Ad will apear here
Next
मौनाची गुपिते उलगडणारी आत्मकथा
मार्गस्थ - भाग १महानुभाव पंथाच्या बा. भो. शास्त्री यांचे ‘मार्गस्थ’ हे आत्मचरित्र औरंगाबादच्या आदित्य प्रकाशनाने दोन भागांत प्रकाशित केले आहे. ‘मार्गस्थ’ हा केवळ ‘स्व’चा शोध नाही, तो माणूसपणाचाही शोध ठरतो. महानुभावांनी अनुसरलेल्या ज्ञानमार्गाच्या वाटचालीची सद्यस्थिती त्यातून ध्यानात येते. एक उपदेशी, एक साधक, एक महंत कसा घडतो हे या आत्मकथेतून डोकावत राहते. स्वतःविषयी न बोलणाऱ्या महंताचा आतला आवाज ‘मार्गस्थ’मध्ये उमटलेला आहे. म्हणूनच ही मौनाची गुपिते उलगडणारी अनोखी आत्मकथा ठरते. या पुस्तकाविषयी...
............
आत्मपर लेखनाची भिन्न भिन्न क्षेत्रे मराठी साहित्यात दाखविता येतात. आत्मचरित्र, आत्मकथन, स्वकथन, अनुभवकथन अशा नावांनी लेखन केले जाते. इतिहास आणि कादंबरी या दोन्हींच्या सीमारेषांवर घुटमळणारा हा वाङ्मयप्रकार आहे; पण त्यातून मानवी जीवनाचे अनेक कंगोरे धुंडाळता येतात. आत्मचरित्रकार ज्या क्षेत्रातील आहे तेथील बहुविध अनुभव या लेखनात मांडले जातात. मराठीत अशा भिन्न क्षेत्रीय लेखनाला बराच वाव मिळालेला आहे. त्यामुळेच बाराव्या शतकापासून विविध धर्म, पंथ वा संप्रदायांतील संतसत्पुरुषांनी जी वाङ्मयनिर्मिती केली, त्यातही आत्मपर लेखन केलेले आढळते; मात्र ते काहीसे संकोच करून लिहिलेले आहे. ‘स्व’चा लोप करणे याला त्यात प्राधान्य आहे. या सर्व बाबी ध्यानात घेऊन ‘मार्गस्थ’चा विचार करता येतो. महानुभाव पंथाच्या बा. भो. शास्त्री यांचे हे आत्मचरित्र दोन भागांत प्रकाशित झाले आहे. 

वर्तमान स्थितीत पंथीय विचारधारा स्वीकारलेल्या महंताचे हे पहिलेच आत्मचरित्र मानावे लागेल. महानुभाव पंथात लिहिले गेलेले वाङ्मय सांकेतिक लिपीत बद्ध असल्याने मराठी रसिकांसमोर येण्यास खूपच विलंब लागला. त्यांच्या सर्वच वाङ्मयामध्ये पंथीय दृष्टी प्रधान होती. तथापि अन्य ललित वाङ्मयामध्ये पंथीयांचा फारसा संबंध दिसत नाही; मात्र अलीकडच्या काळात कविता, कादंबरी असे वाङ्मयप्रकार हाताळण्यास प्रारंभ झाला आहे. वाङ्मयाचा हा ‘खुला व्यवहार’ साहित्य क्षेत्रात भर घालणाराच आहे. शास्त्रीजींच्या मते, ‘ज्यांनी मराठीतला आद्यग्रंथ लिहिला, आजपर्यंत साडेसहा हजार ग्रंथांची भर टाकली ते महानुभाव साडेसातशे वर्षांपासून अबोल राहिले. स्वतःला लपवत राहिले. हा धागा पकडून मी बोलायचं ठरवलं...स्वतःबद्दल.’
 
स्वकथनाची ही भूमिका बोलण्याची, संवादाची आहे. परमार्थाच्या क्षेत्रात वावरणाऱ्या एका उपासकाची, साधकाची, महंताची ही जीवनगाथा आहे. अतिशय नितळ, पारदर्शी; पण तितकेच परखडपणे हे लेखन झालेले आहे. बा. भो. शास्त्रींचा प्रांजळपणा व सत्यकथनाची दृष्टी या अनुभवकथनामधून प्रकटली आहे. एका महंताचा खडतर प्रवास उलगडणारे हे लेखन आहे. ‘मार्गस्थ’च्या पहिल्या भागात बाभूळगावकर शास्त्रींच्या जगण्याचा पूर्वार्ध उलगडत जातो. पंथदीक्षा घेण्यापूर्वीचे त्यांचे जगणे आणि दीक्षेनंतरचे जीवन यांचा विस्तृत पट मांडलेला दिसतो. त्यांच्या कौटुंबिक जीवनातील चढ-उतार त्यात प्रतिबिंबित झालेले आहेत. जन्म देणारी खरी जन्मदात्री आणि वडील कोण आहेत हे उशिराने कळल्यानंतरची उलघाल वाचकालाही अस्वस्थ करणारी ठरते. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे सैरभैर झालेले जीवन हा त्यांच्या जीवनक्रमातला चटका लावणारा भाग आहे. वयाच्या सतराव्या वर्षी अक्षरांची ओळख झालेला हा ‘महंत’ वारकरी पार्श्वभूमी असणारा आहे. साहजिकच या दोन्ही संप्रदायांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहेच; पण त्याचबरोबर या काळात मधुकरराव चौधरी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. अ. ना. देशपांडे यांच्या व्याख्यानांचा प्रभावही शास्त्रीजींवर पडलेला आहे. 

डॉ. रा. बो. मेश्राम यांची भेट व अन्य ज्येष्ठ व्यक्तींचा सहवास यामधून तयार झालेल्या त्यांच्या वैचारिक मांडणीचे वेगळेपण ध्यानात येते. नैतिकतेचा संस्कार आणि संस्कृती यांचा धर्माशी असणारा संबंध व यातून जातविरहित समाजव्यवस्था या विषयीचे चिंतन ‘मार्गस्थ’मध्ये प्रकट होते. महानुभाव पंथ ‘मार्ग’ या नावानेही ओळखला जातो. सर्वज्ञ श्रीचक्रधर यांनी ‘जीवोद्धरणाचे’ कार्य स्वीकारले होते. त्या काऱ्याशी समरस होत केलेली वाटचाल पहिल्या भागातून प्रकटली आहे; पण हा केवळ प्रारंभच असल्याने बाभूळगावकर शास्त्रींच्या संवेदनशील प्रवृत्तीचे दर्शन त्यातून घडते. 

‘मार्गस्थ’चा दुसरा भाग शास्त्रीजींच्या जीवनाचा शोध घेणारा आहे. विविध घटना-प्रसंगांचे अन्वयार्थ लावण्याचा प्रामाणिक व तटस्थ प्रयत्न त्यात आहे. अन्य पंथ-संप्रदायांपेक्षा महानुभावांची उपासना पद्धती, त्यांचे तत्त्वज्ञान, आश्रमव्यवस्था, पोशाख यात खूपच वेगळेपण आहे. त्यांची समूह अभ्यासाची रीतही निराळी आहे. कालौघात भौतिक समृद्धी आल्यानंतर बदलत गेलेले जीवन, विचारांमध्ये होत गेलेले स्थित्यंतर, पंथप्रचाराच्या पद्धतीत झालेले बदल हे दूर राहून लक्षात येणारे नाहीत. महानुभाव पंथातील अधिकारी व्यक्ती, महंतच नेमकेपणाने यावर भाष्य करू शकतात. ‘मार्गस्थ’मध्ये आलेल्या आत्मकथेतून याचे नकळत दर्शन घडते. वाचकाला पंथाविषयी अनभिज्ञ असणाऱ्यालाही त्या सहज उमजू शकतात. कारण शास्त्रीजींची भाषा प्रवाही आहे. तिला लालित्यपूर्णतेची जोड आहे. प्रसंग खुलविण्याची त्यांची हातोटीही विलक्षण प्रभावी आहे. महंत नागराजबाबांविषयी ते लिहितात तेव्हाही हे सहज लक्षात येते. 

‘लहान वयात महंती झाली. तेव्हापासून संघर्ष सुरू झाला. आश्रम बांधला म्हणून पंथाने नावे ठेवली. गाडी घेतली म्हणून टीका झाली. विमानात प्रवास केला म्हणून टीकास्त्र सोडलं. लिपीतल्या पोथ्या छापल्या म्हणून बदनाम केलं, झाडं लावतात, विधी पाळत नाही, निषेध टाळत नाहीत अशीही चर्चा होत होती. अन्य संन्याशांत मिसळतात, अन्य भजन करतात, अन्य कार्यक्रमाला जातात म्हणून विकल्पदोष लावला; पण हा योद्धा संन्याशी तसूभरही विचलित झाला नाही.’ (पृ. १५०) इथे हेही लक्षात येते, की भाषाच केवळ प्रभावी नाही, तर पंथामधील अंतर्गत धुसफूस त्यात जाणवते. स्पष्टवक्तेपणाची लेखकाची भूमिकाही लक्षात येते. महंत नागराजबाबांचे प्रागतिक विचार, काळाबरोबर बदल स्वीकारण्याची त्यांची वृत्ती याचेही सूचन शास्त्रीजी करतात.

आपल्या वाटचालीत महानुभाव व वारकरी यांच्यामध्ये झालेल्या विचारसंघर्षाची नोंदही येते. ‘माझं माहेर वारकरी व सासर महानुभाव आहे. माहेर व सासरच्या संघर्षात सापडलेल्या मुलीसारखी माझी अवस्था झाली होती,’ अशी जाहीर कबुलीच शास्त्रीजींनी दिलेली आहे. महानुभाव पंथाची नालस्ती करणारे लेख जेव्हा छापले गेले, तेव्हा वैचारिक पातळीवर ‘आम्हीबी घडलो, तुम्हीबी घडा ना’ हे पुस्तकलिहून बाभूळगावकर शास्त्रींनी त्याला उत्तर दिले. वारकरी संतांविषयीची आदरभावना मनात असल्याने समन्वयाची भूमिका त्यांनी स्वीकारली. या प्रसंगी मदत करणाऱ्या वारकरी सत्पुरुषांची कृतीही शास्त्रीजींनी अधोरेखित केलेली आहे. हे लिहिताना त्यांची भूमिका कुठेही पक्षपाती झालेली नाही. ‘मार्गस्थ’ हे महंत बाभूळगावकर शास्त्रींचेच केवळ आत्मचरित्र नाही. महानुभाव पंथाच्या वाटचालीचे, पंथात होणाऱ्या बदलांचे, पंथाच्या बऱ्या-वाईट गोष्टींचे, पंथातील व पंथीयेतर व्यक्तींचे, पंथप्रचारासाठी केलेल्या कामाचे, जाणीवपूर्वक केलेल्या प्रयोगांचे दर्शन घडविणारे हे लेखन आहे. लेखन क्षेत्रात आलेल्या साहित्यिकांचे संदर्भ त्यात येतात. प्रारंभीच्या पुस्तक प्रकाशनाचे अनुभव मांडले जातात. कितीतरी मोहाचे क्षण येतात, मग निर्णयही चुकू शकतो याची नोंद केली जाते. पंथातील संप्रदायविशिष्ट शब्दांचेही दर्शन या लेखनातून घडविले जाते. उदा. महंती, झेंडा, लघुचिंतनी, महाचिंतनी इत्यादी. महानुभाव पंथातही कीर्तन असते; पण कीर्तनाबद्दल पंथीयांना आदर नव्हता. संगीतालाही मान नव्हता. ही कीर्तनपरंपरा रुळविण्याचा प्रयत्नही शास्त्रीजींनी केला. 

ब्रह्मविद्या प्रवचन, शास्त्री संमेलन, महाचिंतनी असे प्रयोग केले गेले. पंथात असणारी जाहीर पोथी करण्याची पद्धत इतरांना ज्ञात नाही, त्याचीही नोंद या आत्मकथेत येते. ‘भेटकाळ’ नावाचा प्रसिद्ध कार्यक्रम आज लुप्त झाला आहे. अशा बारीकसारीक गोष्टी या आत्मकथेतून पुढे येतात. पंथीयांच्या जगण्याचे हे पैलू ‘मार्गस्थ’मधून माहीत होतात. प्रत्यक्ष पंथात पंथमान्य गाद्यांवर दोन दोन महंत असणे, त्यातून गट, तट, कलह होणे, हेवेदावे झाल्याने विद्वानांमध्ये तेढ, तणाव निर्माण होणे, सत्तेसाठी प्रयत्न करणे या पंथातील विकृतीचे सूचन करण्यातून पंथाच्या काही मर्यादांनाही पुढे आणले जाते. पंथाची म्हणून एक व्यवस्था आहे. महंती असणे हा आश्रमव्यवस्थेशी निगडित असणारा भाग आहे. ‘श्रीचक्रधरांनी सांगितलेली जीवनमूल्ये लोकांना सांगून फाटत चाललेलं माणूसपण सांधणं हे आमचं ध्येय होतं,’ ही शास्त्रीजींची भूमिका होती. या साध्या गोष्टींचे प्रतिबिब ‘मार्गस्थ’मध्ये आहे. सर्वज्ञ विद्यापीठाची निर्मिती, पंथाच्या अभ्यासक्रमाची मांडणी याविषयीचे शास्त्रीजींचे विवेचन त्यांच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडवते, तर दुसऱ्या बाजूला पप्पू, राजा, हिरा यासारख्या व्यक्तींशी येणारे आत्मीय संबंध बाभूळगावकर शास्त्रींच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकतात. पंथीय व पंथीयेतर विविध व्यक्तींची व्यक्तिचित्रे यात आलेली आहेत. महानुभाव पंथातील एका महंताची असणारी ही आत्मकथा स्वतःच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. 

पंथसंप्रदायात ईश्वरभक्ती, उपासना पद्धती, आचरण पद्धती यांच्याशी समरस झालेली अधिकारी व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा लोप करून भक्तिमय होत जाते. आत्मलोपाची भावना मनात ठेवूनही महंत बाभूळगावकर शास्त्री मात्र ‘स्व’ला शोधण्याची धडपड करताना दिसतात. ‘मार्गस्थ’ हा केवळ ‘स्व’चा शोध नाही, तो माणूसपणाचाही शोध ठरतो. महानुभावांनी अनुसरलेल्या ज्ञानमार्गाच्या वाटचालीची सद्यस्थिती त्यातून ध्यानात येते. महानुभावांची आश्रमव्यवस्था, त्यांची कार्यपद्धती यांचा ओझरता का होईना, पण परिचय होतो. खरे तर एक उपदेशी, एक साधक, एक महंत कसा घडतो हे या आत्मकथेतून डोकावत राहते. स्वतःविषयी न बोलणाऱ्या महंताचा आतला आवाज ‘मार्गस्थ’मध्ये उमटलेला आहे. म्हणूनच ही मौनाची गुपिते उलगडणारी अनोखी आत्मकथा ठरते.

गेल्या काही वर्षांमध्ये चांगल्या आणि प्रामाणिक अशा आत्मचरित्राची वानवा आहे, असे स्पष्टपणे दिसून येत होते. काही आत्मचरित्रे आता काळाच्या रगाड्यात मागे पडलेली आहेत. काही काळाच्या कसोटीवर जगण्याचा एक नवा मापदंड म्हणून अजूनही अधोरेखित आहेत. काही आत्मचरित्रे ही काजव्याच्या प्रकाशाप्रमाणे अल्पजीवी ठरली, तर काही बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये दीपस्तंभ म्हणून आजही स्थिरपणे उभी आहेत. आयुष्यातील अंधारामध्ये पथदर्शक म्हणून त्यातील आजही वाचली जातात; पण सामान्य माणसांच्या चरित्रामध्ये अजून काय असायला हवे, हाही एक प्रश्न आहे. सामान्य माणसाच्या जगण्याचा कॅनव्हास हा असून असून केवढा असणार? त्यात भरून भरून किती रंग भरणार आणि भरले तरी ती रंगसंगती चांगली कशी दिसणार. असे विविधरंगी चित्र नेहमीच चांगले दिसते, असेही नाही. बऱ्याचदा ते बेढब दिसू शकते किंवा गोंधळात टाकणारेही असू शकते. अनेक रंगांच्या संमिश्रणातून नेहमीच सौंदर्यच व्यक्त होते असे नाही. बऱ्याचदा नकोसा वाटणारा मिलाफ दिसून येतो. एकरंगी चित्रामध्येही असेच बऱ्याचदा आढळते. एकाच रंगाच्या विविध छटा योग्य तशा वापरल्या गेल्या नाहीत, तर चित्र हे कंटाळवाणे वाटण्याचा संभव जास्त असतो. माणसाच्या आयुष्याचेही असेच असते. ते एकरंगी, एकसुरी असेल तरीही कंटाळवाणे असते आणि अनेक रंगाचे असेल तर जास्त भडक असते. 

काही आत्मचरित्रे ही फोटोग्राफसारखी असतात. व्यक्तीसोबत त्याचा भवताल आणि अनावश्यक अशा फाफटपसाऱ्याचे अपरिहार्य असे चित्रण त्यात आढळून येतं. प्रत्येकाच्या जगण्यात असे काही असतेच; म्हणून त्याचे चित्रण आत्मचरित्राच्या सारांशाला पोषक असतेच असे नाही. मग अनावश्यक, अपरिहार्य अशा गोष्टींनी ते बेंगरूळ झाल्यासारखे वाटते. काही आत्मचरित्रे ही पोर्ट्रेटसारखी असतात. व्यक्तिमत्त्वसापेक्ष काही महत्वाच्या रेषांना इथे स्थान असते. फाफटपसारा दूर सारला जातो. लेखकाचे प्रामाणिक मत त्यामध्ये व्यक्त होत असते. आयुष्यात कोणत्या गोष्टींना त्याने महत्त्व दिले आणि आपले आयुष्य कसे उभारले हे त्यातून स्पष्टपणे दिसून येते; पण गेल्या काही वर्षांमध्ये अशा चरित्रांची तशी वानवा होती. 

‘मार्गस्थ’ हे बा. भो. शास्त्री यांचे आत्मचरित्र हे यातील दुसऱ्या प्रकारातील आहे. त्यात ना अनेक रंगांचा गोंधळ घातलेला आहे, ना ते एकरंगी आहे. मोजक्या रंगांनी चितारलेले ते सुंदर चित्र आहे. त्याची रंगसंगती जशी मनमोहक आहे, तशीच ती अर्थवाही आहे. केवळ वेधकच आहे असे नाही, तर वेधून घेतल्यानंतर बोध देण्याची क्षमताही तिच्यामध्ये आहे. आत्मचरित्राला आजकाल सेल्फी असे म्हटले जाते; पण ते सेल्फीतल्या छायाचित्रासारखे नाहीये. सेल्फीतील छायाचित्र उलटे असते. ते समजून सुलटे करून बघावे लागते. तसली व्यामिश्रता ... वा अवघडलेपणा शास्त्रीजींच्या व्यक्तिमत्त्वातच नाहीये, तर शब्दांत कुठून येणार?  

त्यामुळे ते सेल्फी असले तरीही सुलट आहे. आणि वळून स्वतःकडे टाकलेला एक दृष्टिक्षेप असला तरीही ते छायाचित्राप्रमाणे अनावश्यक आणि अपरिहार्य अशा फाफटपसाऱ्याने भरलेले नाहीये, तर आवश्यक आणि गरजेपुरत्याच संदर्भाने ते भारलेले आहे. थोडक्यात, ते स्व-व्यक्तिमत्त्वसापेक्ष काही मोजक्या रंगांच्या रेषांनी काढलेले सेल्फ-पोर्ट्रेट आहे. असे असूनही ते प्रामाणिक आहे, त्यात कुठलीही अहंमन्य भूमिका नाही, आत्मप्रौढी नाही. आयुष्यात घडलेल्या घटना, गुदरलेले प्रसंग आणि कराव्या लागणाऱ्या तडजोडी यांची एक प्रामाणिक स्वीकृती त्यामध्ये आहे. असे अस्सल चरित्र तसेही दुर्मीळ असते. 

शास्त्रीबुवांचे वयाच्या वीस एकवीस वर्षांपर्यंत होणारे ‘सक्तीचे आणि हक्काचे’ शिक्षणच झालेलेच नाहीये, हे ऐकून आपल्याला धक्का बसू शकतो. बऱ्याचदा अनेक उच्च विद्याविभूषित व्यक्तीने त्याच्या आयुष्यात पाठ्यपुस्तकाखेरीज काहीही वाचलेले नाही आणि लिहिलेलेही नाही, हे कळल्यावरही असाच धक्का बसतो. मग यात विस्मयकारक काय आहे? पण यात काही साधर्म्य आणि वैधर्म्यही आहे. साधर्म्य केवळ धक्का बसण्याचे आहे. वैधर्म्य हे आहे, की त्या अज्ञान स्थितीतून ज्ञानसंपन्नतेकडे जाणारा एक प्रवास त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे. आणि केवळ एवढेच नाही तर महंताची वस्त्रे अंगावर वागवण्याइतकी निर्वेद स्थितीही त्यांच्या अंगी बाणलेली आहे. शास्त्रीजींच्याच शब्दांत सांगायचे झाले तर ‘लहान मुलांचं अज्ञान हे अजाणता अज्ञान असतं व संन्याशाचं अज्ञान हे जाणतं अज्ञान असतं. त्यालाच शास्त्रीय भाषेत निर्वेद म्हणतात. वेद म्हणजे जाणणे व निर्वेद म्हणजे जाणून अजाण होणे.’ सर्व काही जाणल्यानंतर येणारी तटस्थता ही केवळ ज्ञानोत्तर उदासीनता असते. कृत म्हणजे केलेली कर्मे आणि अकृत म्हणजे न केलेली, पण मनात संकल्प केलेली कर्मे ही मानवाच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण करतात. नुसता कर्माचा विचारही मनात सूक्ष्म आणि अतूट असे बंध तयार करतो. ज्ञानोत्तर उदासीनता ही या बंधनातून सुटका देणारी तटस्थता आणू शकते. ही निर्वेद स्थिती ...तटस्थताच ‘मार्गस्थ’चे लेखन करताना शास्त्रीजींच्या लेखणीतून स्रवत होती हे दिसून येते. 

शास्त्रीजींच्या आयुष्यात स्थित्यंतर घडवणारे काही प्रसंग ‘मार्गस्थ’च्या पहिल्या भागात आहेत. तोही भाग वाचनीय असणारच पण त्या स्थित्यंतरामध्ये ते जगायला शिकले आणि जीवनाचे सारतत्त्व त्यांना उलगडले हे नक्की! ‘जीवन वेगळे आणि आयुष्य वेगळे. आयुष्याला लांबी, रुंदी असते, जीवनाला खोली व धवलता असते. जे पाण्यासारखे स्वच्छ, मधुर व शीतल असते, त्याला जीवन म्हणतात. गंगेच्या पाण्याचे तीर्थ गंगा सागराला मिळेपर्यंत घेतात. सागरात मिळाल्यानंतर ते खारट होते, अशुद्ध होते. मग ते गंगोदक राहत नाही.  असेच आहे मानवी जीवनाचे,’ हे जीवनाचे निर्मळ आणि नितळ असे परीक्षण त्यांनी करून दाखवले आहे आणि हे स्वानुभवावर आधारित आहे, त्यात कुठेही पांडित्याच्या प्रदर्शनाचा लवलेश नाही किंवा उपदेशाचा आवही नाही. त्यात जे द्रष्टेपण आहे, ते मात्र शब्दांआडून सहजपणे डोकावते. त्याचे दर्शन पूर्ण पुस्तकभर होत राहते... ते पाहण्यासारखे आहे. 

पुस्तकात पानापानातून आणि त्यातील प्रत्येक वाक्यातील शब्दांतून सर्वज्ञांविषयी आणि एकंदरच महानुभाव संप्रदायाविषयी सतत एक समर्पणाचा, श्रद्धेचा भाव स्रवत असल्याची जाणीव आपल्याला होत राहते. तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे ‘काय वर्णूं मी या संतांचे उपकार। मज निरंतर जागविती।।’ असा एक सश्रद्ध भाव दिसून येतो. ग्रंथ वाचून परमात्मवस्तू समजते; पण उमजत नाही. प्रत्यक्ष अनुभूती हवी असेल तर संतांचा सहवास हवा. ग्रंथातील शास्त्रप्रचितीला आत्मप्रचितीत रूपांतरित करण्याची किमया संतांना साधलेली असते. म्हणून जगण्याचे कौशल्य संत शिकवतात. संतांच्या शब्दांचा आधार हा साधकाला इतर कुठल्या मार्गदर्शक ग्रंथापेक्षा मोलाचा वाटतो, कारण संत स्वानुभूतीतून बोलत असतात. या साऱ्या गोष्टींचा अनुभव स्वतः शास्त्रीबुवांनी घेतलेला आहे, असे त्यांच्या संयमित आयुष्यावरून दिसून येते. त्यांच्यातील ऋजुता ही पानापानांमधून डोकावत राहते. अंतर्मनातील भाव हे जास्तच हळुवार, पण परिवर्तनशील आहेत, याची जाणीव आपल्याला होतच राहते. महानुभावीय साहित्याचे ते तसेही व्यवच्छेदक लक्षण आहे. महानुभाव साहित्यात असे मर्मस्पर्शी लेखन होतच असल्याचे पुरावे आहेत. मायमराठीच्या दालनात समृद्धता आणण्याचे काम महानुभाव साहित्याने केलेच आहे. आता आत्मचरित्राच्या दालनात प्रवेश करण्याचे नवे महाद्वार ‘मार्गस्थ’च्या निमित्ताने उघडत आहे, ही गोष्टी अत्यंत मोलाची आहे. 

आणि या साऱ्या गोष्टींचा अभ्यास त्यांचा आहे, त्याचा सार्थ असा अभिमानही ते व्यक्त करतात. महानुभाव साहित्याविषयी आणि पंथाविषयी नकोशी असणारी भावना सगळीकडे दाटून आलेली असली, तरीही ती दूर करण्याचा प्रयत्न पूर्वापारपासून सगळ्यांनीच केल्याचीही नोंद ते देतात. आता काही जणांना महत्त्व पटत असल्यामुळे लोकांच्या त्याकडे बघण्याच्या बदलत्या दृष्टीचाही उल्लेख करायला ते विसरत नाहीत. 

‘एखाद्या नकोशा वाटणाऱ्या गोष्टीतली गुणवत्ता कळली, की तीच हवीशी वाटणं हा माणसाचा स्वभाव आहे. नको वाटत असलेल्या कारल्याची भाजी करून खाणं, फेकून दिलेला कचरा उपयोगात आणणं हे त्यातलंच. सापाच्या विषाची भीती वाटत असताना त्यात सर्व विषहारक औषधीपण आहे, हे कळतं आणि भीतीचं प्रीतीत रूपांतर होतं. शेणामध्ये ऊर्जा आहे हे आपल्याला कळताच आपण गोबरगॅस तयार केला. महानुभाव तर अनुभवाचा साठा आहे. मराठीला श्रीमंत करणारा, कवितेला शृंगार चढवणारा, भाष्याला गांभीर्य 
देणारा, मराठीत महाकाव्य निर्माण करून नवरसांचे पाट तयार करणारा हा पंथ आहे,’ या शब्दांत ते महानुभाव संप्रदायाचा गौरव सांगायला विसरत नाहीत. 

लौकिकार्थाने शिक्षण न झालेल्या शास्त्रीबुवांनी शिक्षणावाचून माणसाचे अडते, हे वाक्य खोटे ठरवले आहे. लौकिक शिक्षण होऊनही फारसे आयुष्यात काही मौलिक न करणारी हजारो माणसे असतात. आणि केवळ शिक्षण हे काही शहाणपणाचे साधन नाही. अनुभवश्रीमंती ही खऱ्या अर्थाने माणसाला शहाणे बनवते. ती श्रीमंती त्यांच्या लेखनातून जाणवत राहते. अतिशय साध्या, सोप्या शब्दांमध्ये तत्त्वज्ञानाची उकल करण्याची एक किमयाही त्यांना साधलेली आहे. उदाहरणे देतानाही व्यवहारातील सहज आढळणारी अशीच ते देतात. त्यासाठी कुठलीही ओढाताण केल्याचे जाणवत नाही. मांडणीमधील रसाळता, गोडवा त्यांच्यातील कीर्तनकाराचे दर्शन घडवते. अत्यंत मार्मिक असे विनोद सगळीकडे विखुरलेले दिसून येतात; पण त्यामध्ये रंजन हा हेतू नसून एक अन्वयार्थ दडलेला असतो. लेखनातील सुलभता ही त्यांच्यातील सरावलेल्या लेखकाच्या लेखनकौशल्याची खात्री पटवते. एकंदरच पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. 

संप्रदाय आणि त्यातील आचारविचार, परंपरा आणि नवता, सर्वंकषता आणि पारदर्शिता, सर्वसमावेशकता आणि निष्ठा अशा अनेक वरकरणी विवादास्पद आणि बऱ्याचदा परस्परविरोधी वाटणाऱ्या, पण सहजी आचरणीय अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह केलेले हे आत्मचरित्र अतिशय मौलिक असे आहे. केवळ महानुभाव साहित्याचा वाचकच नव्हे, तर इतरांनीही हे एका चिंतनशील व मनस्वी साधकाने स्वच्छपणे, प्रामाणिकपणे लिहिलेले आत्मचरित्र वाचावे असेच आहे. मराठी साहित्याच्या आत्मचरित्राच्या दालनामध्ये ‘मार्गस्थ’चे अस्तित्व प्रखरपणे जाणवावे, इतके ते महत्वपूर्ण आहे हे नक्की! 
 
मार्गस्थ 
लेखक : बा. भो. शास्त्री
प्रकाशक : आदित्य प्रकाशन , औरंगाबाद 
पृष्ठे : १५६
मूल्य : २०० रुपये
पृष्ठे : २००
मूल्य : २५० रुपये
संपर्क  : (०२४०) २३५४५४२, ८०८७७ ३१८९८

(‘मार्गस्थ’चे दोन्ही भाग ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZNUBI
Similar Posts
यशवंत संस्कृती : यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तित्वाचा बहुआयामी वेध ‘हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री’ असे ज्यांचे यथार्थ वर्णन केले जाते, ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज (१२ मार्च) जन्मदिन. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारा ‘यशवंत संस्कृती : नेतृत्व आणि कर्तृत्व’ हा ग्रंथ विलास फुटाणे यांनी आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केला आहे
वास्तवाला भिडणारी कविता सनदी अधिकारी असलेल्या डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे ‘चांदणं उन्हातलं’ आणि ‘आकांत शांतीचा’ हे दोन काव्यसंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहेत. या काव्यसंग्रहांची ही ओळख...
‘आकांत शांतीचा’... सामाजिक क्रांतीचा! प्रशासकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी लिहिलेल्या कवितांचा ‘आकांत शांतीचा’ हा कवितासंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. डॉ. भापकरांच्या या काव्यसंग्रहातून सौंदर्यपूर्ण काव्याने ओतप्रोत असलेल्या शब्दांची शृंखला उलगडत जाते. या काव्यसंग्रहाबद्दल...
मार्गस्थ (भाग १) महानुभाव पंथातील प्रसिद्ध बा. भो. शास्त्री यांच्या आत्मचरित्राचा हा पहिला भाग आहे. महानुभाव पंथाच्या चाकोरीच्या आत आणि बाहेर त्यांनी मुक्त संचार केला. महानुभाव पंथ ते अक्षरशः जगले. साहजिकच पंथहिताच्या दृष्टीने जे योग्य आहे, ते सर्व या पुस्तकात आले आहे. मात्र, त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केला. आयुष्यातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language