गेलेले २०१८ हे वर्ष एका गोष्टीसाठी नोंदविले जाईल, ते म्हणजे विविध वाहिन्यांनी आपले लक्ष इंग्रजी किंवा हिंदीवरून भारतीय भाषांतील आशयावर केंद्रित केले. आपल्या भाषिक वाहिन्यांची संख्या वाढविण्यापासून क्रीडा वाहिन्यांमध्ये भाषिक आशय वाढविण्यापर्यंत टीव्ही कंपन्यांनी गैरइंग्रजी आणि गैरहिंदी भाषांमध्ये वाढता सहभाग नोंदविला आहे. भविष्यकाळ भारतीय भाषांचा आहे. त्यासाठी आपण सज्ज राहणे ही ‘भविष्यकाळा’ची गरज आहे................
देशातील कोणत्याही राज्यातील, कोणत्याही शहरातील मध्यमवर्गीय घर. या घरातील टीव्हीच्या पडद्यासमोर बसलेली घरातील मंडळी. त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल आणि डोळ्यांसमोर इंग्रजी वृत्तवाहिनी. समोरच्या पडद्यावर वाहिनीचा नेहमीचा लोगो, नेहमीचे निवेदक आणि नेहमीची चित्रे दिसतात. परंतु हे काय...ते ज्या पडद्यासमोर बसलेत त्यावर इंग्रजी नव्हे, तर हिंदीत बातम्या ऐकू येताहेत. निवेदक आणि इतर मंडळी चर्चाही हिंदीतच करताहेत...!
ही गंमत फक्त त्या विवक्षित मंडळींचीच नाही, तुम्ही जर इंग्रजी वाहिन्या पाहत असाल, तर तुम्हालाही हेच चित्र दिसेल. अन् तुम्ही नियमित पाहत असाल, तर या वाहिन्या इंग्रजी भाषेतील असल्या तरी त्या विशिष्ट वेळ हिंदी बातम्यांसाठी राखून ठेवत आहेत, ही गोष्ट तुमच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. केवळ बातम्याच कशाला, त्या पॅनेल चर्चासुद्धा हिंदीमधून करण्यात येतात.
ही पद्धत टाइम्स नाऊ वाहिनीने २०१७मध्ये सुरू केली. त्या वेळी ती देशातील क्रमांक एकची समजली जाणारी वाहिनी होती. या वाहिनीचे प्रमुख पत्रकार अर्णब गोस्वामी बाहेर पडले होते आणि त्यांनी स्वतःची रिपब्लिक ही वाहिनी सुरू केली होती. त्या नव्या वाहिनीशी ‘टाइम्स नाऊ’ची स्पर्धा होती. त्या वेळी ‘टाइम्स नाऊ’चा प्रेक्षक वर्ग १.५ टक्के होता. या वाहिनीने सकाळी आठ वाजता हिंदी बातम्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर या वेळेतील प्रेक्षकांची संख्या चार टक्क्यांपर्यंत पोहोचली होती.
एकदा ‘टाइम्स नाऊ’ने हा पायंडा पाडल्यानंतर आता ‘न्यूज १८’सारखी वाहिनीसुद्धा त्याच मार्गावरून चालत आहे. केवळ टीव्हीवरच नव्हे, तर या वाहिन्यांच्या संकेतस्थळांवरसुद्धा तुम्हाला हिंदी भाषेतील आशय पाहायला मिळतो. याचे कारण म्हणजे इंग्रजीत कितीही तोरा मिरविता येत असला, तरी लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला हिंदी किंवा तत्सम एखाद्या भारतीय भाषेचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे या वाहिन्यांनी हिंदी आशय देणे सुरू केले आणि त्याचे फळसुद्धा त्यांना मिळाले.
मागील वर्ष हे याच वास्तवावर शिक्कामोर्तब करून गेले आहे. गेलेले २०१८ हे वर्ष एका गोष्टीसाठी नोंदविले जाईल, ते म्हणजे विविध वाहिन्यांनी आपले लक्ष इंग्रजी किंवा हिंदीवरून भारतीय भाषांतील आशयावर केंद्रित केले. आपल्या भाषिक वाहिन्यांची संख्या वाढविण्यापासून क्रीडा वाहिन्यांमध्ये भाषिक आशय वाढविण्यापर्यंत टीव्ही कंपन्यांनी गैरइंग्रजी आणि गैरहिंदी भाषांमध्ये वाढता सहभाग नोंदविला आहे.
केवळ वृत्तवाहिन्याच नव्हे, तर गेल्या वर्षात प्रादेशिक भाषेच्या मनोरंजन वाहिन्यांनी प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत दोन अंकी निव्वळ वाढ नोंदविली, असे या क्षेत्रातील अधिकृत संस्था असलेल्या ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (बीएआरसी) अहवालात म्हटले आहे.
‘दक्षिणेतील चार भाषा सात टक्क्यांनी वाढल्या आहेत. यात कन्नडचा वाटा सर्वाधिक म्हणजे १५ टक्क्यांनी वाढला. हिंदी भाषक राज्यांमधील भोजपुरी, बांगला, मराठी, इत्यादींसारख्या वाहिन्यांची बाजारपेठ २६ टक्क्यांनी वाढली आहे. चार दक्षिणी भाषांनी लोकप्रियतेच्या बाबतीत मोठी आघाडी घेतली असली, तरी हिंदी भाषक वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येला मागे टाकणे त्यांना अजून जमलेले नाही. त्यामुळेच २०१७ च्या तुलनेत प्रादेशिक भाषेच्या प्रेक्षकांची संख्या २०१८मध्ये काहीशी कमीच झाली,’ असे ‘बीएआरसी’ने म्हटले आहे.
प्रादेशिक बाजारपेठांमध्ये स्पर्धेच्या तीव्रतेच्या दृष्टीने २०१८ हे वर्ष अभूतपूर्व होते. सर्व प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रसारकांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे. ‘व्हायाकॉम १८’च्या प्रादेशिक टीव्ही नेटवर्कचे प्रमुख रवीश कुमार तर म्हणतात, की प्रसारक, जाहिरातदार आणि आशय निर्मात्यांसाठी प्रादेशिक बाजारपेठ हे नवे रणांगण आहे.
याचे एक उदाहरण म्हणजे सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाने (एसपीएन) काढलेली सोनी मराठी ही नवी वाहिनी. ही या कंपनीची ‘प्रादेशिक’ भाषेतील पहिली वाहिनी. ‘सोनी’च्या छत्राखाली बंगाली भाषेत ‘सोनी आठ’ नावाची सर्वसामान्य मनोरंजन वाहिनी चालविली जाते खरी. परंतु ती कंपनीने स्वतः काढलेली नाही. दुसऱ्या एका कंपनीकडून अधिग्रहित केलेली होती.
त्याचप्रमाणे स्टार नेटवर्ककडून ‘स्टार स्पोर्टस् वन तमिळ’ ही वाहिनी सुरू करण्यात आली. कुठल्याही प्रादेशिक भाषेत सुरू झालेली ही पहिलीच क्रीडा वाहिनी. इतकेच नव्हे तर ‘स्टार इंडिया’ने ‘स्टार स्पोर्टस् वन कन्नड’ या वाहिनीचीही घोषणा केली आहे. नव्या वर्षात ती प्रत्यक्ष सुरूही झाली आहे. ‘व्हायकॉम १८’ने ‘कलर्स तमिळ’ आणि ‘कलर्स कन्नड सिनेमा’ या दोन वाहिन्या सुरू केल्या आहेत. अलीकडेच झी समूहाने झी फॅमिल पॅक नावाची एक योजना आणली आहे. त्यातही भारतीय भाषांना प्राधान्य देण्यात आले आहे.
आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे म्हणजे भारतीय दूरचित्रवाणी मनोरंजन क्षेत्रात ज्या तीन भाषांतील आशयाने दबदबा राखला, त्यात मराठी ही एक होती. तेलुगू आणि बंगाली या अन्य दोन भाषा होत. प्रेक्षकसंख्येच्या दृष्टीने भोजपुरी (३८ टक्के), ओडिया (३६ टक्के) आणि आसामी (३१ टक्के) यांनी आघाडी घेतली होती. मराठीची २६ टक्के वाढ झाली आणि बंगाली १३ टक्क्यांनी वाढली, असे बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राने दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
एवढेच कशाला, टीव्ही १८ आणि ‘नेटवर्क १८’चे व्यवस्थापकीय संचालक राहुल जोशी यांनी दोन महिन्यांपूर्वी (ऑक्टोबर २०१८) त्यांच्याच सीएनबीसी या अर्थविषयक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, की प्रादेशिक भाषेतील वाहिन्यांच्या महसुलामुळे राष्ट्रीय वाहिनीवरील त्यांचे अवलंबित्व कमी झाले आहे. त्यांचा संचित तोटा भरून काढण्यामध्ये या भाषिक वाहिन्यांनी मोठा वाटा उचलला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता या भाषांना प्रादेशिक का म्हणावे, असा प्रश्न मनात येतो.
अन् म्हणूनच तर ‘बिग बॉस’, ‘कौन बनेगा करोडपती’ अशा लोकप्रिय मालिकांच्या भाषिक आवृत्त्या आपल्याला पाहायला मिळतात. ‘बिग बॉस’च्या तमिळ आवृत्तीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या आतापर्यंत मल्याळम्, कन्नड आणि मराठी आवृत्त्याही आलेल्या आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’च्या तमिळ, तेलुगू, बंगाली आणि मल्याळम् आवृत्त्या येऊन गेल्या आहेत.
‘व्हायाकॉम १८’तर्फे चालविल्या जाणाऱ्या ‘वूट’ या ऑनलाइन व्हिडिओ सेवेचे मार्केटिंग, पार्टनरशिप आणि लायसेन्सिंग विभागाचे प्रमुख आकाश बॅनर्जी यांनी एकदा सांगितले होते, की भारतीय भाषांतील आशयामुळे या सेवेच्या वापरामध्ये केवळ सहा महिन्यांत २०० टक्के वाढ झाली होती.
या सर्वांचा अर्थ स्पष्ट आहे. भारतीय भाषांतील आशय हाच लोकांपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग आहे, असे व्यवसायांना पटले आहे. बदलत्या हवेचा अंदाज सर्वांत आधी व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना येतो. त्या अर्थाने पाहायला गेले, तर इथून पुढचा येणारा काळ भारतीय भाषांचाच आहे, याची खात्री पटते.
जे व्यावसायिकांना कळते आहे, ते आपल्याला वळते आहे का, हा आपल्यापुढचा खरा प्रश्न आहे. भविष्यकाळ भारतीय भाषांचा आहे. त्यासाठी आपण सज्ज राहणे ही ‘भविष्यकाळा’ची गरज आहे.