पुणे : ‘पृथ्वीवर केवळ मानवप्राणी हा एकमेव आहे, ज्याला ईश्वराकडून कलेची देणगी मिळालेली आहे. संगीत आणि नृत्याविष्कारामुळे आपले जीवन सुसह्य झाले आहे,’ असे मत ज्येष्ठ नृत्यगुरू आणि भरतनाट्यम नृत्य कलाकार सुचेता भिडे-चापेकर यांनी व्यक्त केले. लायन्स क्लबतर्फे आयोजित कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठीच्या समूहनृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या.
‘कर्णबधिर मुलं जेव्हा ही कला अंगी जोपासतात तेव्हा खरच त्यांचं कौतुक वाटते, त्यांच्या शिक्षकांचेही कौतुक आहे,’ अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.
सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांना गाता यावे, नाचता यावे, या उद्देशाने दर वर्षी लायन्स क्लब ऑफ पूना वेस्टच्या वतीने कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा निवारा वृद्धाश्रम येथील सभागृहात या स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, वायएमसीए कर्णबधिर विद्यालय, सी. आर. रंगनाथन, आधार मुकबधिर केंद्र, रूईया मुकबधिर विद्यालय, रेडक्रॉस कर्णबधिर विद्यालय, धायरी कर्णबधिर विद्यालय, शासकीय बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्र आदी संस्थांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
समूहनृत्य स्पर्धेत रेडक्रॉसच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक वायएमसीए विद्यालयाने, तृतीय क्रमांक सी. आर. रंगनाथन विद्यालयाने आणि चतुर्थ क्रमांक रुईया मुकबधिर विद्यालयाने पटकावला. शासकीय बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्राला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या वेळी स्पर्धा प्रमुख सीमा दाबके, मालती भामरे, प्रिती परांजपे, बिपीन पाटोळे, भाग्यश्री चोंदे, रेश्मा माळवदे उपस्थित होते. सूत्रसंचालन पल्लवी देशमुख यांनी केले, तर मृदुला केळकर यांनी आभार मानले.