Ad will apear here
Next
कृषिप्रधान चीन जगाची ‘फॅक्टरी’ कसा बनला?


‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’
या लेखमालेचा सातवा भाग...

.......
आपण दर वर्षीप्रमाणे यंदाही सणासुदीसाठी लागणारे पणत्यांपासून आकाशकंदिलापर्यंतचे सगळे साहित्य चीनकडून मागवणार आहोत, असे नुकतेच वाचनात आले. फक्त भारतच नाही, तर जगातील अन्यही बहुतांश देश आपल्या सण-समारंभांचे सामान चीनकडून खरेदी करतात. अमेरिकेत हॅलोवीनपासून ख्रिसमसपर्यंतच्या सगळ्या सणांना लागणारे साहित्य चीनमध्ये बनवले जाते. साहजिकच मनात येते, जगाच्या लोकसंख्येसाठी पुरवठा करू शकेल, इतके उत्पादनसामर्थ्य चीनकडे आले कुठून? एक कृषिप्रधान देश अवघ्या पस्तिसेक वर्षांत जगाची ‘फॅक्टरी’ कसा झाला?

फिंग यांची दूरदृष्टी
१९७६ साली चीनच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले नेते तंग शाओ फिंग यांची दूरदृष्टी वाखाणण्यासारखी होती. राष्ट्राध्यक्ष या पदावर रुजू झाल्यावर फिंग यांनी एक महत्त्वाचा बदल करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. त्यांनी माओ त्स तोंग यांच्या साम्यवादी चिनी अर्थव्यवस्थेला औद्योगिकीकरणाचे वळण लावले. त्यांनी आवश्यक ते सर्व सामाजिक बदल करून चिनी लोकांची मानसिकता बदलली आणि इतकी वर्षे कोषात राहिलेल्या चीनला नवीन उभारी दिली.

विशेष आर्थिक क्षेत्रे (एसईझेड)
चीनमधल्या कुआंगतोंग प्रांतातील एका छोट्या शेनझेन शहरापासून सुरू झालेला हा एसईझेड उपक्रम अतिशय कमी कालावधीत चीनच्या प्रगतिपथावरील मैलाचा दगड ठरला. २०२०पर्यंत चीनमध्ये सहा मोठे एसईझेड आहेत. त्यातील एकही एसईझेड ३० हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा लहान नाही. चीन सरकार या एसईझेडमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करते. अखंडित वीजपुरवठा, कुशल कामगार, मुबलक पाणी, रस्ते या सर्व समस्या प्राथमिक पातळीवर सोडवल्या जातात. त्याचबरोबर, जमीन घेण्यासाठी सरकार मदत करते. कंपनी उभी करण्यासाठी लागणारा पैसा सरकार (बँका) अत्यंत कमी दरामध्ये मिळवून देते. कारखानदारांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी स्थानिक सरकार तातडीने मदत करते. कामाबाबतचे सर्व निर्णय तत्परतेने घेतले जातात. त्यामुळे साहजिकच कामाचा वेग वाढतो. पर्यायाने उत्पादनक्षमता आणि उत्पादनही वाढते. 

फिंग यांनी एसईझेड सुरू करण्याबरोबरच आणखी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी विशाल प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे स्थानिकीकरण सुरू केले. म्हणजेच, चीनच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळी व विशिष्ट उत्पादने बनवली जातात. या पद्धतीमुळे, उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात विकत घेतला जातो. त्यामुळे त्याची किंमतही कमी होते. स्वाभाविकपणे, अंतिम उत्पादनाची किंमतही कमी राखणे चिनी उत्पादकांना शक्य होते. 



परकी गुंतवणुकीसाठी ‘रेड कार्पेट’
प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात राबवायचे असेल, तर चीनमध्ये नवीन तंत्रज्ञान आणणे गरजेचे होते. उद्योगासाठी सदैव तत्पर असणाऱ्या चीनच्या सरकारने ते साकार केले. आज चीनमध्ये एखाद्या विदेशी कंपनीला गुंतवणूक करायची असल्यास त्या कंपनीला ‘रेड कार्पेट’ वागणूक दिली जाते. कंपनीला आवश्यक असलेल्या कच्च्या मालापासून जमीन मिळवून कंपनी सुरू करेपर्यंत सर्वतोपरी मदत चिनी सरकार करते. चिनी सरकारचा एक विभाग केवळ या कामांसाठीच कार्यरत असतो. हा विभाग कंपन्यांच्या सतत संपर्कात राहून कंपन्यांच्या सर्व गरजा तातडीने पूर्ण करतो. 

एक जागतिक उत्पादन केंद्र असा ठसा जगावर उमटवणाऱ्या चीनने हे कसे साध्य केले, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. चीनच्या या यशामागची काही कारणे अशी आहेत –

१. कटाक्षाने राजकीय स्थिरता राखणे
२. तळागाळापासून सुधारणा राबवण्यावर भर देणे 
३. ग्रामीण क्षेत्राचा विकास करणे
४. पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकारचा प्रचंड पाठिंबा
५. टप्प्याटप्प्याने औद्योगिक क्रांती राबवणे

चीनच्या वाटचालीमध्ये औद्योगिक क्रांतीचे योगदानही मोलाचे आहे. या क्रांतीचे तीन मुख्य टप्पे आहेत. १९७८ ते १९८८ या पहिल्या टप्प्याला औद्योगिक क्रांतिपूर्व कालावधी असेही म्हणतात. चीनने या टप्प्यात तळागाळापासून काम करण्यास सुरुवात केली. या प्रयत्नांना यश येऊन व्हिलेज इंडस्ट्रियल ग्रॉस आउटपुट १४ टक्क्यांवरून जीडीपीच्या ४० टक्क्यांपर्यंत वाढले. या काळामध्ये चीनने सर्वांत मूलभूत उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे उत्पादन वाढवले. अन्न, कपडे, मांस व इतर कन्झ्युमर गुड्सचे उत्पादन वाढवून लोकांचे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले. 

१९८८ ते १९९८ या दुसऱ्या टप्प्यात चीनने कामगार व कारागिरीवर भर दिला. कामगारांची तीव्र गरज भासणाऱ्या लाइट कन्झ्युमर गुड्सच्या उत्पादनात कमालीची वाढ केली. सरकारने या टप्प्यात वस्त्रोद्योगातील उत्पादनांची निर्यात सुरू केली. त्याचबरोबर, फर्निचर व खेळणी यांच्या निर्यातीलाही सुरुवात केली. 

१९९८ ते २००५ या तिसऱ्या व अंतिम टप्प्यामध्ये चीनने भरारी घेतली. या टप्प्याचे वर्णन केवळ दोन शब्दांत करता येईल, ते म्हणजे – मास प्रॉडक्शन. या काळात चीनने कोळसा, पोलाद, रेल्वे रुळ, इंटरमीजिएट गुड्स, जहाजे, सिमेंट अशा गोष्टी जगाला निर्यात करायला सुरुवात केली. 



इतक्या मोठ्या प्रमाणात निर्यात केल्याने साहजिकच अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत चीनकडे परकी गंगाजळी अधिक आहे. चिनी उत्पादक आज जगातील सर्वांत श्रीमंत आहेत आणि गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. याचे आदर्श उदाहरण चीनचा आफ्रिकेकडे असलेला कल हे आहे. २०२० या वर्षामध्ये चीनला आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची आहे. सोप्या शब्दांत सांगायचे, तर चीनला तेथे आपले दुसरे उत्पादन केंद्र सुरू करायचे आहे. त्यामुळे आफ्रिकेतील बहुतांश देशांमध्ये चीनने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोणाला रेल्वे बांधून देण्यासाठी मदत केली आहे, तर कोणाला मोठे कर्ज देऊन कृतकृत्य केले आहे. काही देशांमध्ये चिनी कंपन्यांनी स्वतःचे उत्पादन प्रकल्पही सुरू केले आहेत. आफ्रिकेबरोबरच, जगातील अनेक देशांमधील प्रादेशिक कंपन्यांमध्ये चिनी कंपन्या संयुक्त भागीदारीद्वारे गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे वरकरणी कंपनी चिनी वाटली नाही, तरी त्यातील पैसा चिनी आहे, हे विसरून चालणार नाही. ‘चला तो चांद तक, वरना रात तक’ अशी टीका सोसावी लागणारा तकलादू चिनी माल आता बंद झाला आहे आणि चीनने केव्हाच पुढचे पाऊल टाकलेले आहे. 

चीनमध्ये लोकशाही नाही, मानवी अधिकारांची गळचेपी केली जाते, कामगार कायदे अस्तित्वात नाहीत, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी नाही, खासगीकरण नाही, रोजंदारी अत्यंत कमी आहे व यामुळे चिनी माल स्वस्त असतो... अशी उथळ चर्चा करण्यापेक्षा, चिनी माल इतका स्वस्त का असतो आणि चीन इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन कसे करू शकतो, याचा सखोल विचार करायला हवा. १९७६ साली चालू झालेल्या औद्योगिकीकरणामुळे चीनला बक्कळ पैसा मिळाला; पण चीनने २०२०मध्ये हा पैसा वेगवेगळ्या मार्गांनी गुंतवला आहे. म्हणूनच, उत्पादन क्षेत्र म्हटले की मास डम्पिंग, मास प्रॉडक्शन असा विचार करण्याऐवजी त्यामागील कारणे अभ्यासणे अधिक योग्य ठरेल.

- सोहम काकडे
ई-मेल : soham.kakade@ewan.co.in

(लेखक पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आणि चिनी भाषेचे तज्ज्ञ आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KXLPCP
Similar Posts
भारत-चीन संबंध : भावनिक नको, ‘प्रॅक्टिकल’ दृष्टिकोन हवा ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा २०वा म्हणजेच अंतिम भाग.....
चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धात भारतासाठी संधी अशी अनेक उत्पादने आहेत, ज्यामध्ये भारत आंतरराष्ट्रीय दर्जा साध्य करून, उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून निर्यातीमध्ये चांगलीच वाढ करू शकतो. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धामध्ये भारतासाठी निश्चितच संधी दडलेल्या आहेत. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १३वा भाग..
चीनचा नवा विस्तारवाद – वन बेल्ट वन रोड शी जिनपिंग नोव्हेंबर २०१२मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष झाले आणि लगेचच मार्च २०१३मध्ये ते चीनचे अध्यक्ष झाले. चीन आधीपासूनच पाहत असलेले विस्तारवादाचे स्वप्न जिनपिंग अध्यक्ष झाल्यानंतर आणखी गडद झाले. त्याबरोबरच, आणखी महत्त्वाकांक्षी स्वप्ने व भौतिक विस्तारवाद साकारण्याचीही तयारी सुरू झाली. ही तयारी
करोनानंतरचा चीन जिथून करोना विषाणूचा प्रसार जगभर झाला, त्या विषाणूचा देशांतर्गत प्रसार रोखण्यासाठी चीनने नेमके काय केले, आत्ता चीनमधील परिस्थिती नेमकी कशी आहे, याचा वेध ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या आजच्या दुसऱ्या भागात घेण्यात आला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language