मराठी साहित्यावर उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. किंबहुना साहित्यावर आधारित चित्रपट निर्माण झाल्यानंतर वाचकांकडून पुन्हा त्या मूळ कलाकृतीची मागणी वाढत असल्याचेही आढळून आले आहे. चित्रपटातून कलाकृतीचा आनंद घेतल्यानंतर फिरून पुन्हा त्या मूळ कलाकृतीचा आनंद मिळवावा हीच त्यामागील रसिकांची भूमिका असते. मराठी साहित्याच्या दृष्टीने हा एक चांगला बदल होत आहे असे म्हणता येईल. ‘साहित्याकडून चित्रपटाकडे’ या विशेष लेखाचा हा दुसरा भाग........................
कला हा समाजमनाचा आरसा असते. चित्रपट हे मानवी भावभावनांचे प्रकटीकरण अधिक प्रभावीपणे करणारे दृकश्राव्य कला माध्यम आहे. चित्रपट दृकश्राव्य असल्यामुळे यातील कलाविश्व प्रेक्षकांना आधिक जवळचे आणि जिवंत वाटते. यामुळेच इतर कलांच्या तुलनेत चित्रपटामध्ये समाजमन अधिक पटकन गुंतते. ‘चित्रपट हे कलात्मकता आणि तंत्रज्ञान यांचा संगम असणारे सर्जनशील असे माध्यम असून लोकरंजन आणि लोकशिक्षणाचेही प्रभावी माध्यम आहे. पडद्यावरील चालत्या-बोलत्या आणि गाणाऱ्या प्रतिमांमधून जीवनाचे दर्शन घडवणारी ही गुंतागुंतीची कला छायाचित्रण आणि तांत्रिक कौशल्य यांचे अपत्य होय. आधुनिक तंत्रावर आधारित असलेल्या या दृकश्राव्य माध्यमाचा आस्वाद घेण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी किंवा विशेष ज्ञान असणे आवश्यक नसल्याने समाजातील कोणत्याही स्तरातील प्रेक्षक या कलेचा विनासायास आनंद घेऊ शकतात. एवढेच नाही, तर भिन्न भाषा आणि संस्कृती असलेल्या प्रेक्षकांनाही ‘डबिंग’च्या मदतीने चित्रपटाचा आस्वाद घेणे अलीकडच्या काळात शक्य झाले आहे. हे चित्रपटाचे सगळ्यात महत्त्वाचे बलस्थान आहे.
चित्रपट तयार करणे ही एक सांघिक कृती आहे. किंबहुना निरनिराळे कुशल तंत्रज्ञ, कलाकार एकत्र येऊन चित्रपटाला आकार देत असतात. यात नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य या कलांसह विविध तंत्रांचाही उपयागे करून निर्मिती केली जाते. दिग्दर्शक हा विविध कला, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांची एकत्र मोट बांधून त्याचे नेतृत्व करीत असतो. यामुळेच दिग्दर्शकाला चित्रपटाच्या तांत्रिक अंगाची आणि इतर कलांचीही उत्तम समज असणे आवश्यक असते. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे असे म्हटले जाते. कारण त्याच्या सूचनेनुसारच प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञ काम करत असतात. कथा, पटकथा, गीत, संगीत, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, संकलन अशा सर्व पातळ्यांवर दिग्दर्शकाला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते.
कथा किंवा गोष्ट ही मराठी समाजमनाला नवी नाही. आपले पौराणिक, धार्मिक आणि प्राचीन साहित्य हे मौखिक परंपरेच्या माध्यमातून गोष्टी रूपानेच आपल्यापर्यंत आले आहे. विधीनाट्ये लोकनाट्य, रंगभूमीवरील नाटक यांसारख्या कलाप्रकारातून समाजाने नाट्यही अनुभवले आहे. चित्रपटासारख्या तंत्रकुशल माध्यमाने त्याच ऐकलेल्या कथा चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आणल्यावर मात्र नवलाई ठरली. मराठी चित्रपटाच्या इतिहासाचा आढावा घेतल्यास अगदी पहिल्या मूकपटापासून ते काल-परवाच्या ‘शाळा’ सारख्या चित्रपटापर्यंत साहित्याशी असलेले चित्रपटाचे नाते सहज लक्षात येते. अगदी मॅजिक लँटर्नद्वारे चित्रफिती दाखवतानाही पौराणिक कथानकानुरूप घटना प्रसंग लिहून घेतले जात. अशा रितीने चित्रपटाच्या बाल्यावस्थेपासून साहित्य व चित्रपटाच्या सहसंबंधाचा विचार आपणास करावा लागतो. अर्थात या दोन्हीही कलांमध्ये ‘शब्द’ अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात;
मात्र अभिव्यक्तीच्या माध्यमातील मूलभूत फरक साहित्य आणि चित्रपटातील शब्दांना वेगळे रूप देतात.
अधिक विस्ताराने मांडायचे झाल्यास लेखकाची साहित्यकृती चित्रपटात जेव्हा अवतरते, तेव्हा तिचे मूळ रूप, मूळ हेतू, निवेदन या सर्व घटकात बदल होतो. भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त झालेली साहित्यकृती चित्रपटात येताना अंतर्बाह्य बदलते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चित्रपटाचे माध्यम असते ‘कॅमेरा’. छायाचित्रणाच्या माध्यमातून लेखकाची कथा चित्रमय पद्धतीने पडद्यावर अवतरते. यामुळेच त्याला ‘चित्रपट’ असे म्हणतात. चित्रपटात घटनेला, प्रसंगाला, त्यांच्या जोडणीला अत्यंत महत्त्व असते. ललित साहित्यातून, शब्दातून अभिनय व्यक्त होतो. परंतु चित्रपटात तो देहबोलीतून व्यक्त होत असल्याने कलावंताच्या अभिनयातून तो अधिक जिवंत होतो आणि जिवंत अभिनय करवून घेण्याचे काम दिग्दर्शकाला पार पाडावे लागते. चित्रपट निर्मिती करताना दिग्दशर्काला जे सांगायचे असते ते सत्य स्वरूपात कलावंतांच्या माध्यमातून पोहचवायचे असते. यामुळेच चित्रपट ही दिग्दर्शकाची निर्मितीच असते.
कथा, कादंबरीतील वाचक आणि चित्रपटांचा प्रेक्षक यात खूप अंतर असते. लेखक भाषेच्या माध्यमातून वाचकापर्यंत विषय पोहोचवतो. परंतु त्यात जिवंतपणाचा किंवा रसरसलेपणाचा अनुभव येईलच असे नाही. याउलट चित्रपटातील प्रेक्षकाला जिवंत दृश्य दिसत असल्यामुळे तो त्या दृश्यांशी लगेचच समरस होतो. कथा-कादंबरीतील दृश्यांचा आस्वाद वाचक आपापल्या सवडीप्रमाणे घेऊ शकतो. चित्रपटाचा प्रेक्षक मात्र चित्रपटाच्या गतीमध्येच ही दृश्ये पाहतो, किंबहुना जगतो. चित्रपट ही विविध कलांचा सहभाग असलेली जिवंत कला आहे. नावीन्य हे तिचे अपरिहार्य वैशिष्ट्य म्हणता येईल. क्षणाक्षणाला दिग्दर्शक तिच्यामध्ये नावीन्य निर्माण करून गतिमानता कायम ठेवतो. त्यामुळेच प्रेक्षकांच्या मनात उत्त्कंठा निर्माण होते. कथा-कादंबरीतील दृश्ये तुलनेने संथगतीने जातात. या परस्परविरोधी भूमिकेमुळे लेखनातील आणि चित्रपटातील प्रत्यक्ष दृश्ये यामध्ये अंतर पडत जाते. जी गोष्ट निर्मितीची, तीच कथानकाचीही. कथा-कादंबरीतील कथानक चित्रपटात जसेच्या तसे घेता येत नाही. चित्रपटाच्या आवश्यकतेनुसार दृश्य अधिक उठावदार होईल या हेतूने दिग्दर्शक हव्या त्या ठिकाणी बदल करतो. यामुळेच अनेकदा कथा-कादंबरीतील कथानक आणि चित्रपटांतील कथानक यात फरक पडलेला दिसून येतो.
लेखकाच्या कलाकृतीतील पात्रे ही त्याची मानसपात्रे असतात. ती त्याच्या प्रतिभेतून निर्माण झालेली असल्याने लेखकाने ती हवी तशी घडवलेली असतात. चित्रपटातील पात्रे मात्र इतकी विस्ताराने येत नाहीत. कारण चित्रपट माध्यमाला असलेली काळाची-दृश्यांची मर्यादा होय. या संदर्भात हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे निर्माते प्रकाश झा यांचे मत विचारात घेता येईल. ‘पुस्तकांच्या वाचकांसाठी पात्र लिहिणे व चित्रपटातील प्रेक्षकांना ती दाखवणे यामध्ये खूप मोठा फरक असून, ते मला खूप मोठे आव्हान वाटते. कथेत पात्र ज्याप्रमाणे लिहिलेली आहेत व वाचकांना ती तशी दिसलेली आहेत ती तशीच्या तशी पडद्यावर साकारणे ही तारेवरची कसरत असते. कथा रंगवण्यासाठी चित्रपटामध्ये खूप कमी वाव मिळतो. पुस्तकात मात्र तुम्ही कितीही पाने वाढवू शकता,’ असे ते म्हणतात. असे असले तरी काही बाबतीत चित्रपट हे माध्यम साहित्यापेक्षा किंचित उजवे ठरते. उदा. धबधब्याखाली बसलेले प्रेमीयुगुल हा प्रसंग शब्दांमधून मांडायचा झाल्यास लेखकाला त्या धबधब्याचे वर्णन, आजूबाजूचा परिसर, प्रेमीयुगुल, हे सर्व विस्ताराने मांडावे लागेल. याउलट हेच दृश्य चित्रपटात प्रत्यक्षात दिसत असताना दिग्दर्शक थेट धबधबा आणि त्याखाली नट-नटी बसवून चित्रीकरण करू शकतो. थोडक्यात चित्रपट आणि साहित्य या दोन्हीही कलामाध्यमांची आपापली बलस्थाने आणि मर्यादा आहेत हे मान्य करावे लागते.
अनेक कलांचा सुयोग्य मेळ असलेल्या चित्रपटामध्ये साहित्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना साहित्य हा चित्रपटाचा मुख्य आधारभूत घटक आहे. मराठी चित्रपटांना साहित्याने अगदी सुरुवातीपासून समृद्ध केले आहे. मराठी साहित्यातील अनेक कथा, कादंबऱ्या आणि कवितांवर चित्रपटनिर्मिती झाली आहे. दिग्दर्शकांना साहित्याने नेहमीच चित्रपट निर्मितीसाठी प्रेरित केल्याचे दिसून येते. सुवर्णकमळ मिळवणारा ‘श्यामची आई’ हा चित्रपट साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारित होता. याच चित्रपटात कवी यशवंतांची गाजलेली कविता ‘आई म्हणोनी कोणी’ ही अत्यंत कुशलतेने वापरण्यात आली. शिवाजी महाराजांच्या चरित्राने मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक ऐतिहासिक चित्रपटांना कथाबीज पुरवले आहे. यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागते ते भालजी पेंढारकरांचे. त्यांचे नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, जय भवानी, शिलंगणाचे सोने, छत्रपती शिवाजी, महाराणी येसुबाई, पावनखींड, स्वराज्याचा शिलेदार, थोरातांची कमळा, मराठा तितुका मेळवावा, गनिमी कावा इत्यादी चित्रपट ऐतिहासिक स्वरूपाचे आहेत.
ह. ना. आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कथेवरून प्रभात कंपनीने ‘कुंकू’ हा अजरामर सामाजिक चित्रपट बनवला. वि. वि. बोकिलांच्या ‘मंगळागौरीच्या रात्री’ या कादंबरीवरून ‘पहिली मंगळागौर,’ तर नाथमाधवांच्या डॉक्टर कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ असे चित्रपट निर्माण झाले. गो. नी. दांडेकरांच्या ‘पवनाकाठचा धोंडी’ आणि ‘जैत रे जैत’ या कादंबऱ्यांनी मराठी चित्रपटाला वैभव प्राप्त करून दिले. याशिवाय व्यंकटेश माडगूळकर, दिनकर पाटील, य. गो. जोशी यांच्या लेखनावर आधारित अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती झाली आहे. अण्णा भाऊ साठेंच्या गाजलेल्या कादंबऱ्यांवर एकूण सात चित्रपट निर्माण झाले. वैजयंता - कादंबरी वैजयंता, टिळा लावते मी रक्ताचा - आवडी, डोंगरची मैना माकडीचा माळ, मुरळी मल्हारी रायाची - चिखलातील कमळ, वारणेचा वाघ - वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्याची तऱ्हा, अलगूज, फकिरा-फकिरा.
मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण झालेल्या व्यक्तिचित्रणात्मक चित्रपटांचा मुख्य आधार त्या व्यक्तींचे आत्मचरित्र, चरित्र असल्याने एकार्थाने साहित्य हेच होते. यामध्ये पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तीपासून ते अगदी अलीकडील महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. प्रकाश बाबा आमटे, बालगंधर्व, लोकमान्य टिळक, दादासाहेब फाळके इत्यादी व्यक्तींचा समावेश होतो.
पुण्यात गाजलेल्या अभ्यंकर खून खटल्यातील प्रमुख आरोपी आणि माफीचा साक्षीदार असलेला मुनावर शहाने लिहिलेल्या ‘येस! आय अॅम गिल्टी’ या पुस्तकावर ‘माफीचा साक्षीदार’ हा चित्रपट निर्माण झाला. मराठीतील केवळ गद्यलेखनावरच चित्रपटानिर्मिती झाली नाही, तर गाजलेल्या कविताही चित्रपटांच्या पटकथेतून पडद्यावर आल्या. कवी बी (मुरलीधर अनंत गुप्ते) यांच्या कमळा या दीर्घकाव्यावर ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट निर्माण झाला. याशिवाय ना. धों. महानोरांच्या ‘अजिंठा’ या दीर्घ कवितेवर ‘अजिंठा’ या नावानेच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मराठी साहित्यकृतीचा आधार घेऊन हिंदी चित्रपटही निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. यामध्ये अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या ‘सांगत्ये ऐका’ या आत्मचरित्रावर हिंदीमध्ये ‘भूमिका’ हा चित्रपट तर सदानंद देशमुखांच्या ‘बारोमास’ या कादंबरीवरही हिंदी चित्रपट निर्माण झाला आहे. साहित्यावरून निर्माण झालेल्या चित्रपटांची यादी अगदी ‘जोगवा’, ‘नटरंग’, ‘दुनियादारी’पर्यंत येऊन ठेपते. साहित्यावर आधारित निर्माण होणाऱ्या चित्रपटांसंदर्भात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांचे मत येथे विचारात घेता येते. ते म्हणतात, ‘साहित्यावर आधारित निर्माण झालेले बहुतांश सर्वच चित्रपट लाकेांना पटकन कळतात. दर वेळी एखादी कथा, गोष्ट रचताच येईल असे नाही. अशा वेळी दिग्दर्शकांना साहित्याचा आधार घ्यावा लागतो. यामुळे साहित्य आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी एकमेकांशी घट्ट स्वरूपात निगडित आहेत.’ अशा रितीने मराठी साहित्य आणि चित्रपटाचा सहसंबंध अगदी मूकपटापासून ते अलीकडच्या चित्रपटांपर्यंत अधोरेखित करता येईल.
साहित्यातून चित्रपट निर्माण होत असताना चित्रपट माध्यमाचे सजग भान असणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा महान साहित्यकृतीवर आधारित चित्रपट फसू शकतो. या संदर्भात ‘पुलं’च्या साहित्यकृतीवर आधारित ‘गोळाबेरीज’ आणि ‘अजिंठा’ हे चित्रपट उदाहरण म्हणून सांगता येतील. साहित्यकृती दर्जेदार असली तरीही तिचे माध्यमांतर होत असताना त्याची सारी मदार असते ती पटकथेवर. ताळेबंद पटकथा आणि उत्तम दिग्दर्शन असेल तर चित्रपट प्रभावी बनतो. साहित्याचे माध्यम शब्द असतात. परंतु चित्रपटसृष्टीचे माध्यम यंत्र किंवा कॅमेरा असतो. यंत्राच्या जोडीला चित्रपटात अभिनयातून प्रकट होणारी स्वतंत्र शक्ती असते. लेखकाची ललितकृती ही वाचकापुरती मर्यादित राहते. परंतु चित्रपटातील चित्रकृती ही समाजव्यापी असते. कथेला वाचक तर चित्रपटाला समाज असतो. यामुळेच चित्रपटसृष्टीचा पट हा अधिक मोठा आणि उठावदार असतो. साहित्यकृतीत शब्द बोलतात, तर चित्रपटात कॅमेरा. याच कॅमेऱ्याच्या मागे दिग्दर्शकाच्या सर्व भावना एकवटलेल्या असतात. कथेच्या आधारे समाजापुढे नेमके काय ठेवायचे याची निश्चिती दिग्दर्शक करतो. त्यानुसार इतर अनेक साधनांचा वापर करून तो आपली चित्रपटसृष्टी लेखकाच्या मर्यादित कल्पनेपेक्षा अधिक विस्तृत करून प्रेक्षकांच्या समोर मांडतो. समाजाला काय सांगायचे कोणता विचार मांडायचा, निव्वळ रंजन करायचे की उद्बोधन, याचा विचार करून दिग्दर्शक हाती घेतलेल्या कथेला नवे रूप देतो. अशा वेळी त्याने स्वीकारलेले चित्रपटाचे तंत्र महत्त्वाचे ठरते. हे वास्तव असले तरी मराठी साहित्यावर उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. किंबहुना साहित्यावर आधारित चित्रपट निर्माण झाल्यानंतर वाचकांकडून पुन्हा त्या मूळ कलाकृतीची मागणी वाढत असल्याचेही आढळून आले आहे. चित्रपटातून कलाकृतीचा आनंद घेतल्यानंतर फिरून पुन्हा त्या मूळ कलाकृतीचा आनंद मिळवावा हीच त्यामागील रसिकांची भूमिका असते. मराठी साहित्याच्या दृष्टीने हा एक चांगला बदल होत आहे असे म्हणता येईल.
-
डॉ. जया विश्वनाथ पाटील
ई-मेल : jayavpatil12@gmail.com
(लेखिका पुण्यातील पृथ्वी अॅकॅडमीमध्ये भारतीय इतिहासामधील सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांचे अध्यापन करतात.)
(या लेखाचा पहिला भाग
येथे वाचता येईल.)