गीतकार इंदिवर आणि पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर यांचा २७ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय... .........
इंदिवर
एक जानेवारी १९२४ रोजी झाशी येथे इंदिवर यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव श्यामल बाबू राय. इंदिवर हे गीतकार बनण्याचे स्वप्न बघत होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुंबईत आले. प्रथम १९४६मध्ये ‘डबल क्रॉस’ या चित्रपटासाठी गीतकार म्हणून कार्य करण्याची संधी आली; पण हा चित्रपट न चालल्यामुळे त्यांची खास ओळख निर्माण झाली नाही.
दरम्यान, १९५१मध्ये ‘मल्हार’ या चित्रपटाचे एक यशस्वी गीतकार म्हणून ओळख मिळवण्यात त्यांना काही प्रमाणात यश आले. १९६३मध्ये बाबूभाई मिस्त्री यांच्या संगीतमय पारसमणी या चित्रपटात इंदिवर यांनी गीते लिहिल्यावर त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.
१९७०मध्ये विजय आनंद दिग्दर्शित चित्रपट ‘जॉनी मेरा नाम’मध्ये ‘नफरत करने वालो के सीने मे..,’ ‘पल भर के लिये कोई मुझे..’ अशी एकसे एक रोमँटिक गाणी त्यांनी लिहिली आणि प्रेक्षकांची मने काबीज केली. मनमोहन देसाई यांच्या सच्चा-झूठा या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले ‘मेरी प्यारी बहनियां बनेगी दुल्हनियां..’ हे गाणे अजूनही लग्नाच्या वरातीत वाजवले जाते.
सफर चित्रपटातील ‘जीवन से भरी तेरी आंखे..,’ ‘और जो तुमको हो पसंद..’ ही गाणी इंदिवर यांनी लिहिलेली आहेत. राकेश रोशन यांच्या यशामागे इंदिवर यांचा खूप मोठा हात आहे. कामचोर, खुदगर्ज, खून भरी मांग, काला बाजार, किशन कन्हैया, किंग अंकल, करण अर्जुन व कोयला या चित्रपटांसाठी इंदिवर यांनी गाणी लिहिली आहेत. राकेश रोशन यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या आवडत्. निर्माता-दिग्दर्शकांमध्ये मनोज कुमार, फिरोज खान हे होते. इंदिवर यांचे आवडते संगीतकार कल्याणजी-आनंदजी होते.
१९६५मध्ये प्रदर्शित झालेला ‘हिमालय की गोद में’, यानंतर उपकार, दिल ने पुकारा, सरस्वती चंद्र, यादगार, सफर, सच्चा झूठा, पूरब और पश्चिम, जॉनी मेरा नाम, पारस, उपासना, कसौटी, धर्मात्मा, हेराफेरी, डॉन, कुर्बानी, कलाकार इत्यादी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. १९७५मध्ये अमानुष या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम गीतकार पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. इंदिवर यांनी सुमारे ३०० चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. इंदिवर यांचे २७ फेब्रुवारी १९९९ रोजी निधन झाले.
.......
गणेश वासुदेव मावळणकर २७ नोव्हेंबर १८८८ रोजी गणेश वासुदेव मावळणकर यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. ग. वा. मावळणकर हे मराठी असले, तरी त्यांचे वास्तव्य गुजरातमध्ये होते.
गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. ते पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते. गणेश वासुदेव मावळणकर यांचे २७ फेब्रुवारी १९५६ रोजी निधन झाले.
माहिती संकलन : संजीव वेलणकर