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखे असावे. या नात्यात काही आमिषे नसावीत, खोटेपणा नसावा. गुरू-शिष्याचे आदर्श नाते असे निखळ असावे. आजच्या काळात त्याची विशेष गरज आहे,’ असे प्रतिपादन सेवानिवृत्त वकील पुरुषोत्तम लक्ष्मण महाजनी यांनी केले. रत्नागिरीचा संकल्प कला मंच
‘पुलसुनीत’ ठरणार दातृत्वामधील दुवा रत्नागिरी : पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्याला माहिती आहेत. लेखनासह विविध कलांच्या त्यांनी केलेल्या आविष्काराचा आनंद आपण कोणत्या ना कोणत्या रूपात लुटत असतो. त्या पलीकडेही दातृत्व हा त्यांच्या जीवनाचा एक मोठा पैलू होता. समाजात तो पैलू वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्ताने
‘पुलं’ची शब्दकळा समाजजीवनाचे मर्म टिपणारी रत्नागिरी : ‘पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या लेखनात समाजजीवनाचे मर्म टिपले आणि नुसते सांगण्यापेक्षा काही तरी करून सांगावे अशी त्यांची शब्दकळा होती. ‘परफॉर्मन्स स्किल’ हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होता. तो मला भावला. त्यांच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळेमुळेच ज्यांना त्यांच्या आवाजाची सवय आहे, त्यांना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language