Ad will apear here
Next
‘आर्ट सर्कल’चा कला संगीत महोत्सव २४ जानेवारीपासून; थिबा राजवाडा प्रांगणात ख्यातकीर्त कलाकारांचे सादरीकरण


रत्नागिरी :
केवळ रत्नागिरीचेच नव्हे, तर कोकणचे नाव सांस्कृतिक विश्वात देशभरात पोहोचवणारा, ‘आर्ट सर्कल’तर्फे आयोजित केला जाणारा कला संगीत महोत्सव २४, २५ आणि २६ जानेवारी २०२० रोजी ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात होणार आहे. दर वर्षीप्रमाणेच प्रतिभावान आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार यात आपली कला सादर करणार आहेत. महोत्सवाच्या स्थळाला कै. शंकरराव टेंकशे नगरी असे नाव देण्यात आले आहे.

विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर या जगप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीने यंदाचा महोत्सव सजाणार आहे. तसेच नवोदित कलाकारांचे सादरीकरणही या महोत्सवात रंग भरणार आहे. शास्त्रीय संगीताची स्वर्गीय अनुभूती आणि राजवाड्याची भव्यता हा संगम निव्वळ शास्त्रीय संगीतप्रेमींनाच नव्हे, तर आबालवृद्धांना मोहात पाडतो. 

२४ जानेवारी रोजी डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांच्या भरतनाट्यम नृत्यकीर्तनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मंदिरामध्ये ईशसेवा करण्यासाठी म्हणून निर्माण झालेली भरतनाट्यम ही नृत्यशैली अस्सल भारतीय तत्त्वज्ञानाशी जोडलेली आहे. डॉ. कनिनिका आणि पूजा या दोघी कीर्तन, नृत्य, संगीत यांचा अनोखा मेळ साधून नृत्यकीर्तन सादर करणार आहेत. या नृत्यकीर्तनामध्ये सरस्वती सुब्रह्मण्यम गायनसाथ करणार असून, अतुल शर्मा बासरीसाथ, तर सतीश कृष्णमूर्ती मृदंगसाथ करणार आहेत.

नृत्यकीर्तनानंतर लगेचच विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. श्रुती सडोलीकर-काटकर हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक अत्यंत आदरणीय नाव असून, पंडित वामनराव सडोलीकर यांचा वारसा त्या समर्थपणे पुढे नेत आहेत. त्यांना अजय जोगळेकर संवादिनीसाथ, तर मंगेश मुळ्ये तबलासाथ करणार आहेत. जयपूर अत्रौली घराण्याच्या अध्वर्यू असलेल्या श्रुती सडोलीकर-काटकर महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप करणार आहेत. कै. शंकरराव टेंगशे स्मृती मैफल असे पहिल्या दिवशीच्या मैफलीचे नाव असून, ती आसमंत बेनवोलन्स यांच्या सहयोगाने होणार आहे. 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा (२५ जानेवारी) प्रारंभ महाराष्ट्रातील आश्वासक युवा गायिका मुग्धा वैशंपायन हिच्या गायनाने होणार आहे. ‘लिटिल चॅम्प्स’च्या मंचावरून घराघरात पोहोचलेली मुग्धा आज शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील नवीन पिढीतील आश्वासक कलाकार आहे. सुप्रसिद्ध वादक अनंत जोशी मुग्धाला संवादिनीची, तर स्वप्नील भिसे तबल्याची साथ करणार आहेत. 

त्यानंतर लगेचच संतूरवादक संदीप चॅटर्जी, बासरीवादक संतोष संत, तबलावादक पं. रामदास पळसुले आणि पखवाजवादक पं. भवानीशांकर यांची जुगलबंदी रंगणार आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू अशोक कुमार चॅटर्जी यांचे कलाकार सुपुत्र अर्थात संदीप यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून संतूर शिकायला सुरुवात केली. गुरू पं. तरुण भट्टाचार्य यांच्याकडे ते गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ शिक्षण घेत आहेत. तसेच, पं. अजय चक्रवर्ती यांच्याकडे ते रागदारी आणि लयकारीचे शिक्षण घेत आहेत. 

बासरीवादक संतोष संत हे पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य आहेत. घरातूनच मिळालेले संगीताचे संस्कार वृद्धिंगत करून संत यांचा सांगीतिक प्रवास चालू आहे. 

तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य रामदास पळसुले मैफलीला तबलासाथ करणार आहेत. गेली दोन दशके भारतभरातील शिष्यांना पारंपरिक गुरुकुल पद्धतीने ते प्रशिक्षण देत आहेत. 

या मैफलीमध्ये ज्येष्ठ पखवाजवादक पं. भवानीशंकर साथ करणार आहेत. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी पखवाज आणि तबला यांचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शास्त्रीय संगीत आणि फ्युजन बँड अशा दोन्ही संगीत पद्धतीमध्ये साथसंगत करण्यात त्यांचा हातखंडा आहे. 

थिबा राजवाडा (फोटो : प्रसाद गोखले)

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी (२६ जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजता असलेले विशेष आकर्षण म्हणजे स्त्री ताल तरंग-लय राग समर्पण! घटमसारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर घटमवादक सुकन्या रामगोपाल यांनी प्रभुत्व प्राप्त केले आहे. भारतातील त्या पहिल्या स्त्री घटमवादक आहेत. वेगवेगळ्या श्रुतीचे सहा ते सात घटम एकत्र ठेवून त्यातून अप्रतिम तालनिर्मिती करणारा घटतरंग हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. सर्व वादक स्त्री कलाकार आहेत. सौम्या रामचंद्रन (व्हायोलिन), लक्ष्मी पिल्लई (मृदंग), वाय. जी. श्रीलता (वीणा) आणि भाग्यलक्ष्मी (मोर्चीग) यांचा त्यात समावेश आहे. 

ज्येष्ठ कलावंत पं. उल्हास कशाळकर महोत्सवाचा समारोप करणार आहेत. वडील नागेश कशाळकर यांच्याकडून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पं. कशाळकर यांनी पं. गजाननबुवा जोशी, पं. राम मराठे, पं. राजाभाऊ कोकजे, पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडून गायन शिकून ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर अशा तीनही घराण्याची गायकी आत्मसात केली. कोलकाता संगीत रिसर्च अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी गेल्या २५ वर्षांत अनेक शिष्य घडवले आहेत. जगभरातील उत्तमोत्तम मानसन्मान पं. कशाळकर यांना लाभले आहेत. तालयोगी पं. सुरेश तळवलकर पंडितजींना तबलासाथ, तर अजय जोगळेकर संवादिनीसाथ करणार आहेत. 

प्रतिभावान कलाकारांच्या सादरीकरणाने यंदाचाही महोत्सव प्रति वर्षाप्रमाणे अविस्मरणीय व्हावा यासाठी आर्ट सर्कल प्रयत्नशील आहे. रसिकांनी या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन ‘आर्ट सर्कल’च्या वतीने करण्यात आले आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZNFCH
Similar Posts
रत्नागिरीतील आर्ट सर्कल संगीत महोत्सवातील कलाकारांच्या भावमुद्रा २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रत्नागिरीतील थिबा राजवाड्याच्या प्रांगणात तेरावा आर्ट सर्कल संगीत महोत्सव पार पडला. त्यात विविध नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली. रत्नागिरीतील लेन्सआर्ट या फोटोग्राफर्सच्या ग्रुपमधील सदस्यांनी या कलाकारांच्या टिपलेल्या भावमुद्रा येथे प्रसिद्ध करत आहोत. उपेंद्र बापट,
सूर-तालांच्या बहारदार आविष्काराने रंगला ‘आर्ट सर्कल’ संगीत महोत्सव रत्नागिरी : इतिहासाच्या आठवणी सांगणाऱ्या आणि कलेचा समृद्ध वारसा असलेल्या भव्य थिबा राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ख्यातकीर्त कलाकारांनी सूर-तालांचा बहारदार आविष्कार सादर केला आणि तीन संध्याकाळी रसिक रत्नागिरीकर एका वेगळ्याच विश्वात रमून गेले. २४ जानेवारीला डॉ. कनीनिका निनावे आणि पूजा भालेराव
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
पुलोत्सव तरुणाई पुरस्कार अनघा मोडक यांना; सामाजिक कृतज्ञता सन्मान ‘सुहित जीवन ट्रस्ट’ला रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिक या संस्थांतर्फे रत्नागिरीत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुलोत्सवा’तील यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अचानकपणे दृष्टी गमावल्यानंतरही खचून न जाता संघर्षमय प्रवास करून निवेदक म्हणून प्रभावी कामगिरी करणाऱ्या अनघा मोडक यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्कार जाहीर झाला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language