Ad will apear here
Next
मंगेश तेंडुलकर यांचा फटकेबाजी करणारा कुंचला!

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचा ११ जुलै हा स्मृतिदिन. त्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांचा विचारांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा...
.............
फटकेबाजी आणि तेंडुलकर या दोन शब्दांचं गहिरं नातं असावं कदाचित. आपलं नाट्यलेखन आणि लेखनातून समाजातील कुप्रथांवर कोरडे ओढणारे आणि क्रांतिकारी विचार मांडणारे विजय तेंडुलकर असोत.... आपल्या बंडखोर विचारांनी कमी वयात आपली कारकीर्द गाजवणारी त्यांची कन्या प्रिया तेंडुलकर असो....आपल्या खऱ्याखुऱ्या फटकेबाजीने शतकांच्या शतकाचा विक्रम करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असो.... दारिद्र्यरेषेची नवी व्याख्या मांडणारे अर्थतज्ज्ञ डॉ. सुरेश तेंडुलकर असोत.... किंवा आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांतून चार घटका निखळ मनोरंजन करणारे आणि भीषण वास्तवाची सहज जाणीव करून देणारे मंगेश तेंडुलकर असोत... आपापल्या क्षेत्रातली फटकेबाजी आणि उत्तुंग कामगिरी हे या साऱ्या जणांचं वैशिष्ट्य... अर्थात यापैकी सचिन वगळता बाकी सगळे तेंडुलकर एकाच कुटुंबातले आणि आपल्या कर्तृत्वानंही त्यांनी ते सिद्ध केलं. 

११ जुलै २०१७ रोजी सकाळी मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाची बातमी आकाशवाणीवर ऐकली आणि मन सुन्न झालं. त्याच वेळी, फटकेबाजी आणि तेंडुलकर यात काहीतरी नातं असावं, असंही वाटून गेलं. वयाची ८० वर्षं होऊन गेली, तरी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्यानं कार्यरत असलेलं मंगेश तेंडुलकर हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या जाण्यामुळे साहजिकच त्यांची व्यंगचित्रं आणि लेखनाबद्दलच्या आठवणींनी मनात रुंजी घातली. ते गेले, त्याच्या काही दिवस आधीच एका कार्यक्रमात त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली होती. आणि मुख्य म्हणजे त्यांच्याशी शांतपणे दहा मिनिटं बोलताही आलं होतं. दहाच मिनिटांतल्या त्या भेटीत ते ज्या काही आपुलकीनं बोलले होते, त्यातून खूप ऊर्जा मिळाली होती. ती प्रत्यक्षातली पहिलीच भेट असल्याने मला त्याबद्दल अप्रूप होतंच; पण तसंही त्यांना भेटण्याची संधी लहानपणापासूनच उपलब्ध करून दिली होती, ती त्यांच्या व्यंगचित्रांनी. 

व्यंगचित्रं म्हणजे काय हे कळायचं नाही, त्या वयापासून व्यंगचित्रं आवडायची. त्यामुळे ‘आवाज’सह अनेक दिवाळी अंकांतली व्यंगचित्रं आवर्जून पाहिली, वाचली जायची. हरिश्चंद्र लचके, वसंत सरवटे अशा अनेक कलाकारांसह मंगेश तेंडुलकर यांनी काढलेली व्यंगचित्रंही त्यात असायची आणि ती खळखळून हसवायची. त्यांच्या फटकेबाजीचा गर्भितार्थ त्या वयात कळत नव्हता; पण त्यांची कुंचल्याच्या फटकाऱ्यांची आणि लफ्फेदार सहीची विशिष्ट शैली मात्र मनात घर करून राहिली. सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याशी, त्यातल्या समस्यांशी निगडित असलेले विषय ते मांडत होते, म्हणूनच ती व्यंगचित्रं आपलीशी वाटायची. दात काढण्यासाठी मोठा हातोडा वापरणारे डॉक्टर, जिवाच्या आकांताने सायकलीत हवा भरताना स्वतः पंपासोबत वर उडालेला माणूस, झेंडावंदनासाठी थेट ध्वजस्तंभावरच चढलेले प्रमुख पाहुणे, उंच इमारतीत पेपर टाकण्यासाठी पेपरवाल्यानं चक्क माकडाला कामाला लावणं, अशा प्रकारची त्यांची व्यंगचित्रं चेहऱ्यावर निर्व्याज हसू फुलवत. त्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातली ती विशिष्ट गोलाई ही त्यांच्या व्यंगचित्रांची खास ओळख होती. 

मंगेश तेंडुलकरांचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे व्यंगचित्रकाराच्या तिरकस नजरेनं पाहण्यातून त्यांनी स्वतःलाही सोडलं नव्हतं. ‘दैनिक सकाळ’मध्ये ते लिहित असलेला ‘संडे मूड’ हा स्तंभ हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. ‘एका रविवारी मी स्वतःपासून दहा फूट अंतरावरून स्वतःकडं पाहायचं ठरवलं,’ या शब्दांत त्यांनी या लेखमालेचा उद्देश सांगितला होता आणि त्यांची ती सबंध लेखमाला खूपच वाचनीय ठरली. पुढे त्याचं पुस्तक झालं आणि त्या पुस्तकाला पुरस्कारही मिळाला. स्वतःच्या मृत्यूची कल्पना करून, तसंच स्वतःच्या उत्तरायुष्याची कल्पना करूनही त्यांनी व्यंगचित्रं काढली होती. 

निखळ मनोरंजन करणारा त्यांचा कुंचला जेव्हा पुण्यातल्या सामाजिक आणि वाहतूक प्रश्नांची हुर्रेवडी (हा त्यांचाच शब्द) उडवायचा, तेव्हा त्याची ताकद कळायची आणि प्रश्नाचं गांभीर्यही प्रकर्षानं जाणवायचं. ‘पीएमटी’ची बस बेदरकारपणे चालवणाऱ्या चालकामुळे एका लहान मुलाला होऊ घातलेल्या अपघातातून वाचवण्यासाठी महर्षी कर्वेंचा पुतळाच स्वतः पुढे होतो, हे व्यंगचित्र... किंवा ‘आमचं कोणीही नाही, शक्यतो आम्हाला दोघांना वाचवा नाही तर दोघांना एकदमच पोहोचवा. आम्ही रागावणार नाही,’ असं लिहिलेली पाटी हातात घेऊन रस्ता क्रॉस करणारं वृद्ध दाम्पत्य दर्शवणारं त्यांचं व्यंगचित्र पाहिलं, की वाहतुकीची गंभीर परिस्थिती डोळ्यांसमोर येते. अर्थात केवळ व्यंगचित्रांतून ही परिस्थिती मांडून ते थांबले नाहीत; तर वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी ते वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी सरसावले. हेल्मेटचं महत्त्व सांगणारी, तसंच सिग्नल आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करणारी त्यांनी काढलेली व्यंगचित्रं पुण्यातल्या चौकांत झळकली. वाहतूक पंधरवडा किंवा अशाच काही उपक्रमांत ते पोलिसांसोबत थेट रस्त्यावरही उतरायचे आणि लोकांना नियम पाळण्यासाठी आवाहन करायचे, हेच त्यांचं वेगळेपण. कलाकाराची संवेदनशीलता त्याच्या कलाकृतीतून तर दिसतेच; पण त्याच्या वागण्यातूनही दिसते. तेंडुलकर हे याचंच एक उदाहरण होते. चिमण्यांवर त्यांनी केलेली चित्रमालिकाही खूप गाजली. अलीकडे फेसबुक या समाजमाध्यमाचाही ते खूप चांगल्या प्रकारे उपयोग करत होते. ते गेले त्याच्या काही दिवस आधीपर्यंत ते फेसबुकवर ताजी व्यंगचित्रं शेअर करत होते. मध्यंतरी एकदा एका सरकारी गाडीने सिग्नल तोडल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी त्या गाडीचा नंबर आणि अन्य माहिती कागदावर लिहून ती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकवर शेअर केली होती. या वयातही सामाजिक जागृतीसाठी, नियमांच्या पालनासाठी, शिस्तीसाठी असलेल्या त्यांच्या धडपडीची यावरून कल्पना यावी. 

एका कार्यक्रमात त्यांनी केलेलं भाषण ऐकायला मिळालं होतं. ते भाषण म्हणजे त्यांच्या कलेबद्दलच्या आणि एकंदरच जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा एक आदर्श वस्तुपाठच होतं. त्यात ते म्हणाले होते, ‘मला काय मिळतं, मी काय गमावतो, याचा विचार थांबतो, तिथे कलेची मौज सुरू होते. व्यंगचित्रक्षेत्रात मी काम करत असताना, मला असं लक्षात आलं, की माझ्या हातून घडलेल्या चित्रांपैकी शंभरातलं एखादं चित्र तयार झालं रे झालं, की त्याच्या शब्द नसलेल्या भाषेत ते क्षणार्धात मला दाद देऊन जातं. ‘वेल डन. छान झालं तुझ्या हातून.’ आपल्या कलाकृतीकडून वाहवा मिळणं, शाबासकी मिळणं याच्याइतका आयुष्यात दुसरा सुवर्णक्षण नाही. तो क्षण अत्यंत अनुभवावा असा असतो. त्याचबरोबर हेही लक्षात आलं, की असं असाधारण चित्र माझ्याकडून कसं काढलं गेलं, हे मला माहिती नाही. आय डिसओन इट. जेव्हा काही असाधारण घडतं, तेव्हा ते त्या कलाकाराकडून घडवून घेतलं जातं, हे खरं. हातून एक छान काम झालं याचा आनंद मात्र जरूर असतो.’ 

पुरस्कारांबद्दलही तेंडुलकर यांनी त्यांचं परखड मत त्या वेळी व्यक्त केलं होतं. ‘आपण एखाद्याला पुरस्कार देतो, तेव्हा त्याला असं बजावून सांगायला पाहिजे, की हा पुरस्कार तुझ्या हातून घडलेल्या असाधारण कामासाठी देतोय, तुला नाही. तसं होत नाही. त्यामुळे कलाकार स्वतःलाच पुरस्कार मिळाल्याचं समजतात आणि मग त्याचे जे काही दुष्परिणाम होतात, ते आपल्यालाच भोगायला लागतात. अनेक कलाकारांची चांगली वाटचाल आपण पुरस्कार देऊन थांबवतो. त्यामुळे पुरस्कार देताना हा विचार निश्चितपणे व्हायला हवा, असं वाटतं. अगदी मलाही पुरस्कार देताना मुस्काडीत वाजवून सांगायला हवं, की हा पुरस्कार तुझ्या कामाला आहे, तुला नाही. आपण स्वतःला विसरून जे काही करतो, ते स्वतःला आणि सगळ्यांनाच आनंद देतं,’ असं ते म्हणाले होते. 

स्वतःकडे, तसंच समाजातल्या सर्व प्रकारच्या माणसांकडे पाहण्याचं त्यांचं कुतूहल हेच त्यांच्या व्यंगचित्रांचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या लेखनातूनही ते सहज दिसे. ‘भुईचक्र’ या त्यांच्या पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी लिहिलं आहे, ‘स्वतःभोवती फिरणारे दिवाळीतले भुईचक्र आणि स्वतःभोवती फिरणारा माणूस यांत केवढे अतोनात साधर्म्य! पुढच्या क्षणी यातला कोण कुठल्या दिशेला जाऊन गरगरेल कुणाला ठाऊक असतं?’ 

एवढं मोठं कर्तृत्व गाजवूनही त्यांचा स्वभाव अत्यंत ऋजू होता. ‘छात्रप्रबोधन’च्या एका दिवाळी अंकात त्यांनी स्वतःबद्दलचं मत मांडलं होतं. ‘कुणी व्हायचं म्हणून मी या प्रांतात आलो नाही. माझ्या हातात माझ्या आवडीचं माध्यम सापडलं. ते घेऊन मनापासून काम करत राहिलो. रस्त्यावरचा एखादा कागदाचा कपटा वाऱ्याच्या झोताने उंच उडून खिडकीच्या तावदानावर जाऊन पडतो. त्या कागदाच्या कपट्याला कुणी विचारलं, की तू इथे कसा आलास? कागदाचा कपटा प्रामाणिकपणे एवढंच उत्तर देईल, ‘मला कसं ठाऊक असेल? वाऱ्याच्या झोताला विचारा!’ मी व्यंगचित्रांच्या प्रांतात इथे कसा आलो, हे पण ‘त्या’ वाऱ्याच्या झोतालाच विचारायला हवं!’ असं त्यांनी लिहिलं होतं. 

‘व्यंगचित्र हेच माझं पहिलं प्रेम आहे,’ असंही त्यांनी लिहिलं होतं. ‘माझ्यापेक्षाही माझे मोठे बंधू, नाटककार विजय तेंडुलकर यांची चित्रकला अधिक चांगली आहे. आम्ही पाचवी-सहावीत असताना विजयसाठी वडिलांनी चित्रकलेले पुस्तक आणले होते. मात्र त्यातील व्यंगचित्रांनी माझ्यातला कलाकार जागृत झाला. त्या वेळी कागदावरील माझे हे हस्तकौशल्य प्रदर्शनाची कोणतीच संधी नव्हती. त्यामुळे मित्रांच्या कॉलरला मागच्या बाजूने ते व्यंगचित्र लावण्याचेही उपद्व्याप केले आणि त्यासाठी भरपूर मारही खाल्ला; पण खऱ्या अर्थाने त्या वेळचे तेच माझ्या चित्रांचे पहिले प्रकाशक ठरले,’ अशी आठवण त्यांनी ‘ग्राहकहित’च्या २००३च्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखात लिहिली होती.

‘व्यंगचित्रे चितारता चितारता माझ्या असे लक्षात आले, की अन्य भाषांसारखीच व्यंगचित्र हीपण एक भाषाच आहे, जी शब्दांच्या भाषा ओलांडून पलीकडच्या माणसापर्यंत पोहोचते. मार्मिकता आणि परिणाकारकता हे या भाषेचे मला समजलेले दोन विशेष. आवडणारी कविता जशी वाचणाऱ्याच्या लक्षात राहते, तसेच आवडलेले व्यंगचित्र पाहणाऱ्याला दीर्घकाळ लक्षात राहते,’ हे त्यांनी आणखी एका लेखात लिहिलेले वाक्य त्यांच्या व्यंगचित्रांनाही लागू पडते.

कलेपेक्षा कलाकाराला मोठं मानण्याची प्रवृत्ती सध्या बळावत चालली आहे. त्यावर मंगेश तेंडुलकरांनी ‘किस्त्रीम’च्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखात खंत व्यक्त केली होती. ‘कलेच्या प्रांतात अनागोंदी चालत असेल, तर बिचाऱ्या व्यंगचित्रकारांनी कोणाचं घोडं मारलंय? इथेही तेच सुरू आहे. भालेकर नावाचे पुण्यातले साइनबोर्ड पेंटर त्यांच्या शाळकरी मुलाला दुकानात हातात ब्रश धरून काम शिकवत होते. ‘आधी ‘पेंटर भालेकर’ लिहायला शीक. बोर्ड रंगवायचे नंतर पाहू!’ हेच व्यंगचित्रांच्या प्रांतात घडते आहे. आधी ‘व्यंगचित्रकार’, नंतर सवडीने व्यंगचित्र. निकड व्यंगचित्रकार होण्याचीच असली, तर व्यंगचित्रावर विचार करणे, ते आत्मसात करण्यासाठी काम करणे यासाठी इथे वेळ उपलब्ध नाही. आता खरी गरज आहे, ती चित्र आणि व्यंगचित्र या दोन्ही भाषा भिन्न आहेत, हे समजावून घेण्याची. एखाद दुसरा अपवाद वगळता,  ज्यांना उत्तम चित्रे चितारता येतात त्यांना व्यंगचित्रे चितारता येत नाहीत आणि जे व्यंगचित्रे चितारतात त्यांना पोर्ट्रेट्स आणि लँडस्केप्स चितारता येत नाहीत. म्हणूनच चित्रकलेपेक्षा व्यंगचित्राकडे ज्यांचा ओढा आहे, त्यांनी चित्रकलेचा मार्ग बदलून त्वरित या दिशेने वाटचाल सुरू करायला हवी आहे,’ असं त्यांनी लिहिलं होतं.  

या लेखात आधी ज्या कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे, त्याच कार्यक्रमात मंगेश तेंडुलकरांनी दोन वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या होत्या. त्या दोन्हींमध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांनाही तंतोतंत लागू पडतात. त्यांनी पहिली आठवण सांगितली होती ती सी. रामचंद्र यांची. ‘सी. रामचंद्र यांना कोणीतरी विचारलं होतं, की संगीतकार होण्यासाठी काय लागतं? त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, की ‘एक स्क्रू ढिला लागतो.’ फक्त संगीतकाराचाच नव्हे, तर गीतकाराचा, गाणाऱ्याचा, ऐकणाऱ्याचा असा सगळ्यांचाच एक स्क्रू ढिला लागतो. तरच त्याचा आनंद घेता येतो,’ असं तेंडुलकर म्हणाले होते. कलेसाठी स्वतःला झोकून देणाऱ्यानं सादर केलेली कलाच रसिकालाही आवडते, असं त्यांना सांगायचं होतं. दुसरी त्यांनी सांगितलेली आठवण म्हणजे कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या रवींद्र पिंगे यांनी घेतलेल्या मुलाखतीची. त्या मुलाखतीत पिंगे यांनी बोरकरांना विचारलं होतं, की तुमचं वय तुम्ही आहात त्यापेक्षा १५ वर्षांनी लहान दिसतं. त्याचं रहस्य काय? त्यावर बोरकरांनी उत्तर दिलं, ‘मी यावर फारसा विचार केला नव्हता; पण कविता सुचल्याच्या क्षणापासून ती कागदावर उतरेपर्यंतच्या काळात मी इथे नसतोच. त्यामुळे तेवढा काळ माझ्या आयुष्यातून वजा करा.’ तेंडुलकरांचंही असंच असावं. व्यंगचित्राची कल्पना सुचल्यापासून ती रेखाटेपर्यंतचा काळ ते या जगात नसावेतच. या वयातही ते सामाजिक कार्यात आणि व्यंगचित्र काढण्यात ज्या उत्साहानं कार्यरत होते, ते पाहता तसंच म्हणावं लागेल. अगदी अलीकडेपर्यंत त्यांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शनंही होत होती. आयुष्यभर ज्यांनी आपल्या कुंचल्याच्या फटकेबाजीनं सतत हसवलं, तो कुंचला आता कॅनव्हासवर फिरणार नाही, ही गोष्ट निश्चितच मन हेलावून सोडणारी आहे...

- अनिकेत कोनकर

(या लेखात वापरलेली मंगेश तेंडुलकर यांची व्यंगचित्रे आणि तेंडुलकर यांच्या दिवाळी अंकांमधील लेखांतील संदर्भ http://www.mangeshtendulkar.com या वेबसाइटवरून घेतले आहेत. ही वेबसाइट म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी खूप मोठा ठेवा आहे.)

(लेख पूर्वप्रसिद्धी : ११ जुलै २०१७)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZNNBE
 अप्रतिम लेख!मलाही त्यांना भेटतां आलं एकदा,तो अनुभव माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता,अशी माणसे पुन्हा होणे नाही!त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
Similar Posts
अमराठी जनांना मराठीचं बाळकडू पाजणारा कौशिक मूळचा डोंबिवलीकर आणि सध्या पुण्यात असलेला कौशिक लेले हा तरुण कम्प्युटर इंजिनीअर परदेशी आणि परराज्यातल्या अमराठी नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून मराठी भाषा शिकविण्याचं कार्य करतो आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या कार्याबद्दल...
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
पु. ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
डॉ. ह. वि. सरदेसाई : ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व पुण्यातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे आज (१५ मार्च २०२०) निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’सारख्या त्यांच्या अनेक पुस्तकांनी संपूर्ण महाराष्ट्रातच, नव्हे तर जगभरातील मराठी माणसांना सोप्या भाषेत वैद्यकीय ज्ञान देण्याचे मोठे काम केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language