Ad will apear here
Next
संस्कृत शिक्षणाची चळवळ मोठी व्हायला हवी
उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांचे प्रतिपादन
उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांचा सत्कार करताना श्रीकांत ढालकर. डावीकडून डॉ. कल्पना आठल्ये, हिरालाल शर्मा. (छायाचित्र : माउली फोटो, रत्नागिरी)

रत्नागिरी :
‘संस्कृत शिक्षणाची चळवळ आणखी कशी मोठी होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. ही चळवळ माध्यमिक शाळांपर्यंत पोहोचवण्याकरिता मी नक्कीच मदत करीन. परंतु लहान मुलांना जास्तीत जास्त सहभागी करून घेतले पाहिजे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी केले. 

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थान व रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राच्या या वर्षीच्या अभ्यासक्रमांचे उद्घाटन नुकतेच त्यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर केंद्रप्रमुख तथा संस्कृत विभागप्रमुख आणि उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये आणि संस्कृत शिक्षक हिरालाल शर्मा उपस्थित होते. 

गावंड म्हणाले, ‘शिक्षणाला वय नसते. भगवद्गीतेने आपले सारे जीवन व्यापून टाकले आहे. पूर्वसुरींनी गीता सोपी करून सांगितली आहे. जगभर संस्कृतची वाहवा होते. त्यामुळे संस्कृत आपण सर्वांनीही शिकले पाहिजे. संस्कृत ही अनेक भाषांचे मूळ आहे. संस्कृतमुळे भाषा नक्कीच सुधारू शकते.’ 

योगशिक्षक श्रीकांत ढालकर यांनी गावंड यांचा सत्कार केला. तत्पूर्वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी ऋचा सादर केल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी शुभेच्छा दिल्या. 

केंद्राच्या प्रमुख डॉ. आठल्ये म्हणाल्या, ‘यंदा या वर्गाचे चौथे वर्ष आहे. त्यात विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे. प्रत्येक भारतीयाने संस्कृत शिकावे असे राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे उद्दिष्ट आहे. हा वर्ग ऑगस्ट २०१९ ते एप्रिल २०२० या काळात चालू राहील. संस्कृत भाषा प्रमाणपत्रीय पाठ्यक्रम व संस्कृत भाषा दक्षता पाठ्यक्रम असे दोन अभ्यासक्रम यात आहेत. संस्कृत शिकण्याची इच्छा असलेले विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, डॉक्टर अशी कोणीही जिज्ञासू व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकते.’

संस्कृतचे ज्ञान सोप्या पद्धतीने शिकवता येण्याच्या दृष्टीने याचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत देण्यात येतात. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळते. या महिन्याच्या अखेरीपर्यंत सहभागी होण्याकरिता डॉ. कल्पना आठल्ये किंवा हिरालाल शर्मा यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

संस्कृत वर्गाच्या विद्यार्थिनी अक्षया भागवत, विशाखा भिडे, दीक्षा पंडित, महादेवी आरबोळे, गुरुराज कुलकर्णी यांनी मनोगतामधून संस्कृतबद्दलचे प्रेम व्यक्त केले. ही भाषा शिकल्याने व्यक्तिगत आयुष्यात होणारे बदलही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आर्या देवळेकर हिने केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZUTCD
Similar Posts
राष्ट्रीय संस्कृत संस्थानतर्फे नऊ ऑगस्टला रत्नागिरीत शिक्षण केंद्राचे उद्घाटन रत्नागिरी : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थान आणि रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गेली चार वर्षे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र सुरू आहे. यंदाच्या वर्गाचे उद्घाटन नऊ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे. जिल्हा परिषदेचे
संस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा रत्नागिरी : ‘संस्कृतमध्ये सर्व शास्त्रांवर ग्रंथ आहेत. संस्कृतमधील तत्त्वज्ञान आणि विचार उदार आणि विश्वबंधुत्वाचे आहेत. भारताचा तिरंगा ध्वज भारतीयांना एकत्र आणतो, त्याप्रमाणे संस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संस्कृत शिकले पाहिजे,’ असे प्रतिपादन गोदूताई जांभेकर विद्यालयातील
विविध कार्यक्रमांनी रंगले संस्कृत स्नेहसंमेलन रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थानातर्फे चालवल्या जाणाऱ्या अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्रातर्फे रविवारी (१७ फेब्रुवारी) संस्कृत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या या संमेलनात गीत, नृत्य, समूहगायन, कथाकथन,
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language