Ad will apear here
Next
भारत चीनमधून काय काय आयात करतो?


भारताने आत्मनिर्भर होण्याचे ठरवले आहे आणि त्या दृष्टीने वाटचालही सुरू केली आहे; मात्र त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. चीनमधून भारत वेगवेगळ्या क्षेत्रांतील आयात करतो आणि त्याचे प्रमाण लक्षणीय आहे. या व्यापाराच्या वस्तुस्थितीचा आढावा घेऊ या ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या पाचव्या भागात...
.......
प्रत्येक देशाला आपल्या लोकसंख्येच्या निरनिराळ्या गरजा भागवण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. नैसर्गिक संपत्तीची विपुलता, औद्योगिकीकरण, आधुनिकता, संपन्नता अशा वेगवेगळ्या कारणांमुळे प्रत्येक देशाची बलस्थानेही भिन्न आहेत. त्यामुळे विशिष्ट उत्पादनांच्या बाबतीत काही देश अग्रेसर आहेत. तेल म्हटले की आखाती देश समोर येतात, मायक्रोसॉफ्ट किंवा तंत्रज्ञानाच्या बाबतीत एखादे नाव घेतले की अमेरिका हा देश डोळ्यांसमोर येतो. निसर्गाने युरोपला भरभरून सौंदर्य दिले आहे. अन्य देशांप्रमाणे आपल्याही काही कमकुवत, तर काही भक्कम बाजू आहेत. त्यानुसार आपण आयात-निर्यात करतो. आपल्या एकूण आयातीमध्ये चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनाचे प्रमाण अंदाजे १४ टक्के आहे. त्यानंतर अमेरिका, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती यांचा क्रमांक आहे; पण या देशांच्या तुलनेत, आपण एकट्या चीनकडून लक्षणीय आयात करतो.

भारत आणि चीन यांचा परस्परांशी संपर्क असल्याच्या लेखी नोंदी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकामध्ये आढळतात. सर्वसामान्य लोकांमध्ये व्यापाराच्या माध्यमातून असलेला हा संपर्क भारतातील बौद्ध धर्म चीनमध्ये गेल्यावर कमालीचा वाढीस लागला. चिनी साधू फा शिएन यांनी जवळजवळ दहा वर्षे भारतात वास्तव्य केले आणि चीनमध्ये परतल्यावर बौद्ध धर्मावरचे संस्कृतमधले बरेच साहित्य चिनी भाषेमध्ये रूपांतरित केले.परंतु, भारतात बौद्ध धर्माचा अस्त आणि दोन्ही देशांमध्ये पसरलेला वसाहतवाद यामुळे दोन्ही देशांतली सांस्कृतिक देवाणघेवाण घटली. त्यानंतर दोन्ही देशांच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार आले; पण या शतकाच्या सुरुवातीपासून भारत आणि चीन यांचे व्यापारी संबंध झपाट्याने वाढू लागले. 

२००८ या वर्षापर्यंत चीन हा आपला सर्वांत मोठा व्यापारी देश बनला होता. चीनने तेव्हा निर्माण केलेले स्थान आजही कायम आहे. यापूर्वीच्या शतकात दोन्ही देशांमधला व्यापार उत्तरोत्तर वाढतच गेला. २०११पर्यंत तो ७३.९ अब्ज डॉलरपर्यंत वाढला. २०१८ या वर्षापर्यंत दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापाराने वार्षिक १३.३४ टक्के वाढ साध्य केली आणि ९५.७ अब्ज डॉलर इतकी पातळी गाठली. त्याच वर्षी चीनकडून केली जाणारी आयातही १२.८९ टक्के वाढून ७६.८७ अब्ज डॉलर झाली.
अगदी याच वर्षाचे उदाहरण घ्यायचे तर, एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीमध्ये आपण चीनकडून तब्बल ६२.४ अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंची आयात केली आहे. 

एक तर आपण पूर्णतः तयार असलेली वस्तू चीनमधून मागवतो किंवा भारतीय कंपन्यांना उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल चीनमधून येतो किंवा या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री चीनने तयार केलेली असते. 



औषधांसाठी कच्च्या मालाचा स्रोत
कच्च्या मालासाठी फार्मास्युटिकल उद्योगाचीही भिस्त चीनवर आहे. औषधांच्या निर्मितीसाठी एपीआय, म्हणजेच बल्क ड्रग्जची आवश्यकता असते. आपण अंदाजे ८० टक्के बल्क ड्रग चीनमधून मागवतो. काही जीवनरक्षक औषधांच्या बाबतीत तर आपले जवळजवळ ९० टक्के अवलंबित्व चीनवर आहे. भारताने ३८ एपीआयच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला हवे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. या यादीमध्ये फर्मेंटेशनवर आधारित असलेल्या औषधांचा समावेश असण्याची शक्यता असून, त्यामध्ये चीनची जगात मक्तेदारी आहे. 

स्मार्टफोन
चीनवरून येणारी उत्पादने म्हटले, की सर्वप्रथम फोन डोळ्यांसमोर येतात. फोर जी आल्यानंतर भारतातल्या कंपन्या या क्षेत्रात काहीशा मागे पडल्या. सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनपैकी ७५ टक्के स्मार्टफोन चीनमध्ये तयार झालेले असतात. चिनी कंपन्यांनी भारतातल्या स्मार्टफोन क्षेत्रामध्ये घट्ट पाय रोवले आहेत. शाओमी, विवो, रिअलमी व ओप्पो या चार चिनी ब्रँडनी भारतातील अंदाजे ६० टक्के बाजारपेठ गिळंकृत केली आहे. 

इलेक्ट्रॉनिक्स
भारतात केल्या जाणाऱ्या आयातीपैकी, सेमीकंडक्टर व इंटिग्रेटेड सर्किट्स अशा इलेक्ट्रॉनिक घटकांपैकी जवळजवळ ६७ टक्के आयात चीनकडून केली जाते. या क्षेत्राची उलाढाल अंदाजे ५३०० अब्ज रुपये आहे. २०१९मध्ये आपण चीनकडून १९.९७ अब्ज डॉलर रकमेच्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटची आयात केली. 

कन्झ्युमर अप्लायन्सेस
भारतात आयात केल्या जाणाऱ्या एकूण कन्झ्युमर ड्युरेबल्स उत्पादनांपैकी अंदाजे ४५ टक्के उत्पादने चिनी असतात. या क्षेत्राची उलाढाल अंदाजे ७६३ अब्ज रुपये आहे. या उत्पादनांमध्ये एसी, रेफ्रिजरेटर्स आणि टीव्ही आघाडीवर आहेत. CEAMA या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी संबंधित असणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष कमल नंदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात ३० टक्के एअरकंडिशनरची आयात केली जाते, तसेच बहुतेकसे मायक्रोवेव्ह चीनची सीमा ओलांडून भारतात आलेले असतात. स्मार्ट टीव्ही सेट्सपैकी जवळजवळ ४५ टक्के टीव्ही चिनी बनावटीचे असतात. ते चीनमधून घ्यायचे नसतील, तर त्यांना असलेल्या पर्यायी टीव्ही सेट्सची किंमत २० ते ४५ टक्के अधिक आहे.

लेदर (चामड्याच्या वस्तू)
आपण लेदरच्या वस्तूंचीही आयात करतो. त्यापैकी ३८ टक्के उत्पादने चीनमधून येतात. प्रामुख्याने लेदर शूज चीनमधून मागवले जातात.

कपडे
कपड्यांचा पुरवठा करण्याच्या बाबतीतही चीन मागे नाही. चीनमधून ४६० दशलक्ष डॉलर किमतीचे सिंथेटिक यार्न आणि ३६० दशलक्ष डॉलर किमतीचे सिंथेटिक फॅब्रिक यांची आयात करण्यात आली. शिवाय, बटणे, हँगर, सुया व चेन अशा कपड्यांसाठी लागणाऱ्या वस्तूही चीनने पुरवल्या. ही आयात अंदाजे १४० दशलक्ष डॉलर इतकी होती.

खेळणी
देशातला खेळणी बनवण्याचा उद्योगही चीनपासून वेगळा राहू शकलेला नाही. २००१ ते २०१२ या कालावधीमध्ये, आपण चीनकडून आयात करत असलेल्या खेळण्यांच्या एकूण आयातीमध्ये २५.२१ टक्के वाढ झाली. यामध्ये आणखी वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

उत्पादनांच्या किमती सर्वसामान्यांच्या आटोक्यात ठेवायच्या असतील आणि स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर कंपन्यांना हवे असलेले घटक आणि कच्चा माल चीनकडून खरेदी करण्याशिवाय सध्या तरी गत्यंतर नाही. या मालाचे उत्पादन चीनइतक्या रास्त दरामध्ये अन्य कोणताही देश करत नाही. त्यामुळे आपल्याला चीनकडून ही आयात अपरिहार्य आहे. सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर, मेक इन इंडिया अशा देशव्यापी अभियानांमुळे भविष्यकाळामध्ये हे चित्र बदलते का ते पाहायचे!

- गौरी देशपांडे
ई-मेल : gouri@ewan.co.in

(लेखिका चिनी भाषेच्या तज्ज्ञ असून, पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मँडरिन बिझनेस डाटा अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DXQCCP
Similar Posts
चिनी माल स्वस्त का? चिनी वस्तू स्वस्त असतात, हे जणू समीकरणच तयार झाले आहे. महागाई भस्मासुरासारखी वाढत असल्याचे चटके आपल्याला सारखे बसत असताना, उत्पादनाची सगळी गणिते चीन जुळवतो तरी कशी? इतक्या स्वस्त दरामध्ये वस्तू विकणे चीनला शक्य तरी कसे होते, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणे अतिशय स्वाभाविक आहे. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १२वा भाग
व्यावसायिकतेची बीजे चीनमध्ये पूर्वीपासूनच रुजलेली... चीनची व्यापारविषयक आकडेवारी, चलनविषयक घडामोडी, तिथल्या कंपन्यांचा विस्तार, गुंतवणूक यावर नजर टाकली, की एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे चीनचे पाय किती विस्तारले आहेत, याची कल्पना येते. इतिहासावर नजर टाकली, तर गेल्या अनेक शतकांच्या इतिहासामध्ये चीन हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अविभाज्य घटक राहिल्याचे लक्षात येते
आफ्रिकेच्या साधनसंपत्तीवर चीनचा डोळा अनेक कारणांनी चीनचा आफ्रिकेवर डोळा आहे. आफ्रिकेचे मोक्याचे स्थान, तेलाचे साठे, दुर्मीळ धातू, मासे या गोष्टी मिळवण्यासाठी चीनला आफ्रिकेला हाताशी धरायचे आहे. तसेच, आफ्रिकेला पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करणे असा मुखवटा चीनने पांघरला असला, तरी चीनला जागतिकीकरणाच्या पुढच्या टप्प्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आफ्रिकेची गरज लागणार आहे
चिनी गुंतवणुकीवरील नियंत्रणासाठी भारताचे नवे एफडीआय धोरण गेले काही महिने जगाला विळखा घातलेल्या आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलेल्या करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारला देशाच्या एफडीआय धोरणामध्ये महत्त्वाचे बदल करणे गरजेचे वाटले. त्यानुसार यंदा एप्रिल महिन्यात सरकारने नवीन धोरण जाहीर केले. भारताने नवे धोरण जाहीर करताना कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही;

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language