Ad will apear here
Next
मन में है विश्वास...
विश्वास जयदेव ठाकूर

ज्याला एक लाख रुपयांचं कर्ज नाकारण्यात आलं होतं, त्याच तरुणानं वयाच्या २७व्या वर्षी स्वकर्तृत्वावर बँक उभारली! वीस वर्षांत या बँकेच्या ११ शाखा निर्माण झाल्या असून, बँकेचा व्यवसाय ५०० कोटींवर पोहोचला आहे... स्वतःवर विश्वास ठेवून जिद्दीनं हे यश मिळविणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे विश्वास जयदेव ठाकूर...‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज पाहू या त्यांची प्रेरणादायी गोष्ट...
..............

लहरों से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करनेवालों की हार नहीं होती

सोहनलाल द्विवेदी यांची (हरिवंशराय बच्चन यांची म्हणून ओळखली जाणारी) ही कविता मला फार आवडते. या कवितेत कवी म्हणतो, ‘इवलीशी मुंगी तिच्यापेक्षा अवजड असा अन्नाचा कण घेऊन भिंतीवरून चालताना शंभर वेळा तोल जाऊन कोसळते; पण तरीही आपल्या अढळ विश्वासाच्या जोरावर ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहते आणि अखेर तिच्या प्रयत्नांना यश येऊन ती आपल्या मुक्कामी पोहोचते.’ कवी शेवटी म्हणतो, ‘असफलता एक आव्हान आहे, त्याचा स्वीकार करून आपल्या कामात कुठे कमतरता राहिली आहे हे बघून त्यात सुधारणा करायला हवी. सफलता मिळेपर्यंत त्या संघर्षमयी वातावरणात माघार न घेता पुढेच जायचं आहे, आल्या प्रसंगाला तोंड द्यायचं आहे. असं केलं तर यश मिळून सर्वत्र जयजयकाराचा जयघोष होणार आहे.’ 

ही कविता, या कवितेच्या ओळी आठवताना एक व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येऊन उभी राहते आणि ‘या ओळी मी सार्थ करून दाखवल्या आहेत बघ,’ असं मला सांगत राहते. या व्यक्तीचं नाव आहे - विश्वास! विश्वास जयदेव ठाकूर!

विश्वास म्हणजे उत्साहाचा अविरत कोसळणारा धबधबा आहे! त्याचा वेग, त्याचं कोसळणं, त्याची झेप पेलणं समोरच्याला तितकंसं सोपं नाही. नाशिक शहरामध्ये विश्वास ठाकूर हे नाव कोणालाही अपरिचित नाही. विश्वास लॉन्स ही आज सर्व नाशिककरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाला हक्काची जागा मिळवून देणारी जागा आहे. तिथे होणारे संगीतकार मदनमोहन, हरिहरन किंवा कबीर यांच्या रचनांचे कार्यक्रम असोत वा खाद्यमहोत्सव असोत... मिसळ महोत्सव, उपवास महोत्सव, भजी महोत्सव, नॉन व्हेज महोत्सवासाठी तमाम नाशिककर येऊन आस्वाद घेतात. कमीत कमी पन्नासेक हजार नाशिककरांनी तिथे येऊन आपली उपस्थिती नोंदवलीच म्हणून समजावं. 

यशस्विनी अभियानतसंच प्रत्येक वाहनातून, मोबाइलमधून सुरेल, सुमधुर अशा असंख्य गाण्यांची फर्माईश पार पाडली जाते आणि नाशिककरांचे कान तृप्त केले जातात ते नाशिकच्या विश्वास कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून! लोकांसाठी असलेल्या या रेडिओद्वारे चांगली पुस्तकं, चांगल्या लोकांशी संवाद आणि चांगली गाणी कशी ऐकावीत याविषयी सातत्यानं कार्यक्रम होत असतात. विश्वास हॅपिनेस सेंटर याअंतर्गत या उपक्रमाचे सदस्य सातत्यानं अनेक आनंदादायी उपक्रम राबवत असतात. नाशिकमध्ये विश्वास ज्ञानप्रबोधिनी आणि रिसर्च सेंटर असून, त्यात २० हजार पुस्तकं अभ्यासूंसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘यशस्विनी अभियान’ (मार्गदर्शक : खासदार सुप्रिया सुळे) हे महाराष्ट्रात सगळ्यात मोठं असं बचतगटाचं जाळं पसरलं असून, याचे संचालक विश्वास ठाकूर आहेत. विश्वास नाशिक जिल्हा नागरी असोसिएशन बँकेचा संचालक आहे, तसंच महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी जिल्हा बँकेच्या असोसिएशनचा बिनविरोध संचालक आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्राचा कार्याध्यक्ष म्हणूनही विश्वास कार्यरत आहे. 

अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासोबतखरं तर ही विश्वासची खरी ओळख नाहीच. विश्वासची खरी ओळख बघण्यासाठी प्रचंड जिद्दी असलेल्या, अफाट परिश्रम करणाऱ्या आणि परिपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या एका आदिवासी मुलाचा प्रवास आपल्याला अनुभवावा लागेल. चला तर मग.....!

विश्वासचा जन्म नाशिक शहरामधला! त्याचे वडील जयदेव ठाकूर पोस्टात कारकून म्हणून कार्यरत होते, तर आई लीलावती ठाकूर ही गृहिणी म्हणून आपल्या चार मुलांचं संगोपन करण्यात व्यग्र होती. विश्वासच्या वडिलांनी वयाच्या ८०व्या वर्षी ‘बीए’ची पदवी मिळवली, तर ८२व्या वर्षी त्यांनी एमए केलं. जयदेव ठाकूर प्रेमळ, शांत... आणि इतरांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव, तर लीलावती ठाकूर या अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जात. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह विश्वास ठाकूरनाशिकच्या एका वाड्यात दहा बाय दहाच्या एका छोट्याशा खोलीत सहा जणांचं ठाकूर कुटुंब राहायचं. आपल्या सगळ्या मुलांनी उत्तम शिकलं पाहिजे असं जयदेव ठाकूर आणि लीलावती ठाकूर यांना वाटायचं. विश्वास आपल्या मोठ्या भावाचे जुनेच कपडे वापरायचा. जुन्या वह्यांची कोरी पानं काढून नवी वही शिवली जायची. जुनीच पुस्तकं वापरायला असायची. शाळेत अभ्यासात पहिला क्रमांक आला नसला, तरी ५५ ते ६० टक्के मार्क्स पडायचे. विश्वासला खो खो आणि अॅथलेटिक्स या खेळांची लहानपणापासून आवड होती आणि खो-खोच्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही तो खेळला होता. शाळेमध्ये हस्तलिखित मासिक तयार केलं जायचं. ते तयार करण्यात आपल्या मित्रांबरोबर विश्वासचा सहभाग असायचा. अतिशय काटकसरीत दिवस काढावे लागले असले, तरी ठाकूर दाम्पत्याने मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही.

शाळेत जाणारा विश्वास खूप खोडकर होता. या ना त्या कारणावरून त्याचे शिक्षक कान धरून त्याला शिक्षाही करत. आपल्या खोड्यांमध्ये तो नवनवीन प्रयोग करायचा. कधी शिक्षकांच्या खुर्चीवर शाई सांडून ठेव, तर कधी पेन शिंपडून ती शाई दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या पांढऱ्याशुभ्र सदऱ्यावर उडव, असे नाना पराक्रम करायचा. तसंच आपली तक्रार घरी जाऊ नये यासाठी त्या मुलांना दमदाटी करायलाही विश्वास मागेपुढे पाहत नसे. 

विश्वास खोडकर असला, तरी त्याच्यातली हुशारी गोडबोले बाई, जोशी सर, गायधनी सर अशा काही शिक्षकांच्या लक्षात आली होती. त्यांनी विश्वासवर नेहमीच विश्वास दाखवला आणि त्याला कायम प्रोत्साहन दिलं. लहानपणापासून विश्वासमध्ये संघटन कौशल्य उपजत होतं. त्याला नेहमीच आपण नेता होऊन आपल्या टीमच्या इतर मंडळींना मार्गदर्शन करायला आवडायचं आणि त्याच्या मित्रांनाही त्याचं नेतृत्व मान्य असायचं. आपली ती जबाबदारी तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा. 

शाळेत असताना विश्वासला वाचनाची गोडी लागली होती. शिवाजी सावंत, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, ना. सी. फडके, बाबा कदम असे लेखक आवडायचे. फास्टर फेणे, चांदोबा, किशोर, चंपक ही पुस्तकं वाचायला खूप आवडायची. सातवी-आठवीत असताना विश्वासनं मृत्युंजय, छावा, ययाती, शहेनशहा ही मोठमोठी पुस्तकं वाचून त्यांचा फडशा पाडला होता. त्याला नारायण धारपांच्या भयकथा आणि दक्षता मासिकातल्या साहसकथा वाचायला खूप आवडायच्या. विश्वासला व्यक्तिचित्रं आवडायला लागली. माणसं कशी घडतात, त्यांच्या संघर्षात ती कशी सामोरी जातात, आपल्या कष्टातून त्यांना मार्ग कसा गवसतो हे प्रश्न विश्वासला पडायला लागले आणि अशा प्रकारच्या वाचनातून आपल्याला जास्त आनंद आणि ऊर्जा मिळतेय असं त्याच्या लक्षात आलं. 

वाचनामुळे विश्वासला गोष्टी सांगायची सवय लागली आणि त्याच्या वयाचीच नव्हे, तर मोठ्या वयाची मंडळीही जमून त्याला गोष्ट सांगण्याचा आग्रह करत. याच टप्प्यावर विश्वासला आपल्यामध्ये वक्तृत्वाचे गुण असल्याचं लक्षात आलं; पण अंगी कौशल्य असूनही संधी मिळतेच असं नाही, ही गोष्ट त्याच्या बालमनाला त्या वेळी बोचली. आपण जेव्हा मोठे होऊ, तेव्हा असा अन्याय दुसऱ्यावर करायचा नाही हे त्यानं मनोमन ठरवलं. 

‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमात
दहावीत विश्वासला ६० टक्के गुण मिळाले आणि आपल्या मुलानं इंजिनीअर व्हावं असं त्याच्या आई-वडिलांना वाटायला लागलं. विश्वासला मराठी आणि इतिहास हे विषय खूपच आवडायचे आणि त्याचा कला शाखेकडे जास्त कल असल्यानं पुण्याला जाऊन विश्वासनं फर्ग्युसन कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश मिळवला. आपण बीए करणार असं त्यानं नाशिकला घरी जाऊन जाहीर केलं. अर्थातच त्याच्या आईला खूप वाईट वाटलं. ‘बीए’साठी घरातून एक पैसाही दिला जाणार नाही, असं तिनं निक्षून सांगितलं. 

विश्वास पुण्यात आला आणि त्याला पत्रकारिता आवडत असल्यानं त्यानं बातमीदार म्हणून काम करायला सुरुवात केली. यातून मिळणाऱ्या ३०० रुपयांमध्ये त्याचा महिन्याचा खर्च तो भागवणार होता. वर्षभर विश्वासनं हे काम केलं. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार म्हणून त्यानं ‘डीआयसी’कडून २५ हजाराचं कर्ज उचललं आणि नाशिकमध्ये प्रिंट वर्ल्ड कमर्शियल प्रिंटर या नावानं एक प्रेस सुरू केला. तो चालवण्यासाठी एकाची नियुक्ती करून तो पुन्हा पुण्यात परतला. 

विश्वास सहकारी बँक
याच दरम्यान विश्वासनं युवांसाठी ‘भरारी’ नावाचं मासिक काढायला सुरुवात केली. त्यासाठी जाहिराती मिळवण्यासाठी तो खूप फिरायचा. बातमीदार म्हणून काम करताना विश्वासच्या बोलक्या स्वभावामुळे त्याच्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांशी ओळखी झाल्या होत्या. त्यांच्याकडूनही त्याला काही जाहिराती मिळायच्या. ‘भरारी’ चार वर्षं उत्तमपणे चालवल्यानंतर एके दिवशी विश्वास कुसुमाग्रज म्हणजेच तात्या शिरवाडकर यांना ‘भरारी’चा अंक घेऊन भेटायला गेला. त्यांनी त्याला ‘तरुणांसाठी लिही आणि त्याचं नाव ‘युवा विश्व’ ठेव,’ असं सांगितलं. विश्वासनं युवांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातलं ते पहिलंच नियतकालिक असावं. 

‘युवा विश्व’च्या अंकात कुसुमाग्रज खूप रस घ्यायचे. विश्वासवर ते अत्यंत प्रेम करायचे. त्यांच्या ‘नटसम्राट’नं विश्वासवर मोहिनी घातली होती. पुण्यातले कॉलेजचे दिवस भुर्रकन उडाले. नोकरी करायची नव्हतीच. प्रिंटिंग प्रेससाठी काढलेलं कर्ज विश्वासनं व्याजासकट फेडलं होतं. त्यामुळे त्याच बँकेकडून एक लाख रुपयांचं कर्ज काढून ‘पीसीओ’चा व्यवसाय सुरू करायचं त्यानं ठरवलं; मात्र कुठे गणित बिघडलं कुणास ठाऊक; पण त्या बँकेनं विश्वासला कर्ज देण्यास नकार दिला. सगळ्या कागदपत्रांची योग्य पूर्तता करूनदेखील हाती नकार आला होता. विश्वासला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. त्या दिवशी तो पहिल्यांदाच चक्क रडला. त्या बँकेतून बाहेर पडताना त्यानं ‘मीच आता बँक काढून दाखवतो,’ असं सांगितलं. 

यशस्विनी अभियानशून्यापासून सुरुवात करायची होती. नातेवाईकांपासून मित्रांपर्यंत सगळ्यांनीच विश्वासला ‘हे कसलं नवं खूळ डोक्यात घेतलंय’ असं म्हणून वेड्यात काढलं. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाचं हे काम नाही हेही पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं; मात्र विश्वासचा निश्चाय पक्का होता. तो अनेक लोकांना भेटला. बँक काढण्यासाठी कुठली कागदपत्रं लागतात, ती कुणाकडे जमा करावी लागतात, ती प्रक्रिया काय असते याची माहिती तो घेत राहिला. बँकेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी कशी फाइल तयार करावी लागते याचीही त्याला माहिती मिळाली. ही फाइल तयार झाल्यावर रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळवणं आवश्यक होतं. बँक तयार करताना त्यात संचालक म्हणून काही लोकांची नावं टाकावी लागणार होती. विश्वासनं आपल्या मित्रांची नावं टाकली. विश्वासचं वय त्या वेळी होतं २५ वर्षं, तर त्याच्या मित्रांचीही वयं अशीच होती. लोकांनी पुन्हा एकदा विश्वासला वेड्यात काढलं. बँक काढायची असेल तर कशी बडी बडी मंडळी संचालक म्हणून असावी लागतात हे त्याला सांगितलं; पण विश्वासला सर्वसामान्यांसाठी बँक काढायची होती आणि त्यात काम करणारी माणसंही त्यांच्यातलीच एक असावीत असा त्याचा विचार होता. 

‘ग्रामीण बँके’चे प्रणेते, नोबेलविजेते महंमद युनूस यांच्यासमवेतरिझर्व्ह बँकेच्या अनेक चकरा विश्वासला माराव्या लागल्या; पण त्यानं जिद्द सोडली नाही. दादर स्टेशनवर वर्तमानपत्र अंथरून रात्र काढायची, सकाळी सार्वजनिक स्वच्छतागृहात तयार व्हायचं आणि रिझर्व्ह बँकेत चकरा मारायच्या असा विश्वासचा दिनक्रम होता. त्यानं आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि एके दिवशी त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्याला रिझर्व्ह बँकेकडून बोलावणं आलं. तिथल्या मॅनेजरनं विश्वासला खालून वरपर्यंत न्याहाळलं आणि त्याचं इतकं लहान वय बघून त्याला विचारलं, ‘बच्चे, बँक कैसे चलायेगा? बँक चलाना कोई टाइमपास की बात तो है नही।’ विश्वासचा स्वतःवर विश्वास असल्यानं त्यानं मॅनेजरला उत्तर दिलं, ‘जर राजीव गांधी वयाच्या चाळीस-चव्वेचाळिसाव्या वर्षी देश चालवू शकतात, तर मी बँक का नाही चालवू शकणार?’ विश्वासच्या चेहऱ्यावरची चमक आणि बोलण्यातला आत्मविश्वास मॅनेजरच्या लक्षात आला. त्यांनी विश्वासला हिरवा कंदील दाखवला. 

बाबासाहेब पुरंदरे आणि मंगेशकर कुटुंबीयांसमवेत
बँक चालवण्यासाठीचा परवाना विश्वासला मिळाला; मात्र गोष्ट आता जास्तच कठीण होती. विश्वासला पंधरा लाख रुपयांचं भागभांडवल उभं करायचं होतं आणि किमान १५०० सभासद करायचे होते. एका निम्नमध्यमवर्गीय तरुणासाठी १५ लाख रुपये जमा करणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती. 

परवाना मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत भागभांडवल आणि इतर गोष्टींची पूर्तता करून जिल्हा बँकेचा दाखला विश्वासला घ्यायचा होता. ज्या लोकांनी आधी आम्ही पैसे देऊ म्हटलं होतं, ते ऐन वेळी आपल्या अडचणी सांगून पसार झाले. काहींनी टाळायला सुरुवात केली, तर काहींनी चकरा मारायला लावल्या. ज्यांनी दहा हजार देतो सांगितलं, अशांनी फक्त पाचशेच हातावर टिकवले. पाऊस, ऊन काहीही न बघता विश्वास आपल्या स्कूटरवरून वणवण फिरत होता. काहींनी दिलेले चेक वटलेच नाहीत... जेवढे नकार येत गेले, तेवढा विश्वासचा निर्धार आणखी आणखी मजबूत होत चालला होता. पैसे जमा करायचा शेवटचा दिवस उजाडला आणि त्या दिवशी पंधरा ऐवजी साडेपंधरा लाख रुपये जमले होते. सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली होती, विश्वासला प्रमाणपत्र मिळालं आणि विश्वास सहकारी बँक २५ मार्च १९९७ या दिवशी सुरू झाली. 

गिरीश कार्नाड आणि भालचंद्र नेमाडे यांच्यासहबँक सुरू झाल्यावर बँकेचा कारभार पारदर्शी असला पाहिजे ही भूमिका विश्वासनं सुरुवातीपासूनच घेतली होती. विश्वासनं बँक काढली असली, तरी त्याला यातल्या कामाचा अनुभव नव्हता. आणि त्यामुळेच बँकेतल्या इतर तीन ते चार संचालकांनी चुकीच्या मार्गांनी कामकाज करायला सुरुवात केली. ही गोष्ट विश्वासच्या लक्षात येताच त्यांच्यात मतभेद झाले. बँकेतून जाताना त्यांनी इतर लोकांना भेटून ही बँक लवकरच बुडणार आहे, तेव्हा तुम्ही तुमचे पैसे काढून घ्या असं घरोघर जाऊन सांगितलं. बँकेतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना फूस लावून काम सोडायला भाग पाडलं. बघता बघता ही बातमी सगळीकडे वेगात पसरली. बँक बंद पडणार आणि आपले पैसे बुडणार या भीतीनं लोकांनी सकाळपासून बँकेसमोर रांग लावली. 

संकटाशी सामना करण्याचा विश्वासचा स्वभाव असल्यानं त्यानं ही गोष्ट अतिशय शांतपणे हाताळायची ठरवली. त्यानं आपले नातेवाईक, मेहुणे आणि बहीण यांना बँकेत बोलावून घेतलं. बँकेचं कुलूप उघडलं. लोक विश्वासची कृती बघत होते. विश्वासनं बँकेतला झाडू हातात घेतला आणि सगळी बँक झाडून घेतली. कुशल आणि कामाचा अनुभव असलेल्या आपल्या नातेवाईकांना काउंटरवरचं कामकाज सोपवलं. तो लोकांसमोर आला. त्यानं हात जोडले आणि घडलेला खराखुरा वृत्तांत लोकांना सांगितला. तसंच सगळं काही सुरळीत करण्यासाठी फक्त आठ दिवसांची मुदत लोकांकडे मागितली. हातात झाडू घेऊन बँक झाडणारा, कामाची लाज न बाळगणारा, संकटापासून पळ न काढणारा विश्वास लोकांनी बघितला होता. त्यामुळे त्यांनी विश्वासला आठ दिवसांची मुदत दिली आणि ते शांतपणे निघून गेले. 

त्या आठ दिवसांत विश्वासच्या नातेवाईकांनी आपापल्या कामांवरून सुट्टी घेऊन बँकेची घडी नीट बसवली आणि त्याच आठ दिवसांमध्ये विश्वासनं अतिशय कुशल कर्मचारीवर्गाची बँकेत नेमणूक केली. आजही ते कर्मचारी विश्वास को-ऑपरेटिव्ह बँकेचं काम सोडून जायला तयार नाहीत हे विशेष! त्यानंतर मात्र विश्वासच्या कामावरचा लोकांचा विश्वास वाढला. बँकेचं काम झपाट्यानं वाढत गेलं. एकट्या नाशिक शहरातच विश्वास बँकेच्या ११ शाखा उभ्या राहिल्या. विश्वाहस बँकेला रिझर्व्ह बँकेची उच्च श्रेणी मिळाली. विश्वास सहकारी बँकेनं सहकारी क्षेत्रातली सगळ्यात जास्त पारितोषिकं पटकावली. उत्तम सादरीकरण असो, उत्तम रिकव्हरी (कर्जवसुली) असो किंवा उत्तम अहवाल असो, अशा विविध गुणवत्तांसाठी विश्वास बँकेनं ४५ पारितोषिकं मिळवली. विश्वासच्या कार्याबद्दल त्याला वैयक्तिक मोजता येणार नाहीत इतकी पारितोषिकं मिळाली. 

विजया मेहतांसोबत
एकदा तर कर्जवसुली करताना विश्वासच्या वडिलानांच जामीनदार म्हणून नोटीस पाठवण्याचा प्रसंग बँकेच्या कर्मचाऱ्यांवर आला. ‘आता काय करायचं,’ असा प्रश्न त्यांनी विश्वासला केल्यावर विश्वासनं ‘माझे वडील असले, तरी त्यांना नियमाप्रमाणे नोटीस पाठवा’ असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. विश्वासच्या या कृतीतून तो कोणालाच पाठीशी घालत नाही हा संदेश सर्वत्र गेला. आज विश्वास बँकेत योग्य कागदपत्रांची पूर्तता केली, की कुठल्याही वशिल्याशिवाय कर्ज मिळतं. विश्वासच्या बँकेची कर्जवसुली जवळजवळ ९७ टक्के आहे. आपल्या कामाचं, अधिकाराचं विकेंद्रीकरण विश्वासनं केलं आहे. 

विश्वास आपली सामाजिक बांधिलकी मानतो. त्यामुळे आपल्याकडे मदत मागायला आलेल्या व्यक्तीला तो विन्मुख पाठवत नाही. एका अनाथालयाच्या चाळीस मुलींची दयनीय अवस्था बघितल्यावर विश्वासनं त्या अनाथालयात पाणी, वीज, फरशी, स्वयंपाकघर अशा सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्या मुलींमध्ये त्याला आपल्या दोन मुली दिसल्या. त्यानं केलेलं काम बघून त्या मुलींचे डोळे पाणावले आणि राखी पौर्णिमेला चाळीस मुलींच्या राख्या विश्वासच्या घरी पोहोचल्या. आपल्या दोन मुलींबरोबर चाळीस मुलींचे आपण पालक बनलो आहोत या भावनेनं विश्वासचं मन भरून आलं. 

सहकाररत्न पुरस्कार स्वीकारताना
बँकेच्या कामाबरोबरच विश्वासचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. अनेक साहित्यिक, नाट्य/सिनेअभिनेते, गायक, संगीतकार, उद्योजक, राजकारणी, व्यावसायिक, अधिकारी असे सगळ्याच क्षेत्रात असलेले त्याचे मित्र आहेत. सच्चे, निखळ मैत्री जपणारे लोक त्याला आवडतात. आजही व्यग्रतेतून वेळ मिळाला, की तो वाचनाकडे वळतो. त्याला जेआरडी टाटा, आल्फ्रेड हिचकॉक, चार्ली चॅप्लिन आवडतात. पं. नेहरू, वर्गीस कुरियन, नंदन नीलेकणी या व्यक्तींच्या कामाचा/कर्तृत्वाचा त्याच्यावर प्रभाव आहे. साधा असलेला विश्वास कुठल्याही खर्चिक आणि झगमगीत लग्नसमारंभांना जात नाही. कोणालाही भेटवस्तू देताना तो पुस्तकच भेट देतो.

विश्वासची पत्नी ज्योती ही एका बँकेच्या संस्थापकाची आणि संचालकाची बायको असली तरी ती घर सांभाळून आजही तिची इन्शुरन्स क्षेत्रामधली नोकरी करते. विश्वास आणि ज्योती यांना दोन मुली असून, मुलगा आणि मुलगी हा भेद दोघांनाही मान्य नाही. 

आपल्या आईकडून घेतलेला शिस्तीचा गुण विश्वासच्या अंगात आहे. प्रत्येक गोष्ट वेळेत आणि ती एक्सलंटपणे केलेली त्याला आवडते. त्याच्यामध्ये एक उत्तम व्यवस्थापक दडलेला आहे. तसंच काम करतानाही वातावरणात ताजेपणा ठेवण्यावर त्याचा भर असतो. त्यामुळेच काम करताना विनोद कर, कोट्या कर अशा गमतीजमती तो करत असतो. विश्वास हा प्रचंड सकारात्मक ऊर्जा असलेला माणूस आहे. ‘नाही’, ‘जमणार नाही’ वगेरे शब्द त्याला आवडतच नाहीत. कामं रेंगाळत ठेवणं त्याला मान्य नाही. ‘कल करे सो आज आणि आज करे सो अब’ यावर त्याचा भर असतो. 

दहा माणसं ज्या वेगानं काम करतील, तेवढी कामं हाच विश्वास एकटा करत असतो. खाण्याची आवड असल्यानं तो मोठमोठ्या पिशव्या घेऊन भाजी मंडईची नियमित सैर करतो. कुठल्याही भाजीवाल्याशी भाजीच्या भावावरून तो हुज्जत घालत नाही. घरापासून ते ऑफिसपर्यंत सौंदर्यदृष्टी जपल्यानं त्याच्या घरातली आणि कार्यालयातली एक न् एक वस्तू सौंदर्यानं नटलेली असते. प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेत चवीनं जगणारा माणूस म्हणून लोक त्याच्याकडे आदरानं बघत असतात. पर्यावरणाची आणि आरोग्याची सांगड घालणारा विश्वास नियमितपणे रोज १० ते १५ किलोमीटर अंतराची सायकलफेरी मारतो. 

विश्वास सहकारी बँकेच्या आज ११ शाखा असून, ५०० कोटींचा मिश्र व्यवसाय करणारी ही यशस्वी बँक आज दिमाखात उभी आहे! ज्याला एक लाख रुपयांचं कर्ज नाकारण्यात आलं होतं, त्याच विश्वास ठाकूर नावाच्या तरुणानं वयाच्या २७व्या वर्षी स्वकर्तृत्वावर बँक उभारली! स्वतःवर विश्वास ठेवून जिद्दीनं वाटचाल केल्यावर काय होऊ शकतं, याचं हे उत्तम उदाहरण!!!

ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाइट : http://vishwasbank.com/

(विश्वास ठाकूर यांच्या कार्यासंदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी https://goo.gl/FWMgLg येथे क्लिक करा.)

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

कुटुंबासह विश्वास ठाकूर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZRXBJ
 खूप छान लेख2
 Farach chan lekh ahe ya madhe khup barkavyanishi tyachi mandani keli ahe ! Mala pan ya mdhil kahi gosti mahit zalya jya kadhI hi Vishwas kadun samjlya nawtya ! Tumche tya baddal dhanyawad
 विश्वास ठाकूर यांचे नेतृत्वगूण व उपक्रमशिलता हे गुण वाखाडण्या सारखे आहेत.त्यांचेवर ग्राहकांचा असलेल्या विश्वासा मुळे त्यांच्या बँकेचा वटवृक्ष होइल यात शंकाच नाही.
बंडू पवार,अध्यक्ष ठाकूर समाज नाशिक
 तरुणांना प्रेरणादायी ठरू शकणाऱ्या एका यशस्वी व्यक्तिमत्वाचे यथार्थ चित्रण छान रेखाटले आहे.असंख्य मित्रांचे बँक ब्यालन्स असलेले विश्वास एक उत्साहाचा महामेरू आहे.
 Speechless. So so so incredible. Most inspiring for everyone.. We are proud of you Vishwas.
 Superb! Hats off to my friend Vishwas.
 फार सुंदर आहे हा लेख1
 विश्वास बसत नाही असे कर्तृत्व.. लाख लाख शुभेच्छा...
 Ma'am lekh chhanach ahe, inspirable ahe. Khup aavadala Ani tyapeksha hi jast vachanaryala prerana denara vatala...
Aabhar tumche
Swapnil Deo
Savarkar nagar
Gangapur road
Nashik.
9922995740
 thank you very much madam, and also inspiring Vishwas ji. khup positive vatale vachtana.
 Very nice achivment..All the best...Keep it up...I want to meet once Hon. Vishwasji...The most inspirable person...Superb...
Similar Posts
जिद्दीचा ‘शब्दकोश’ आई-वडील निरक्षर असलेला एक मुलगा केवळ जिद्दीच्या जोरावर एका लहानशा खेड्यात राहून शिक्षणाला सुरुवात करतो. घरची गरिबी, इंग्रजी भाषेचा न्यूनगंड, कम्प्युटर कशाशी खातात याचा गंध नाही, तब्येतीचे अनेक प्रश्न या सगळ्यांशी लढत, अफाट परिश्रम करत सुनील खांडबहाले नावाचा मुलगा आपल्या जिद्दीनं या सगळ्या परिस्थितीवर
‘मनोहर’ कार्य करणारी ‘मुक्ता’ एखाद्याच्या दुःखानं अश्रूंना मुक्तपणे वाट करून देणाऱ्या, पण अन्यायाच्या विरोधातल्या मोर्चाचं नेतृत्व करताना कणखर, लढाऊ होणाऱ्या, कामगारांच्या हक्कांसाठी त्यांना लढण्याचं बळ देण्यासाठी प्रेरणादायी भाषणं करणाऱ्या आणि समाजाला जागृत करण्यासाठी या साऱ्यांचे प्रश्न प्रभावी लेखनातून मांडणाऱ्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे मुक्ता मनोहर
तो एक ‘राजहंस!’ सेरेब्रल पाल्सीमुळे ज्याचं अवघं आयुष्यच पणाला लागलं होतं, लहानपणी जो पाण्याला घाबरत होता, तो हंसराज पाटील आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जलतरणपटू आहे. स्पर्धा परीक्षेमध्येही उत्तम यश मिळवून तो आज नाशिकचा नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. तो आणि त्याच्या आई-वडिलांनी जिद्दीने अडचणींवर मात करत केलेल्या प्रयत्नांमुळे
पुस्तकं आणि पुस्तकवेडा विनायक! पुस्तकं वाचण्यासाठी विकत घ्यावी लागतात, तर कधी वाचनालयाचं सभासद व्हावं लागतं; मात्र नाशिकच्या विनायक रानडे नावाच्या पुस्तकवेड्या माणसानं या पुस्तकांना चक्क आपल्या दारात आणून ठेवलं आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज पाहू या पुस्तकांना आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनवू पाहणाऱ्या विनायकची हृदयाला भिडणारी, प्रेरणा देणारी गोष्ट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language