सध्या सारे जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडले आहे. सारे देश आपापल्या परीने या संकटाचा सामना करीत आहेत. भारताचा लढा जगासमोर नवे आदर्श निर्माण करीत आहे. या महामारीच्या पहिल्या तडाख्यात सारे जण हतबुद्ध झाले होते; पण आता या संकटाच्या विविध पैलूंवर सुसंगत विचार पुढे यायला लागले आहेत. या संकटाशी दोन हात कसे करावेत, या संकटाला कायमस्वरूपी कसे गाडून टाकावे, करोनानंतरच्या काळात देश नव्या शक्तीने, समर्थपणे कसा उभा करावा, याविषयीचे विचार लोक मांडू लागले आहेत.
असे विचार आणि संकल्पना प्रकट करण्यासाठी एक अनोखी संधी समर्थ भारत व्यासपीठ आणि चैतन्य ज्ञानपीठ पुण्यातील दोन संस्थांनी लेखन स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे. समर्थ भारत व्यासपीठ आणि चैतन्य ज्ञानपीठ या संस्थांचे राष्ट्रीय समन्वयक मुकुंद गोरे यांनी त्याविषयी माहिती दिली.
लेखनाचे विषय :
उपाय करोनाविरुद्धचा : आताचा लॉकडाउनचा काळ संपल्यावरही करोनाविरोधी लढा दीर्घ काळ चालूच ठेवावा लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक स्वच्छता व रोगप्रतिकारशक्तीत वाढ हे यात कळीचे मुद्दे ठरणार आहेत. या बाबी आपल्या जीवनशैलीचा कायमस्वरूपी भाग कशा करता येतील यावर आपल्याला सामाजिक जाणिवेतून सुचणारे विचार आणि नावीन्यपूर्ण कल्पना लिहून पाठवायच्या आहेत.
शोधू या संधीचे सोनेरी किरण : करोनानंतरच्या नवभारतात आपले जीवन अधिक सुरळीत, संपन्न करण्यासाठीच्या अनेक संधी विविध क्षेत्रांत उपलब्ध होत आहेत. अनेकविध क्षेत्रांत जाणवलेल्या अशा संधी, ज्याद्वारे भारत देश नव्या सामर्थ्यवान स्वरूपात ठामपणे उभा राहील, त्याविषयी लिहून पाठवायचे आहे.
स्पर्धकांनी पाठवलेल्या सर्व संकल्पनांची एक पुस्तिका तयार करण्यात येणार असून, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठीही या कल्पना पाठविण्यात येतील.
स्पर्धेचे नियम :
- स्पर्धा देश-विदेशातील सर्व बंधुभगिनींना खुली आहे. वयाची अट नाही.
- स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही.
- प्रत्येक विषयाच्या स्पर्धेत स्वतंत्रपणे भाग घेता येईल.
- स्पर्धकांनी कल्पना लिहून केवळ ९४०४४ ०९४१२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरच पाठवायची आहे.
- शब्दमर्यादा : २०० ते ३०० शब्द
- लेख पाठवण्याची अंतिम मुदत : सात मे २०२०
- निकालाची तारीख : पाच जून २०२०
- बक्षिसे : पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस साडेसात हजार रुपये तर तिसरे बक्षीस पाच हजार रुपयांचे आहे. त्याशिवाय २१०० रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे आणि एक हजार रुपयांची १० विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत. ही बक्षिसे दोन्ही विषयांवरील लेखनासाठी स्वतंत्रपणे दिली जाणार आहेत.
- सहभागी झालेल्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती सोबतच्या पत्रकात दिली आहे.
संपर्क :
गिरीशंत उमरखेडी – ९१७२३ ८४८०३
भूषण पसरणीकर – ९७६२८ ५०६४०