सोलापूर : येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सायबर क्राइम अवेअरनेस कार्यक्रमाचे सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक व पोलीस आयुक्तांतर्फे भरभरून कौतुक करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान ७ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राइम रोखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन 'सायबर क्राइम' अवेअरनेस चे व्याख्यान दिले गेले. यात सायबर क्राइम म्हणजे काय? सायबर क्राइमचे प्रकार, मोबाइल, कॉम्प्युटर इंटरनेट वापरकर्त्यांनी घ्यावयाची काळजी याबद्दल व्याख्यानाद्वारे जनजागृती केली. या कार्यक्रमांतर्गत विविध महाविद्यालयातून सुमारे सात हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.
सोलापूर पोलीस आयुक्तालय व सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबवला गेला. यासाठी सिंहगड महाविद्यालयाचे प्रा. रितेश दायमा व सारंग तारे यांनी व्याख्यानाद्वारे जनजागृती केली. या कार्यक्रमाचे तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर व पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी सिंहगडच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. या टीममध्ये प्रा. व्ही. एस. बिरादार, प्रा. हरीश गुरमे, प्रा. ए. डी. शिंदे, सुहास माने, प्रा. एस. एच. लामकाने, प्रा. विनय जोकारे यांनी परिश्रम घेतले.