Ad will apear here
Next
ललिता पवार, अंकल पै
नामवंत अभिनेत्री ललिता पवार आणि ‘अमर चित्रकथा’कार अंकल पै यांचा २४ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय... 
....... 
ललिता पवार
१८ एप्रिल १९१६ रोजी ललिता पवार यांचा जन्म झाला. हिंदी-मराठी चित्रपटांतील खाष्ट सासूचे कॅरेक्टर म्हटले, की सहज डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे ललिता पवार. पांढरी बंगाली काठाची किंवा जरीच्या काठाची कडक इस्त्रीची साडी - सासूच्या रोलचा कडक शिस्तीचा किंवा वाकडेपणाचा ताठा दाखवणारी, पांढरे केस, डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा, त्या चष्म्याच्या काचांमधून डायलॉग मारताना अधिकच मोठे आणि मग बारीक होणारे डोळे, त्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारा मत्सर किंवा राग, आणि आवाजाची धार समोरच्या सून म्हणून उभ्या राहणाऱ्या हिरॉइनला सुन्न करणारी. कारकीर्दीतील जवळपास ९०टक्क्यांहून जास्त सिनेमांमध्ये अशा रोलमध्ये ललिता पवार पडद्यावर दिसल्या. 

ललिता पवार यांचं माहेरचं नाव अंबिका लक्ष्मण सगुण. त्यांचे शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत झालं होतं. १९२८ साली ‘आर्यमहिला’ या मूकपटात सर्वप्रथम भूमिका साकारली व त्यानंतर ‘गनिमी कावा’ ,’राजपुत्र’ , ‘समशेर बहादूर’ , ‘चतुर सुंदरी’, ‘पृथ्वीराज संयोगिता’, ‘दिलेर जिगर’ यांसारख्या मुकपटातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. मुंबईच्या चंद्र आर्ट्सच्या ‘हिम्मतो मर्दा’ या बोलपटात त्या नायिका होत्या आणि हाच त्यांचा पहिला बोलपटदेखील होता. १९३८ साली टॉलस्टॉयच्या रेसरेक्शन या कादंबरीवरून ‘दुनिया क्या है?’ या चित्रपटाची त्यांनी निर्मिती करून त्यात भूमिकाही केली. या चित्रपटात गाणीसुद्धा त्यांनी स्वतःच गायली होती. 

भालजी पेंढारकर लिखित-दिग्दर्शित अरुण पिक्चर्सच्या १९३९ रोजी प्रदर्शित झालेल्या नेताजी पालकर या चित्रपटात ‘काशी’ या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारली. हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट (बोलपट). याशिवाय ललिता पवार यांचे महत्त्वाची व मध्यवर्ती भूमिका असलेले मराठी चित्रपट म्हणजे ‘अमृत’, ‘गोराकुंमार’, ‘जय मल्हार’, ‘रामशास्त्री’, ‘अमर भूपाळी’, ‘मानाचं पान’, ‘चोरीचा मामला’, तर हिंदीत ‘दहेज’, ‘परछाई’, ‘दाग’, ‘श्री ४२०’, ‘अनाडी’,’ जंगली’, ‘प्रोफेसर’, ‘घराना’, ‘खानदान’, ‘घर बसा के देखो’, ‘परवरिश’, ‘सास मी कभी बहू थी’, ‘बहूरानी’, ‘आनंद’मधून विविधांगी व्यक्तिरेखा साकारून रसिकाची मनं जिंकली. 

१९४२ च्या सुमारास ‘जंग-ए-आजादी’ चित्रपटासाठी ललिता पवार भगवानदादांसोबत एका प्रसंगाचे चित्रण करीत होती. थंडीच्या दिवसात, तळ्यात स्नान करीत असलेल्या ललिताला मास्टर भगवान थोबाडीत देतात, असा एक सीन होता. भगवानदादांसाठी अशा प्रकारचा सीन नवीनच होता. ललिताजी या त्यांच्यापेक्षा वयानेदेखील मोठ्या असल्याने प्रथमत: त्यांनी हा सीन नाकारला; पण दिग्दर्शक, तसंच ललिता पवार यांनी समजवल्यानंतर ते कसेबसे या सीन साठी तयार झाले; त्या सीनसाठी भगवानदादांनी ललिताजींच्या इतकी सणसणीत कानफटात ठेवून दिली, की त्यामुळे ललिता पवार यांच्या डाव्या डोळ्याची रक्तवाहिनी, तर फुटलीच त्याशिवाय चेहऱ्याला तात्पुरता पॅरॅलिसिसचा अॅटॅक आला. सतत तीन वर्षे उपचार करूनदेखील शेवटी त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. त्या प्रसंगापासून ललिता पवार यांना नायिकेच्या भूमिका सोडून देऊन पुढे चरित्र नायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या; पण त्या भूमिकासुद्धा एवढ्या गाजल्या की ललिता पवार हे नाव भारतीय चित्रपटांत प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले. 

ललिता पवार यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा नैसर्गिक खानदानी रुबाब असल्यामुळे त्यांच्या आवाजात हुकमी लय आहे आणि चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारचा भाव असल्यामुळे खानदानी, तडफदार, सोज्वळ, तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकाही त्या यशस्वीपणे साकार करू शकल्या व त्यामध्ये नैसर्गिकतादेखील पाहायला मिळाली. 

ललिता पवार यांनी तीनशे चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारल्या असून, त्यामध्ये मराठामोळी तरुणी, गृहिणी, वृद्ध महिला, खाष्ट सासू , प्रेमळ घरमालकीण, कामगार महिला अशा सर्वच व्यक्तिरेखा प्रभावी व उत्तमपणे रूपेरी पडद्यावर उभ्या केल्या. रामानंद सागर यांच्या रामायण या लोकप्रिय अध्यात्मिक मालिकेत ललिता पवार यांनी ‘मंथरा’ची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. ललिता पवार यांना १९६१ रोजी ‘संगीत नाटक अकादमी पारितोषिक’, तर १९९६ साली महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ प्राप्त झाला. गृहस्थी, सजनी, अनाडी, घर बसा के देखो या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ललिता पवार यांचे २४ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले. 
....... 
अंकल पै
१७ सप्टेंबर १९२९ रोजी अंकल पै यांचा जन्म झाला. पहिल्या भारतीय कॉमिक चित्रमालिकेचे निर्माते ही अंकल पै म्हणजेच अनंत पै यांची प्रमुख ओळख. ही कॉमिक चित्र मालिका अमर चित्रकथा या नावाने जगप्रसिद्ध आहे. 

वयाच्या बाराव्या वर्षी ते मुंबईत आले. त्यांचा जन्म कर्नाटकातील करकाला गावचा. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांचे आई-वडील वारले. मुंबईत आल्यावर त्यांनी माहिमच्या ओरिएन्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. पुढे त्यांनी बीएस्सी करताना रसायनशास्त्र, फिजिक्स आणि केमिकल टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला. आपल्यातल्या चित्रकाराची हौस भागवण्यासाठी त्यांनी १९५४मध्ये मानव या नावाने एक मुलांसाठीचं चित्र मासिक सुरू केलं. ते टाइम्स ऑफ इंडिया वृत्त समूहात ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करत होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली टाइम्स ग्रुपने इंद्रजाल या कॉमिक्स बुकची निर्मिती केली.
 
अमर चित्रकथा या प्रचंड लोकप्रिय आणि गाजलेल्या कॉमिक मालिकेची सुरुवात त्यांनी १९६७मध्ये केली. त्या वेळी दूरदर्शनच्या एका लोकप्रिय क्विझ कार्यक्रमात ग्रीक पुराणांवर आधारित प्रश्न विचारले जात; मात्र भारतीय पुराणांचा या प्रश्नावलीत समावेशच केला जायचा नाही. कारण त्याविषयी कुणाला माहितीच नसायची. त्यांना या घटनेनं अस्वस्थ केलं आणि मग जन्म झाला अमर चित्रकथेचा. जी. आर. मीरचंदानी यांच्या इंडिया बुक हाउस या प्रकाशन संस्थेच्या मदतीने त्यांनी अमर चित्रकथा सुरू केली. अमर चित्रकथेच्या इंग्रजीत आठ कोटी साठ लाख प्रती विकल्या केल्या. हा एक जागतिक विक्रम समजला जातो. १९८०मध्ये त्यांनी रंगरेखा फीचर्सच्या माध्यमातून ट्विंकल या कार्टूनची सुरुवात केली. लहान मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या ट्विंकल व अमर चित्रकथा, तसेच अन्य मालिकेमुळे त्यांना अंकल पै हे संबोधन मिळालं. १९८०पासून ते अंकल पै या नावानेच ओळखले जायचे. 

अंकल पै यांनी अमर चित्रकथेबरोबरच रामू आणि श्यामू, लिटल राजी आणि रेखा या कार्टून्सचीही निर्मितीही केली. गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून अंकल पै यांच्या स्टोरीटेलिंगला सार्थ अभिवादन केले होते. अंकल पै यांचे २४ फेब्रुवारी २०११ रोजी निधन झाले. 

माहिती संकलन : संजीव वेलणकर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZOZCJ
Similar Posts
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language