Ad will apear here
Next
समर्थांची घोंगडी
.काही वर्षांपूर्वी मावशीनं एक सुंदर आणि अगदी मऊ मऊ गोधडी शिवून दिली होती. मुंबईच्या हवेला दोन मऊ मऊ पातळं एकमेकांना जोडली, की थंडीतही ते पांघरूण पुरतं. त्याला आपण उगाचच गोधडी म्हणतो असं वाटतं. गोधडी म्हणजे जाड पांघरूण खरं तर. असो. तर हे पांघरूण परवा माझ्याच पायाच्या नखात अडकून किंचित फाटलं. आता पायाचं नख ते काय.. पण पांघरूण फाटायला नख हे कारण पुरेसं होतं. मी लगेच दुपारी ते शिवून टाकलं पण. शिवता शिवता मला समर्थशिष्याची, मधुकरची गोष्ट आठवली.

आता गोष्ट वाचून बरेच दिवस झालेत; पण आजही मी अंगावर पांघरूण घेताना किंवा मुलींच्या, वैद्यांच्या अंगावर पांघरूण घालताना मनात येतं, की मधुकरला जशी ती घोंगडी पांघरूण म्हणून मिळाली तशीच ही पण होवो.

गोष्ट अशी आहे...

समर्थ रामदास स्वामी गावोगावी फिरत असताना त्यांना एक जोडपं भेटतं. ते आपल्या मुलाला, मधुकराला समर्थांसोबत पाठवतात. मधुकर तरतरीत, गोरा आणि धीट असतो. एकदा हिंडता हिंडता ते दोघं एका गावात येतात आणि गावातल्याच मारुतीच्या देवळात थांबतात. सूर्य भर डोक्यावर आलेला असतो. उशीर झालेला असतो. आता यापुढे कोरडी भिक्षा आणून त्यापुढे स्वयंपाक करायला उशीर झाला असता. म्हणून समर्थ मधुकराला माधुकरी मागून आणायला सांगतात. मधुकर निघतो; पण उशीर झाल्याने गावातल्या अनेकांचं जेवण झाल्यानं माधुकरी मिळत नाही. तो असाच हिंडत असताना काही मुलं त्याला म्हणतात, की ‘या गावात एकच घर असं आहे, की जे उशिरा जेवतात... ते म्हणजे जोशीबुवांचं. तू त्यांच्याकडे जा. तुला एकाच ठिकाणी दहा घरची माधुकरी मिळेल.’ 

मधुकर उन्हातान्हात फिरून दमलेला असतो. तो लगेच त्यांच्याकडे जातो आणि खणखणीत आवाजात ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे...’ हा श्लोक म्हणून ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणतो. कोण इतक्या मोठ्या आवाजात ओरडतंय, हे बघायला जोशीबुवा बाहेर येतात. आणि मधुकरने म्हटलेल्या श्लोकाचा अर्थ विचारतात. तो त्याचा अर्थ त्यांना धीटपणे सांगतो. त्यांना मधुकर उर्मट वाटतो. आणि आपल्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीने पाहण्याची कोणाची प्राज्ञा नाही अशी घमेंड मारणारा आहे तरी कोण हे कळलेच पाहिजे म्हणून ते मधुकरला घरात यायला सांगतात.

त्याची जन्मवेळ विचारून त्याची कुंडली मांडून, ‘उद्या दुपारी तुझा मृत्यू होणार आहे,’ असं सांगतात. आणि ‘या मृत्यूच्या तावडीतून तुला तुझ्या समर्थांनी सोडवलं तर मी तुला माधुकरी घालीन’ असं म्हणतात. बिचारा मधुकर घाबरतो. तो कसाबसा दोन घरी माधुकरी मागून देवळात येतो. त्याचा अत्यंत थकलेला आणि रडवेला अवतार बघून समर्थ त्याच्या जवळ जातात. मायेनं डोक्यावरून हात फिरवत विचारतात, ‘काय रे खूपच थकलास का... कोणी तुला काही बोललं का...’ हे ऐकून मधुकर रडत रडत त्यांना घडलेला प्रसंग आणि उद्या दुपारी होणाऱ्या आपल्या मृत्यूविषयी सगळं सांगतो. आता आपल्या आई-बाबांची भेट होणार नाही, याने त्याला अजूनच रडू येतं. तो समर्थांना म्हणतो, ‘मला थंडी वाजतेय आणि अंग गरम झाल्यासारखं वाटतंय.’

समर्थ त्याच्याकरिता अंथरूण घालून त्यावर त्याला झोपवून त्याचे पाय स्वतः चेपू लागतात. इकडे मधुकरचा ताप वाढत असतो. तो तापात बडबड करत असतो. सकाळ होते. शनिवारचा दिवस असतो. समर्थ मधुकराला हाक मारून उठवतात. म्हणतात, ‘मधुकरा उठ. पाणी कढत केलं आहे. आंघोळ कर.’ मधुकर म्हणतो, ‘माझ्यात बसायचीही शक्ती नाही. मी आंघोळ नाही करत. नाही तरी मी मरणारच आहे.’ समर्थ म्हणतात, ‘अरे मरायचंच आहे, तर पारोशाने का? चल मी तुला आंघोळ घालतो.’ समर्थ त्याला आपल्या मांडीवर बसवून आंघोळ घालतात. दोघांच्या आंघोळी झाल्यावर समर्थ खिचडा तयार करतात. आणि मधुकरला खायला देतात. मधुकर म्हणतो, ‘मी आता मरणार आहे. हे कशाला खाऊ?’ त्यावर समर्थ म्हणतात, ‘अरे मरणार आहेस, तर उपाशीपोटी का मरतोस! चांगलं पोटभर जेवून मर.’

जरा वेळाने समर्थ मधुकराला म्हणतात, की ‘काल रात्रभर तू तापात बडबडत होतास. त्यामुळे मला अजिबात झोप लागली नाही. मी आता जरा वेळ पडतो. तू जरा माझे पाय चेप. आणि कोणीही बोलावलं तरी माझ्या अंगावरची घोंगडी सोडून जाऊ नकोस.’ मधुकर जरा खिन्नतेनेच पाय चेपत बसतो. थोड्याच वेळात यमाचे काळेकभिन्न दूत त्याला बाहेर बोलावतात; पण मधुकर म्हणतो, ‘मी माझ्या गुरुमाऊलींची सेवा करतोय. मी येणार नाही.’ यमदूतांनी किती वेळा सांगूनही तो ऐकत नाही. शेवटी ते मधुकरच्या दिशेने पाश टाकतात; पण ते पाश, घोंगडीपर्यंत येऊन परत मागे फिरतात. ते बघून मधुकराला वाटतं, की ही जादूची घोंगडी आहे. म्हणून तो घोंगडीचा बराचसा भाग आपल्याभोवती पांघरून घेतो आणि काही भाग समर्थांच्या अंगावर ठेवतो.

यमदूत घडलेली हकीकत यमाला सांगतात. मग यम स्वतःच रेड्यावर बसून तिकडे येतो. आणि मधुकराला दरडावत सांगतो, की ‘बऱ्या बोलानं माझ्या जवळ ये.’ त्यावर मधुकर यमाला सांगतो, ‘मी तुम्हाला अनेकदा सांगितलं, की मी येणार नाही, तरीही तुम्ही मला सारखे का बोलावता? तुमचा बाप आला तरी मी येणार नाही.’ यमही पाश टाकून बघतो; पण घोंगडीपर्यंत पाश गेले, की ते मागे येत.

जरा वेळाने समर्थांना जाग येते. मधुकर त्यांना घडलेली हकीकत सांगतो. समर्थ त्याला म्हणतात, ‘जा आणि कालच्या त्या जोशीबुवांकडे जाऊन माधुकरी मागून आण.’ मधुकर म्हणतो, ‘मी जाईन, पण वाटेत यमदूत उपटले तर... मला आपली ती तुमची घोंगडी द्या.’ समर्थ म्हणतात, ‘अरे मरणाची वेळ टळली आहे. काळजी करू नकोस.’ पण तरीही मधुकर घोंगडी घेऊन जातो. आणि पुन्हा एकदा खणखणीत आवाजात तोच श्लोक म्हणतो. जोशीबुवांना आश्चर्य वाटतं. ते पुन्हा एकदा जन्मवेळ बघून गणित मांडतात. वेळ तर बरोबर असते. मग हे झालंच कसं, या विचारात पडतात. मग मधुकराला ते सांगतात, की ‘मला तुझ्या गुरूंना भेटायचंय.’ मधुकर त्यांना घेऊन मारुतीच्या देवळात जातो.

ही गोष्ट अजून संपली नाही. लहानपणी आईच्या तोंडून ही गोष्ट अनेकदा ऐकली होती. मला शेवटी समर्थ आणि बुवांच्या भेटीबद्दल उत्सुकता कमी आणि त्या घोंगडीबद्दल जास्त उत्सुकता वाटायची. मी किती वेळा तरी झोपताना, मला पण तशी घोंगडी मिळायला हवी आणि ती आपण सगळे पांघरू असं वाटायचं. पुढे हीच गोष्ट राजा मंगळवेढेकरांच्या पुस्तकात मी अनेकदा वाचली; पण शेवट मी भराभर वाचत असे किंवा वाचतही नसे. काही नाही... त्यात समर्थांनी बुवांना ‘असं कोणालाही ज्योतिष सांगू नये’ हे सांगितलं आहे.

तेव्हापासून पांघरूण घेताना किंवा घालताना, ते समर्थांची घोंगडी होऊ दे असं वाटतं. लहानपणीच्या काही समजुती अशा घट्ट विणीच्या असतात हेच खरं.

एवढी गोष्ट सांगून मी माझे ८७३ ++ शब्द संपवते.

बास... बाकी काही नाही.

- मंजिरी जोशी-वैद्य

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PWYECQ
Similar Posts
ऊर्जा हळूहळू सगळं मूळ पदावर येईल तो सुदिन. या मधल्या काळात आमच्या समोरच्या रस्त्यावरून ‘चाये... चाय.. चाय.. चाय गरम’ म्हणत खांद्याला थर्मासची मोठी पिशवी लावलेला एक मध्यमवयीन माणूस तरातरा चालत जात असतो. तो रोज दोन वेळा त्या गल्लीतून जातो. पारलाभर फिरत असणार. त्याचे रंग उडालेले काळे पांढरे केस, घामाने कच्च ओला
हेही दिवस पालटतील... अखेर सोमवारपासून आमची लायब्ररी सुरू होत आहे. शासनाने पाठवलेल्या नियमानुसार काही बदल करायला लागणार आहेत. पूर्वी पुस्तकाच्या रॅकमध्ये स्वतः वाचक जाऊन पुस्तक निवडत असत; पण आता मात्र काही दिवस समोर असलेल्या पुस्तकांमधूनच पुस्तक निवडायला लागणार आहे. रेंगाळायला मिळणार नाहीये.
फराळाचे लळीत एकांकडून आलेले करंजीच्या आकाराचे खुळखुळे आता फक्त तीन उरलेत. ते जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून खाऊन संपवले जातील. काटामोड चकली दहीभाताबरोबर खाल्ली जाईल. हल्ली फराळाचं संपवताना, जेवताना शेवटी दहीभात खावाच लागतोय. नाही तर दही घुसळल्यावर जसं लोणी वर येतं, तसं तेल घशाशी येईल की काय असं वाटतं. दहीभातानंतर एक वाटी ताक
गाडी रुळावर येतेय... एकाने तर हळूच सांगितलं, की ‘रोमान्सची पुस्तकं कुठे मिळतील. बायकोला हवी आहेत. आणि आईला राजे, गोगटे, यांचे कथासंग्रह हवेत.’ मग दिली त्यांना हवी असलेली पुस्तकं. एक तरुण मुलगा तंजावरवरची पुस्तकं मागत होता. असे मिश्र वाचन करणारे वाचक एकाच दिवशी आले, की जी तारांबळ उडते ती आम्ही खूप दिवसांनी अनुभवली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language