Ad will apear here
Next
साहित्यातून चित्रपटांकडे...
साहित्यातून चित्रपटांकडेभारतीय लोकांच्या जीवनात ‘चित्रपट’ हा कलाप्रकार लोकरंजनाच्या दृष्टीने चमत्कारच ठरला आहे. महाराष्ट्राच्या किंवा मराठी माणसाच्या मनोरंजनाचा विचार करता सादरीकरणाचे निरनिराळे प्रकार ध्यानात घ्यावे लागतात. त्यातील अनेक कलाप्रकार आजही सादर होतात. यातही साहित्य आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी एकमेकांशी घट्ट स्वरूपात निगडित आहेत. अशा रितीने मराठी साहित्य आणि चित्रपटाचा सहसंबंध अगदी मूकपटापासून ते अलीकडच्या चित्रपटापर्यंत अधोरेखित करता येईल. पुस्तकरूपी साहित्य आणि भारतीय चित्रपट यांच्या असलेल्या संबंधाचा आढावा घेणाऱ्या लेखाचा हा पहिला भाग...
.....................

माणसाच्या व्यावहारिक जीवनात भाषेला अत्यतं महत्त्वाचे स्थान आहे. कोणतीही भाषा ही केवळ शब्द आणि त्यातून ध्वनित होणारा अर्थ अशा मर्यादित परिघात कार्य करत नाही. खरे तर भाषा ही संबंधित समाज, त्याच्या चालीरीती, रूढी-परंपरा, त्यांचे संकेत, भोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक पर्यावरण या घटकांशी संबंधित व्यक्तीच्या भावना अभिव्यक्त करत असते. ही प्रक्रिया इतक्या सहजतेने आणि सरावाने होते, की तिचा आवर्जून उलगडा करायचा झाल्यास तो नीटपणे करता येईलच असे नाही. मानवाला भाषेचा हा सर्व व्यवहार गुंतागुंतीचा वाटणारा तरीही सरावाचा आहे. किंबहुना यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा प्राणी म्हणूनही गणला जातो.
 
‘भाषेचे नेमके कार्य काय?’ हा अगदी विद्यार्थीदशेपासून वेगवगेळ्या निमित्ताने कानावर येणारा प्रश्न. याचे उत्तरही नेहमीप्रमाणेच ‘भाषा हे संप्रेषणाचे माध्यम आहे,’ असे दिले जाते. सोप्या भाषेत मांडायचे झाल्यास, भाषा म्हणजे आपल्या मनातील भावना इतरापंर्यंत पोहोचवण्याचे माध्यम. असे जरी असले, तरी एवढ्यापुरतेच भाषेचे कार्य मर्यादित नाही. व्यावहारिक गरजेच्या पलीकडे अफाट असा भाषा व्यवहार निर्माण होतो यातच भाषेचे सामर्थ्य आधोरेखित होते.
 
‘साहित्य’ या संज्ञेचा विचार करताना भाषेचे व्यापकत्व अधिक ठळकपणे जाणवते. आपण मराठी भाषेतील लिखित मजकुरासाठी साहित्य, वाङ्मय अशा शब्दांचे उपयोजन करून ते वापरतो. वाङ्मय म्हणजे वाणीने युक्त असे सर्व काही. थोडक्यात जे बोलले जाते ते वाङ्मय होय, असे ढोबळ मानाने म्हणता येईल; मात्र भाषेत वाणीने उच्चारलेले प्रत्यके शब्दरूप ‘साहित्य’ म्हणजे ‘ललित साहित्य’ असतेच असे नाही. मराठी विश्वकोशात ‘साहित्य’ या संज्ञेविषयी - ‘मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूलमानाने ‘साहित्य’ असे संबोधले जाते,’ अशी माडंणी करण्यात आली आहे. साहित्य व्यवहाराच्या सोयीसाठी स्थळ, काळ, भाषेप्रमाणेच समूहदर्शक विशेषणांना योजून साहित्य ही संज्ञा वापरली जाते. उदा. अमेरिकन साहित्य, मध्ययुगीन साहित्य, तेलुगू साहित्य, स्त्रीवादी, साहित्य दलित साहित्य इत्यादी.

सर्वसाधारणपणे वाङ्मय अथवा साहित्य संज्ञेमध्ये अपेक्षित असलेल्या साहित्याला ‘ललित’ असे विशेषण जोडण्यात येते. ललित या शब्दाचा अर्थ लालित्यपूर्ण, कलात्मक, सौंदर्ययुक्त असा सांगता येतो. येथे आधुनिक काळाचा विचार करत असल्याने वाङ्मयाचे ललित आणि ललितेतर अशा प्रकारांमधील वर्गीकरण लक्षात
घेतले आहे.

ललित साहित्य हे लेखकाच्या प्रतिभेमुळे निर्माण झालेले कल्पित जग असते. वास्तवातील अनेक घटना, प्रसंग, व्यक्ती हा या निर्मितीचा मुख्य आधार असला तरीदेखील एकूण अभिव्यक्ती ही लेखकाची कल्पक निर्मिती असते. ललित साहित्याचे कविता, कथा, कादंबरी, नाटक हे विविध प्रकार त्यातील अभिव्यक्तीनुसार ठरवण्यात आले आहेत. अर्थात मराठीतील हे साहित्य प्रकार संस्कृत आणि नंतरच्या काळातील इंग्रजी भाषेतील वाङ्मयाच्या प्रभावातून निर्माण झाले आहेत हे ध्यानात घ्यावे लागेल. साहित्यातील या ठळक प्रकारांशिवाय ललित गद्य, नाट्यछटा, निबंध, लघुनिबंधांचाही ललित साहित्यात समावेश करता येतो.
ललितेतर वाङ्मयाचे मुख्य उद्दिष्ट हे वाचकाला माहिती व ज्ञान देणे हे असते. यामुळेच येथे केवळ तथ्यालाच महत्त्व असते. लेखकाचा कल्पनाविलास येथे अपेक्षित नसतो. ‘शब्द’ हे ललितेतर साहित्याचे ज्ञानप्रसाराचे माध्यम असतात. वैचारिक, संशोधनपर, विविध विद्याशाखांमधील अभ्याससाहित्य इत्यादी लिखाणाचा समावेश ललितेतर वाङ्मयात केला जातो. ज्ञानप्रसारासाठी निर्माण झालेले हे साहित्य सुस्पष्ट आणि नेमक्या पद्धतीने मांडलेले असते.
 
ललित आणि ललितेतर या दोन्हीही प्रकारच्या साहित्याची वैशिष्ट्ये असलेले काही लेखन प्रकार मराठी साहित्यात आहेत. या प्रकारांची नोंद घेणे येथे अगत्याचे ठरेल. चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, इत्यादी लेखनाचा या दृष्टीने विचार करता येतो. तथ्याचा किंवा वास्तवाचा आधार असूनही कल्पकतने मांडणी असलेले हे साहित्य ज्ञानाबरोबरच रचनाकौशल्यामुळे वाचकाला ललित साहित्याचेही समाधान देणारे ठरते. निबंधविषयास अनुसरून ललित वाङ्मयापुरते वाचकाला विवेचनाची मर्यादा येथे आखून घेतली आहे. सहित्याचा विविध प्रकारांतील अभिव्यक्ती वाचनाचा आणि वैयक्तिक पातळीवर निराळ्या समाधानाचा अनुभव देत असते. कविता, कथा, नाटक, कादंबरी, ललित गद्य यासारख्या साहित्य प्रकारातून अभिव्यक्त होणाऱ्या विश्वाचा मूलभूत घटक म्हणजे मानवी जीवन होय. ‘शब्द’ या माध्यमाचा आधार घेऊन कवी, लेखक मानवी जीवनातील भावभावना, ताणतणाव, संघर्ष, असहायता वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक पातळ्यांवरील माणसाचे जगणे कल्पकतेने मांडत असतात. वाचकही माहिती असलेल्या भावनांच्या वाचनातुन समाधानाची अनुभूती प्राप्त करत असतो. अर्थात यामुळेच साहित्य ही व्यक्तिनिष्ठ कला असूनही त्यातील मानवी जीवन या वैश्विक घटकामुळे स्थळ, काळ, प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून जाते. एका बाजूला लेखकाच्या निर्मितीचा विचार करता ती क्वचित स्वान्तसुखाय भावनेतूनही केली जाऊ शकते; मात्र जेव्हा एखादा वाचक कलाकृती वाचतो तेव्हा ती लेखकापुरती मर्यादित न राहता सामाजिक रूप धारण करते. या संदर्भात दिगंबर पाध्येंचे मत येथे विचारात घेणे उद्बोधक ठरेल. ‘कलावस्तूचा निर्माता कलावंत, कलावस्तूचा आस्वादक रसिक, साहित्यकृतीतून व्यक्त होणारा आशय आणि ज्या भाषेद्वारे कलावस्तू निर्माण होते ती भाषा हे सर्व विशिष्ट समाजाचेच भाग असतात.’ अर्थात लेखक लिहितो, वाचक वाचतो या प्रक्रिया विशिष्ट समाजाचाच भाग असतात. हे येथे समजून घ्यावे लागते. यामुळेच विशिष्ट भाषेत विशिष्ट समाजात निर्माण होणारी कलाकृती ही त्या समाजाचे भाषिक प्रतिबिंबच असते असे विधान करता येते.
 
साहित्य व्यवहारात लेखक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. तो त्याच्या ज्ञानाच्या आणि जीवनानुभावाच्या आधारे सगळ्यांना ज्ञात असलेले मानवी जीवन रचना कौशल्याने साहित्यकृतीत शब्दबद्ध करत असतो. व्यक्तिपरत्वे अभिव्यक्ती बदलते. त्यामुळेच साहित्यात वेगवेगळ्या लेखकांनी केलेले जीवनचित्रण भिन्न स्वरूपाचे असते. किंबहुना यामुळेच ते वाचनीय ठरते.

‘शब्द’ हे लेखकाचे मुख्य साधन आणि त्याच्या अभिव्यक्तीचे माध्यमही असते. शब्द या घटकाला साहित्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. लेखक-कवी आपल्या कल्पनेच्या जोरावर जे निराळे विश्व वाचकांसमोर उभे करतात त्याचा मुख्य आधार ‘शब्द’ असतात. मराठी भाषेच्या संदर्भात शब्दांची संपन्नता विशेष लक्षात घ्यावी लागेल. निरनिराळ्या भौगोलिक वैशिष्ट्यांबरोबरच भाषिक विविधता हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य साहित्यातही प्रतिबिंबीत होते. तरीदेखील मराठी साहित्यव्यवहार हा दीर्घकाळ प्रमाण भाषेतच होत राहिला आहे हे येथे लक्षात घ्यावे लागेल.
 
स्वातंत्र्योत्तर काळात दलित साहित्याच्या निर्मितीने प्रमाणभाषेत साहित्यनिर्मितीला छेद दिला गेला असल्याचे आपण पाहिले आहे. अलीकडच्या काळात दैनंदिन बोलण्यातील शब्द साहित्यकृतीत मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे शब्दच साहित्याचे माध्यम आहेत आणि साहित्यातील हे शब्द निरनिराळ्या सकेंतांनी युक्त आहेत. साहित्यामध्ये लेखक व्यापक कालपटावर निर्मिती करत असतो. विशेषत: गद्यलेखन प्रकारात हे प्रामुख्याने दिसून यते. कादंबरीसारख्या वाङ्मयप्रकारात दीर्घ कालपट निर्माण करून लेखक कुशलतेने निर्मिती करत असतो. खरे तर काळाची कोणतीही मर्यादा साहित्यिकाला असत नाही. अभिव्यक्तीच्या गरजेनुसार हा कालपट ठरवला जातो. साहित्यकृतीतील या काळावर लेखकाचे पूणर्पणे नियत्रंण असते. स्वत:च्या कल्पनाशक्तीच्या आधारे लेखक अनेकपदरी बहुआयामी, व्यामिश्र, तरल, सूक्ष्म अशा विविध स्वरूपाचे जीवनानुभव चित्रित करत असतो. लेखक-कवी आपापल्या निर्मितीमधून कल्पनेवर आधारित वेगळ्याच विश्वाची निर्मिती करतात. निरनिराळ्या वाङ्मयप्रकारांच्या माध्यमातून वाचकांना सहानुभवाचा आनंद प्राप्त होतो. साहित्याची भाषा, रचनावैशिष्ट्ये, त्याचे सामाजिक असणे हे सर्व घटक वाचकांच्या अभिरुचीवर परिणाम करणारे ठरतात. थोडक्यात कोणत्याही सुसंस्कृत समाजात साहित्याला विशेष स्थान असते.


चित्रपट
 
भारतीय लोकांच्या जीवनात ‘चित्रपट’ हा कलाप्रकार लोकरंजनाच्या दृष्टीने चमत्कारच ठरला आहे. महाराष्ट्राच्या किंवा मराठी माणसाच्या मनोरंजनाचा विचार करता निरनिराळी विधीनाट्ये (जागरण, गोंधळ, दंडार, भारूड), नाटक, लोकनाट्य असे सादरीकरणाचे निरनिराळे प्रकार ध्यानात घ्यावे लागतात. त्यातील अनेक कलाप्रकार आजही सादर होतात. एकोणिसावे शतक हे खऱ्या अर्थाने मन्वंतरकारी ठरले. या शतकात साहित्य, कला, यंत्र अशा सर्वच क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आले. कलाक्षेत्रही याला अपवाद नाही. मराठी रंगभूमी आणि तमाशा हे शुद्ध मनोरंजनाचे कलाप्रकार प्रत्यक्ष रसिकांसमोर सादर केले जात. काम करणारी नट मंडळी प्रेक्षकांना जवळून पाहता येत असत. चांगल्या-वाईट कामाची दादही कलावंतांना लगेचच मिळे. दीर्घ काळ चाललेल्या या कलात्मक संवादामध्ये चित्रपटाच्या आगमनामुळे मूलभूत स्वरूपाचे बदल झाले. यंत्रावर आधारित ही कला अल्पावधीत लोकप्रिय बनली.


भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सन १८८९मध्ये मुंबई येथील इंजिनीअर मदनराव पितळे यांनी केलेला प्रयोग सर्वप्रथम प्रयोग मानला जातो. श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग स्लाइड्सच्या माध्यमातून पितळे यांनी दाखवले. या सादरीकरणातून चलचित्रांचा भास निर्माण होत असे. पुढे मॅजिक लँटर्नचे (शांबरीक खरोलिका) अनेक प्रयोग त्यांनी केले. साधारणपणे सन १९८९ ते १९१८पर्यंत ‘शांबरिक खरोलिका’ चे प्रयोग चालू राहिले. सन १९९३मध्ये प्रत्यक्ष पडद्यावर अवतरलेला सिनेमा पाहताना या खेळांची उत्सुकताही ओसरू लागली.
 
युरोपातील ल्युमिए बंधूंनी निर्माण केलेले चित्रपट युरोपातील निरनिराळ्या देशांत दाखवण्यात आले. भारतातही याचा खेळ दिनांक सात जुलै १८९६ रोजी मुंबईतील वॅटसन्स हॉटेलमध्ये दाखवण्यात आला. याची जाहिरात करताना टाइम्स ऑफ इंडियाने – ‘दी मार्व्हल ऑफ दी सेंच्युरी - दी वंडर ऑफ दी वर्ल्ड’ - अशी केली होती.
त्या काळात पडद्यावर चलचित्रे पाहणे हेच मोठे आश्चर्य होते. ल्युमिए बंधूंचे ‘बेबीज डिनर’, ‘रिजॉइसिंग इन दी मार्केट प्लेस ऑफ पॅरिस’, ‘दी स्ट्रीट डान्सर ऑफ लंडन’ ‘दी डायव्हर’ यांसारखे चित्रपट मुंबईत दाखवण्यात आले. शहरात अन्य ठिकाणीही तंबू उभारून चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली. अशा प्रकारे सुरुवातीच्या काळात मुंबईत चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. पाश्चात्यांनी भारतात प्रथमच आणलेल्या या मनोरंजन उद्योगाचा भारतीय माणसाच्या मनावर खोलवर परिणाम झाला. यातूनच प्रेरणा घेऊन सावेदादा अर्थात हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर यांनी फोटो स्टुडिओ सुरू केला. ल्युमिए बंधूंप्रमाणे चलचित्रांचे खेळ दाखवण्याचा व्यवसाय ते करू लागले. अर्थात यात प्रामुख्याने विदेशी चित्रपटांचाच समावेश असे. याच काळात अनेक परदेशी तंत्रज्ञ भारतात चित्रिकरण करू लागले होते. हे पाहून सापेदादांनी स्वत:च चित्रीकरण करायचे ठरवले. त्यानुसार मुंबईतील एका कुस्तीचे चित्रीकरण त्यांनी केले. पुढे रँग्लर परांजपे (रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे) भारतात परतले त्या वेळच्या सत्कार प्रसंगाचे चित्रीकरण सावेदादांनी ‘दी रिटर्न ऑफ रँग्लर परांजपे’ या नावाने केले.
 
सन १९००मध्ये याच सावेदादांकडून एस. एन. पाटणकर, करंदीकर आणि दिवेकर या मित्रांनी कॅमेरा विकत घेतला. यांनीही त्या काळातील इतर चित्रपटांप्रमाणेच वर्तमानातील घटनांचे चित्रण केले. पुढे मात्र यांनी ‘नारायणराव पेशवे यांचा मृत्यू’ (१९१५) हा चित्रपट केला. तत्पूर्वी १८ मे १९११ रोजी दादासाहेब तोरणे यांचा ‘पुंडलिक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला; मात्र हा चित्रपट रंगभूमीवरील ‘भक्त पुंडलिक’ या नाटकाचे चित्रीकरण होते. चित्रपटाचे तंत्र त्यात आललेले नव्हते. यानंतर १९९३मध्ये चित्रपट या माध्यमाची बलस्थाने लक्षात घेऊन सर्व भारतीय तंत्रज्ञ कलावतांनी निर्माण केलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात दादासाहेब फाळके यांनी चित्रपट माध्यमाची गरज त्यातील तंत्र आणि ‘चित्रपटाच्या भाषेचा वापर करून भारतातील चित्रपट व्यवसायाची पायाभरणी केली. अल्पावधीत ही तंत्रकुशल कला लोकप्रिय झाली. पडद्यावर हलणारी माणसे पाहणे हेच येथील लोकांना उत्सुकतेचे वाटे. त्यातही पौराणिक धार्मिक कथानके आणि देवदेवता यांचा प्रत्यक्षात पडद्यावरचा वावर प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत असे. अशा रीतीने भारतातील चित्रपट कला आणि व्यवसाय सुरू झाला.
 
डॉ. जया विश्वनाथ पाटील

ई-मेल : jayavpatil12@gmail.com

(लेखिका पुण्यातील पृथ्वी अॅकॅडमीमध्ये भारतीय इतिहासामधील सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांचे अध्यापन करतात.)

(या लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UYYEBB
Similar Posts
चित्रपटांवर प्रभाव साहित्याचा मराठी साहित्यावर उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. किंबहुना साहित्यावर आधारित चित्रपट निर्माण झाल्यानंतर वाचकांकडून पुन्हा त्या मूळ कलाकृतीची मागणी वाढत असल्याचेही आढळून आले आहे. चित्रपटातून कलाकृतीचा आनंद घेतल्यानंतर फिरून पुन्हा त्या मूळ कलाकृतीचा आनंद मिळवावा हीच त्यामागील रसिकांची भूमिका असते
‘पुस्तक भिशी’तून मिळाले पुस्तकरूपी मित्र.. भिशी हा प्रकार आपल्याला अनेक वस्तूंच्या रूपात माहिती आहे पण पुण्यातला मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप चक्क पुस्तक भिशीचा उपक्रम राबवतो आहे आणि तोही गेली १५ वर्षं. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल... ................ ‘पुस्तकांचं आणि ग्रंथालयांचं टिकणं म्हणजे सध्याच्या यांत्रिक काळात माणसांचं अस्तित्व
यंदाची पुस्तक राजधानी कोनक्री गिनी प्रजासत्ताक या देशातील कोनक्री या शहराला यंदाच्या पुस्तक राजधानीचा मान मिळाला आहे. ‘युनेस्को’कडून दर वर्षी अशा राजधानीची घोषणा केली जाते. वाचनाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम वर्षभर त्या शहरात राबवले जातात. ‘बुक कॅपिटल’च्या या संकल्पनेविषयी... ............... वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट यांसंदर्भात
मराठीसाठी सर्व संस्थांनी एकत्र यावे : मधू मंगेश कर्णिक यांचे आवाहन रत्नागिरी : 'कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने 'कोमसाप'च्या झेंड्याखाली वेंगुर्ल्यापासून डहाणूपर्यंतचे कोकण एकत्र झाले आणि आम्ही मराठीची पालखी येथे उभी केली. जोपर्यंत सह्याद्रीचा कडेकपार आणि अथांग समुद्र टिकून आहे, तोपर्यंत ही मराठी कोकणात रुजून आणि टिकून राहणार आहे,' अशा शब्दांत कोकण मराठी साहित्य परिषदेचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language