पुणे : ‘‘पुलं’ची आणि माझी केवळ दोन-तीन वेळाच भेट झाली; पण त्यांची प्रत्येक भेट त्यांच्यातील गुणांचे दर्शन देणारी होती. त्यांची भाषा आणि बोलणे हे दोन्ही मी अनुभवले आणि मी थक्क झालो. कारण त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचे वास्तव्य होते,’ असे मत ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केले.
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुलं परिवाराच्या सहयोगाने, आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वनने वर्षभर आयोजित केलेल्या ‘ग्लोबल पुलोत्सवा’चा समारोप सोहळा नुकतंच झाला. त्या वेळी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना नवनिर्वाचित आमदार व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पुलं स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. त्या वेळी पंडितजी बोलत होते. या वेळी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांचा ८० व्या वर्षानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, पिनॅकल ग्रुपचे सीएमडी गजेंद्र पवार, ‘आशय सांस्कृतिक’चे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, सुप्रिया चित्राव, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले, ‘‘पुलं’ची झालेली पहिली भेट मला आजही आठवते. माझा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचे निवेदक काही कारणामुळे कार्यक्रमाला पोहोचू शकत नसल्याचे ऐनवेळी कळले. अशा परिस्थितीत कार्यक्रमाचे आयोजक पुरते गोंधळून गेलेले असताना ‘पुलं’नी निवेदकाची भूमिका लीलया पार पाडली. एवढेच नाही तर, ‘बहुदा तुमच्या आई-वडिलांना माहित असावे की, तुम्ही बासरीवादक होणार आहात म्हणूनच त्यांनी तुमचे नाव हरिप्रसाद ठेवले,’ असे ते मला म्हणाले. त्या वेळी मी अवाक् होऊन गेलो. त्यांची शब्दांची जाण मोहित करणारी होती.’
या वेळी बोलताना ज्येष्ठ सतारवादक उस्मान खाँ म्हणाले, ‘‘पुलं’ची पुस्तके, नाटके आणि चित्रपट तसेच संगीताचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांसारखाच मी एक रसिक आहे. अनेक ‘पुलं’मय लोकांप्रमाणे मीही एक आहे. मी १० वर्षांचा असल्यापासून बेळगावच्या संगीत स्पर्धेत सहभागी होत असे. त्या स्पर्धेत ‘पुलं’ परीक्षक असायचे. त्यांच्या हस्ते मी १९५०, ५१ आणि ५२ अशी सलग तीन वर्षे बक्षीसे मिळवली आहेत. त्यामुळे आज या पुलोत्सवात झालेल्या माझ्या सन्मानाला विशेष महत्त्व आहे.’
या वेळी बोलताना मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘गेल्या वर्षभरात जगभरात ग्लोबल पुलोत्सव आयोजित करण्यात आला. कारण मराठी माणूस जगभरात पोहोचला असून ‘पुलं’ हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहेत. पुलंची लेखनशैली, त्याची नाटके, संगीत अशा सगळ्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनात प्रचंड आदर आहेच; पण त्याचबरोबर त्यांना असलेली सामाजिक जाणीव आपल्याला प्रेरणा देणारी आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत ‘पुलं’चा वाटा अतिशय महत्त्वपूर्ण होता. गेल्या वर्षी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्उभारणीचा मुद्दा पुढे आला. त्या वेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींची मते लक्षात घेऊन याची दिशा ठरविण्यात आली आहे. यासंदर्भात रसिकांची कोणत्याही प्रकारे निराशा होणार नाही, याची काळजी निश्चितच घेतली जाईल.’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले. यानंतर रात्री ‘आमचे पी. एल.’ हा कार्यक्रम झाला. ‘पुलं’ त्यांच्या तरुणपणी शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात राहत असताना त्यांना केशवराव व ज्योत्स्नाबाई भोळे यांचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले. त्या काळातल्या काही सुरेल आठवणी, तसेच केशवराव व ‘पुलं’ यांच्या काही एकत्रित संगीतरचना यांवर आधारित हा कार्यक्रम विशेष रंगला. या कार्यक्रमाची निर्मिती स्वरवंदना प्रतिष्ठानची होती, तर सादरीकरण वंदना खांडेकर व अंबरीश मिश्र यांचे होते. या कार्यक्रमात वंदना खांडेकर व अमृता कोलटकर हे गायक कलाकार सहभागी झाले होते. त्यांना राजीव परांजपे (संवादिनी) आणि राजेंद्र हसबनीस (तबला) यांनी साथसंगत केली.