Ad will apear here
Next
‘समाजातल्या सर्वांचं योगदान अपेक्षित’ (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - १०)


‘भटक्या-विमुक्त जाती-जमातीच्या लोकांकडे वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारचं अत्यंत उत्तम असं पारंपरिक ज्ञान आहे; मात्र त्यांना आधुनिक सोयी-सुविधा, प्रशिक्षण मिळालं, तर या सगळ्याची नोंद होऊ शकेल, त्यांचाही विकास होईल आणि त्यांचा देशाच्या विकासातही हातभार लागेल. त्यासाठी समाजातल्या सर्वांचं योगदान अपेक्षित आहे...’ असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांचं मत आहे. आरती आवटी यांनी घेतलेल्या गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीचा हा शेवटचा भाग...
...........
तुमचं सगळं काम, हा तुमचा परिवार आणि तुमचं कुटुंब यांचा मेळ कसा बसवला? वेळेची सगळी सांगड कशी घातली?

गिरीश प्रभुणे : माझा प्रेमविवाह झाला आहे. प्रचारक असतानाच, मला माझ्या (भावी) पत्नीने पत्र लिहिलं होतं. मी नववीत असताना कादंबरी लिहिली होती आणि ११वीत असताना ती प्रकाशित झाली होती. कादंबरी होती सामाजिकच; पण मेनका प्रकाशनने प्रकाशित केली होती. त्या वेळी मेनका प्रकाशन म्हणजे अश्लील कादंबऱ्या प्रकाशित करणारं असं होतं. त्यांच्यावर खटलाही भरला गेला होता. त्या वेळी अत्रे होते, बाबा भिडे वकील होते. त्यामुळे माझी कादंबरी त्यांच्याकडून प्रकाशित झाली आणि मी ती गुरुजींना वाचायला दिली. कादंबरीचं कौतुक झालं. कादंबरीचं नाव होतं ‘लाटांखाली संथ पाणी.’ प्रेमकथाच होती. दलित वस्ती, सवर्ण अमुक-तमुक, कोकणातले खोत-बित, हिंदू-मुस्लिम असं ते सगळं होतं. ती वाचली बायकोनं. तीही त्या वेळी दहावी-अकरावीत असेल. तशी ती दूरच्या नात्यातली. लग्न-समारंभात वगैरे कुठेतरी ओळख झाली. लागली पत्र लिहायला. एका विशिष्ट वयात आपणहून कुणा एका मुलीचं पत्र येणं, ही वेगळी गोष्ट! एरव्ही मला कोण पत्र लिहिणार? मी कायम हाफ पँटमध्ये वावरणारा, संघाचा स्वयंसेवक; पण अशी काही पत्रं लिहितंय कोणी म्हटल्यानंतर पडलो मी त्यात; पण मी तिला सांगितलं, ‘मी संघात काम करणार आहे. मी प्रचारक म्हणून जाणार आहे.’ (कारण मलाही कुणीतरी गळ लावून बसलेलं होतं. आम्ही प्रचारकच व्हावं, असं त्यांचं म्हणणं होतं.

किसनराव डावखर म्हणून प्रचारक होते साताऱ्याला. नंतर ते आमदार झाले. नंतर ते शरद पवारांबरोबर त्या वेळच्या ‘पुलोद’मध्ये गेले. ते आणि कृष्णराव हेगडे अशा दोघांनीही मला बाहेर काढलं घरातनं.) आमचं प्रेम जमलं. मी म्हटलं, ‘मी प्रचारक असेपर्यंत तू थांबलीस, तर ठीक आहे.’ थांबली ती. मी आमच्या घरी सांगितलं. तिनं तिच्या घरी सांगितलं. दोघांच्या घरातले सगळे येऊन म्हणाले, ‘लग्न तुम्ही ठरवलंय ना, मग लवकर करा. उशीर नका लावू.’ मला नोकरी नव्हती, तिचं शिक्षण अर्धवट होतं. तरी आमचं लग्न आमच्या घरातल्यांनी लावून दिलं. मग मी नोकरीला लागलो आणि मग तिला म्हटलं, ‘मला आता नोकरी नाही करायची. मला संघाचं काम करायचंय. तुझ्यासाठी प्रचारक म्हणून मी थांबलो; पण मला काम करायचंय. मी संघाचं काम करायचं, तर तुला नोकरी करावी लागेल. तर तू डीएड कर.’ मग लग्नानंतर दोन वर्ष तिनं डीएड केलं, माहेरी राहून. मी नोकरी केली त्या काळात. नंतर मग ती आली इकडे. मग आमचा संसार सुरू झाला. मी नोकरी करणार नाही, तिनं नोकरी करायची, असं ठरलं. ती अजून नोकरी करते आहे, शिक्षिका आहे. त्यामुळे मग तिने प्रपंच, मुलं लहानाची मोठी करणं, आमच्या घरातल्या सगळ्या अडचणी, माझ्या बहिणींची लग्नं, माझ्या भावांची लग्नं, तिच्या बहिणींची लग्नं, तिच्या भावांची लग्नं... असं सगळं केलं. तिच्यात प्रचंड गुण आहेत. म्हणजे माझं भाग्यच म्हणू, ते की तिनं मला पत्र टाकलं. तसं झालं नसतं, तर मला एवढी चांगली बायको नसती मिळाली. म्हणजे मी बावळट तरी राहिलो असतो किंवा आणखी काहीतरी करत बसलो असतो. सामाजिक काम माझ्याकडनं घडलंच नसतं. ती अत्यंत गुणवान, स्वतः उत्तम गायिका होती. रेडिओवर गात होती; पण तिनं ते सगळं सोडलं. म्हणजे तिचं करिअर तिनं पूर्ण संपवलं. नोकरी केली. सर्वांचे संसार केले. आमच्या आई-वडिलांचं केलं.

वडील ९२ वर्षांचे होऊन गेले. चार वर्षं आजारी होते. मी भटकायचो कायम. आठ दिवसांनी घरी येणार. नेहमीच, ‘ग्रामायण’चं काम करत असताना काय किंवा ‘असिधारा’ मी चालवलं तेव्हाही.. त्याचं जवळपास तीन-चार लाख रुपये कर्ज करून ते बंद केलं. ते कर्ज सगळं तिनं नोकरीतनं फेडलं. मी उचापती करायच्या आणि तिनं त्या फेडायच्या. आता मुलं उचापती करतात तीच फेडते. असं आहे. म्हणजे सर्वांची शिक्षणं तिनंच केली. माझा मुलगा मयुरेश असंच सामाजिक काम करतो. ‘खगोलविश्व’ म्हणून एक संस्था स्थापन केली आहे. २००७ साली पिंपरी-चिंचवड सायन्स काँग्रेस झाली, तिचा प्रमुख तो होता. बरंच काय काय करून, आयुक्तांना आणि अनेकांना भेटून त्याने ती सायन्स काँग्रेस भरवली होती. पाच-सहा वर्षांपूर्वी, ‘ज्ञानप्रबोधिनी’मध्ये अशीच एक सायन्स काँग्रेस भरवली होती. आठवीपासून तो विज्ञानाचा अभ्यास करतो. शे-दोनशे पोरांना गोळा करायचं, रात्र-रात्र त्या आभाळाकडे बघायचं... दुर्बिणी लावून आणि मंगळावर काय आहे आणि कुठे अजून काय आहे, याचा शोध घेत राहायचं. आम्ही त्याची टिंगलटवाळी करायचो; पण तो उत्तम काम करायचा. मग त्याने जर्नालिझम विषय घेऊन एमए केलं. नंतर ‘पुणे सकाळ’मध्ये लागला. मुलगीही एमए (जर्नालिझम) झाली. लोकसत्तामध्ये पाच वर्षं होती. आता रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, आदिवासी, महिला, त्याबद्दलचं संशोधन, वगैरे वगैरे. पीएमपी बसमध्ये महिलांसाठी आरक्षित जागा ही सोय माझ्या मुलीमुळे सुरू झाली. दुसरा मुलगा चित्रकार आहे. असं तिघांचं वेगळं विश्व आहे. पत्नीनं या सगळ्यांना आधार दिला. 

आमच्या घरात अमुक का करतो, असा प्रश्न आम्ही कधी नाही केला. सगळे शाखेच्या मांडवाखालनं गेलेले आहेत. त्यांना जे पटतं ते करतात. वाह्यातपणे वागले नाहीत, कोणी व्यसनाधीन झाले नाहीत. घरामध्ये जाती किंवा इतर कुठलाही भेद राहिला नाही. आम्ही त्या तिघांनाही सांगितलं, की तुमच्या मनाला जे वाटेल, ज्या जातीतली मनाला पटेल त्या मुलीशी तुम्ही संसार करा. कारण मला मनाला पटलं, तिच्याशी मी संसार केला. त्यांची त्यांची एकेक शैली आहे प्रत्येकाची. त्यामुळे घर हा जो काही घटक आहे, त्या बाबतीत मी अत्यंत आनंदी आहे. म्हणजे सुखाचं घर आहे. मला रोज बायको घरचं जेवण देते. खरं तर आता आमच्या इथे मेस आहे; पण एरव्ही मी बाहेर हिंडतो. त्यामुळे मी पुण्यात असलो तरी मोतीबागेत (संघाचं कार्यालय) नाही जेवत. प्रचारक म्हणून आता पंधरा-वीस वर्षं आहे; तर आता घरी जेवलं पाहिजे. आठवड्यातले दोनच दिवस मी घरी असतो. त्या दोन दिवसांतही पुण्यात बैठका असतात. मग बैठक असली की तिथे जेवण असतं. मग मी सांगतो, मी नाही येत जेवायला. बैठकीतसुद्धा मी जेवत नाही. कधी बारा वाजले, तरी घरी येऊन जेवतो. कारण ती एवढं सगळं कष्टाने करत असते. रात्री बारा वाजेपर्यंत माझी वाट पाहत बसते. डबा सकाळी तयार करून देते. रात्री साडेअकराला गेलो, तरी ती थांबलेली असते. भाजी करायची ठेवते ती तेवढ्याकरिता. आमच्या घरात रात्री दहाच्या आत कोणीही जेवत नाही. रात्री ११- सव्वा ११ला सगळ्यांचं जेवण होतं. बाबा आले की जेवायचं. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे.

याचा जो वाचक वर्ग आहे, त्यांना जर या कामात सहभागी व्हायची इच्छा असेल तर कोणकोणत्या प्रकारे ते मदत करू शकतात?

गिरीश प्रभुणे : आता १२-१५ ठिकाणी कामं चाललेली आहेत. चिंचवडलाही गुरुकुल सुरू केलं आहे. या वर्षी एकूण संख्या ७० आहे, तर पुढल्या वर्षी किमान २०० संख्या असेल. तेवढी जागाच नाही. जसजसा आपला परिचय वाढत जातो, तसतशा समस्या पुढे येतात. साधन-सुविधा सगळंच खूप अपुरं आहे. यमगरवाडीला आता साडेतीनशे मुलं आहेत. नेरले येथे ६०-७० मुलं आहेत. इमारती नाहीत, जागा नाही. त्यामुळे या सगळ्याला लागणारा पैसा आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान. जगभर राहणारा जो वाचक आहे, त्यांच्याकडे आज साधन-सुविधा आहेत, त्यामुळे ज्ञान आहे. त्यांच्याकडे असलेलं ज्ञान त्यांनी द्यावं. जुन्या पद्धतीने शिकवणं आता चालणार नाही. आता जलद गतीनं शिकलं पाहिजे. वीस वर्षं शिकल्यावर पदवीधर होता येतं आणि तो म्हाताराच होतो. म्हणजे आता विसाव्या वर्षीच केस पांढरे होतात. म्हणून जलद गतीनं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ते पोहोचवायचं असेल, तर आपल्याकडे जे आहे ते अधिकाअधिक प्रयत्न करून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांपर्यंत गेलं पाहिजे. हे द्यायचं असेल, तर कार्यकर्ता हा घटक वाढवावा लागणार. तो ज्ञानी, शिकलेला असला पाहिजे. आता प्रचारक यंत्रणा पहिल्यासारखी राहिलेली नाही. संघाचा प्रचारक होणाऱ्यांची संख्या घटायला लागली आहे. अजूनही होतातच; पण पहिलं प्रमाण होतं, ते कमी आहे आता.

इकडे आमचं कामही वाढलेलं आहे. व्याप वाढलेले आहेत. जे शिकून तयार होतायत, त्यांनी किमान एक वर्ष, दोन वर्षं अशा क्षेत्रात जावं, राहावं, काम करावं. जो नोकरी-व्यवसायात असेल, त्याने आपल्या खर्चाचं नियोजन करून किमान दहा टक्के रक्कम अशा कामासाठी बाजूला काढावी. दुसरा मार्ग म्हणजे आपण जो स्वतःवर वैयक्तिक खर्च करतो (मौजमजा, वाचन, लेखन, कपडे याकरिता) तेवढाच खर्च या अशा एखाद्या वंचित घटकातल्या मुलांसाठी करावा. म्हणजे वेळ द्यावा, ज्ञानाची साधनं द्यावी, निधी उभारून द्यावा. जगभरातनं साधन-सुविधा, ज्ञान जे काही आणता येईल, त्याची यांना ओळख करून द्यावी. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे सुरू झाल्यामुळे कमी वेळात प्रवास होऊ लागला. असा एखादा मार्ग मिळाला, तर एखाद्या समाजाची गती वाढू शकते. म्हणजे जसा पैसा लागणार आहे, तसंच ज्ञानही महत्त्वाचं आहे. समजा डोंबारी समाजासाठी एखादं उत्तम असं छोटंसं स्टेडियम, वसतिगृह उभं केलं, आधुनिक, सुसज्ज असं जिम्नॅशियमचं प्रशिक्षण केंद्र उभं केलं आणि दर वर्षी पन्नासेक मुलं घेतली, तर ऑलंपिकची एक मोठी टीम तयार होईल पुढच्या काळात; पण हे सगळं खर्चिक आहे. सरकार करेल का? सरकार नाही करत. आम्ही खूप प्रयत्न केले त्यासाठी. त्यांची जी रचना आहे, त्याच पद्धतीने ते जाणार. ती रचना बदलत नाही. म्हणून खासगी केंद्र उभं करा. 

नृत्य करणाऱ्या महिलांच्या मुला-मुलींना उत्तम प्रकारचं क्लासिकल नृत्य शिकवता येऊ शकतं. असं सर्वांगीण विकासाचं केंद्र उभं करणं, हे मोठं काम आहे. मग त्याच्यासाठी जगभरातनं मदत मिळू शकेल, तज्ज्ञ मिळू शकतील. या लोकांमध्ये उत्तम प्रकारच्या नेमबाजीचे गुण आहेत. एकच काय तो आपला सुंबाराम पोहोचला. नंतर नाव नाही! का? तर त्यासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी सुसज्ज केंद्रं उभी केली पाहिजेत. काहीवेळा काय होतं, एखादं केंद्र उभं राहतं आणि पुन्हा सुशिक्षित घरातलीच मुलं तिथं येतात. वैदु आणि अशाच चार-पाच जमाती आहेत, की ज्यांच्याकडे अनेक वनस्पती आहेत, की त्यांची आवश्यक ती नोंद झालेली नाही. पुढच्या प्रवासात त्यांनाच फक्त या वनस्पतींचं ज्ञान आहे. त्यांच्याना जर लहानपणापासूनच शाळा मिळाली, उपयोग होईल. 

पेटंटच्या कायद्यानुसार, औषध ज्यांनी तयार केलं आहे, त्या कुटुंबाला त्याचं पेटंट मिळायला हवं. एक साधी बाभूळ आहे, सगळीकडे झपाट्याने वाढते, त्या बाभळीचं शास्त्रीय नाव आहे प्रॉसोपिस ज्युलिफ्लोरा. मी शोध घेतला, की ज्युलीफ्लोरा म्हणजे काय? तर ज्युली आणि फ्लोरा या दोघी मैत्रिणी होत्या. त्या ५० वर्षांपूर्वी बायोटेक्नॉलॉजी शिकत होत्या. त्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या. तिथे वेगवेगळ्या वनस्पतींचं संशोधन करताना, त्यांनी या वनस्पतीचा शोध घेतला. आणि ही जगभरात विस्तारलेली जी वनस्पती आहे, तिचं मूळ ऑस्ट्रेलियातलं आहे, असं सिद्ध झाले. मग तिची नोंद झाली आणि त्यांचं नाव दिलं गेलं. आपल्याकडचे अनेक वैदू, वनवासी जमातीतल्या अनेकांकडे अशा अनेक वनस्पतींचं ज्ञान आहे, त्यांची पेटंट कायद्याप्रमाणे नोंद झाली पाहिजे. कोणी करत नाही ते. ते करण्याच्या दृष्टीने केंद्र उभं राहिलं पाहिजे. तसं झालं, तर त्यातले अनेक जण वैद्य होतील. आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जातील. इंटरनेटचा वापर करतील. म्हणजे तज्ज्ञ आणि अडाणी यांच्यातली आत्ताची दरी, कमी होईल. त्यासाठी शिकलंच पाहिजे असं नाहीये. खोतारिया आहेत, घिसाडी आहेत, लोहार आहेत आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत. याचं एक केंद्र उभं राहिलं, तर किमान पाच-दहा कोटी संख्या असलेला हा समाज, जलद गतीनं विकासाच्या वाटेवर येईल. त्याला कलेमुळे सन्मान मिळेल. जसे निग्रो आहेत, त्या विल्यम्स भगिनी आहेत. आज कुठच्या कुठं जाऊन पोहोचल्यात. अमेरिकेतल्या निग्रोंचा विकास पाहिला, तर लक्षात येईल, की ते सर्व क्षेत्रात आहेत. फार शिकलेले नाहीयेत ते. आपल्याकडे शिक्षाणाचं जे महत्त्व आहे, ते तिथे खेळालाही आहे आणि त्या त्या विषयाला आहे. रस्त्यावर त्या निग्रोंच्या वसाहतीत फुटबॉल खेळता-खेळता एक मोठा खेळाडू तयार होतो. शाळेत नाही जात तो शिकायला. तो त्या क्लबमध्ये जॉइन होतो. शासन त्याचा सगळा खर्च करतं. आपल्याकडे असं काहीच नाही. आपल्याकडे तो शाळेच्या रहाटगाडग्यात अडकतो आणि सगळा कुचकामी बनतो.

...तर असं केंद्र उभं राहावं, अशी कल्पना आहे. आता आम्ही चिंचवडला तसं काही करतोय. ‘पुनरुत्थान - समरसता - गुरुकुलम’ याची रचना तशी आहे. यमगरवाडीचं केंद्रही तसंच आहे. ते इथंही उभं रहावं. पैसा असला आणि तज्ज्ञ मंडळी आली, तर गती मिळते. त्यासाठी सर्वांचं योगदान अपेक्षित आहे.

(समाप्त)
(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZVFBQ
Similar Posts
गुरुकुलाने गाठला विकासाचा टप्पा (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ६) ‘भटक्या-विमुक्तांसाठी सुरू केलेल्या गुरुकुलामध्ये कला, कौशल्य, संगीत, चित्रकला, इंग्रजी, संस्कृत सेवाभावीपणे शिकवणारे अनेक जण येतात. गीता शिकवायला सुरुवात झाली आहे. इथल्या इथे आम्ही त्यांना व्यवसायाचं वेगळं मार्गदर्शन देतो. विकासाचा एक टप्पा यातून गाठता आला आहे...’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे
‘हे काम बसू देत नाही...’ (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ८) ‘हे काम म्हणजे चाक आहे. ते तुम्हाला बसू देत नाही. माझ्या मागनं येणारा जो कार्यकर्ता आहे, तो इथून तयार झालेला आहे. आपण किती काळ करणार? त्यामुळे नवे कार्यकर्ते पुढे यायला हवेत...’ सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे... आरती आवटी यांनी घेतलेल्या त्यांच्या दीर्घ मुलाखतीचा हा आठवा भाग...
एक पिढी घडली... (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ७) ‘वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या समाजातले सामाजिक प्रकल्प सुरू होत गेले. त्यातून कार्यकर्त्यांचा, शिक्षणाचा एक ओघ सुरू झाला. त्यातून गेल्या दहा-पंधरा वर्षांत एक पिढी तयार झाली आहे...’ सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे.... आरती आवटी यांनी घेतलेल्या त्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा सातवा भाग
‘तो’ कृतार्थतेचा क्षण! (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ९) ‘असा एक कार्यकर्त्यांचा संच, की जो आपल्या परिवारातला नाही; पण तो या कामामुळे आमच्या परिवारात आला. हा मोठा कृतार्थतेचा क्षण होता...’ सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे... आरती आवटी यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा हा नववा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language