सोलापूर : जुन्या काळातील लोक अनेक वनस्पतींचा उपयोग आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी करत होते. काही ठिकाणी पेरूच्या पानांचा उपयोग चहासाठी केला जाया. त्याचप्रमाणे एका वनस्पतीच्या बियांचा उपयोग कॉफीच्या चवीचे पेय तयार करण्यासाठी केला जायचा. अलीकडच्या काळात ही वनस्पती फारशी आढळत नाही. म्हणूनच या वनस्पतीचे जतन करण्याच्या हेतूने विठ्ठलवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील भांगे कुटुंबीयांनी या वनस्पतीची खास लागवड केली आहे.
या वनस्पतीच्या बियांपासून बनविलेले पेय आरोग्यवर्धक आणि उत्साहवर्धक असते आणि त्याची चव व सुगंध कॉफीसारखाच असतो, असा त्यांचा अनुभव आहे. या वनस्पतीच्या बियांचा उपयोग पूर्वी सर्रास कॉफी म्हणूनच केला जात होता. म्हणून या वनस्पतीची लागवड शेताच्या बांधावर व घराच्या शेजारी हमखास होत होती. आता मात्र ही वनस्पती सहज दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे विठ्ठलवाडी गावातील सेंद्रिय शेतीचे अभ्यासक गोरक्षनाथ भांगे व त्यांच्या कुटुंबीयांनी या वनस्पतीचे जतन करण्यासाठी सुमारे दोन गुंठे क्षेत्रावर तिची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी कळंबवाडी (ता. बार्शी) येथील राजश्री मुंडे यांच्याकडून या वनस्पतीचे बियाणे आणले.
या झाडांची उंची साधारण चार फूट असते, पाने दाट असतात, मुख्य खोडाला भरपूर फांद्या असतात व प्रत्येक फांदीला शेवरीच्या शेंगेसारख्या शेंगा लागतात. साधारण मोहरीच्या आकाराएवढ्या या बिया वाळवून, त्या छान भाजून त्यांची पावडर केली जाते. ही पावडरच कॉफीसारखी वापरली जाते. या पेयाची चव व सुगंध बाजारात मिळणाऱ्या कॉफीसारखाच असल्याचे भांगे कुटुंबीय सांगतात. भांगे कुटुंबीय सध्या याच ‘कॉफी’चे सेवन करत आहेत. या पेयाच्या सेवनाने इतर कोणताच त्रास होत नाही. त्यामुळे चहा-कॉफीमुळे त्रास होणाऱ्यांसाठी या पेयाचा पर्याय चांगला असल्याचे भांगे सांगतात.