Ad will apear here
Next
एका इनामदाराची संघर्षयात्रा
सांगली येथील ८४ वर्षांचे डॉ. गजानन रामचंद्र देशमुख यांनी ‘एका इनामदाराची संघर्षयात्रा’ या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांच्या पत्नी सौ. कादंबरी यांनी ते शब्दबद्ध केले आहे. हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका, पार्श्वभूमी आणि पुस्तकाचं स्वरूप सांगणारा हा डॉ. देशमुख यांचा लेख...
.........................

मी डॉ. गजानन रामचंद्र देशमुख, मनातील ‘कल्लोळ’ संयमाने शब्दबद्ध करून ‘एका इनामदाराची संघर्षयात्रा’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. माझे वडील कै. रामचंद्र दत्तात्रय देशमुख ऊर्फ इनामदार रामभाऊ देशमुख ऊर्फ भाऊ, हे सालस, सरळमार्गी, हळव्या मनोवृत्तीचे, निर्व्यसनी, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे इनामदार होते. प्रामाणिक, कष्टाळू व शिस्तीचे भोक्ते होते. त्यांच्या पोटी चार मुलींच्या पाठीवर, २८ सप्टेंबर १९३३ रोजी, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर माझा जन्म झाला. रामभाऊंचे कुलदैवत ‘श्री आत्मगजानन’ याच्या कृपेने रामभाऊ इनामदारांच्या वाड्यात जणू गोकुळच अवतरले. वाड्यातून येणाऱ्या कृष्णा घडशीच्या सुरेल सनईवादनाने हे जणू अंगापुरातील घराघरात ज्ञात झाले, की निगडी गावचा ‘दुमालदार’, अंगापूर व कामेरी गावांचा जमीनदार, दहा गावांच्या वतनांचा देशमुख इनामदार, एक एकरावर बांधलेल्या चौसोपी वाड्याचा भावी मालक दसऱ्याच्या सुमुहुर्तावर वाड्यातच जन्मला: तोही आईसारखा (ताई इनामदारीण) गोरा, देखणा व रामभाऊ इनामदारांसारखा सशक्त व रुबाबदार! असे माझ्या ‘जन्मोत्सवाचे’ वर्णन माझी आई (ताई) करायची.

त्या वेळी सारे असे आलबेल असतानाही माझ्या आतापर्यंतच्या ८४ वर्षांच्या आयुष्याच्या प्रवासाला मीच ‘एका इनामदाराची संघर्षयात्रा’ म्हणून संबोधत आहे. कारण जीवनाच्या सुरवातीला ‘मी व माझ्या इनामदार’ कुटुंबीयांनी परिस्थितीचे चटके सोसले. त्या नंतरच्या जडणघडणीच्या तारुण्याच्या काळात ‘कायद्याने व शिस्तीने वागायचे,’ या माझ्यावरील संस्कारामुळे मी कुटुंबाकरिता, वडिलांकरिता कोर्टकचेऱ्यांत माझा शैक्षणिक प्रगतीचा काळ ‘न्यायदेवतेने दिलेले’ ‘अन्यायाचे’ चटके सोसत व्यतीत केला. एक जानेवारी २०१३ रोजी (अंगारकी चतुर्थी) समाजातील राक्षसी वृत्तीचा आघात सोसला; अर्थात माझे आराध्य दैवत श्री आत्मगजाननाच्या कृपेने, यातून तावून सुलाखून बाहेर पडलो. याची मला या वयातही ना खंत ना खेद!

कालमानानुसार समाजव्यवस्था बदलत जाते. रीतीरिवाज, पोषाखातून बदल होत चाललाय. तौलनिकदृष्ट्या विचार केला, तर पूर्वीचे अशिक्षित, अल्पशिक्षित लोकांचे निर्णय आजच्या काळापेक्षा चांगले होते. आजच्या काळात सुधारणा होऊनही, म्हणावे तसे योग्य पद्धतीने कायद्याला धरून, दूरदृष्टीने विचार करून, निर्णय दिले जात नाहीत, असे दिसून येते. पूर्वी गावातील न्यायनिवाडा पाच पंच करीत. त्या व्यक्ती गावातील सर्वांना आदरणीय असत. त्यामुळे गावातील लोकांना बाहेरच्यांकडून न्यायनिवाडा करून घेण्याची वेळ येत नसे. तेव्हा गरीब वा श्रीमंत असा भेदभाव केला जात नव्हता. हे स्वातंत्र्यापूर्वी पाहायला मिळत होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीचा जन्म झाला. मतांचा हिशेब सुरू झाला. जात, पात, पंथविरहित मतदानाचे जे उद्दिष्ट होते, ते नाहीसे झाले व गट निर्माण झाले. बहुसंख्याकांचे राज्य आले. अल्पसंख्य त्यांचे बटीक झाले. त्याविरुद्ध कोणी वागले, बोलले, की त्यांचे जिणे, जगणे मुश्किल केले जाऊ लागले. त्याचा आता वारंवार वापर होऊन, हा परिपाठच सुरू झालेला आहे. त्यामुळे ज्याच्यावर अन्याय झाला, त्याला न्याय मिळेनासा झाला आहे. खासगी वस्तू व वास्तूही, न्यायदेवतेच्या आधारे सार्वजनिक झाल्या. काही न्यायदेवता पूर्वीचा इतिहास विचारात न घेता न्याय देत असलेल्या दिसून आल्या.

‘सद्रक्षणाय। खलनिग्रहणाय॥’ हे ब्रीदवाक्य पोलीस ठाण्यामध्ये किंवा या खात्याच्या मुख्य ऑफिसमध्ये अगदी ठळक अक्षरांत, अगदी सहजासहजी जनतेला वाचायला मिळते; पण त्याचा अर्थ तिथे त्याच्याच खाली बसून काम करणाऱ्यांना कळलेला दिसत नाही. याचा अनुभव मी कित्येक वेळा घेतलेला आहे. त्याचा उल्लेख माझ्या या पुस्तकात सविस्तर आलेला आहे.

हे सारे कथन करताना मी सत्यकथन, प्रांजळपणा, स्वभावचित्रण आणि तटस्थपणे, साध्या-सोप्या भाषेत निवेदन ही पद्धत वापरली आहे. स्वत:विषयी व सर्वांविषयीही मोकळेपणाने लिहिलेले आहे. जीवनात जसे घडले तसेच लिहिले. अनुभवले तसेच लिहिले. अंगापुरातील शाळा, सिटी हायस्कूल, आदी बलभीम व्यायामशाळा यांविषयी मी लिहिले आहे. ही व्यायामशाळा म्हणजे आमची तालीम, जिच्यामुळे मी उत्तम शरीरसंपदा कमावली व मला उत्तम आरोग्य लाभले. त्या वयात आदी बलभीम व्यायामशाळेचा एक उत्तम खेळाडू व पैलवान म्हणून मला सांगलीत ओळखायचे. मी सांगलीच्या सिटी हायस्कूल या संस्थेत इंग्लिश पहिली ते मॅट्रिकअखेर उत्तम शिक्षण (१९४५ ते १९५२) घेतले. त्या दोन्ही संस्थांना माझ्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिर्मित काही आर्थिक देणगी देऊन अंशत: उतराई व्हावे, ही इच्छा प्रत्यक्षात आणली आणि त्या दिवशी माझ्या मित्रांच्या पुन:श्च गाठी-भेटी घेऊन त्यांनी माझे व माझ्या कुटुंबीयांचे केलेले कौतुक ऐकून मी तृप्त झालो. ते वाचनीय व स्मरणीय आहे.

हे आत्मकथन करताना मी जीवनांत जसे घडले, अनुभवले तसे शब्दांकित केले आहे. अंगापुरातील मित्र, सांगलीतील शालेय जीवनातील, तालमीतील, कॉलेजमधील, मित्र यांच्याविषयी लिहिताना मला, ‘किती लिहू!’ असे झाले. तसेच माझी भावंडे, आजोळच्या गोतावळ्यातील व्यक्तींची व्यक्तिचित्रे, व्याही मंडळी, विहीणबाई, मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे यांची शब्दचित्रे, प्रवासवर्णने, त्यातील चित्रमयता, पर्यटनस्थळातील वर्णने माझी पत्नी, लेखिका, कवयित्री सौ. कादंबरी देशमुख हिने शब्दांत उतरवली आहेत. तिने वर्णनशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे ‘भाषेची मितव्यक्तता’ चपखलपणे दर्शवली आहे. उदाहरणार्थ - ‘उपाय थकले, १६व्या वर्षी लग्न करून, देशमुखवाड्यात नांदायला आलेल्या ताई (आई) इनामदारिणीचा तिच्या वयाच्या ८५व्या वर्षी मृत्यू झाला. ‘वाड्याने’ एक पर्व संपलेले पाहिले.’

या आत्मचरित्राच्या निमित्ताने, मी माझा भूतकाळ पुन:श्च जगलो. माझ्या स्मरणशक्तीने मला चांगली साथ दिली आहे. त्यामुळेच कुटुंबातल्या घडामोडी, हृदय प्रसंग, ग्रामीण भागात प्रॅक्टिस करताना मला आलेले चांगले-वाईट अनुभव; घरासाठी, मंदिरासाठी कराव्या लागलेल्या न्यायालयीन-प्रशासकीय खटपटी आणि त्या वेळी मनात आलेल्या भावना मांडल्या आहेत. माझे मित्र एस. ए. लिमये यांचा दुजोरा व प्रेरणा, प्रा. मा. के. यादव यांचा ‘लकडा’ यामुळे हे आत्मचरित्र कागदावर शब्दरूपाने प्रकटले.

हे माझे अक्षरधन देशमुख घराण्यातील देशमुखांकरिता लिहून ठेवून लौकिक अर्थाने कृतार्थ जीवन जगत आहे. तरीही आता माझे डोळे क्षितिजाच्या पलीकडे उभ्या असलेल्या देवदूतांकडे लागले आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवसाला मी एक डॉक्टर म्हणून ‘थँक यू’ म्हणत आहे.

पुस्तक : एका इनामदाराची संघर्षयात्रा
लेखक : डॉ. गजानन रामचंद्र देशमुख
शब्दांकन : सौ. कादंबरी गजानन देशमुख
पाने : ३२०
मूल्य : ३२० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वर ३०४ रुपयांना उपलब्ध आहे.)

संपर्क : डॉ. गजानन रामचंद्र देशमुख
पत्ता : ‘गोकुळ’, प्लॉट नं. ४, जय मल्हारनगर,
सदर बझार एरिया, सातारा - ४१५००१
मोबाइल : ९४०५५ ४२४५५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZIEBE
Similar Posts
पोटली परदेशात राहणारे भारतीय ही आता नवीन गोष्ट राहिली नसली, तरी अद्याप त्यांच्या विषयीचे कुतूहल कायम आहे. कारण त्यांना येणाऱ्या अनुभवांचे वेगळेपण आणि त्यांचे आचार-विचार हे त्या कुतूहलास कायम आहे. कारण त्यांना येणाऱ्या अनुभवांचे वेगळेपण आणि त्यांचे आचार-विचार हे त्या कुतूहलास कारणीभूत ठरतात. दुबई-अबुधाबी आणि
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके... रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरप्यासारख्या लहानशा गावातून एक मुलगा पुण्यात पोहोचला आणि नंतर त्याच्या स्वप्नांनी त्याला थेट अमेरिकेत नेऊन पोहोचवलं. अमेरिकेत जाऊनही त्यानं आपलं मूळ गाव साखरपा आणि पुणे यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. या तरुणाचं नाव आहे मंदार मोरेश्वर जोगळेकर! ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या
मनात रेंगाळणाऱ्या कथा मानवी मनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवणाऱ्या चार दीर्घकथा दीप्ती मडी यांनी ‘मंचल’ या कथासंग्रहाद्वारे वाचकांसमोर आणल्या आहेत. ‘मनातल्या चलबिचलीच्या कथा’ असं या पुस्तकाचं उपशीर्षक असलं, तरीही या कथांमधून त्यातील पात्रांच्या विचारांमध्ये असलेला ठामपणा आपल्याला जाणवतो. या कथासंग्रहाचा हा परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language