Ad will apear here
Next
प्राचीन नागरी सभ्यता - सिंधू संस्कृती
सिंधू संस्कृती ही एक सुधारलेली नागरी सभ्यता होती. तिचा विस्तार प्रचंड झालेला होता. नवनवीन स्थळांवर अद्यापही उत्खनन व संशोधन सुरू आहे. या सिंधू संस्कृतीविषयी सांगत आहेत पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असलेले ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... आपल्या ‘किमया’ या सदरातून...
............
सन १९२०-२१मधील गोष्ट. (सध्याच्या पाकिस्तानातील) लाहोर-मुलतान रेल्वेचे काम चालू होते. जमीन खणताना काही विशिष्ट आकाराच्या असंख्य पक्क्या विटा बाहेर येऊ लागल्या. तिथले प्रमुख अधिकारी ‘जागरूक’ असल्यामुळे त्यांनी काम थांबवले आणि पद्धतशीर शोध सुरू केला अन् काय महान आश्चर्य! अद्याप ओळख नसलेली, भारताची एक प्राचीन संस्कृती उजेडात आली. हडप्पा आणि मोहेंजोदडो (मोहेंजोदारो) ही शहरे जगासमोर प्रकट झाली. सिंधू नदीच्या आसपास ती ठिकाणे असल्यामुळे ‘सिंधू संस्कृती’ किंवा ‘हडप्पा’ (हराप्पा) असे नाव पुढे रूढ झाले. भारताला फार प्राचीन इतिहास नाही, हा पाश्चात्यांचा भ्रम दूर झाला. 
सुरुवातीच्या उत्खननात सर जॉन मार्शल, मॉर्टिमर व्हीलर हे ब्रिटिश संशोधक आणि राखालदास बॅनर्जी, दयाराम साहनी, माधवस्वरूप वत्स हे भारतीय सहभागी झाले होते. सन १९२३पर्यंत त्या भागात मोठ्या प्रमाणावर काम झाले. त्यापूर्वी जवळपासच्या खेड्यांमधील नागरिक आपल्या घरांच्या बांधकामांसाठी तिथल्या सहज उपलब्ध होणाऱ्या भक्कम विटा वापरत होते, असे नंतर लक्षात आले. महत्त्वाची पुरातत्त्वीय स्थळे म्हणून ती सर्व जाहीर झाल्यानंतर तिथला ऱ्हास आणि नाश थांबला. त्या वेळच्या वायव्य भारतामधील सिंधू संस्कृतीची नवनवी स्थाने उत्खननांद्वारे सापडत गेली. सध्याच्या भारतात स्वातंत्र्यापूर्वी फार काम झाले नव्हते. परंतु आजमितीला सिंधू संस्कृतीच्या स्पष्ट खुणा दाखवणारी स्थाने पाकिस्तानापेक्षा आपल्याकडे अधिक आहेत. सुरुवातीला या संस्कृतीचा इतिहासपूर्व काळ (त्या वेळी मिळालेल्या पुराव्यांवरून) इ. स. पूर्व २५०० ते १७०० मानला जात होता. आज तो आणखी किमान २००० वर्षे मागे जातो, असे स्पष्ट झाले आहे.

विशाल स्नानगृह (तलाव)हडप्पा आणि मोहेंजोदडो ही त्या काळी शहरी वस्ती होती. शहराभोवताली संरक्षक भिंती होत्या. विशेष म्हणजे, उत्खननात एकाखाली एक असे वस्तीच्या खुणा दाखवणारे ५-६ थर सापडले. मातीच्या भांड्यांची खापरे आणि मातीच्याच लहान-मोठ्या मूर्ती (खेळणी) या गोष्टी सिंधू संस्कृतीच्या निदर्शक मानल्या जातात. मोहेंजोदडोमध्ये मिळालेल्या ठळक वस्तू/वास्तू म्हणजे सार्वजनिक विशाल स्नानगृह (तलाव), प्रमाणबद्ध इमारती, सांडपाण्याची व्यवस्था, तसेच युनिकॉर्न (एकशिंगी प्राणी) व पशुपतीच्या मुद्रा, वजनमापे इत्यादी. खोलवर खणत जाताना पाणी लागल्यामुळे उत्खनन होऊ शकले नाही. अजूनही तिथला महत्त्वाचा भूभाग ‘अंधारा’त राहिलेला आहे.

गुजरातमधील कच्छच्या रणविभागात ‘धोलाविरा’ नावाचे (हडप्पा, मोहेंजोदडोएवढेच मोठे) शहर उजेडात आले. १९९०पासून तिथे पद्धतशीर उत्खनन सुरू झाले. तिथे अनेक दगडी वास्तू सुस्थितीत आढळल्या. घराघरात पाणी पोहोचविणारी जमिनीखालील आधुनिक पुरवठ्याची जाळी, हे तिथले आणखी एक वैशिष्ट्य. त्यावरून तिथे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते, हे लक्षात येते. ‘सिंधू लिपी’ हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. नंतरच्या काळातील ब्राह्मी आणि देवनागरी लिपींची ही जननी! त्या लिपीच्या ३००हून अधिक खुणा (अक्षरे) आहेत. काही जणांनी ती वाचण्यात यश मिळाल्याचा दावा केला आहे. परंतु अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही. बघू या भविष्यात त्याचे श्रेय कोणाला मिळणार आहे! विशेष म्हणजे धोलविरामध्ये सिंधू लिपीतील एक दगडी फलक मिळालेला आहे.

गुजरातमध्ये साबरमती नदीजवळ ‘लोथल’ हे सिंधू संस्कृतीचे प्रसिद्ध स्थळ आहे. समुद्रमार्गे व्यापाराचे ते एक प्रमुख ठिकाण होते. आज समुद्र जरी तिथून लांब असला, तरी त्या काळात बोटी आतपर्यंत येत असणार, अशा बंदरसदृश जागा लोथलमध्ये आढळल्या आहेत. मणी बनवण्याचा कारखानाही तिथे सापडला. हडप्पाएवढेच राखीगढी आणि तिथल्या संस्कृतीचे संशोधन महत्त्वाचे आहे. तसेच, पाकिस्तान, बलुचिस्तान, अफगाणिस्तानातही नवनवीन स्थळे उजेडात येत आहेत. बऱ्याच ठिकाणी सिंधूपूर्व आणि उत्तरसिंधू संस्कृतीचे पुरावे हाती येत आहेत.

नर्तिकाभारताच्या इतिहासात कालनिर्णय हा फारच जटिल प्रश्न बनलेला आहे. सिंधूकालाबरोबरच वैदिक आणि महाभारताचा काळ प्रश्नचिन्ह निर्माण करतो. सिंधू संस्कृतीच्या नाशाला ‘आर्यांचे आक्रमण’ कारणीभूत होते, हा ब्रिटिशांचा सिद्धांत आता खोटा ठरला आहे. आर्यांचे आणि वेदरचनेचे स्थान सरस्वती नदीच्या किनाऱ्याजवळ होते. तसे उल्लेख वेदांमध्ये जागोजाग आढळतात. एकेकाळची सिंधू नदी दुष्काळ आणि हवामानातील बदल यांमुळे गायब झाली. आज ‘घग्गर’ नावाने तिचे प्रवाह काही काही ठिकाणी आढळतात. डॉ. वाकणकर यांनी अथक परिश्रमातून सिंधूच्या हिमालयातील उगमस्थानापासून पश्चिम समुद्रात ती विलीन होईपर्यंतचा संपूर्ण मार्ग (प्रवाह) शोधून काढला. अर्थात सरस्वती ही सिंधू नदीइतकीच महत्त्वाची असून, सिंधू संस्कृतीला ‘सरस्वती संस्कृती’ मानणारे काही संशोधक आहेत.

आधुनिक पुराव्यांवरून सिंधू संस्कृतीचा काळ (काही स्थळांच्या संदर्भात) इ. स. पूर्व ६०००पर्यंत मागे जातो. इजिप्त आणि मेसोपोटेमियाची सभ्यतासुद्धा इतकी जुनी नाही. ब्राँझ धातूचा वापर त्या काळात झाला. म्हणून त्याला ‘ब्राँझ एज’ संस्कृती मानले जाते. त्याची व्याप्ती वायव्य बृहत्तर भारत ते खाली दक्षिणेपर्यंत सुमारे दोन लाख चौरस किलोमीटर होती. शहरांची भरभराट होत गेली, तसतशी ती पूर्व आणि दक्षिणेकडे पसरत गेली. तिचे अस्तित्व भारतभूमीतून नाहीसे कसे झाले, याबाबत अद्याप एकवाक्यता नाही. नदीचे पूर, दुष्काळ आणि प्रतिकूल हवामान ही त्याची कारणे असावीत. सिंधू लिपी किमान इ. स. पू. ३०००पासून अस्तित्वात होती. संस्कृती आणि लिपीवर जगभरातील पुरातत्त्वज्ञ संशोधन करत आहेत. पाकिस्तानातील मुख्य स्थळांना भेट देण्याची परवानगी भारतीयांना सहजासहजी मिळत नाही. ‘ती आमचीच प्राचीन संस्कृती आहे,’ असे ते मानतात! आता संशोधनात रेडिओकार्बन कालमापन आणि सॅटेलाइटवरून केलेले चित्रीकरण खूप उपयोगी पडत आहे. इथपर्यंत आपण सिंधू संस्कृतीचा थोडक्यात आढावा घेतला. आता पुन्हा एकदा सगळ्या इतिहासाचे अवलोकन करू.

सिंधू संस्कृतीचे कल्पनाचित्रसन १८२३मध्ये भारतात प्रवासी म्हणून आलेल्या चार्ल्स मॅसन या व्यक्तीला आगळ्यावेगळ्या विटांचे ढीग आढळले. त्याला ते जुन्या किल्ल्याचे अवशेष वाटले. त्यानंतर तीस वर्षांनी, १८५६मध्ये लोहमार्ग बांधणाऱ्या अभियंत्यांना तशाच आणखी काही विटा सापडल्या. त्यांनी त्यांचा आपल्या कामात उपयोग करून घेतला. लुप्त सिंधू संस्कृतीचा शोध अशा रीतीने प्रथम त्या लोकांना लागला. १९२०नंतर हडप्पा आणि मोहेंजोदडोत व्यवस्थित उत्खनन सुरू झाले. हवाई चित्रणाद्वारे जमिनीखालील वास्तूंचाही शोध लागू शकतो. पडक्या वास्तू, खापरे, जनावरांची हाडे आणि वनस्पतींच्या बिया या पुरातत्त्वाच्या अभ्यासात खूप उपयोगी ठरतात. काळानुसार त्यांची विभागणी केली जाते. उत्खनन फार काळजीपूर्वक करावे लागते. कारण ‘खालच्या पुराव्यां’चा नाश होण्याची शक्यता असते. पुरातत्त्वाच्या संशोधनात इतिहास, भूविज्ञान, रसायन, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संगणक आदी अनेक विषयांमधील तज्ज्ञांची आवश्यकता असते. संपूर्ण जगात, पुण्यातील डेक्कन कॉलेज हे असे एकमेव ठिकाण आहे, की जिथे या सर्व विषयांचे विभाग एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे तिथे संशोधन वेगाने होऊ शकते.

मोहेंजोदडोचा शब्दश: अर्थ ‘मृतांचा (दफनांचा) ढिगारा’ असा होता; परंतु तिथे प्रत्यक्ष दफनभूमी सापडलेली नाही. सध्याच्या सिंधू (धग्गर) नदीपासून ते ठिकाण पाच किलोमीटरवर आहे. पाच-सहा हजार वर्षांपूर्वी नदी शहराजवळ असू शकते. जुन्या वस्त्यांच्या थरांवर नवीन शहराची बांधणी झालेली दिसते. आधीची वस्ती महापुरांमुळे नष्ट झाली असण्याची शक्यता आहे. हडप्पा हे मोहेंजोदडोच्या ईशान्येला ६०० किलोमीटरवर आहे. नदी आणि जमिनीवरून चालणाऱ्या व्यापाराला हडप्पा हे जवळचे सोयीचे स्थान होते. आज ते शहर जवळजवळ पूर्णपणे नष्ट झालेले आहे. गव्हासारखी धान्ये साठवण्यासाठी मोठमोठी कोठारे तिथे सापडली. हडप्पात दोन दफनभूमी आढळल्या. शस्त्रे आणि अन्य अवजारे बनविण्यासाठी लागणाऱ्या तांबे निर्मितीच्या भट्ट्या तिथे होत्या. मोहेंजोदडोत दफनभूमी सापडली नसली, तरी ३९ रहस्यमय सांगाडे एका जागी मिळाले. कदाचित एखाद्या हल्ल्यात ते लोक मरण पावले असावेत किंवा रोगाच्या साथीत त्यांचा बळी गेला असावा.

पशुपती मुद्रामोहेंजोदडोत साधारण तीन हजार घरे होती. दर तीन घरांपैकी किमान एका घरात स्वत:ची पाण्याची विहीर होती. घराची रचना आयताकृती असून, मधल्या भागात मोकळी जागा असे. पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची जमिनीअंतर्गत उत्तम व्यवस्था होती. शहरातील रस्ते, बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे एकमेकांना समांतर आणि ९० अंशांत काटणारे होते. ते प्रशस्त होते. सार्वजनिक स्नानासाठी तलाव होते आणि नद्यांमधून देशांतर्गत व्यापार चालत असे. हडप्पा लोकवस्ती ५० हजारांपर्यंत असावी. सिंधू लिपीवरून असे म्हणता येते, की लिहिण्याची कला लोकांना अवगत असावी. वजन-मापे अत्यंत काटेकोर (प्रमाणबद्ध) होती. शेतीमुळे तिथली अर्थव्यवस्था स्थिर झालेली होती. गहू, तांदूळ, विविध भाज्या, फळे आणि कापूस यांचे पीक घेतले जाई. बैलांसह अनेक प्राणी पाळले जात. लापिस लाझुली आणि कार्नेलियन या मौल्यवान खड्यांची निर्यात होई.

पुरोहितमानवी आणि प्राण्यांची चित्रे असलेल्या स्टिएटाइट दगडाच्या असंख्य मुद्रा उत्खननात जागोजाग सापडल्या आहेत. पशुपती, एकशिंगी प्राणी, नर्तिका आणि पुरोहित यांच्या मुद्रा व मूर्ती जगप्रसिद्ध झालेल्या आहेत. भाजलेल्या मातीची खेळणी खूप मिळालेली आहेत. मुद्रांवर अनाकलनीय सिंधू लिपीतील एक-दोन ओळींचे लेख आहेत. भौमितिक आकारही कोरलेले आहेत.

अशा प्रकारे सिंधू संस्कृती ही एक सुधारलेली नागरी सभ्यता होती. तिचा विस्तार प्रचंड झालेला होता. नैसर्गिक कारणांमुळे तिचा अस्त झाला असावा. त्यानंतर तिथले लोक सर्व दिशांना विखुरले असावेत. नवनवीन स्थळांवर अद्यापही उत्खनन व संशोधन सुरू आहे. सिंधू लिपीची उकल झाली, तर त्या वेळचे लोक आणि त्यांचा निश्चित काल यावर प्रकाश पडू शकेल. आपण त्याची वाट पाहू या. 

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZLUCK
Similar Posts
प्राचीन नागरी सभ्यता - सिंधू संस्कृती सिंधू संस्कृती ही एक सुधारलेली नागरी सभ्यता होती. तिचा विस्तार प्रचंड झालेला होता. नवनवीन स्थळांवर अद्यापही उत्खनन व संशोधन सुरू आहे. या सिंधू संस्कृतीविषयी सांगत आहेत पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असलेले ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... आपल्या ‘किमया’ या सदरातून...
संस्कृत भाषेच्या उन्नतीसाठी झटणारी पुण्यातील आनंदाश्रम संस्था उच्च न्यायालयात वकिली करणारे महादेव चिमणाजी आपटे यांनी ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मित:’ हे ध्येय समोर ठेवून पुण्यात १८८८मध्ये ‘आनंदाश्रम’ संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था संस्कृतची उन्नती, प्रसार यांसाठी कार्यरत आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत या संस्थेबद्दल
रोमचा अग्निप्रलय इसवी सनाच्या पहिल्या शतकात, १९ जुलै ६४ रोजी अज्ञात कारणामुळे इटलीतील रोममध्ये आग भडकते. संपूर्ण शहर बेचिराख करूनच ती शांत होते. एकीकडे राजधानी जळत आहे आणि त्या देशाचा सम्राट नीरो मजेत फिडल वाजवत बसला आहे, ही कथा आपण ऐकून आहोत; पण प्रत्यक्षात तिथं नेमकं काय घडलं होतं?... जाणून घेऊ या ज्येष्ठ लेखक रवींद्र
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language