Ad will apear here
Next
ऑर्गनवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या आठवणी
पं. गोविंदराव पटवर्धन३० जानेवारी हा नामवंत ऑर्गनवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘सूररंगी रंगले’ सदरात मधुवंती पेठे आज लिहीत आहेत त्यांच्या आठवणी...
............
मी आज एका अशा ज्येष्ठ वादक कलाकाराबद्दल सांगणार आहे, ज्यांनी आपल्या हार्मोनिअमवादनानं मराठी रंगभूमीवरचं नाट्यसंगीत रसिकांच्या मनांत जिवंत ठेवलं. ते कलाकार म्हणजे सुप्रसिद्ध ऑर्गनवादक आणि हार्मोनिअमवादक पं. गोविंदराव पटवर्धन. 

पं. गोविंदराव पटवर्धन हे नाव घेतलं, की डोळ्यांसमोर उभी राहते ती त्यांची वामनमूर्ती. हात ऑर्गनवर किंवा हार्मोनिअमवर... संपूर्ण लक्ष गायक कलाकाराकडे... डोळे किलकिले... चेहऱ्यावर मंद स्मित. 

बाकी ते इतरांसाठी कितीही मोठे कलाकार असले तरी माझे मात्र काका. माझ्या लहानपणापासून मी त्यांना ओळखते ते सर्वांत आधी माझे काका म्हणूनच. आमच्या अप्पांचा त्यांच्यावर आणि त्यांचा अप्पांवर फार लोभ. माझ्या वडिलांना ते ‘एपी’ म्हणायचे, तर अप्पा त्यांना ‘ए गोविंदा.’ 

आमच्या चेंबूरच्या श्रीराम संगीत विद्यालयातर्फे दर वर्षी साजऱ्या होणाऱ्या गानमहर्षी संगीत महोत्सवामध्ये काका हार्मोनिअमसाथीला असायचे. १९६६पासून १९७८ पर्यंत... अगदी सलग बारा वर्षं. 

त्यांनी अनेक कलाकारांना हजारो मैफलींमध्ये हार्मोनिअमसाथ केली. अगदी सावलीसारखी स्वरसाथ. कलाकार कोणत्याही घराण्याचा असू दे, त्याची गायकी सही न सही त्यांच्या साथीमध्ये दिसायची. त्याचप्रमाणे अनेक संगीत नाटकांच्या दहा हजारांवर प्रयोगांना ऑर्गनची साथ त्यांनी केली. नाट्यसंगीताच्या साथीत तर पदाचा शब्द न् शब्द ऐकू यायचा. लहानपणापासून मी पाहिली, ऐकली ही त्यांची ‘गाणारी हार्मोनिअम.’ 

ते आमच्या घरी नेहमी यायचे. तेही कधी...? तर दादरच्या शिवाजी मंदिरचा संगीत नाटकाचा प्रयोग वाजवून रात्री साडेबाराला. इतक्या रात्री घराची बेल वाजली की समजून जायचं.... काका आले. आम्ही मुलं झोपली असलो, तर हलवून उठवायचे अन् म्हणायचे.... ‘झोपली होतीस होय.. बरं झोप झोप...’

मग कुठले आम्ही झोपायला! माझ्या आईची बिचारीची धांदल उडायची. सगळ्यांचं आदरातिथ्य करायची तिला सवयच पण घरातलं दूध नेमकं संपलेलं असायचं. काका म्हणायचे, ‘दूध संपलंय... काही हरकत नाही. काळा चहा चालेल...’ काका आले, की आम्ही रात्रभर जागत असू. काका पट्टीचे कॅरम खेळणारे. आमच्या अप्पांनाही कॅरमची आवड. मग रात्रभर कॅरम चाले. कधी वाजवायचा मूड असला, की मला विचारायचे. ‘मग काय मधोबा, काढायचा काय हार्मोनिअम?’ (मला मधोबा म्हणायचे.) मग काय! आम्हाला पर्वणीच ती. सुरुवातीला मी दुसरी हार्मोनिअम घेऊन त्यांचं अनुकरण करायचे. कधी चंद्रकंसची त्रितालातली गत, कधी शिवकंसमधली झपतालातली गत. तीच नंतर त्रितालात फिरवून वाजवायचे. नंतर नाट्यगीतं... दे हाता शरणागता, चंद्रिका ही जणू...., मास्तरांची भैरवी....‘शाम बजाए तोरे घरमें मुरलिया’ किंवा ‘देखो मोरी चुरिया...’ मजाच मजा.. 

सुरुवातीला त्यांच्या मागे मागे चालणारा माझा हात नंतर स्तब्ध व्हायचा. नंतर नुसती श्रवणभक्ती... काळ-वेळेचं भान विसरून जायचं. त्या वादनात बालगंधर्व दिसायचे, छोटा गंधर्व दिसायचे, राम मराठे दिसायचे, हिराबाई तर कधी जयमालाबाई.... सगळ्यांना साथ करता करता सगळ्यांच्या व्हरायटी, लकबी त्यांच्या वादनात दिसायच्या. ‘वद जाऊ कुणाला शरण’ वाजवायला लागले, की तिन्ही अंतऱ्यांची चाल एकच असली, तरी काकांच्या हार्मोनिअममधून त्या तीनही अंतऱ्यांचे शब्द स्पष्ट ऐकू यायचे. अगदी ‘मम तात जननी मात्र ती’ हेसुद्धा. नंतर ‘बघुनी कष्टती हाल हिचे’मध्ये ‘कष्टती’मधला क जराही लांबायचा नाही. कितीही वेळा ऐकली ही पदं त्यांच्याकडून, तरी मन भरायचं नाही. प्रत्येक वेळी काही तरी नवीन सापडायचं त्यात. ‘आज किती वेगळं वाजवलंत काका, उगीच का कांता...’ असं मी म्हटलं की म्हणायचे, ‘मग तो अमका समोर होता ना, मग त्याला ऐकवलं जरा वेगळं...’

छोट्या छोट्या गोष्टींत काका मिश्किलपणा करत असत. ५२१८३६ असा आमचा फोन नंबर. फोन केला की विचारायचे.. ‘पाचशे एकवीस आठशे छत्तीस का....?’ लगेच समजायचं, काकांचा फोन. म्हणायचे... ‘हे टेलिफोनवाले सतत ताल बदलत असतात. आधी फोन नंबर दादऱ्यात असायचे (सहा आकडी), नंतर रूपकमध्ये (सात आकडी), आता तर भजनीच करून टाकला (आठ आकडी).’ 

कॉलेजच्या वर्षांपासून सात आठ वर्षं सतत काकांच्या बरोबर तंबोऱ्याच्या साथीला असायचे मी. विद्याधर ओक असायचा दुसऱ्या हार्मोनिअमवर. तो नसला, की मी साथीला बसायचे. चंद्रकंसाची गत माझ्या हातात चांगलीच बसली होती. मजा यायची वाजवायला. एकदा शास्त्री हॉलमध्ये गणेशोत्सवातल्या कार्यक्रमात मी त्यांना अशीच साथ केलेली आठवते. वांद्र्याच्या आर्किटेक्ट कॉलनीत कवी सुधीर मोघेंच्या घरीही अशीच रंगली होती काकांच्या हार्मोनिअमवादनाची मैफल. ‘विद्याहरण’ मधलं ‘मधुकर वनवन...’ अगदी रामभाऊंच्या शैलीतलं. भैरवी मात्र वझेबुवांच्या नाटकातली... ‘निशिदिनी मनी धरिला....’ अगदी वेगळ्या शैलीतलीही मस्त वाजवायचे. 

पं. राम मराठेंच्या मैफलीतली त्यांची साथ म्हणजे जशी जन्मोजन्मीची गाठ पडल्यासारखी. तडफदार तलवारीच्या खणखणाटाला प्रत्युत्तर देणारी. पं. कुमार गंधर्वांच्या बरोबरची साथ अगदी विरुद्ध शैलीत. कुमारांचा हृदयात आरपार घुसणारा स्वर आणि काकांच्या हार्मोनिअमचा त्यात विरघळून जाणारा, कधी बाहेर जाऊन वेगळा ऐकू न येणारा स्वर. जणू त्यांच्या हार्मोनिअमचा स्वर-लगावही बदलायचा. एकदा दादरच्या ब्राह्मण सहायक संघाच्या हॉलमध्ये कुमारांचा कार्यक्रम. आम्ही समोर... अगदी स्टेजला चिकटून... असं कलाकाराला नादब्रह्मात रंगून गेलेलं इतकं जवळून बघण्यात काय मजा यायची. बाजूला श्रोत्यांमध्ये कोण.... खुद्द पु. ल. देशपांडे आणि आमचे वसंत बापट सर. त्या दिवशीचा ‘लगन गांधार...’ भूपामध्ये दोन गंधार असे लागोपाठ यायचे. अंगावर काटा यायचा. त्या दिवशीही अनुभवला काकांच्या हार्मोनिअमचा स्वर-लगाव. 

त्यांना कुणी ‘गोविंदराव’ संबोधलेलं आवडायचं नाही. कानाच्या पाळीला हात लावून म्हणायचे, ‘गोविंदराव एकच होऊन गेले. ते म्हणजे गोविंदराव टेंबे. मला आपलं नुसतं गोविंदा म्हणा...’ कुठेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता, केवळ दिग्गज कलाकारांना साथ करून त्यांनी हार्मोनिअमवादन आत्मसात केलं, हे विशेष. 

संगीत नाटकांना ऑर्गनसाथ करताना काकांना बघणं, हा एक खास अनुभव असायचा. कोणीही, कोणत्याही पट्टीत (स्वरात) गाणारा असो, काकांचे दोन्ही हात लीलया फिरत असायचे. अण्णा पेंढारकरांची आणि विद्याधर गोखलेंच्या रंगशारदेची सगळी नाटकं मी बघितली. कधी कधी तर साथीदारांच्या जवळ बसूनही. ते रंगभूमीवरचं कलाकारांचं गायन आणि साथीदारांची साथ इतक्या जवळून अनुभवल्यानं, माझं आयुष्य त्या अनुभवांनी खूप श्रीमंत झालं आणि पुढे रंगभूमीवर भूमिका करताना ते अनुभव उपयोगी पडले. साथ करताना काका एकाग्रतेने कलाकाराकडे बघत असत. कधी कधी तर त्यांची ती तंद्री पाहून, काका झोपले तर नाहीत असं वाटायचं. भालचंद्र पेंढारकर तर म्हणायचे, ‘गोविंदा झोपेतही तितकंच चांगलं वाजवेल....’ 

मी १९७८ साली ‘संगीत मानापमान’ केलं. नायिका भामिनीची भूमिका. काकांच्याच गुहागरला नाटक; पण देवपाटात. काका वरल्या पाटातले. तिकडे अगदी चुरस असायची देवाच्या उत्सवात संगीत नाटकं सादर करायची. देवपाटात दर वर्षी मेमध्ये, तर वरल्या पाटात त्रिपुरारी पौर्णिमेला. ‘देवपाटातल्या नायिकेला गाणी शिकवतोस काय..’ असं गमतीनं कुणी म्हणायचेसुद्धा त्यांना. झालं.... बसलो एकदा पदं समजून घ्यायला. एका रात्रीत भामिनीची चौदा पदं सांगितली काकांनी. असंख्य व्हरायटीज दाखवल्या. म्हणाले... ‘हे घे... ऐकवतो तुला... काय जमेल ते, लक्षात राहील ते म्हण...’ मग काय मीही जिद्दीची... अप्पांनी दिलेली रागांची तालीम आणि काकांनी दिलेल्या व्हरायटीज याच्या आधारे मी माझ्या मनाने पदं बसवली आणि ऐकवली नंतर त्यांना. खूश झाले. रंगीत तालमीला आले अचानक. काम पाहिलं. म्हणाले.... ‘छान करतेस...’ भरून पावले मी. 

अजूनही ती पदं गाताना काका डोळ्यांसमोर येतात. ‘टकमक पाही सूर्य रजनीमुख’ कुणाच्या विशेष लक्षात न राहणारं पद; पण मला खूप आवडायचं. माझ्या लाडक्या यमनातलं हे पहिलं पद म्हणताना आत्मविश्वास मिळायचा आणि नाटकातलं पुढचं गाणं सोपं व्हायचं. चांगल्या जागा घ्यायच्या नादात ‘टकमक’मधला क जराही लांबवायचा नाही... काकांची ताकीद असायची. ‘खरा तो प्रेमा’मध्येही.... ‘स्वसुखा त्यागी दया...’ यात खा.. त्या... असं जोडायचं नाही, स्वसुखा...... त्या.. गी दया... असंच आलं पाहिजे. 

रात्री दहाला सुरू झालेलं ‘मानापमान’ पहाटे अडीचला संपलं. त्या नाटकानं मला संगीत नाटक पेलण्याचा आत्मविश्वास दिला. 

पुढच्या वर्षी ‘संगीत सौभद्र’मधली सुभद्रा केली. पुन्हा काकांनी पदं सांगितली. बलसागर तुम्ही, वद जाऊ कुणाला, किती सांगू तुला ही नेहमीची पदं तर होतीच; पण मला आवडलेली ‘दीपचंदी’मधली ‘व्यर्थ मी जन्मले थोर कुळी’ आणि ‘पुष्पपराग सुगंधित’... अगदी हिराबाईंच्या शैलीत. केवळ काकांच्या शिकवण्यामुळेच मी गाऊ शकले. साथीला साक्षात पं. तुळशीदास बोरकर आणि पुण्याचे तबलजी केशवराव नावेलकर. खूप रंगली पदं. 

गायिका नीलाक्षी जुवेकर चेंबूरलाच राहायच्या. त्यांना पदं शिकवायला काका यायचे. तेव्हाही त्यांची तालीम मी ऐकायला जात असे. नीलाक्षीताई सुरेश हळदणकरांच्या शिष्या. ‘श्रीरंगा कमलाकांता’ खूप छान गायच्या. 

काका व्यावसायिक गायक-गायिकांना जसं मार्गदर्शन करायचे, तितक्याच आपुलकीनं एखाद्या नवोदितालाही करायचे. त्याचा वकूब ओळखून, त्याला झेपेल एवढंच सांगून उत्तेजन द्यायचे. कधी कुणाला नाउमेद केलं नाही त्यांनी. एकदा तर नवी मुंबईच्या वाशी म्युझिक सर्कलमध्ये माझं गायन आणि मध्यंतरानंतर काकांचा हार्मोनिअम सोलो असा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात काका चक्क माझ्याबरोबर साथीला बसले. तिलवाड्यातला गौडमल्हार ‘काहे हो’ आणि द्रुत एकतालातली बंदिश माझी स्वत:ची ‘सैंया तूं तो बार बार...’ नंतर भक्तिगीतं, नाट्यगीतं. काकांनी त्या दिवशी माझं खूप कौतुक केलं. मला अगदी आकाशाला हात पोहोचल्यासारखं झालं होतं. 

लहानपणापासूनच मी जे जे गायचे, ते सर्व सहजपणे हार्मोनिअमवर वाजवायचे. काकांच्या सांगण्यावरून मी एक वेगळीच प्रॅक्टिस करायचे. हार्मोनिअमच्या पट्ट्यांवर कपडा टाकून, पट्ट्या न बघता वाजवायचं. त्यामुळे हाताच्या बोटांना एक प्रकारे पट्ट्यांचा अंदाज येतो. पुढे मी जेव्हा स्वत: नाटकाच्या साथीला बसले, तेव्हा मला या प्रॅक्टिसचा उपयोग झाला. नाटकाच्या अनाउन्समेंटनंतर नाट्यगृहातले दिवे बंद झाले, पडद्याआडून नांदी सुरू झाली. ती संपूर्ण नांदी मी अंधारात वाजवली. 
काकांनी दिलेली नाट्यसंगीताची शिदोरी आयुष्यभर पुरणारी आहे. त्यांनी दिलेलं प्रेम, आपुलकी यामुळे सख्खे काका नसल्याची खंत कधी वाटली नाही. असे लोकप्रिय कलाकार गोविंदराव पटवर्धन माझे काका होते, हे सांगताना आजही अभिमानानं ऊर भरून येतो. 

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZTXCF
Similar Posts
हिंदुस्थानी रागसंगीताचे प्रसारक पं. रविशंकर पाश्चात्य रसिकांना आपल्या सतारवादनाद्वारे हिंदुस्थानी रागसंगीताची ओळख करून देऊन, त्याची लोकप्रियता वाढवण्याचं फार मोठं काम पं. रविशंकर यांनी केलं. फक्त सतारवादनाचे कार्यक्रम न करता त्यांनी हिंदुस्थानी संगीत आणि पाश्चात्य संगीत यांच्यात संवादाचा पूल बांधला. सात एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने,
हार्मोनिअमवादक पं. गोविंदराव टेंबे ऑर्गनच्या भरदार आवाजाच्या साथीनं संगीत नाटकाची ‘नांदी’ सुरू झाली, की एक वेगळाच माहौल तयार होत असे. या ऑर्गनवादकांच्या यादीतलं पहिलं महत्त्वाचं नाव म्हणजे पं. गोविंदराव टेंबे. ‘संगीतातल्या विविध विषयांचा व्यासंगी विद्वान’ अशी त्यांची ओळख होती. स्वतंत्र हार्मोनिअमवादन करणारे महाराष्ट्रातले ते पहिले हार्मोनिअमवादक
नाट्यसंजीवनी : भाग दुसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दुसरा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग तिसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा तिसरा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language