Ad will apear here
Next
चिनी माल स्वस्त का?
‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १२वा भाग...
...
चिनी वस्तू स्वस्त असतात, हे जणू समीकरणच तयार झाले आहे. महागाई भस्मासुरासारखी वाढत असल्याचे चटके आपल्याला सारखे बसत असताना, उत्पादनाची सगळी गणिते चीन जुळवतो तरी कशी? इतक्या स्वस्त दरामध्ये वस्तू विकणे चीनला शक्य तरी कसे होते, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणे अतिशय स्वाभाविक आहे.

चीनमध्ये अत्यंत स्वस्त दरामध्ये कामगार मिळतात, असे म्हटले जाते. त्यामुळे पर्यायाने वस्तूंची किंमतही कमी होते; पण कामगार किंवा मनुष्यबळ हा उत्पादन खर्चाचा केवळ एक भाग झाला. त्याबरोबरच कोणत्याही गोष्टींचे उत्पादन करताना अन्य अनेक घटकही महत्त्वाचे असतात. हे सगळे घटक चीनने चपखलपणे जुळवून आणलेले असल्याने आज चिनी माल अवघ्या जगावर राज्य करत आहे.

जगाचा कारखाना
चीनला अवघ्या जगाचा कारखाना असे म्हटले जाते. पुरवठादार, उत्पादक, सरकारी यंत्रणा आणि ग्राहक यांचे उत्तम जाळे या देशाने विणलेले आहे. त्यातूनच, गेल्या तीसेक वर्षांत चीनमध्ये व्यवसायासाठी पोषक अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. उत्पादनाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी या व्यवस्थेतला प्रत्येक घटक मोलाची भूमिका बजावतो.

आर्थिक दिलासा
चीनमधले कारखाने आरोग्य आणि सुरक्षा याविषयीचे नियम पाळत नाहीत, तसेच पर्यावरणविषयक कायदे धाब्यावर बसवतात, असे काही जण म्हणतात. यामुळे कचरा व्यवस्थापनासाठी येणारा खर्च सोयीस्करपणे टाळला जातो, असेही म्हटले जाते.

चिनी सरकारने १९८५मध्ये करसवलत देणारे धोरण मांडण्यास सुरुवात केली. निर्यातीला उत्तेजन देण्यासाठी आणि निर्यातीपुढचे अडथळे दूर करण्यासाठी या धोरणाने पुढाकार घेतला. निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील दुहेरी करआकारणी रद्द करण्यात आली.



कंपन्यांना व्यवसाय कर्ज सहजपणे आणि कमी दराने मिळते. त्यामुळे त्यांच्या उद्योगांना भक्कम आर्थिक हात मिळतो. निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर व्हॅट हा कर आकारला जात नाही. व्हॅटमधून वजावट किंवा सवलत मिळत असल्याने उत्पादकांना उत्पादनाचा खर्च कमी राखता येतो. त्यामुळे, या देशाकडे गुंतवणूकदार आकर्षित होतात. तसेच, परदेशातल्या ज्या कंपन्यांना कमी खर्चामध्ये उत्पादन करून घ्यायचे असते, त्यांनाही चीनचा पर्याय सोयीचा वाटतो. चीनने यंत्रसामग्री आणि औद्योगिक संसाधने यांसाठीच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीतही कमालीची प्रगती केलेली असल्याने तिथल्या कारखान्यांना ज्या देशांना निर्यात करायची आहे, त्या देशातल्या बाजारातील वस्तूंच्या दरापेक्षा कमी दरामध्ये किंवा उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टीने मोठी मदत होते.

विशेष आर्थिक क्षेत्रे (एसईझेड)
चीनच्या उत्पादनाला लक्षणीय चालना देण्यामध्ये या ‘एसईझेड’चा मोठा वाटा आहे. चीनमधल्या एसईझेडमध्ये प्रामुख्याने विविध देशांतर्गत कायदे, नियम व प्रक्रिया यांपासून सवलत दिली जाते. प्रत्येक एसईझेडसाठी एक प्रमुख व्यक्ती नेमून दिली जाते. सहसा ही व्यक्ती पक्षातील वरिष्ठ पदावरची आणि विश्वासू व्यक्ती असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कर आणि परकीय चलनावरील नियंत्रण यांच्याशी निगडित नियमांच्या बाबतीत अवलंबल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींचा वापर करण्याचे बऱ्यापैकी स्वातंत्र्य या एसईझेडना दिले जाते. नव्वदीच्या दशकाच्या मध्यानंतर एसईझेडनी पकड घ्यायला सुरुवात केल्यावर उच्च तंत्रज्ञानयुक्त विशेष क्षेत्रे विकसित करण्यात आली. त्यामध्ये देशांतर्गत संशोधन आणि विकासाला, तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन करण्याला उत्तेजन देण्यात आले. गुंतवणुकीचा ओघ आणण्यासाठीही यामार्फत प्रयत्न करण्यात आले. या क्षेत्रांना कराध्येही प्रचंड सवलत मिळते. भारतात एसईझेडनी सगळे मिळून १० हजार हेक्टर इतके क्षेत्र व्यापले आहे. चीनमध्ये मात्र १६ एसईझेड आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाचे क्षेत्र ६० हजार हेक्टरपेक्षा कमी नाही. यावरून तेथील एसईझेडची व्याप्ती लक्षात येईल. 

पाठीशी सरकार
उत्पादन क्षेत्राला, विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी चीन सरकार खंबीरपणे उत्पादकांच्या पाठीशी उभे आहे. त्यासाठी अनुकूल धोरणे आखण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी सदैव तत्पर आहे. उद्योग सुरू करण्यासाठी जमिनीची गरज असेल, तर सरकार पुढाकार घेऊन स्वस्तात जमीन मिळवून देते. उद्योग सुरू केल्यावर त्यामध्ये तयार होणारी उत्पादने देशाबाहेर विकली जाणार असतील आणि त्यातून देशाला परकीय चलन मिळवून दिले जाणार असेल, तर सरकार आणखी उदार होते आणि जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करते. उत्पादने देशातल्या देशात विकली जाणार असली, तरी सरकार त्यांच्या विक्रीसाठी मदत करते. उद्योगांबाबतचे निर्णय स्थानिक स्तरावर घेतले जात असल्याने कामे पटपट होतात.



वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन
चिनी उत्पादनाचे रहस्य म्हणजे, चीनमधल्या कंपन्या उत्पादन करण्यासाठी मोल्ड तयार करतात. मोल्ड खराब होईपर्यंत ते वापरत राहतात. यामुळे मोल्डचा खर्चही वसूल होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडे जशी राज्ये आहेत, तसे चीनमध्ये प्रोव्हिन्स आहेत. निरनिराळे प्रोव्हिन्स विशिष्ट उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहेत. ते प्रोव्हिन्स त्या त्या उत्पादनाच्या निर्मितीमध्ये तरबेज असतात. जसे, गरम पाण्याच्या केटल कुआंगचौमध्ये तयार होतात. शांगतोंगमध्ये रसायने आणि औद्योगिक रंग बनवले जातात. असे केल्याने नैसर्गिक संसाधने, कच्चा माल, वाहतूक, तंत्रज्ञान, इतर सगळ्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतात. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो. साहजिकच, उत्पादनाची किंमतही कमी ठेवता येते.

हाँगकाँगच्या सीमेला लागून असणाऱ्या शन्चनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे केंद्र विकसित करण्यात आले आहे. कम्पोनंट उत्पादक, कमी खर्चिक मनुष्यबळ, तांत्रिक ज्ञान असलेले मनुष्यबळ, असेम्ब्ली सप्लायर आणि ग्राहक या घटकांचा समावेश असलेली उत्पादनाची पुरवठा साखळी इथे निर्माण करण्यात आली आहे. तैवानमधील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपने आजूबाजूच्या परिसरात अनेक कम्पोनंट उत्पादक आणि पुरवठादार तयार केले आहेत.

चिनी लोक किमतीच्या बाबतीत घासाघीस करत नाहीत. ग्राहक किंमत कमी करण्याचा आग्रह करू लागले, तर ते किमतीऐवजी उत्पादनाची गुणवत्ता कमी करतात. आपल्याला कचकड्याची गुणवत्ता असणारी उत्पादने मिळतात, याचे कारण हेच आहे. 

उत्पादन करणाऱ्या चिनी कंपन्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी कच्चा मालही घाऊक प्रमाणात खरेदी करतात. साहजिकच त्यामुळे त्यांचा खर्च कमी होतो.

आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी किंबहुना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी चीन आणि चिनी सरकार जे-जे करावे लागेल, करता येईल ते करत आहे. मग ते उद्योजकांना भक्कम पाठिंबा देणे असो किंवा देशाच्या चलनासारख्या किचकट बाबींमध्येही नियंत्रण निर्माण करणे असो, चीनने ही सर्वच साखळी यशस्वीपणे निर्माण केली आहे. अद्याप तरी ती भेदणे कोणालाही शक्य झालेले नाही. 

- गौरी देशपांडे
ई-मेल : gouri@ewan.co.in

(लेखिका चिनी भाषेच्या तज्ज्ञ असून, पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मँडरिन बिझनेस डाटा अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZXEJCQ
Similar Posts
भारत चीनमधून काय काय आयात करतो? भारताने आत्मनिर्भर होण्याचे ठरवले आहे आणि त्या दृष्टीने वाटचालही सुरू केली आहे; मात्र त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. चीनमधून भारत वेगवेगळ्या क्षेत्रांतील आयात करतो आणि त्याचे प्रमाण लक्षणीय आहे. या व्यापाराच्या वस्तुस्थितीचा आढावा घेऊ या ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या पाचव्या भागात
व्यावसायिकतेची बीजे चीनमध्ये पूर्वीपासूनच रुजलेली... चीनची व्यापारविषयक आकडेवारी, चलनविषयक घडामोडी, तिथल्या कंपन्यांचा विस्तार, गुंतवणूक यावर नजर टाकली, की एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे चीनचे पाय किती विस्तारले आहेत, याची कल्पना येते. इतिहासावर नजर टाकली, तर गेल्या अनेक शतकांच्या इतिहासामध्ये चीन हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अविभाज्य घटक राहिल्याचे लक्षात येते
आफ्रिकेच्या साधनसंपत्तीवर चीनचा डोळा अनेक कारणांनी चीनचा आफ्रिकेवर डोळा आहे. आफ्रिकेचे मोक्याचे स्थान, तेलाचे साठे, दुर्मीळ धातू, मासे या गोष्टी मिळवण्यासाठी चीनला आफ्रिकेला हाताशी धरायचे आहे. तसेच, आफ्रिकेला पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करणे असा मुखवटा चीनने पांघरला असला, तरी चीनला जागतिकीकरणाच्या पुढच्या टप्प्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आफ्रिकेची गरज लागणार आहे
युरोपमध्येही ‘मेड इन चायना’ चिनी वस्तू भारताच्या कानकोपऱ्यात पोहोचल्यात... चिनी उत्पादकांनी भारतीय संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करून सणासुदीसाठी लागणाऱ्या इत्थंभूत वस्तू बनवल्यात आणि भारताला निर्यात केल्यात... चायनीजच्या गाड्या अगदी खेड्यापाड्यांतही दिसून येतात... अशी आपली निरीक्षणे आणि अनेकदा तक्रार असते; पण सगळीकडे चिनी छाप असलेला भारत हा एकमेव देश नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language