
ख्यातनाम संगीतकार गुलाम मोहम्मद आणि बोलपटाच्या सुरुवातीच्या कालखंडातील पार्श्वगायिका राजकुमारी दुबे यांचा १७ मार्च हा स्मृतिदिन. तसेच, बांग्लादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रेहमान यांचा १७ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...........
गुलाम मोहम्मद
१९०३ साली राजस्थानातील बिकानेर येथे जन्मलेल्या गुलाम मोहम्मद यांचे वडील जनाब नबी बक्श हे तबलावादक होते. त्यामुळे गुलाम मोहम्मद यांना संगीताचे जनुक रक्तातूनच आलेले होते. राजस्थानी लोकसंगीताचा त्यांनी आपल्या चित्रपट संगीतात पुरेपूर वापर करून घेतला. ढोलक, मटका, डफ, खंजिरी, चिमटा अशा तालवाद्यांना त्यांनी लोकप्रिय बनवले. अर्थात कोणत्या प्रकारच्या गाण्यात आवाजाला जास्त उठाव द्यायचा आणि कोणत्या प्रकारच्या गाण्यात वाद्यांचा वापर करून गाणे उठावदार करायचे याचे अचूक कसब त्यांच्याकडे होते.
आगगाडीच्या शिट्टीचा वापर त्यांनी ‘पाकिजा’मध्ये कल्पकतेने करून घेतला होता. ‘चलते चलते’ या गाण्याच्या शेवटी, किंवा ‘मौसम है आशिकाना’ गाण्याच्या आधीचा पक्ष्यांचा तो किलबिलाट रेकॉर्ड करण्यासाठी तब्बल एकवीस दिवस त्यांना रोज सकाळी त्या ठिकाणी सगळा लवाजमा घेऊन आवाज रेकॉर्ड करण्यासाठी जावे लागले. तेव्हा कुठे त्यांना मनासारखा तो किलबिलाट रेकॉर्ड करता आला.
ते नौशाद यांच्याकडे अनेक वर्षे सहाय्यक म्हणून काम करत होते. नौशाद साहेबांच्या सुरवातीच्या काळातील म्हणजे रतन, मेला, दर्द, दास्तान, दिल्लगी, बाबुल, दीदार, या चित्रपटांच्या संगीतावर गुलाम मोहम्मद यांची छाप स्पष्ट दिसून येते. अर्थात नौशाद साहेबांनी त्यांना स्वतंत्र काम करायची परवानगी दिली होती. गुलाम मोहम्मद यांनी स्वतंत्रपणे जवळपास पस्तीस हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी त्या पैकी मिर्जा गालिब आणि पाकीजा हे चित्रपट खूप गाजले. पाकीजा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला. एक अजरामर संगीत कलाकृती ठरली. अर्थात ती तयार होण्यासाठी ही तब्बल चौदा वर्षे लागली. गुलाम मोहम्मद यांना आपल्या हयातीत हा चित्रपट पूर्ण झालेला पाहण्याचे भाग्य लाभले नाही. त्यांच्या निधनानंतर नौशादसाहेबांनी या चित्रपटाची उर्वरित गाणी आणि पार्श्वसंगीत तयार केले.
या चित्रपटाने आणखी एक विक्रम असा केला की मूळ चित्रपट साडेतीन तासांपेक्षा अधिक लांब आणि तेवीस गाणी त्यात होती. पुढे चित्रपटाची लांबी कमी करण्यासाठी बारा गाणी कट करावी लागली, तरी या कापलेल्या गाण्यांची एचएव्हीने एक वेगळी रेकॉर्ड बनविली. या चित्रपटासाठी गुलाम मोहम्मद यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले पण पारितोषिक नाही मिळाले. पण मिर्झा गालिबच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. गुलाम मोहम्मद यांचे निधन १७ मार्च १९६८ रोजी झाले.
......
राजकुमारी दुबेचार डिसेंबर १९१७ रोजी राजकुमारी दुबे उर्फ राजकुमारी यांचा जन्म झाला. त्या गोड आवाजाच्या पार्श्वगायिका होत्या. बोलपटाच्या सुरुवातीच्या काळातील गायिका म्हणून, तसेच पहिल्या महिला पार्श्वगायक म्हणून त्यांना ओळखले जाते.
राजकुमारी यांनी करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. १९३३मधील ‘आंख का तारा’, ‘भक्त और भगवान’, व १९३४ मध्ये आलेल्या लाल चिठ्ठी, मुंबई की रानी, ‘शमशरे आलम’ या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली होती. त्यांचे पहिले गाणे त्या दहा वर्षांच्या असतना १९३४ साली एचएमव्हीने रेकॉर्ड केले होते.
राजकुमारी म्हटले की आठवतो तो मधुबाला आणि लता मंगेशकर या दोघींनाही एकाचवेळी इंडस्ट्रीत नाव मिळवून देणारा ‘महल.’ या चित्रपटात ‘घबराके हम’ आणि ‘एक तीर चला’ ही राजकुमारी यांची दोन अप्रतिम गाणी होती.
लता मंगेशकर यांनी राजकुमारींबरोबर काही सुंदर गाणी गायली आहेत. श्यामसुंदर, नौशाद, बर्मनदा, ओ. पी. नय्यर आदी दिग्गजांकडे काम मिळूनही राजकुमारी फार गाजल्या नाहीत. रोशन यांनी बावरे नैन, अनहोनी अशा गाजलेल्या चित्रपटात त्यांना संधी दिली होती. राजकुमारी यांची उतरत्या वयात इतकी वाईट परिस्थिती झाली की त्या पाकीजा चित्रपटात त्या कोरसमध्ये गाताना दिसल्या. राजकुमारी दुबे यांचे निधन १७ मार्च २००० रोजी झाले.
........

शेख मुजीबुर रेहमान१७ मार्च १९२० रोजी शेख मुजीबुर रेहमान यांचा जन्म झाला. मुजीबुर रेहमान हे बांग्लादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होते. मुजीबुर रेहमान यांना बंगबंधू नावानेही संबोधत. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली. त्याला इतिहासात तोड नाही.
१० जानेवारी १९७१ रोजी मुजीबुर रेहमान पाकिस्तानी कैदेतून मुक्त होऊन स्वतंत्र बांग्लादेशास परतले. त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. देश उभारणीसाठी त्यांनी सोविएत पद्धतीची अर्थनीती स्वीकारून राष्ट्रीयीकरण सुरू केले. १५ ऑगस्ट १९७५च्या पहाटे मुजीब यांच्यासकट पत्नी, मुलगी, १० वर्षांचा मुलगा, जावयासह सर्वांचा गोळ्या घालून खून करण्यात आला.
माहिती संकलन : संजीव वेलणकर