Ad will apear here
Next
‘पर्फेक्शनिस्ट’ रांगणेकर
ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर यांचा एक फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचे भाचे मुरलीधर गावस्कर यांनी जाग्या केलेल्या त्यांच्या स्मृती, तसेच, रांगणेकरांविषयी आणखी काही माहिती देणारा हा लेख... 
.........
मो. ग. रांगणेकरांच्या गिरगावातल्या खोताच्या वाडीतल्या चाळीतल्या वास्तव्याच्या, त्यांच्या ठराविक पेहरावाच्या, नाटकांच्या तालमींच्या वेळच्या स्पष्ट शब्दोच्चाराबद्दलच्या आग्रही भूमिकेच्या स्मृती, रांगणेकरांचे पुण्यात वास्तव्याला असलेले भाचे मुरलीधर गावस्कर यांनी जाग्या केल्या. आजच्या भाषेत थोडक्यात सांगायचं झालं, तर ते त्या वेळचे ‘पर्फेक्शनिस्ट’ होते. ‘तो मी नव्हेच’च्या आरंभीच्या प्रयोगाच्या वेळी खुद्द आचार्य अत्र्यांनादेखील रांगणेकरांच्या दिग्दर्शनाबद्दल आणि त्यांनी खटला आणि इतर प्रसंग स्टेजवर कसे बसवले असतील याबद्दल वाटत असलेल्या कुतुहलाची आणि शंकेबद्दलची आठवण गावस्करांनी सांगितली. रांगणेकरांनी रंगमंचाचे दोन भाग, दोन पडदे वापरून करून उभा केलेला प्रयोग विसरणं शक्यच नाही, हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. तसंच, काही कारणानं पणशीकर आणि रांगणेकरांमध्ये उभ्या राहिलेल्या बेबनावाच्या वेळी, रांगणेकरांनी आत्माराम भेंडे यांना प्रमुख भूमिका देऊन तीही उत्तम वठवून घेतल्याची आठवण सांगितली.

रांगणेकरांबद्दल आणखी काही...

१० एप्रिल १९०७ रोजी जन्मलेले मोतिराम गजानन रांगणेकर म्हणजे मराठी नाट्यसृष्टीतलं एक मातब्बर नाव! वयाच्या चौतिसाव्या वर्षी म्हणजे तीस नोव्हेंबर १९४१ रोजी त्यांनीच लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘आशीर्वाद’ नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकलं. पुढची तब्बल पस्तीस वर्षं म्हणजे जानेवारी १९७६च्या ‘मी एक विदूषक’पर्यंत ते मराठी रंगभूमीवर लेखक/ दिग्दर्शक या नात्याने कार्यरत होते. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आपल्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेतर्फे अनेक उत्तमोत्तम नाटकं लिहिली आणि दिग्दर्शित केली. पायात सपाता, धोतर नेसलेलं, अंगात मलमलचा कुडता, नाकावर चष्म्याची नाजूक फ्रेम आणि चालताना सोगा हातात धरून चालणं अशा त्यांच्या मूर्तीची छाप वर्षानुवर्षं रंगभूमीवर होती.

विष्णुपंत औंधकर, विमल सरदेसाई, ज्योत्स्ना भोळे, श्रीपाद जोशी, स्नेहप्रभा प्रधान, गजानन जागीरदार, गोविंद करमरकर, कुसुम कुलकर्णी, बेबी शकुंतला, शाहू मोडक, बाळकराम, कान्होपात्रा, उषाकिरण, मास्टर अविनाश, श्रीकांत मोघे, प्रभाकर पणशीकर, आत्माराम भेंडे, पु. ल. देशपांडे, रामचंद्र वर्दे यांसारख्या मराठी रंगभूमीच्या दिग्गज कलाकारांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला रांगणेकरांसोबत कामं केली होती. नाटक व्यवसायाला काहीशी उतरती कळा आली असताना रांगणेकरांनी आपल्या नाटकांद्वारे प्रेक्षकांना पुन्हा थिएटर्सकडे खेचून आणलं. ज्यांना पूर्वीची पाच-सहा तास चालणारी संगीत नाटकं आवडत नसत, अशा प्रेक्षकांना, रांगणेकरांनी आटोपशीर नाटकं सादर करून आपल्याकडे वळवलं.

रांगणेकरांसोबत बरीच नाटकं केलेल्या प्रभाकर पणशीकरांनी ‘तोच मी’ या आत्मचरित्रात, रांगणेकरांची नाटक बसवण्याची नेटकी पद्धत सांगितली आहे- ‘पहिले दोन दिवस हातात नकलेची वही घेऊन बैठी तालीम. या तालमीत ते प्रत्येक पात्राकडून संवाद व्यवस्थित म्हणून घेत. योग्य त्या लयीत आणि आवाजाच्या चढ-उतारांसह संवाद म्हणणं चालू असताना ऱ्हस्व-दीर्घ उच्चार, न-ण, स-श यांमध्ये गफलत केलेली त्यांना खपत नसे. या बैठ्या तालमीत नकलेवर थोडाबहुत ताबा आला, की उभ्या तालमी सुरू होत. याप्रमाणे एका आठवड्यात पहिला अंक तयार झाला, की पुढच्या आठवड्यात पहिल्या अंकाची उजळणी आणि दुसरा अंक याप्रमाणे तीन आठवड्यांत सबंध नाटक बसे. नंतर मेकअप-कपडे, प्रॉपर्टी, सेटिंग, फर्निचर यांसह दोन-चार तालमी आणि पहिला प्रयोग अशी पद्धत होती.....रांगणेकर कल्पक आणि नैसर्गिक दिग्दर्शक होते.’

रांगणेकरांनी दिग्दर्शित केलेलं प्रचंड यशस्वी नाटक म्हणजे आचार्य अत्रे लिखित, ‘तो मी नव्हेच’. खरं तर त्या वेळच्या प्रसिद्ध ‘काझी खटल्यावर’ आधारित एक नाटक आपण लिहावं असं स्वतः रांगणेकरांनाही वाटलं होतं; पण दरम्यान अत्र्यांकडून त्यांनी एक नाटक लिहून मिळवण्याचं प्रॉमिस मिळवलं होतं आणि म्हणून ही कथावस्तू त्यांनी अत्र्यांच्या हातात सोपवली. आणि पुढचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीतच आहे. या नाटकाने सुरुवातीचे काही प्रयोग रंगमंचावर दोन भागांत अर्धवर्तुळाकार ड्रॉप्सच्या साह्याने आणि नंतर फिरता रंगमंच वापरून केले आणि ‘न भूतो’ लोकप्रियता मिळवली. रांगणेकरांनी संगीत नाटकंही केली होती आणि त्यासाठी मास्टर कृष्णराव, केशवराव भोसले, स्नेहल भाटकर यांसारख्या प्रसिद्ध संगीतकारांकडून संगीत करून घेतलं होतं.

इतकी वर्षं आणि इतकी नाटकं केल्यावरसुद्धा रांगणेकरांचा ‘नशिबा’वर प्रचंड भरवसा होता. उत्तम संहिता, उत्तम नटसंच वगैरे असूनसुद्धा ते कुठल्याही नाटकाच्या यशात ‘नशीब’ या गोष्टीला प्रचंड महत्त्व द्यायचे. त्यांच्या काळात ठिकठिकाणी नाट्यशिबिरं भरायला सुरुवात झाली होती; पण रांगणेकर त्याही बाबतीत स्पष्ट सांगत, की पोहणं शिकायचं असेल तर पाण्यातच उडी घ्यावी लागते. तद्वत स्टेजवर उभं राहिल्याशिवाय कुणीही नाटक शिकू नाहीच शकत. रांगणेकर यांनी म्हापसा इथे झालेल्या ४९व्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

- प्रसन्न पेठे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZKLBE
Similar Posts
‘महाभारत हे केवळ धर्मयुद्ध नव्हते’ : डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांची विशेष मुलाखत आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले पुण्यातील ज्येष्ठ प्राच्यविद्यापंडित डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे १९ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. (जन्मतारीख : १४ फेब्रुवारी १९१८) संस्कृत भाषा, ऋग्वेद, महाभारत, निरुक्ता, तसेच पाली, प्राकृत भाषेतील संशोधन आणि अवेस्ता या पारशी ग्रंथाचे संशोधन अशा विविध विषयांत डॉ
लोकशिक्षक संत तुकाराम जीवनातील सर्व चढउतारांमध्ये संत तुकारामांमधील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी लोकशिक्षकाची मोठी भूमिका निभावली. आज तुकाराम बीज आहे. या दिवशी संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते
पु. ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
आंग्लमुनी विल्यम शेक्सपिअर इंग्लंडचा महान नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपिअर याचा जन्म व मृत्यूचा दिनांक २३ एप्रिल हाच आहे. जागतिक पुस्तक दिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने, ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर यांनी ‘किमया’ सदरातून शेक्सपिअरला वाहिलेली ही आदरांजली...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language