लहानपणी पोलिओ झालेल्या नीलेश छडवेलकर तरुणानं आपली जिद्द न सोडता स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी तर सुरू केलीच; शिवाय प्रशासकीय अधिकारी होण्याचं आपलं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं ज्ञानकोश तयार केला, इतरांना स्पर्धा-परीक्षांचा अभ्यास सोपा होण्यासाठी... ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’मध्ये आज गोष्ट, ‘सहानुभूती नको, संधी हवी’ असं म्हणणाऱ्या नीलेशची...
............
जे स्वतःला साध्य झालं नाही, मिळालं नाही, ते इतरांना मिळावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा आणि ते इतरांसाठी मिळवून देणारा असा तरुण मला भेटला, त्याचं नाव नीलेश! नीलेशचा प्रवास चारचौघांसारखा नसूनही, त्यानं त्याची कधी खंत बाळगली नाही. जे आपल्याला मिळालंय, जे आपल्याकडे आहे, ते स्वीकारून तो पुढे जात राहिला. त्याच्यातला दुर्दम्य आशावाद आणि चिकाटी या गुणांनी त्याला यशाच्या शिखराकडे जाण्याचा रस्ता दाखवला.
नीलेशचे वडील महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर या गावातल्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. नीलेशला एक भाऊ आणि दोन बहिणी....नीलेशचा जन्म झाला आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं. छोट्या नीलेशच्या बाळलीलांनी घर गजबजून गेलं. बघता बघता नीलेश एका वर्षाचा झाला. त्याचा वाढदिवस कुटुंबीयांनी आनंदात साजरा केला आणि दोन-तीन महिन्यांत नीलेश तापानं इतका फणफणला, की त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. खरं तर मृत्युशी झुंज देणाऱ्या नीलेशचा जीव वाचलाच, तर एक तर तो अंध होईल किंवा त्याच्या मेंदूवर अनिष्ट परिणाम होतील अशी भीती डॉक्टरांना वाटत होती. जन्मापासून चिवट असलेल्या नीलेशनं मृत्यूला तर परतवून लावलंच आणि डॉक्टरांची भीतीही खोटी ठरवली; पण नीलेशला झालेल्या पोलिओला मात्र डॉक्टर हुसकावून लावू शकले नाहीत.
नीलेशच्या हातापायांमध्ये कुठल्याही प्रकारची ताकद शिल्लक राहिली नव्हती. आतापर्यंत आपल्या खोडकर बाळलीलांनी अख्खं घर डोक्यावर घेणाऱ्या नीलेशकडे आता त्याच्या आई-वडिलांना बघवत नव्हतं; पण आपणच खचलो तर या मुलाचं भवितव्य काय, असा विचार दोघांच्याही मनात येत होता. नीलेशच्या निरागस चेहऱ्याकडे बघून त्यांनी आपलं मन खंबीर केलं आणि त्याच्यावर जे जे उपचार करता येतील ते ते त्यांनी केले. नीलेशच्या सर्वांगाचं मालिशही सुरू ठेवलं. या सगळ्यांचाच परिणाम म्हणजे किमान हातांनी हालचाल करण्याइतकी शक्ती त्याच्यामध्ये आली. नीलेशनं चौथीपर्यंतचा अभ्यास घरीच केला; मात्र त्यानंतर त्यानं शाळेत जाण्याचं ठरवलं. घरातली भावंडं आणि मित्र यांच्या मदतीनं नीलेश शाळेत जाऊ लागला. आपण इतर मुलांसारखे नाही आहोत, आपण चाकाच्या खुर्चीशिवाय राहू शकत नाही हा न्यूनगंड नीलेशच्या मनात तयार झाला. त्यामुळे त्याची शाळेतली अभ्यासातली प्रगती यथातथाच राहिली.
नीलेशची भावंडं मात्र शिक्षणात खूप चांगली प्रगती करत होती. त्यांच्याकडे बघून नीलेशलाही आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून असंच नाव कमवलं पाहिजे असं वाटायला लागलं. त्यातूनच केवळ शालेय शिक्षणावर समाधान न मानता आपणही महाविद्यालयीन शिक्षण घेतलंच पाहिजे, असा नीलेशच्या मनाचा निर्धार झाला. मनातल्या कमीपणाच्या भावनेकडे दुर्लक्ष करत नीलेशनं कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. महाविद्यालयीन विश्वाानं त्याच्यापुढे अनेक दारं उघडली. अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन करण्याची गोडी नीलेशला लागली. त्यातूनच निबंधलेखनाचं कौशल्य आत्मसात करता आलं. वक्तृत्वकलेत प्रावीण्य मिळवता आलं. शाळेत लाजराबुजरा असलेला नीलेश महाविद्यालयीन विश्वानत आमूलाग्र बदलला.
नीलेशला स्वतःमधल्या शारीरिक मर्यादांची जाणीव होती. त्याला सगळे मैदानी खेळ खेळायला आवडायचं; पण आपण आपल्या पायावर उभेही राहू शकत नाही हेही त्याला कळत होतं. मग सोसायटीतल्या मुलांबरोबर तो त्यांच्याएवढा होऊन आपल्या खुर्चीवरूनच क्रिकेटपासून सगळेच खेळ खेळायला लागला. मुलांनाही आपल्या या दादाबरोबर खेळणं आवडायला लागलं. कॅरम असो की बुद्धिबळ, नीलेश मुलांमध्ये रमायला लागला. एखाद्या दिवशी खेळून दमल्यावर मुलं नीलेशला ‘आम्हाला गोष्ट सांग’ असा हट्ट धरत. नीलेश त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागला. मजेची गोष्ट म्हणजे या गोष्टी स्वतःच रचायची सवय नीलेशला लागली. त्यामुळे प्रत्येक दिवशीची गोष्ट वेगळीच असायची. मुलांमध्ये राहिल्यामुळे मुलांमधलं वाढतं कुतूहल, त्यांची जिज्ञासू वृत्ती आणि त्यांची मानसिकता नीलेशला नीटपणे कळत गेली.
वाणिज्य शाखेतली पदवी मिळताच नीलेशला एमकॉम करण्याचे वेध लागले. त्यासाठी तो नाशिकला राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे जाऊन पोहोचला. तिथल्या केटीएचएम महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला. नीलेशच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तिथेही त्याला अनेक मित्र मिळाले आणि त्यांचं सहकार्यही! याच दरम्यान नीलेश स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्नं बघू लागला. त्यानं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. एमपीएससी परीक्षेची पूर्वपरीक्षा नीलेश उत्तीर्ण झाला. आपलं स्वप्न आता पूर्ण होणार या आनंदात असतानाच त्याच्या आई-वडिलांनी, भावाबहिणींनी मात्र त्याला तुला दुर्गम भागातलं काम मिळालं तर तू कसं करणार हा प्रश्नब विचारला. कुटुंबीयांनी त्याला पुढे जाण्यास विरोध केला. त्यांच्या प्रेम आणि काळजीतून आलेल्या विरोधापुढे नीलेशनं माघार घेतली.
पुढे जाण्याआधीच प्रशासकीय सेवेचा मार्ग आता बंद झाला होता. पुढे काय करायचं माहीत नव्हतं. याच वेळी नीलेशच्या भावानं नीलेशला कम्प्युटर भेट दिला. नीलेशला कम्प्युटरमधली विशेष माहिती नव्हती; पण त्याच्यातली चिकित्सक वृत्ती आणि कुतूहल त्याला गप्प बसू देईना. त्यानं एकलव्याप्रमाणे कम्प्युटरमधल्या ‘हेल्प मेन्यू’चा आधार घेत त्यातल्या एक एक गोष्टी शिकायला सुरुवात केली. मग त्याला कम्प्युटरविषयी अनेक पुस्तकंही मिळवता आली. त्या आधारे तो अनेक गोष्टी शिकला आणि हळूहळू त्याला प्रोग्रॅम बनवता येऊ लागले.
विशेष म्हणजे आपल्याला जे जे येतंय, त्याचा उपयोग आता आपल्या आसपासच्या ओळखीच्या लोकांना झाला पाहिजे या भावनेतून नीलेश प्रत्येकाला त्याच्या छोट्यामोठ्या व्यवसायात कम्प्युटरची मदत घेऊन काय काय करता येऊ शकतं हे सांगू लागला. याचा परिणाम असा झाला, की एका हॉटेलचा हिशेब ठेवण्याचा प्रोग्रॅम करण्याचं काम त्याला मिळालं. नीलेशला हे काम करताना त्या प्रोग्रॅममध्ये अनेक लहानमोठ्या अडचणी आल्या; पण रात्र रात्र जागून त्यानं त्याची उत्तरं शोधली. हातातला प्रोग्रॅम यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि या कामाचा मोबदला म्हणून त्या हॉटेलमालकानं खूश होऊन नीलेशच्या हातावर चक्क पाच हजार रुपये ठेवले. नीलेशची ही पहिली कमाई होती. या कामामुळे नीलेशचा आत्मविश्वा स वाढला आणि त्याला त्यानंतर हॉटेल्स, सराफांची दुकानं, पेट्रोल पंप, विवाहसंस्था, पतसंस्था, किराणा दुकानं अशा अनेक ठिकाणांची कामं मिळायला सुरुवात झाली. त्याला वेळ पुरेनासा झाला. त्याच्या मदतीला त्याचा कॉलेजमित्र शरद दाभाडे धावून आला आणि दोघांच्या परिश्रमातून ‘शैलनी सॉफ्टवेअर सोल्युशन्स’ या कंपनीची स्थापना झाली. नीलेशला पुण्याहूनही कामं मिळायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यानं गावातून स्थलांतर करून पुण्याचा रस्ता पकडला.
शैलनी कंपनीत सॉफ्टवेअर विकसित करण्याबरोबरच कंटेंट मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट, वेबसाइट डेव्हलपमेंट, वेब अॅप्लिकेशन अशी अनेक कामं करून दिली जाऊ लागली. नीलेशनं लवकरच आपल्या व्यवसायात जम बसवला; मात्र त्याला आपलं स्पर्धा परीक्षेचं अधुरं स्वप्न नेहमीच आठवायचं. या परीक्षेचं महत्त्व त्याला कळत होतं. त्याच वेळी स्पर्धा परीक्षांना राज्यभरातून बसणारी तरुण मुलं त्याला दिसत होती. या परीक्षेत पास होण्याची स्वप्नं घेऊन खेड्यापाड्यातून पुण्यासारख्या शहराकडे येणारा प्रत्येक तरुण त्याला दिसत होता. यातल्या अनेक तरुणांना अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तकं वापरावीत, कोणकोणत्या विषयांचं सखोल ज्ञान असलं पाहिजे याचं मार्गदर्शन आपण केलं, तर त्यांचे कितीतरी अडथळे दूर होतील असं नीलेशला वाटलं. त्यातूनच त्यानं स्पर्धा परीक्षार्थींसाठी ज्ञानकोश करण्याचा निर्धार केला.
या ज्ञानकोशासाठी नीलेश आणि त्याचा मित्र शरदनं प्राथमिक तयारीसाठी पहिली ते दहावी अशी अभ्यासक्रमाची सगळी पुस्तकं अभ्यासली. अनेक संदर्भग्रंथ, सरकारी संकेतस्थळं, संयुक्त राष्ट्रसंघाची महत्त्वाची संकेतस्थळं यांचाही अभ्यास केला आणि विषयानुसार वर्गीकरण करत माहितीचं संकलन करायला सुरुवात केली. इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, सामान्यज्ञान, मनोरंजन, थोर व्यक्तींची चरित्र, अशा अनेक विषयांची महत्त्वाची माहिती एकत्रित करणं, मिळवलेली माहिती युनिकोडमध्ये आणणं, माहिती कंटाळवाणी वाटू नये यासाठी रंगीत छायाचित्रं, नकाशे आणि आवश्यक तिथे चित्रफिती जमा करायला सुरुवात केली. परीक्षार्थींना सरावासाठी हजारो प्रश्नांचा संच तयार केला गेला. अशा रीतीनं नीलेशचा ‘ज्ञानकोश’ तयार झाला खरा; पण तो आता परीक्षार्थींपर्यंत पोहोचवायचा कसा हा प्रश्नर समोर होता.
त्याच वेळी पुण्यात ‘एज्युगेन’ नावाचं प्रदर्शन भरलं आणि त्या प्रदर्शनात सहभागी होऊन नीलेशनं आपला ज्ञानकोश तिथं ठेवला आणि येणाऱ्या प्रत्येकाला हसतमुखानं या ज्ञानकोशाचं महत्त्व सांगायला आणि माहिती द्यायला सुरुवात केली. फक्त चारच दिवसांत नीलेशच्या स्टॉलला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ज्ञानकोशच्या हजारो सीडीज विकल्या गेल्या. या सकारात्मक परिणामानं नीलेशला बळ मिळालं आणि त्यानं पुणे शहरच नाही, तर ज्ञानकोश राज्यभरात पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले.
हे सगळं करत असताना नीलेशच्या लक्षात आलं, की ग्रामीण युवक असो वा शहरी, स्पर्धा परीक्षांची तयारी तो खूप उशिरा सुरू करतो. त्यामुळे त्याला यश मिळवणं खूप कठीण जातं. महाराष्ट्राच्या मानानं उत्तर प्रदेश वगैरे भागांतले तरुण यात मुसंडी मारताना दिसून येतात. अशा वेळी नेमकं आपण कुठे कमी पडतो याचा अभ्यास नीलेशनं सुरू केला. प्रशासकीय सेवेत जायचं असो वा नसो, शालेय जीवनापासूनच हा ज्ञानकोश विद्यार्थ्यांनी वापरला तर त्यांच्या आयुष्यात बदल घडून येतील ही गोष्ट नीलेशच्या लक्षात आली. त्यामुळे नीलेशनं पाचवी, सहावी इयत्तेचा एक गट, सातवी, आठवी इयत्तेचा दुसरा गट, नववी, दहावी इयत्तेचा तिसरा गट आणि अकरावी, बारावी असा चौथा गट अशी विभागणी केली आणि त्या त्या वयानुसार मुलांचं कुतूहल वाढवत, त्यांना ज्ञान कसं मिळेल याचा विचार करून स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार रचना केली. यामुळे ज्यांचे पालक मुलांना वेळ देऊ शकत नाहीत किंवा शिकवू शकत नाहीत अशा अनेकांना या ज्ञानकोशाचा फायदा होईल हे त्यानं बघितलं. अशा प्रकारच्या ज्ञानकोशामुळे कोणाच्याही मदतीशिवाय अभ्यासाला पूरक आणि अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टी मुलं स्वतःच शिकू शकतील असा विश्वासस नीलेशला वाटला. त्याच्या या ज्ञानकोशात एटीएल म्हणजे एनी टाइम लर्निंग सर्व्हिस असाही एक पर्याय आहे. मुलाला कुठलाही प्रश्न पडला, उदाहरणार्थ, पेट्रोलमध्ये काय काय घटक असतात असा प्रश्नर पडला, तर तो प्रश्नल तो या ‘एटीएस’ला विचारू शकतो. त्याला त्याच्या प्रश्नांचं लगेचच उत्तर मिळतं.
हा ज्ञानकोश नीलेशनं सीडीद्वारे घरातल्या कम्प्युटरवर,
www.dnyanved.com या वेबसाइटवर आणि
अॅपद्वारे मोबाइलवर असा तिन्ही ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. या ज्ञानकोशाच्या वापरासाठी सदस्य व्हावं लागतं. सदस्य होताच जगभरातला खजिना तुमच्यासमोर हजर! विशेष म्हणजे हा ज्ञानकोश मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांत उपलब्ध आहे. या ज्ञानकोशाचा सदस्य होणारा विद्यार्थी हुशार आणि गुणी असेल. त्यानं प्रत्येक चाचणी उत्तीर्ण केली तर त्याला प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्तीदेखील उपलब्ध करून दिली आहे. (‘ज्ञानवेद’चं फेसबुक पेज
https://www.facebook.com/dnyanved या लिंकवर उपलब्ध आहे.)
आज आयटी क्षेत्रात एक यशस्वी प्रोग्रॅमर म्हणून नीलेशचा नावलौकिक आहे. त्याच्या कामाची दखल घेऊन त्याला अनेक संस्थांनी पुरस्कारानं गौरवलं आहे. पुष्पाई युवा चेतना पुरस्कार, विश्वारत्न पुरस्कार, निर्धार पुरस्कार आणि अनिता अवचट फाउंडेशनचा संघर्ष सन्मान पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार नीलेशला मिळाले आहेत. नीलेशनं अपंगांची साहित्य संमेलनं आयोजित करण्यात पुढाकार घेतला आहे. रक्तदानासह अनेक शिबिरांचं तो आजही आयोजन करतो.
नीलेशनं आपल्या अपंगत्वावर मात करत यश प्राप्त केलंय. आपलं अधिकारी होण्याचं अधुरं स्वप्न, त्यानं इतर मुलांना ते स्वप्न देऊन पूर्ण केलंय. त्यासाठीच त्यानं जिद्दीनं ज्ञानकोश तयार केलाय. ‘अपंगांच्या मनातला न्यूनगंड घालवण्यासाठी, त्यांना वेगळं लेखू नका, तर प्रवाहात सामील करून घ्या,’ असं त्याचं म्हणणं आहे. आज सर्वत्र श्रीमंत मुलांसाठी वेगळ्या पंचतारांकित शाळा, गरिबांसाठी जिल्हा परिषदांच्या शाळा, अपंगांसाठी किंवा मतिमंदांसाठी अतिशय कमी प्रमाणात कुठे तरी तुरळक वेगळ्या शाळा अशी विभागणी आपण केली आहे. त्यामुळे नॉर्मल मुलाला अपंग मुलाचं दुःख कळूच शकत नाही.
ही सगळीच मुलं एकाच पातळीवर येऊन एकाच शाळेत, एकाच वातावरणात शिकली, तर त्यांना परस्परांच्या मर्यादा आणि बलस्थानं कळतील. परस्परांची सुख-दुःखं कळतील आणि एकीची भावना वाढली तरच निकोप समाज घडू शकेल. तेव्हा या व्यवस्थेमध्ये सरकारी पातळीवर बदल झाले पाहिजेत, असं नीलेश तळमळीनं सांगतो.
‘सहानुभूती नको, संधी हवी’ असं म्हणणाऱ्या व्हीलचेअरवर बसलेल्या नीलेशची उंची मला आभाळाला स्पर्श करणारी वाटली.
संपर्क :
नीलेश छडवेलकर, शैलनी सॉफ्टवेअर सोल्युशन्स, पुणे
मोबाइल : ८२३७० ८२८०१
ई-मेल : nilesh@shailani.com
- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com
(
दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर
लेखन करतात.)