Ad will apear here
Next
‘गुरुजींचा ऑर्गन वाजला, की गायक गातो असे वाटायचे’
रत्नागिरी : ‘पं. तुळशीदास बोरकर म्हणजे हार्मोनियम आणि ऑर्गन या वाद्यांचे भीष्माचार्य होते. गुरुजींचा ऑर्गन वाजला, की साक्षात गायक गातो असे वाटायचे. गुरुजी केवळ वादकच नव्हते, तर वाद्यातील तंत्रज्ञानाचीही त्यांना उत्तम माहिती होती. ते स्वतः उत्तम ट्युनिंग करायचे. त्यांच्या निधनामुळे ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे अशा चरणांना मुकलो आहे,’ अशी भावना रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचे उमाशंकर दाते यांनी व्यक्त केली. १९५०नंतर जगभरात ऑर्गन या वाद्याची निर्मिती थांबली होती; मात्र दाते यांनी प्रयत्नपूर्वक ती निर्मिती सुरू केली. त्यामुळे दाते हे ऑर्गन वाद्याचे सध्याचे जगातील एकमेव निर्माते आहेत. पं. बोरकर यांनीही दाते यांच्या ऑर्गन निर्मिती कारखान्याला तीन-चार वेळा भेट दिली होती. 

दाते यांचा पं. बोरकर यांच्याशी व्यक्तिगत स्नेह होता. त्यांच्या आठवणींना दाते यांनी उजाळा दिला. ‘गुरुजींचे रत्नागिरीतील शिष्य मधुसूदन लेले सर यांच्यामुळे त्यांच्याशी माझी ओळख झाली. गुरुजी कलाकार म्हणून मोठे होतेच; पण उत्तम माणूसही होते, अत्यंत विनम्र स्वभाव, समोरच्याचे ऐकून घ्यायची वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये. स्वतः मोठे कलाकार असूनही ते कुठलाही अभिनिवेश न बाळगता आपुलीने बोलत. स्वरराज छोटा गंधर्व यांची गायकी तर त्यांच्या नसानसात भिनली होती. साथ कशी समजून करावी, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. गुरुजींच्या समोर शिष्य म्हणून बसण्याचे भाग्य मला जास्त लाभले नाही. फक्त दोन वेळा त्यांनी मला शिकवले; पण मला त्यातून भरपूर काही मिळाले आहे. गेल्या वर्षी त्यांचे गुरुजी विष्णुपंत वष्ट यांचा स्मृतिदिन साजरा झाला. त्या वेळी गुरुजींनी मला ऑर्गनवर दोन गाणी वाजवायला सांगितली, याहून थोर भाग्य कुठचे,’ अशा शब्दांत दाते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पं. तुळशीदास बोरकर यांच्यासह उमाशंकर दाते

ऑर्गन हा पं. बोरकर यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे दाते यांच्या ऑर्गन निर्मिती कारखान्याला पं. बोरकर यांनी भेट दिली होती. त्या वेळच्या आठवणीही दाते यांनी सांगितल्या. ‘माझ्या ऑर्गन कारखान्यात गुरुजी तीन-चार वेळा आले. वयाने अधिकाराने आणि ज्ञानाने मोठे असूनसुद्धा त्यांनी माझ्या कामाची मुक्तकंठाने तारीफ केली. ‘तुम्ही वयाने लहान असलात, तरी तुमच्या गुणांना माझा नमस्कार आहे,’ असे ते म्हणाले होते. त्यांच्याशी ट्युनिंग या विषयावर खूप चर्चा झाली. त्यांनी माझ्या ज्ञानाला शाबासकी दिली. ‘तुम्ही ऐतिहासिक कार्य करत आहात, इतिहासात तुमची नोंद सुवर्णाक्षरांनी घेतली जाईल,’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले होते. एकदा गुरुजींना गोव्याला कारने सोडायला जातानाही भरपूर गप्पा झाल्या होत्या,’ असे दाते म्हणाले. 

‘राजापूरमधील ‘मित्रमेळा’तर्फे आयोजित कार्यक्रमात गुरुजींचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले आणि त्याच वेळी गुरुजींनीही माझा आशीर्वादपर सत्कार केला, हे माझे भाग्यच. (या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) त्यांचे निधन ही फारच दुःखदायक गोष्ट आहे. आज देहरूपाने जरी ते आपल्यात नसले, तरी चैतन्यरूपाने त्यांच्या वादनातून आणि शिष्यांच्या स्वरूपात ते आपल्यात आहेत,’ अशा शब्दांत दाते यांनी पं. बोरकर यांना श्रद्धांजली वाहिली.

(पं. तुळशीदास बोरकर यांनी उमाशंकर दाते यांच्या ऑर्गन निर्मिती कारखान्याला भेट दिली होती, त्या वेळचा व्हिडिओ सोबत देत आहोत. पं. बोरकर यांचे रत्नागिरीतील शिष्य मधुसूदन लेले आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांनी जागवलेल्या पं. बोरकर यांच्या आठवणी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZFWBS
Similar Posts
पं. बोरकर यांच्या ऑर्गनची भेट म्हणजे अमूल्य ठेवा रत्नागिरी : ‘गायकाची मैफल सजवण्यासाठी तुम्ही साथीला बसलेले असता. त्यात आपण किती वाजवतो, याचे प्रदर्शन करू नये. गायकाचा साथीदार साडेसातीचा असू नये. मैफल प्रेक्षकांना आवडली पाहिजे,’ अशी शिकवण पं. तुळशीदास बोरकर यांनी दिल्याची आठवण रत्नागिरीतील त्यांचे शिष्य हार्मोनियमवादक मधुसूदन लेले यांनी जागवली. पं
तावडे अतिथी भवनाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : आडीवरे (ता. राजापूर) येथे नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचे उद्घाटन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते १० मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
‘युवकांनी तावडे समाजाचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यावे’ क्षत्रिय मराठा हितवर्धक मंडळाला ७५ वर्ष असून, क्षत्रिय मराठा हितवर्धक विवाह मंडळाला ५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील आडिवरे गावी नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचा लोकार्पण सोहळा १० मे रोजी शिक्षणमंत्री तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदारपणे पार पडला.
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language