रत्नागिरी : ‘देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूरशास्त्री म्हणजे राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम होते. शेती आणि संरक्षण या देशाच्या अत्यावश्यक बाबींकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिल्यामुळे या दोन्ही बाबतींमध्ये देश नेहमीच आघाडीवर राहिला,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी रत्नागिरीत केले.
कीर्तनसंध्या परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात ‘योद्धा भारत’ या आख्यान विषयावर तिसऱ्या दिवशी (१० जानेवारी २०२०) त्यांनी लालबहादूरशास्त्री यांची कारकीर्द आणि १९६५ साली पाकिस्तानबरोबर झालेल्या पहिल्या युद्धाचा इतिहास कथन केला.
पूर्वरंगात बुवांनी ‘राम का गुनगान करिये’ हे हिंदी भजन निरूपणासाठी घेतले. राज्याभिषेक होण्याच्या पूर्वसंध्येला कैकयीने दशरथ राजाकडे भरताला राज्याभिषेक करण्याची आणि रामाला १४ वर्षे वनवासाला पाठवण्याची मागणी केल्यानंतरचा प्रसंग बुवांनी ऐकविला. रामाने त्या प्रसंगात आईची आणि वडिलांची दोघांचीही समजूत काढली. भद्रता आणि सभ्यतेचे दर्शन रामाच्या वर्तणुकीतून दिसून येते. दशरथाची तेव्हाची मानसिकता स्पष्ट करण्यासाठी बुवांनी किर्लोस्करांच्या ‘रामराज्य वियोग’ या नाटकातील ‘सोडूनी मज राम राय जाय जरी वनी’ हे नाट्यगीत गायले.
एकवचनी आणि निःस्वार्थी रामाला मर्यादापुरुषोत्तम म्हटले जाते. तेच गुण लालबहादूरशास्त्री यांच्यामध्ये होते हे पटवून देणारी त्यांच्या लहानपणापासून ते पंतप्रधान होईपर्यंतची विविध उदाहरणे बुवांनी सांगितली. वडिलांचे निधन झाल्यानंतर लालबहादूरना मुलांच्या शिकवण्या घेऊन शिक्षण घ्यावे लागले. या काळात घरभाडे भरण्याएवढेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. आपल्या मुलांना शिकवण्यासाठी एक धनवान व्यक्ती महिना ५० पैसे द्यायला तयार होती; पण त्यांनी घरभाड्याएवढे केवळ पंचवीस पैसेच त्यांच्याकडून घेतले. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे वेतन साठ रुपये होते. काही गरजेसाठी त्यांना पैशांची गरज लागली, तेव्हा त्यांनी पत्नी ललितादेवी यांच्याकडे पैसे मागितले. पत्नीने घरखर्चातून वाचवलेले पैसे लालबहादूर यांना दिले. एवढे पैसे घरातून बाजूला काढून ठेवता येतात, याचा अर्थ आपला पगार पाच रुपये जास्त आहे, असे समजून त्यांनी सरकारला आपला पगार रुपयांवरून ५५ रुपये कमी करायला लावला निःस्वार्थीपणा आणि साधेपणा हेच त्यांचे वैशिष्ट्य होते. लग्नाच्या वेळी त्या काळी हुंड्याची प्रथा पाळावी लागणार होती. त्यामुळे त्यांनी तेव्हा हुंड्यात चरखा आणि कापूस मागितला. पुढच्या आयुष्यातही आपले कुटुंब पूर्णपणे साधेपणाने कसे राहील, याकडे त्यांचा कटाक्ष होता. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांची मुले सार्वजनिक बसमधूनच प्रवास करत असत. असे अनेक प्रसंग बुवांनी उलगडले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच लालबहादूर शास्त्री महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात ओढले गेले. त्यासाठी त्यांना त्यांचे शिक्षक निष्कामेश्वर मिश्रा यांची मोठी मदत झाली. देशप्रेमाचे धडे गुरुजींनी लालबहादूरशास्त्रींना दिले. पुढच्या काळात ते तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विश्वासू सहकारी बनले. जमीन सुधारणेसारखा महत्त्वाचा कायदा आणण्यापूर्वी देशभरातील शेतकरी कुळांना न्याय देणारा पूर्णपणे निष्पक्ष अहवाल शास्त्रीजींनी दिला. पुढच्या काळात त्यांनी दिलेला ‘जय किसान’ हा नारा त्यांनी आधीच अमलात आणला होता.
देशावर १९६२ साली झालेल्या चीनच्या आक्रमणानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण देशाचे जनजीवन ढवळून निघेल अशी भीती वाटण्यासारखी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. हजरतबाल हे इस्लामधर्मीयांचे श्रद्धास्थान श्रीनगरमध्ये आहे. महंमद पैगंबर यांचा पवित्र केस कडेकोट बंदोबस्तातही २६ डिसेंबर १९६३ रोजी चोरीला गेल्याची बातमी आली. त्यानंतर आठच दिवसांत, चार जानेवारी १९६४ रोजी तो केस पुन्हा मिळाल्याची बातमीही आली. तो त्याच ठिकाणी ठेवण्यात आला होता; मात्र अनेक मुस्लिम संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. तेथे कोणता तरी गोंधळ निर्माण झालेला असू शकतो, अशी शंका त्या संघटनांनी घेतली. त्यामुळे वातावरण चिघळले. शास्त्रीजींनी ती परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. मुस्लिम मौलवींच्या पथकासह शास्त्रीजींनी हजरत बाल दर्ग्याला भेट दिली. मौलवींच्या साक्षीनंतर संपूर्ण देशातील अशांत वातावरण निवळले. त्यांच्या अशा प्रकारच्या अभूतपूर्व कार्यामुळे त्यांना नेहरूंचा उत्तराधिकारी असे म्हटले जाऊ लागले, असे बुवांनी सांगितले.
२७ मे १९६४ रोजी पंडित नेहरूंचे निधन झाल्यानंतर शास्त्रीजींची दोन जून १९६४ रोजी पंतप्रधानपदी निवड झाली. त्या दरम्यान देशात अभूतपूर्व अन्नधान्य टंचाई निर्माण झाली. तेव्हा परदेशातून धान्य मागवायच्याऐवजी देशातच धान्याची व्यवस्था कशी करता येईल, याचा विचार करून शास्त्रीजींनी देशवासीयांना दर सोमवारी उपवास करून धान्य वाचविण्याचे आवाहन केले. शास्त्रीजींच्या शब्दाला तेव्हा एवढे महत्त्व होते, की नागरिकांनी दर सोमवारी काहीही न खाता उपास केला आणि त्यातून संकलित झालेले धान्य पुढे तीन वर्षांच्या टंचाईच्या काळात देशाला उपयोगी ठरले. या काळात एकदाही भारताला अन्नधान्य आयात करावे लागले नाही. शास्त्रीजींच्या शब्दाखातर सुरू केलेला हा उपवास अजूनही सुरू ठेवलेले काही वयोवृद्ध नागरिक असल्याचे आफळेबुवांनी सांगितले.
‘शेतीबरोबरच शास्त्रीजींनी देशाच्या संरक्षणाकडे लक्ष दिले. संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड केली. पाकिस्तानने अमेरिकेकडून तेव्हाचा प्रगत असा पॅटन रणगाडा खरेदी केला होता; मात्र शास्त्रीजींनी असे रणगाडे घेण्याऐवजी शस्त्रास्त्रे तयार करण्याचे तंत्रज्ञान, प्रगत यंत्रे देशात तयार व्हावीत, या दृष्टीने यशवंतराव चव्हाणांना अमेरिका, रशियात पाठविले होते. सैन्याला अधिक अधिकार दिले. देशाची आणि बाहेरची सुरक्षा व्यवस्थित ठेवण्यासाठी जे लागेल ते देण्याची भूमिका स्वातंत्र्यानंतर भारतात प्रथमच अमलात आली होती. आवश्यक तेथे रस्ते, वैमानिकांचे प्रशिक्षण, हँडग्रेनेड तयार करणे, लष्कराच्या रेल्वेलाइन तयार करणे, आगीतून धावण्याचा आणि काम करण्याचा सैनिकांना सराव घडविणे अशा कामांवर संरक्षणाच्या बाबतीत भारताने भर दिला. भारतीय सैन्यदल प्रगत होत असताना जानेवारी १९६५मध्ये पाकिस्तानने कच्छचे रण भागात भारतावर पहिले आक्रमण केले. भारताकडे तेव्हा असलेल्या तुलनेने कमी क्षमतेच्या शस्त्रास्त्रांच्या आधारेही ते आक्रमण परतवून लावण्यात भारताला यश आले. तेव्हा भारताचे ९३, तर पाकिस्तानचे १५० अधिकारी मारले गेले,’ असा इतिहास आफळेबुवांनी उलगडला.
‘अन्नधान्याच्या दृष्टीने भारत स्वयंपूर्ण व्हावा आणि संरक्षणाच्या बाबतीतही देशाची ताकद वाढावी यासाठी शास्त्रीजींनी केलेले प्रयत्न हेच त्यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या पंतप्रधानपदाचे फलित म्हणता येईल,’ असे आफळेबुवांनी सांगितले.
कीर्तनाच्या मध्यंतरात आर्या संदीप मुळ्ये, हर्षवर्धन विद्याधर ताम्हनकर आणि शुभानन उमेश आंबर्डेकर या तीन विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनामध्ये विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्याबद्दल गौरविण्यात आले.
आफळेबुवांना हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), मंगेश चव्हाण (पखवाज/ढोलकी), राजन किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन), हरेश केळकर (तालवाद्य) आणि अभिजित भट (गायन) यांनी साथसंगत केली.