‘करू या देशाटन’ सदरात आपण सध्या मुंबईतील पर्यटनस्थळांची माहिती घेतो आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या धोबी तलाव परिसरातील ठिकाणांची............
मुंबईतील आताच्या वासुदेव बळवंत फडके चौकाला ‘मेट्रो चौक’ असेही म्हणतात. या परिसरात धोबी तलाव होता. म्हणून या परिसराला धोबी तलाव असेही म्हणतात. हा मुंबईमधील भव्य चौक आहे. येथून गिरगावकडे जाणारा जगन्नाथ शंकरशेठ रोड, भुलेश्वरकडे जाणारा काळबा देवी रोड, क्रॉफर्ड मार्केटकडे जाणारा लोकमान्य टिळक मार्ग, महापालिका व गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा महापालिका मार्ग, ओव्हल मैदान, आझाद मैदान, क्रॉस मैदान अशा मैदानांमधून हायकोर्ट मंत्रालयाकडे जाणारा महात्मा गांधी मार्ग, मरीन ड्राइव्हकडे जाणारा आनंदीलाल पोतदार मार्ग एवढ्या मोठी वाहतूक असलेल्या रस्त्यांची सुरुवात होते. हा भाग मैदानी असल्याने मोकळी हवा भरपूर खेळत असते. क्रॉस मैदानाजवळ खाऊगल्लीही आहे. आजूबाजूला असलेल्या गॉथिक, इंडोसारासेनिक, आर्ट डेको शैलीतील इमारती, मधोमध असलेली वृक्षांची किनार व त्यामधील मैदाने यामुळे हा परिसर एकदम रम्य दिसतो.
धोबी तलाव : बिना पानी का धोबी तालाब देखो...
ई है ‘बंबई’ नगरिया तू देख बबुआ
धोबी तलाव मेट्रो ते महात्मा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) तेथून मुंबई महापालिका तेथून मेट्रो हा भाग धोबी तलाव वॉर्ड म्हणून ओळखला जातो. तलाव असलेल्या जागेवर सध्या एक सार्वजनिक वाचनालय आहे. तसेच लागूनच मेट्रो सिनेमा थिएटर आहे. ब्रिटिश सैनिकांचे कपडे धुण्यासाठी तेथे असलेल्या गोड्या पाण्याच्या झऱ्यांचा उपयोग करून धोबी घाट बांधण्यात आला होता. सध्या तेथे मेट्रो टॉकीज आहे. शहर विस्तारासाठी किल्ला पाडल्यावर हा तलाव हलविण्यात आला. इंग्रजांची भारतावर पक्कड घट्ट झाल्यावर लष्कराच्या माध्यमातून संस्थानिकांवर ब्रिटिशांनी दबाव ठेवला. मुंबईमध्ये मोठे लष्कर ठेवण्याची आवश्यकता संपली. मुंबईचे औद्योगीकरण व व्यापारीकरण मोठ्या प्रमाणावर होऊ लागले व त्याबरोबरच लाँड्री व्यवसायही सुरू झाला. धोबी तलाव काळाच्या ओघात संपला; पण नाव मात्र तसेच राहिले.
मेट्रो सिनेमा : हे चित्रपटगृह आर्ट डेको शैलीमध्ये सन १९३८ मध्ये बांधले गेले. हे थिएटर मेट्रो-गोल्डविन-मेयर या कंपनीने (एमजीएम) बांधले आणि चालविले. याचे संकल्पचित्र अमेरिकन आर्किटेक्ट थॉमस डब्ल्यू. लँब आणि मुंबईचे डी. डब्ल्यू. डिचबर्न यांनी केले होते. पहिला सिनेमा सिनेमा पाच जून १९३८ रोजी प्रदर्शित झाला. सुरूवातीला एमजीएमने बनविलेले चित्रपट प्रदर्शित केले. आतील बाजू, मजले, भिंती, छत, तसेच फर्निचर लाल आणि गुलाबी रंगात होते.
संचालक चार्ल्स गेरार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी याचे सुशोभीकरण केले. उद्घाटन कार्यक्रमासाठी हॉलिवूडचे अभिनेते ग्रेगरी पेक उपस्थित होते. १९५५मध्ये पहिले फिल्मफेअर पुरस्कार येथेच दिले गेले. १९७०मध्ये हे सिनेमागृह गुप्ता कुटुंबाने ताब्यात घेतले. राज कपूर यांचा ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ येथेच प्रदर्शित झाला. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहामुळे याच्यावर परिणाम होऊन २००५मध्ये ते बंद पडले होते; पण २००६मध्ये मल्टिप्लेक्सप्रमाणे सुधारणा करून चित्रपटगृह सुरू झाले.
कावसजी रुस्तुमजी पटेल टँक (सीपी टँक) : मेट्रो सिनेमाच्या समोर हा तलाव होता, तेथे आता कावसजी रुस्तुमजी पटेल सभागृह बांधले आहे. पूर्वी मुंबईत पिण्याच्या पाण्यासाठी अनेक तलाव श्रीमंत पारशी, मुस्लिम व्यापारी, गुजराथी, तसेच यहुदी लोकांनी बांधले होते. हा तलाव १८३१मध्ये बांधण्यात आला होता. १८५६मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी जनावरांचे गोठे माहीमला हलविण्यात आले. विहार व तुळशी या तलावांमधून शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर या टाक्या (तलावही) हटविण्यात आल्या. कारण डासांचा प्रादुर्भाव होऊ लागला होता.
एल्फिन्स्टन कॉलेज : हे कॉलेज मुंबई विद्यापीठाच्या सर्वांत जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. नाना शंकरशेट यांच्या पुढाकारातून १८२४मध्ये बॉम्बे ऑफ नेटिव्ह स्कूल सोसायटीची स्थापना झाली व मुंबईत व्यापाराबरोबर शिक्षणही आले. पुढे याच संस्थेचे एल्फिस्टन एज्युकेशन सोसायटी असे नाव झाले. सन १८५६मध्ये हे कॉलेज सुरू झाले. मुंबई हे सागरी व्यापार आणि व्यापारातील समृद्ध केंद्र होते. या दोन संस्थांच्या स्थापनेपासून मुंबईमध्ये शैक्षणिक सुविधांना सुरुवात झाली. या संस्थेतून शिक्षण घेतलेल्या, तसेच संस्थेशी संबंध असलेल्यांमध्ये लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीरचंद गांधी, बद्रुद्दीन तैबजी, फिरोजशाह मेहता, नानाभाऊ हरिदास, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, जमशेटजी टाटा आणि प्रख्यात प्राध्यापक दादाभाई नौरोजी यांचा समावेश आहे. या संस्थेची इमारत खूपच देखणी आहे.
कामा हॉस्पिटल : महिला आणि मुलांसाठी महापालिका पथावर एल्फिन्स्टन कॉलेजजवळ हे हॉस्पिटल आहे. २२ नोव्हेंबर १८८३ रोजी ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या हस्ते इमारतीची पायाभरणी केली गेली आणि ३० जुलै १८८६ रोजी ही इमारत पूर्ण झाली. मुनचेरजी कावसजी मुर्ज़बान यांनी मध्ययुगीन गॉथिक शैलीत ही इमारत तयार केली होती. पोरबंदरकडून मिळालेल्या दगडापासून ही इमारत बनविली आहे. पेस्तनजी हार्मूसजी कामा यांनी त्याच्या बांधकामासाठी त्या वेळी एक लाख रुपये देणगी दिली होती. हे हॉस्पिटल २६/११च्या हल्ल्यामुळे चर्चेत आले. अजमल कसाब व त्याचा साथीदार छत्रपती टर्मिनस वर गोळीबार करून येथे आले; पण येथील नर्सच्या हुशारीमुळे मोठा अनर्थ टळला.
गोवन स्पोर्टस् असोसिएशन : ही संस्था ९० वर्षांपूर्वीची आहे. सन १९२९मध्ये या संस्थेची स्थापना झाली. तत्कालीन सरकारने क्रॉस मैदानाजवळील जमीन लीजवर मैदानासाठी उपलब्ध करून दिली. फुटबॉल हा येथील आवडीचा खेळ आहे. बरोबरीने हॉकीलाही प्रोत्साहन दिले जाते. सरावासाठी मैदान कायम भरलेले असते. मुंबईतील हजारो खेळाडू, शाळा आणि महाविद्यालये यांना खेळाचे मैदान वापरण्याचा फायदा झाला आहे. आंतरशालेय, महाविद्यालयीन, तसेच राज्य पातळीवरील सामने येथे होतात. गोवा स्पोर्ट असोसिएशनचा हॉकीचाही संघ आहे.
बॉम्बे हॉस्पिटल : गोवन स्पोर्टस् असोसिएशनच्या मैदानाच्या पश्चिमेस भारतातील प्रसिद्ध खासगी रुग्णालय आहे. त्याची स्थापना १९५०मध्ये आर. डी. बिर्ला यांनी केली होती. हे ८३० खाटांचे सुसज्ज असे हॉस्पिटल आहे. अतिदक्षता विभागात ११० जणांची क्षमता आहे.
२२ शस्त्रक्रिया दालने आहेत. सुमारे ३२०० कर्मचारी आणि २०० निवासी डॉक्टर आहेत. यात दोन कॅथलॅबही असून, दर वर्षी १८०० शस्त्रक्रिया आणि ४००० अँजियोग्राफी/अँजिओप्लास्टी केल्या जातात. न्यूरो सर्जरी आणि न्यूरोलॉजी विभागातही ऑपरेशन थिएटर आहेत. जवळच मातोश्री बिर्ला सभागृह आहे.
क्रॉस मैदान क्रूसीफिक्स : मैदानाच्या उत्तर बाजूला क्रूसीफिक्स आहे. येथे तीन मे रोजी संपूर्ण मुंबई आणि गोव्यातून ख्रिश्चन भाविक येतात. मोठा उत्सव साजरा होतो.
खाऊगल्ली : क्रॉस मैदानाजवळील खाऊगल्ली फास्टफूडसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी व पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथील मंच्युरियन, आलू बेबी कॉर्न चाट, पावभाजी, चीज पनीर फ्रँकी आणि बॉम्बे सँडविच हे पदार्थ लोकप्रिय आहेत. त्याबरोबरीने रगडा पॅटिस, समोसे, इतर पदार्थही मिळतात; पण चायनीज साठी ही गल्ली प्रसिद्ध आहे. जवळच बहाई भवन आहे.
बॉम्बे जिमखाना मैदान : हा भारतातील पहिला जिमखाना आहे. सन १८७५मध्ये याची स्थापना झाली. क्लबहाउसचे संकल्पचित्र ब्रिटिश आर्किटेक्ट क्लॉड बॅटले यांनी काढले आहे. लॉबी, टेबल टेनिस क्षेत्र, बॅडमिंटन कोर्ट, रेस्टॉरंट आणि लाउंज म्हणून काम करणारी एक लांब इमारत असलेला हा सुसज्ज असा जिमखाना आहे. येथे हिवाळ्यातील महिन्यांत क्रिकेट खेळले जाते. पावसाळ्याच्या महिन्यांत रग्बी आणि फुटबॉल साठी मैदान वापरले जाते. सी. के. नायडू यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिला कसोटी सामना १५ डिसेंबर १९३३ रोजी येथे खेळला गेला. तात्पुरती शेड करून त्यामध्ये ५० हजार प्रेक्षकांसाठी स्टँड लावले गेले होते. १० डिसेंबर २००२ रोजी अपंगांनी खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना येथे पार पडला. या जिमखान्यामध्ये तीन बॅडमिंटन कोर्ट, पाच स्क्वॅश कोर्ट, सहा टेनिस कोर्ट, बिलियर्डस् आणि स्नूकरसाठी सहा टेबल्स, एक जलतरण तलाव आणि एक फिटनेस सेंटर आहे. या क्लबच्या मेंबरशिपसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ पुरुषांनाच क्लबमध्ये सदस्यत्व मिळायचे. आता स्त्रियांनाही मिळते. आझाद मैदान आणि जिमखाना यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस व चर्चगेट येथे जाण्यासाठी छोटी लेन आहे.
आझाद मैदान : आझाद मैदान हे मुंबईमधील ऐतिहासिक मैदान आहे. क्रिकेट आणि राजकीय पक्षांची आंदोलने यामुळे हे मैदान सतत चर्चेत राहिले आहे. २५ एकर क्षेत्र असलेल्या या मैदानाने अनेक क्रिकेटचे सामने पाहिले, अनेक खेळाडूही घडवले. २८ डिसेंबर १९३१ रोजी महात्मा गांधींनी याच मैदानावर मोठी सभा घेतली होती. याच्या दक्षिण बाजूला चर्चगेट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानचा छोटा संपर्क रस्ता आहे. त्याच्या पलीकडे मुंबई जिमखाना आहे. मैदानाच्या पूर्व बाजूस महापालिका मार्गास लागून मुबई मराठी पत्रकार संघाचे कार्यालय आहे.
फॅशन स्ट्रीट : हे मुंबईतील सर्वाधिक खरेदीचे ठिकाण आहे. पर्यटक आणि मुंबईतील ग्राहकांचे आवडते ठिकाण आहे. सांगितलेल्या किमतीच्या अर्ध्या किमतीपर्यंत जेथे खरेदी करता येईल असे ठिकाण म्हणजे फॅशन स्ट्रीट. येथे प्रामुख्याने रेडिमेड कपडे, पादत्राणे, तसेच नॉव्हेल्टीज स्वस्त किमतीत मिळतात. अगदी मंडईत घासाघीस चालते तशी येथे चालते; मात्र खरेदीकरताना सावधानता घ्यायला हवी. आझाद मैदानाच्या पलीकडील महात्मा गांधी रस्त्याकडे क्रॉस मैदानापर्यंत सुमारे ३०० ते ४०० दुकाने आहेत.
क्रॉस मैदान : हे पूर्वी परेड मैदान म्हणून ओळखले जायचे. वीर नरिमन पथ व महात्मा गांधी पथ जेथे मिळतात त्या ठिकाणी हे मैदान आहे. क्रॉस मैदानाचे क्षेत्रफळ २३ हजार चौरस मीटर असून, येथे क्रिकेट व इतर खेळ खेळले जातात. आसपास फॅशन स्ट्रीटवरील दुकाने आहेत. क्रॉस मैदानामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानला २०१८मध्ये दोन तोफा आढळून आल्या आहेत. सीकोस्ट कॅनन आणि पोर्तुगीज बनावटीची लहान तोफ यांचा त्यात समावेश आहे. सीकोस्ट तोफेची लांबी ६.३ फूट असून, तिचा व्यास २. ५ फूट आहे. ही तोफ अंदाजे एक टन वजनाची आहे. दुसरी पोर्तुगीज बनावटीची तोफ ६.५ फूट लांबीची आहे. तिचा व्यास १.५ फूट आहे. या दोन्ही तोफा जमिनीवर आहेत. तोफांचे शिवडी किल्ल्यावर जतन करावे अशी विनंती सह्याद्री प्रतिष्ठानने केली आहे. दक्षिणेस १७२५मध्ये भिका बहरामने बांधलेली विहीर आहे व त्याच्या दक्षिण बाजूसच सर हार्मूसजी कावसजी दिनशॉ यांचा पुतळा आहे. क्रॉस मैदानाच्या उत्तर बाजूस टाटा गार्डन आहे.
कसे जाल धोबी तलाव परिसरात?
येथे जाण्यासाठी चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बेस्टची बस सेवा आण टॅक्सी हे पर्याय आहेत.