पुणे : हिमालयाच्या कुशीत अत्यंत रमणीय, निसर्गरम्य प्रदेशात पौराणिक वारसा असलेली अनेक पवित्र तीर्थस्थळे आहेत. असेच एक ठिकाण आहे स्वर्गारोहिणी. येथूनच पांडव स्वर्गात गेले असे म्हणतात. हे ठिकाण उत्तराखंड राज्यातील बद्रिनाथ या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातील कर्दळीवन सेवा संघाने या यात्रेची संपूर्ण माहिती आणि स्वर्गारोहिणीचे दर्शन घडविणारा माहितीपट निर्माण केला असून, तो यू-ट्यूबवर उपलब्ध आहे. या रमणीय, पवित्र स्थळाला भेट देण्याची संपूर्ण माहिती त्याद्वारे मिळते.
महाभारत युद्धानंतर पांडव याच मार्गाने स्वर्गाकडे निघाले. वाटेत भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांनी देह ठेवला. शेवटी फक्त युधिष्ठिर मात्र स्वर्गारोहिणी पर्वतापासून सदेह स्वर्गामध्ये गेला, अशी आख्यायिका आहे. कर्दळीवन सेवा संघाने आतापर्यंत नऊ वेळा स्वर्गारोहिणी यात्रा आयोजित केल्या असून, १८०हून अधिक जणांनी ही यात्रा पूर्ण केली आहे.
अत्यंत दुर्गम अशा पहाडी भागातून हा प्रवास होतो. उंच डोंगरकड्यांच्या बाजूने जाणारे नागमोडी रस्ते, हिरव्यागार कुरणांमध्ये स्वैर हुंदडणाऱ्या शेळ्या, मेंढ्या, शांत वातावरण, स्वच्छ, शुद्ध हवा, पांढऱ्याशुभ्र बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे अशा वातावरणात हा प्रवास सुरू असतो. सोबतीला असतात वजन पेलत, प्रवाशांना आधार देत सांभाळून नेणारे शेर्पा. वाटेतील उंच डोंगररांगांमधील गुंफांमध्ये अनेक साधू साधना करताना दिसतात. वाटेत झेंडेदार या ठिकाणी आपले झेंडे लावून पुढे जाण्याची प्रथा आहे, तर संतोपथ येथे असणारे नितळ पाण्याचे तळे, आजूबाजूला फुललेली रंगीबेरंगी फुलांचे ताटवे मन मोहून टाकतात. जागेवरून हलूच नये असे हे निसर्गसौंदर्य मनाला वेड लावते.

हिमशिखरांची भव्यता, निसर्गाचे रौद्र रूप ‘मी’पणाची बोळवण करते. स्वतःला विसरत आपण वाट चालत राहतो आणि एका क्षणी समोर असते स्वर्गारोहिणीची वाट. या बर्फाळ डोंगरात बारकाईने बघितले तर पायऱ्या दिसून येतात. हा क्षण, हा अनुभव निव्वळ शब्दातीत. पांडव ज्या वाटेवरून चालले त्या वाटेवर आपण चालत आलो आणि ते जिथून स्वर्गाला गेले त्या ठिकाणाला आपण भेट दिली हा अनुभव केवळ अवर्णनीय असा असतो. भारतीय संस्कृतीत महाभारताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यातील घटना जिथे घडल्या, त्या स्थळांना भेट देण्याचा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा आहे. या अनुभवाची प्रचीती घ्यायची असेल तर स्वर्गारोहिणी स्थळाला जरूर भेट द्या. त्यासाठी कर्दळीवन संघाने बनवलेला माहितीपट पाहायला हवा.
अधिक माहितीसाठी :
विनायक पाटुकले,
कर्दळीवन सेवा संघ, पुणे
व्हॉट्सअप : ७०५७६ १७०१८
मोबाईल : ९३७११ ०२४३९
वेबसाईट : KARDALIWAN.com
फेसबुक : facebook.com/KardaliwanSevasangh