पुणे : ‘कवी कलाकार असेल तर त्याच्या कवितांमधून त्याची कला झिरपते. ओघवत्या अक्षरांतून अगदी अलगदपणे मनातील तरल भावना कागदावर उतरतात आणि त्या वाचल्यावर आपली वेव्हलेंग्थ जुळून मन ट्यून होते. मिलिंदने केलेल्या कविता फेसबुकवरच न विरता त्यांचं मूर्त स्वरूप पुस्तक रूपात आलं ही गोष्ट महत्त्वाची आहेच; पण त्या पुस्तकाची एका महिन्यातच दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे हे अधिक भाग्याचं आहे,’ अशा शब्दांत मराठी चित्रपटांतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने संगीतकार मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना तुलाही...’ या कवितासंग्रहाचे कौतुक केले.
या कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २३ जानेवारी २०२० रोजी जागतिक हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून पुण्यातील पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहात मुक्ता बर्वे हिच्या हस्ते झाले. त्या वेळी ती बोलत होती. या वेळी संगीतकार मिलिंद जोशी, त्यांच्या पत्नी गायिका मनीषा जोशी, बुकगंगा पब्लिकेशन्सचे संस्थापक मंदार जोगळेकर, ‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये, गौरी बापट उपस्थित होत्या.
मुक्ता बर्वे म्हणाली, ‘सध्याच्या परिस्थितीत एखाद्या कवितासंग्रहाची एका महिन्यात दुसरी आवृत्ती प्रकाशित होणं ही खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. या पुस्तकातील दर्जेदार कविता आणि त्याची मांडणी या यशाला जबाबदार आहेच, तसेच ते प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीही तितक्याच जबाबदार आहेत. हस्ताक्षरात लिहिला गेलेला हा गेल्या काही काळातला पहिला कवितासंग्रह आहे है वैशिष्ट्य जपतानाच वाचकांची आवड लक्षात घेऊन ते पुस्तक देखणं कसं होईल याचीही काळजी प्रकाशकांनी घेतली आहे. सामान्य प्रकाशकांप्रमाणे ठोकळेबाजपणे काम न करता ‘बुकगंगा’च्या मंदार जोगळेकर यांनी सर्जनशीलपणे पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्याचे वितरणही तसेच केले गेले. त्यामुळे यश मिळाले. या सगळ्यामुळेच लवकरच या कवितासंग्रहाच्या आणखी आवृत्त्या प्रकाशित होतील, असा मला विश्वास वाटतो.’
बुकगंगा पब्लिकेशन्सचे संस्थापक मंदार जोगळेकर म्हणाले, ‘एखाद्या पुस्तकाचं साहित्यमूल्य प्रकाशकांनी ठरवण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे; पण हॅरी पॉटरसारख्या पुस्तकाला नाकारणाऱ्या प्रकाशकांना नंतर पश्चात्ताप करावा लागला हे वास्तव आहे. त्यामुळे पुस्तकांचा दर्जा हा प्रकाशक किंवा त्यांच्या समितीतील तज्ज्ञांनी न ठरवता वाचकांनी ठरवायला हवा. मराठी साहित्य ई-बुक स्वरूपात, तसंच मुद्रित स्वरूपात जगभर पोहोचवण्याचा वसा ‘बुकगंगा’नं घेतला आहे. पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील इंटरनॅशनल बुक स्टोअरने मराठी साहित्य विक्रीचा जपलेला वारसा अबाधित राखण्यासाठी आम्ही त्याच वास्तूत ऑफिस सुरू केले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमची दर महिन्याची पुस्तकविक्री वाढतेच आहे. या पुस्तकाच्या निर्मितीवेळी हस्ताक्षरात कविता संग्रह करण्याची कल्पना खूपच आवडली आणि मिलिंदचे घोटीव अक्षर पाहिल्यावर अगदी ISBN क्रमांकही त्यानेच लिहावा अशी माझी इच्छा होती. वाचकांना आवडेल असं पुस्तक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.’
‘असंच होतं ना तुलाही...’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन २० डिसेंबर २०१९ रोजी मुंबईत अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या हस्ते झाले होते.
संगीतकार, कवी मिलिंद जोशी म्हणाले, ‘माझ्या कविता मी हस्ताक्षरात फेसबुकवर प्रसिद्ध करायचो. मंदार जोगळेकरांच्या नजरेने त्यातील शक्ती ओळखली आणि त्याचं पुस्तक करण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला. कविता लिहिताना मनातील भावनांच्या वेगानुसार हस्ताक्षर बदलतं. मनाला जसं हवं तसं वागू दिलं की अक्षरंही गाण्याचं स्वरूप घेतात. कविता लिहिताना हेच भान जागं ठेवलं. त्यामुळे सुलेखन जसं हातानं घडलं, तसंच ते पुस्तकातही ठेवलं. कवितांच्या घडण्याची प्रक्रिया वाचकाने अनुभवावी हाच त्यामागचा उद्देश होता. मराठीतील दिग्गज कवींच्या वाचलेल्या कविता, गुरू गीतकार, संगीतकार दिवंगत यशवंत देव यांची शिकवण, आई-वडील, शिक्षकांचे आशीर्वाद, पत्नी मनीषाचे सहकार्य या सगळ्यामुळेच मी कविता करू शकलो आणि आज इथवर पोहोचलो. माझ्या कवितांना वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे अनेकानेक आभार. ते असंच प्रेम करत राहतील ही अपेक्षा आहे.’
कार्यक्रमाचे प्रायोजक जय जिनेंद्र कोल्ड स्टोरेज कंपनीचे श्री. पारख, तसेच दुसरे प्रायोजक समर्थ एंटरप्रायजेसचे राजेंद्र सावंत यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रकाशनानंतर मुक्ता बर्वे, मिलिंद जोशी, मनीषा जोशी यांनी कवितासंग्रहातील कवितांचे अभिवाचन आणि गायन केले. नजर, ऐक ना, तो शुभ्र पांढरा कागद, ब्लेम इट, सहवास, मग बोलू, प्रारब्धाची वीण अशा कवितांना प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली. पिंगा घालत फुलपाखरे जमू लागली होती, गंध हलकासा सुखाचा दरवळाया पाहिजे, तो तीळ जरासा आवर तू, सूर्य आता सारखा शोधात आहे ही गीतं आणि गझला मिलिंद जोशी आणि मनीषा जोशी यांनी सादर केल्या. त्यांना तबल्यावर प्रसाद पाध्ये, हार्मोनियमवर अमित पाध्ये, इलेक्ट्रिक गिटारवर संजय महाडिक यांनी साथ केली. कार्यक्रमाचे निवेदन आणि आभारप्रदर्शन अस्मिता पांडे यांनी केले.
(‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिककरा. त्याचे ऑडिओ बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. या कवितासंग्रहातील काही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत. या कार्यक्रमाविषयी एका श्रोत्याचा अभिप्राय वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या कवितासंग्रहाबद्दलचा एक अभिप्राय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)