Ad will apear here
Next
महाराष्ट्रातील तरुण देशपातळीवर झळकले; नवलिहाळकर, मालपुरे यांना राष्ट्रीय पुरस्कार
चंद्रपूरच्या इको-प्रो बहुउद्देशीय संस्थेचाही सन्मान
ओंकार नवलिहाळकर किरेन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना

नवी दिल्ली : कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनीत मालपुरे या तरुणांना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर येथील इको-प्रो बहुद्देशीय संस्थेचाही या वेळी सन्मान करण्यात आला. केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशभरातील २० तरुण आणि तीन संस्थांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील या तीन प्रतिनिधींचा समावेश आहे.

विनीत मालपुरे पुरस्कार स्वीकारताना

नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या सर्वांचा गौरव करण्यात आला. हे पुरस्कार २०१६-१७ या वर्षासाठीचे होते. या वेळी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी, सहसचिव असित सिंह उपस्थित होते. ५० हजार रुपये रोख, पदक आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ओंकार नवलिहाळकर हा एका डोळ्याने दिव्यांग असणारा तरुण कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे. जीवनज्योत आपत्कालीन सेवा संस्था, जीवन मुक्ती आपत्कालीन सेवा संस्थांसोबत कार्य करत त्याने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत. सलाम मुंबई फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमधील शाळा तंबाखूमुक्त करण्यामध्ये ओंकारने महत्त्वाचे योगदान दिले असून, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून तंबाखूमुक्तीची शपथ घेतली आहे. दिव्यांग असूनदेखील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या झालेल्या प्रशिक्षणात संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा प्रथम क्रमांक आला आहे. संसदवारी उपक्रमांतर्गत ओंकार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

विनीत मालपुरे यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून युवा विकासाचे उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांनी हे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचविले आहे. युवा विकास कार्याच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रकुल युवा परिषदेत सहभाग घेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मालपुरे यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनानेही त्यांना राज्य युवा पुरस्काराने सन्मानित केले आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी विनीत यांना राष्ट्रीय गौरव सन्मान देण्यात आला आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि पुण्यातील क्रीडा व युवा संचालनालय यांच्या माध्यमातून विनीत यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. संगणक क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण झालेल्या विनीत यांनी जय योगेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

इको-प्रो बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळू धोत्रे पुरस्कार स्वीकारताना

चंद्रपूर येथील इको-प्रो बहुउद्देशीय संस्थेने विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन या संस्थेला राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बाळू धोत्रे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चंद्रपूर किल्ल्याची स्वच्छता करून संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी या संस्थेने केली आहे. पर्यावरण, वन्य-जीव संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, जलसंधारण आदी कार्ये या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. सामाजिक जाणिवेतून केलेल्या उत्तम सेवेची दखल राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZVDCD
Similar Posts
फक्त अडीच हजारांत ‘उडान’ नवी दिल्ली : ‘उडान’ या योजनेअंतर्गत देशात तासाभराचा विमान प्रवास केवळ अडीच हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिकांना विमानप्रवास अनुभवता यावा यासाठी ‘उडे देश का आम नागरिक’ ऊर्फ ‘उडान’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक,
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,
लॉकडाउनमध्ये मोडी लिपी शिका ऑनलाइन.. तेही मोफत..! करोना विषाणूमुळे ओढवलेल्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या हातात भरपूर वेळ निर्माण झाला. प्रत्येकाने आपापल्या परीने त्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. काही जण वेगवेगळे ऑनलाइन कोर्सही करत आहेत. अशाच पद्धतीने घरबसल्या मोडी लिपी शिकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language