Ad will apear here
Next
गोष्ट एका ‘ञ’सलेल्या अक्षराची!


मराठीला आधुनिकीकरणाचा सोस चढला आणि या प्रक्रियेत कधीतरी ‘ञ’ गळून पडला. ‘च’ वर्गातील व्यंजनांसाठी अनुनासिक वापरायचे, तर ‘ञ’ हे अक्षर वापरले जाते. अर्थात ही अशी सुबक रचना मूळ संस्कृतची आणि काही प्रमाणात तमिळचीही. सध्याच्या घडीला मात्र मराठीत वा हिंदीत हे अनुनासिक अक्षर न वापरता सर्रास अनुस्वार दिला जातो. सोशल मीडियावरील लेखनात ‘ञ’ वापरला जातो; मात्र तो ‘त्र’ या अक्षराऐवजी...  काय आहे नेमकी या अक्षराची गोष्ट...?
............
अलीकडेच घडलेली गोष्ट. एका प्रख्यात प्रकाशन संस्थेत आगामी दिवाळी अंकासाठी प्रसिद्धीपत्रक तयार करण्याचे काम चालू होते. त्यातील पहिल्याच पानावर पत्रक हा शब्द होता. अन् हा पत्रक शब्द ‘पञक’ असा लिहिला होता. ही गफलत मी त्या ऑपरेटरच्या लक्षात आणून दिली आणि ते अक्षर ‘त्र’ असे करून घेण्यास सांगितले.

‘पण त्र असाच असतो ना?’ त्याने एक भाबडा प्रश्न केला. त्यावर मी त्याला ‘नाही’ असे सांगितले आणि प्रत्यक्ष ‘त्+र’ करायला लावले. संगणकाच्या पडद्यावर जिवंत ‘त्र’ उमटलेला पाहून तोही हरखला. मला यात काहीही आश्चर्य वाटले नाही. एका अडगळीत टाकलेल्या आणि म्हणून स्वतःची ओळख हरवून बसलेल्या अक्षराच्या चैतन्याला तो बळी पडला होता. परंतु अशा प्रकारे ञ आणि त्र मध्ये गल्लत करणारा तो एकटा थोडाच होता? एक संपूर्ण पिढी या दोन अक्षरांमध्ये फरक न करता वाढली आहे, वाढत आहे. व्हॉट्सअॅपसारख्या अगंभीर व्यासपीठांवर तर या गफलतीने नुसता उच्छाद मांडला आहे. त्यामुळे कुत्रे ‘कुञे’ होतायत आणि कार्यकर्ते ‘कार्यकञे’ होताहेत.

वास्तविक, देवनागरी लिपीची खासियत ही, की प्रत्येक व्यंजनांचा एक वर्ग आणि त्या प्रत्येक वर्गाचे एक अनुनासिक अक्षर. देवनागरीच कशाला, बहुतेक सर्व भारतीय भाषांचे हे एक वैभवच होय. बंगाली, तमिळ आणि मल्याळम यांसारख्या भाषांनी या वैभवाचा दागिना जपून ठेवला आहे. परंतु मराठीला आधुनिकीकरणाचा सोस चढला आणि या प्रक्रियेत कधीतरी हा ‘ञ’ गळून पडला. मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ‘ङ’ आणि ‘ञ’ या वर्णांचा उच्चार शुद्ध अनुनासिक आहे. ‘क’ वर्गातील व्यंजनासाठी ‘ङ,’ ‘ट’ वर्गासाठी ‘ण’ आणि ‘त’ वर्गासाठी ‘न’ ही अनुसासिके आहेत, तसे ‘च’ वर्गासाठी ‘ञ’ हे अनुनासिक होय. ‘च’ वर्गातील व्यंजनांसाठी अनुनासिक वापरायचे, तर हे अक्षर वापरले जाते. उदा. - चञ्चल, वाञ्छा, रञ्जन इत्यादी. अर्थात ही अशी सुबक रचना मूळ संस्कृतची (आणि काही प्रमाणात तमिळचीही). सध्याच्या घडीला मात्र मराठीत वा हिंदीत हे अनुनासिक अक्षर न वापरता सर्रास अनुस्वार दिला जातो.

अन् येथेच या अक्षराचे पतन सुरू झाले. जुन्या काळी खिळ्यांच्या छापखान्यात ङ् आणि ञ् असे असे अर्धे अक्षर घडविणे जिकिरीचे ठरू लागले. त्यामुळे त्यांच्याऐवजी अनुस्वारावर भागविण्याची पद्धत रूढ झाली. त्यामुळे वेदान्त हा शब्द ‘वेदांत’ असा झाला आणि स्वरान्त शब्दाचा ‘स्वरांत’ झाला. वास्तविक या सर्व शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. परंतु संदर्भानुसार ते अर्थ समजून घेणे हे वाचकांवर सोपवण्यात आले. हळूहळू हे अक्षर वापरातून हरवले आणि नित्याच्या व्यवहारातून बाद झाल्यामुळे त्याचा उच्चारही गायब झाला. ङ् या अक्षराचीही तीच गत. तरीही लाजेकाजेस्तव का होईना, ‘वाङ्मय’सारख्या शब्दांत आजही त्या अनुनासिकाचे अस्तित्व टिकून आहे. वि. आ. बुवा यांच्या एका लेखात हा शब्द वापरून त्याच्यापुढे कंसात ‘याचा उच्चार ‘वांगंमय’ असा केला तरी चालेल’ अशी मल्लिनाथी केली आहे. यातून या अक्षराबाबतचे लोकांचे अज्ञानच त्यांना समोर आणायचे आहे.

परंतु सुदैवाने सगळेच काही गमावलेले नाही. उत्तरेत बंगालीने त्याला अद्याप जवळ बाळगले आहे. हिंदी पट्ट्यात काही शुद्धतावादी तो वापरतात. संस्कृतचा तर प्रश्नच नाही. दक्षिणेकडील तमिळ आणि मल्याळम यांसारख्या भाषांनी आपला ‘ञ’ जपून ठेवला आहे. तमिळचीही लेखनाची परंपरा संस्कृतसारखीच सुनियोजित आहे, फक्त तेथे व्यंजनांचा गजबजाट कमी आहे. त्यामुळे आजही तेथे पञ्ज (भिती), अञ्जल (टपाल), अञ्जनेयर (हनुमान) अशा शब्दांमध्ये हे अक्षर ठसठशीतपणे दिसून येते. शिवाय ञाबगम (आठवण) असे खास या अक्षरानेच सुरू होणारे शब्दही आहेतच. दुर्दैवाने आपल्या भाषांमध्ये काय लिहिलेय, हे आपल्यालाच माहीत नसते. गेल्या आठवड्यात तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचे निधन झाले, तेव्हा हा गोंधळ प्रकर्षाने जाणवला. कवी, लेखक, पटकथा लेखक व समीक्षक असलेल्या करुणानिधी यांना तमिळनाडूत ‘कलैञर’ असे म्हटले जाते. कला मर्मज्ञ किंवा कलेचा विद्वान असा त्याचा अर्थ. आपल्याकडे ज्या प्रमाणे विधिज्ञ म्हणजे कायदेतज्ज्ञ, तंत्रज्ञ म्हणजे तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, तसाच हा ‘कलैञर.’ अरिञर म्हणजे विद्वान, अशी त्या शब्दाची उत्पत्ती. तमिळमध्ये ज्ञ नसल्यामुळे त्यासाठी ञ कामी येतो. 

आता हा ‘कलैञर’ इंग्रजीत कसा आणायचा? तर तमिळनाडूतच विकसित झालेल्या लिप्यंतराच्या पद्धतीनुसार त्याचे स्पेलिंग Kalaignar असे करण्यात आले. (वास्तविक शुद्ध भाषाशास्त्रानुसार ते Kalaijnar असे व्हायला हवे.) आता या स्पेलिंगचे पुन्हा भारतीय लिपीत लिप्यंतरण करायचे झाले, तेव्हा ते ‘कलैग्नार’ असे करण्यात आले. म्हणजे आधी घरातून हाकललेल्या मुलाचे कुटुंबीयांनी नावही टाकून द्यावे, असा हा प्रकार होता.

परंतु ‘ञ’ ही कसला चिकट. रावणाच्या दरबारात अंगदाने रोवलेल्या पायाप्रमाणे तो भाषेत उभा राहिला आहे, अगदी घट्टपणे! मराठी व्यक्तींसाठी तर अत्यंत जिव्हाळ्याचा ठराव्या अशा चिवटपणे. मराठीला अस्मिता देणाऱ्या ज्ञानदेवांच्या नावामध्येच तो लपून राहिला आहे. कारण वर म्हटल्याप्रमाणे भाषाशास्त्राच्या दृष्टीने ‘ज्ञ’ हे अक्षर ‘ज्+ञ’ असेच बनलेले आहे. सुदैवाने संगणकासाठी सर्व भारतीय लिप्यांचे की-बोर्ड बनविणाऱ्या ‘सी-डॅक’च्या तज्ज्ञांनीही (परत ज्ञ!) ही गोष्ट लक्षात घेतली. त्यामुळे इन्स्क्रिप्ट कळफलकात (की-बोर्ड) ‘ज्ञ’ लिहायचे झाले, तर हीच जोडी वापरावी लागते.

अन् या उप्परही कोणी ‘ञ’ला घालवून देण्याची इच्छा करीत असेल, तर त्याला सांगावे लागेल, की जोपर्यंत या जगाच्या पाठीवर मल्याळम भाषा आहे, तोपर्यंत ‘ञ’ या भूतलावर राहील. याचे कारण असे, की मल्याळम भाषेत पहिले सर्वनामच ‘ञ’ या अक्षरापासून सुरू होते. मल्याळममध्ये ‘ञान्’ म्हणजे मी. आपण दररोज म्हणत असलेल्या ‘भारत माझा देश आहे’ या प्रतिज्ञेतील पुढचे वाक्य मल्याळममध्ये असे आहे ‘ञान् एन्टे नाडिने स्नेहिक्कुन्नु’ (माझ्या देशावर माझे प्रेम आहे).
तेव्हा ‘ङ’ असो वा ‘ञ’ असो, एका मोठ्या कालप्रवाहात नांदलेल्या संस्कृतीचे हे संचित आहे. केवळ आपल्या आळसापायी आपण ते टाकून देता कामा नये. वाडवडिलांच्या संपत्तीत भर घालता येत नसेल, तर तिची नासधूस तरी करू नये. ‘ञ’पासून एवढे ज्ञान घेतले तरी पुरे!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZSEBR
 सुंदर माहिती
 खूपच सुंदर आर्टिकल आहे... अशा आर्टिकल ची गरज आहे... bytes of india👍👌👌
 To simplify the script of a script of a language , is a good idea . It males
It makes it easy to write / read to read /learn it . But this is a process
which takes time , involving experts . Chinese started doing this -- more
than a hundred years ago .
 अप्रतिम, वाचनीय आणि संग्राह्य लेख
Similar Posts
वाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का! सन २००१च्या जनगणनेच्या तुलनेत २०११च्या जनगणनेमध्ये मराठी ही मातृभाषा असलेल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणजेच मराठी ही माझी मातृभाषा आहे, हे सांगणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मराठी संपली, मराठी मृतप्राय झाली, अशी हाकाटी घालणाऱ्यांना ही चपराक आहे. भाषेच्या दृष्टीने विचार करण्यासारख्या आणखीही अनेक गोष्टी या अहवालात आहेत
हुळहुळलेल्या अस्मितेचा मायावी पुळका केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या शिफारशीनंतर हिंदी भाषेच्या विरोधातील सूर उमटला आणि जणू सगळ्याच दाक्षिणात्यांच्या भावना उफाळून आल्याचे भासवले गेले. ‘तमिळ लोक म्हणजे हिंदीविरोधी, त्यांची भाषिक अस्मिता हाच आदर्श आणि मराठी लोकांनी त्यांचा कित्ता गिरवावा,’
देवा तूचि ‘गाणे’शु दाक्षिणात्य गाण्यांनी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवर वरचष्मा गाजवला आहे. बदलत्या काळात हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या दाक्षिणात्य भागांतील गणेशोत्सवही पुणे व मुंबईच्या बरोबरीचे ठरत आहेत. तेलुगू व तमीळ चित्रपटांमध्ये गणपतीच्या गाण्यांची संख्या वाढत चाललीय. या सर्व गाण्यांमध्ये ‘बाप्पा मोरया’चा मराठी जयघोष ऐकू येतो
मित्रात् न इच्छेत्‌ पराजयम्‌...! नेपाळमधील राज्यघटना दिवसाच्या निमित्ताने नेपाळ सरकारच्या मालकीची वाहिनी असलेल्या ‘एनटीव्ही’ने अलीकडेच संस्कृत भाषेतील बातमीपत्राचे प्रक्षेपण करण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्समध्ये संस्कृत हेरिटेज वेबसाइट तयार करण्यात आली आहे. विविध देशांनी संस्कृतच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा आणि भारताने त्याच्या मागोमाग जावे, हे काही बरे नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language