Ad will apear here
Next
युरोपमध्येही ‘मेड इन चायना’


‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ 
या सदराचा ११वा भाग...

..
चिनी वस्तू भारताच्या कानकोपऱ्यात पोहोचल्यात... चिनी उत्पादकांनी भारतीय संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करून सणासुदीसाठी लागणाऱ्या इत्थंभूत वस्तू बनवल्यात आणि भारताला निर्यात केल्यात... चायनीजच्या गाड्या अगदी खेड्यापाड्यांतही दिसून येतात... अशी आपली निरीक्षणे आणि अनेकदा तक्रार असते; पण सगळीकडे चिनी छाप असलेला भारत हा एकमेव देश नाही. युरोपात गेलो तरीही काही ठिकाणी असेच चित्र नजरेस पडू शकते.

चीन आणि युरोपातील वेगवेगळे देश यांचेही व्यापारी, आर्थिक, भाषिक संबंध आहेत आणि या नात्याला निरनिराळे पैलू आहेत. युरोप आणि चीन हे जगातील दोन सर्वांत मोठे व्यापारी प्रांत आहेत. युरोपला गरजेच्या असणाऱ्या सर्वाधिक वस्तूंची आयात चीनकडून केली जाते. तसेच युरोपीय देश ज्या ज्या देशांना निर्यात करतात, त्यामध्ये चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीन आणि युरोप यांचा एकमेकांशी दररोज एक अब्ज युरोपेक्षा जास्त व्यापार होतो. युरोपीय देश चीनकडून प्रामुख्याने औद्योगिक व कन्झ्युमर गुड्स, यंत्रसामग्री व उपकरणे आणि फूटवेअर व कपडे आयात करतात. युरोपीय देश चीनला यंत्रसामग्री व उपकरणे, मोटर व्हेइकल्स, एअरक्राफ्ट व रसायने निर्यात करतात. 

जगातील अन्य देश जसे एकमेकांशी व्यापार करतात, तशीच हीसुद्धा आकडेवारी आहे. चीनचा या देशांवर असणारा प्रभाव खऱ्या अर्थी दिसून येतो या देशांत फेरफटका मारल्यावर. युरोपपासून चीन किती लांब आहे, लोक युरोपात फक्त फिरायला आणि तेथील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी जातात, असे सर्वसामान्यांना वाटू शकते; पण चीनने अंतर, भाषा, संस्कृती अशी कोणतीही बंधने ठेवलेली नाहीत आणि आपला डंका जगाच्या नकाशावर सगळीकडे मिरवला आहे.

स्विस की चायना?
स्वित्झर्लंड महागड्या घड्याळांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील काही शहरांत चिनी लोक वर्षानुवर्षे स्थायिक झाले आहेत. तिथे चिनी लोकांची संख्या इतकी आहे, की स्थानिक लोक अल्पसंख्याक वाटावेत. चिनी मंडळींनी तेथील बाजारपेठ काबीज केलेली आहे. मोठमोठी दुकाने, शॉपिंग मॉल चिनी नागरिकांच्या मालकीचे आहेत. त्या ओघाने हॉटेल-रेस्तराँ, खाद्यपदार्थ हेही आलेच. 

‘यूके’तील चायनाटाउन
जगभर ठिकठिकाणी चायनाटाउन दिसतात. युनायटेड किंग्डमही (यूके) त्यासाठी अपवाद नाही. तिथेही अनेक चायनाटाउन आहेत. तिथे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची आणि विद्यार्थ्यांची भाऊगर्दी असते. लंडन चायनाटाउन हे ‘यूके’तील सर्वांत मोठे चायनाटाउन आहे. लाइमहाउस चायनाटाउन हे लंडनमधील पहिले चायनाटाउन होते. ते १८६० ते १९५० या कालावधीदरम्यान कार्यरत होते. त्यानंतर हे चायनाटाउन उदयास आले. लिव्हरपूल हे ‘यूके’च्या इतिहासातील सर्वांत जुने चायनटाउन आहे. १८९०च्या दशकात ते स्थापन झाले. चिनी नवीन वर्षाचे येथे होणारे सादरीकरण पाहण्यासारखे असते.



जर्मनीशी वाढते सख्य
जर्मनीच्या चॅन्सेलर म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर अंजेला मर्केल यांनी चीनचे अनेक दौरे केले आहेत. त्यांनी या दोन्ही देशांना आणखी जवळ आणले. २०१९मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार २०६ अब्ज युरोपर्यंत वाढला. युरोपबरोबरच जर्मनीचाही सर्वाधिक व्यापार चीनबरोबर होतो. २०१३मध्ये, मर्केल आणि चीनचे अध्यक्ष ली खछिआंग यांनी सिनो-जर्मन अर्बनायझेशन पार्टनरशिपची मुहूर्तमेढ रोवली. कमालीचे वाढते शहरीकरण, हवामानातील बदलांमुळे वारंवार येणारी नैसर्गिक संकटे, पर्यावरणाची सातत्याने घटती गुणवत्ता यावर विचारमंथन करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली. त्याअंतर्गत, चीन आणि जर्मनी या दोन्ही देशांमध्ये शाश्वत विकास करण्यावर भर दिला जाणार आहे.

करोनाचा ‘प्रसाद’
इटलीमध्ये चिनी लोकांची संख्या प्रचंड आहे. तेथील चिनी मायदेशी स्प्रिंग फेस्टिव्हल साजरा करायला गेले होते. येताना इटलीसाठी करोनाचा ‘प्रसाद’ घेऊन आले. इटलीमध्ये करोनाने थैमान घालण्याचे हे एक प्रमुख कारण असल्याचे म्हटले जाते. एका लोकप्रिय पोर्टलच्या मते, इटलीचे मोक्याचे भौगोलिक स्थान, देशातील संपन्नता आणि कुशल लोक यामुळे इटलीवर नेहमीच कोणाचा ना कोणा डोळा राहिला आहे. आता, महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या चीनची नजर इटलीवर खिळलेली आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ पायाभूत प्रकल्पासाठी इटलीने करार करून हिरवा कंदील दाखवला आहे. सात औद्योगिक देशांच्या समूहाने हा करार करणारा इटली हा पहिला देश आहे. चीनशी हात मिळवल्याने व्यवसायाला चालना मिळेल आणि अनेक वर्षे भरभराटीच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्थव्यवस्थेला नवी तरतरी मिळेल, अशी इटलीची अपेक्षा होती. म्हणूनच, इटलीने चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी होण्याचे ठरवले. करोनाच्या कालावधीमध्ये युरोपीय देशांनी इटलीला एकटे पाडले अन् चीनने इटलीला तारले, असे चित्र निर्माण करण्यात आले. चीनने इटलीला वैद्यकीय मदत, बाकी सोयीसुविधा तत्परतेने उपलब्ध करून दिल्या. याचा फायदाही चीनने बरोब्बर उचलला आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नवा ‘हेल्थ सिल्क रोड’ बांधण्याची घोषणा करून टाकली. हा नवा प्रकल्प ‘बेल्ट अँड रोड’ या उपक्रमाच्या अनुषंगानेच साकारला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. 

जिनपिंग यांनी केलेल्या इटली दौऱ्यामध्ये दोन्ही देशांनी ३० करार केले. त्यातील १० करार इटालियन कंपन्यांशी आहेत. या सगळ्या करारांची एकत्रित रक्कम २.५ अब्ज युरो इतकी आहे. इटलीच्या उपपंतप्रधानांच्या मते, ही रक्कम किमान २० अब्ज युरो इतक्या मूल्यापर्यंत वाढणार आहे. इटलीतील बंदरे आणि ‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, इटलीतील दर्जेदार फूड, डिझाइन आणि पर्यटनाची क्षमता, तंत्रज्ञानाची केंद्रे आणि इटलीमध्ये झालेला ‘फाइव्ह जी’चा विकास यामध्ये चीनला प्रचंड रस असल्याचे म्हटले जाते. 

थोडक्यात, मेड इन चायनाचा सामना फक्त आपण करत नाही आहोत, तर जगभर हीच गाथा आहे. यापासून युरोपसारखे विकसित, औद्योगिक, संपन्न आणि पुढारलेले देशही सुटलेले नाहीत.

- गौरी देशपांडे
ई-मेल : gouri@ewan.co.in

(लेखिका चिनी भाषेच्या तज्ज्ञ असून, पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मँडरिन बिझनेस डाटा अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UXFGCP
Similar Posts
व्यावसायिकतेची बीजे चीनमध्ये पूर्वीपासूनच रुजलेली... चीनची व्यापारविषयक आकडेवारी, चलनविषयक घडामोडी, तिथल्या कंपन्यांचा विस्तार, गुंतवणूक यावर नजर टाकली, की एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे चीनचे पाय किती विस्तारले आहेत, याची कल्पना येते. इतिहासावर नजर टाकली, तर गेल्या अनेक शतकांच्या इतिहासामध्ये चीन हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अविभाज्य घटक राहिल्याचे लक्षात येते
आफ्रिकेच्या साधनसंपत्तीवर चीनचा डोळा अनेक कारणांनी चीनचा आफ्रिकेवर डोळा आहे. आफ्रिकेचे मोक्याचे स्थान, तेलाचे साठे, दुर्मीळ धातू, मासे या गोष्टी मिळवण्यासाठी चीनला आफ्रिकेला हाताशी धरायचे आहे. तसेच, आफ्रिकेला पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करणे असा मुखवटा चीनने पांघरला असला, तरी चीनला जागतिकीकरणाच्या पुढच्या टप्प्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आफ्रिकेची गरज लागणार आहे
चिनी माल स्वस्त का? चिनी वस्तू स्वस्त असतात, हे जणू समीकरणच तयार झाले आहे. महागाई भस्मासुरासारखी वाढत असल्याचे चटके आपल्याला सारखे बसत असताना, उत्पादनाची सगळी गणिते चीन जुळवतो तरी कशी? इतक्या स्वस्त दरामध्ये वस्तू विकणे चीनला शक्य तरी कसे होते, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणे अतिशय स्वाभाविक आहे. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १२वा भाग
भारत चीनमधून काय काय आयात करतो? भारताने आत्मनिर्भर होण्याचे ठरवले आहे आणि त्या दृष्टीने वाटचालही सुरू केली आहे; मात्र त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. चीनमधून भारत वेगवेगळ्या क्षेत्रांतील आयात करतो आणि त्याचे प्रमाण लक्षणीय आहे. या व्यापाराच्या वस्तुस्थितीचा आढावा घेऊ या ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या पाचव्या भागात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language