‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या नाटकात दोन पात्रांच्या संघर्षाच्या काळाची झालेली व्यामिश्र गुंफण नाट्यकथानकाला कलात्मता व सौंदर्यात्मता प्राप्त करून देते. जयंत पवार यांनी लिहिलेल्या या पारितोषिकप्राप्त नाटकाच्या दीर्घ समीक्षणाचा हा तिसरा भाग... ...........
‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या नाटकात दाभाडे हे प्रमुख पात्र आहेच; पण बबनही तितकेच महत्त्वाचे पात्र आहे. संपूर्ण नाटक हे या दोन पात्रांभोवती गुंफलेले आहे, असे म्हणता येते. प्रस्तुत नाटकात बबन येलमामे व निवेदक ही दोन पात्रे वगळता नाट्यगत अन्य पात्रांचा दाभाडेंशी थेट संबंध असलेला दिसतो. दाभाडे आणि अन्य पात्रे ही निवेदकाच्या नाट्यपूर्ण कथनातील कल्पित पात्रे आहेत. स्वाभाविकच ही पात्रे भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोन भिन्न कालावकाशामध्ये प्रेक्षकांना विविध घटनांमधून सामोरी येतात. दाभाडे हे एक मध्यमवर्गीय कुटुंबवत्सल, पापभीरू वृत्तीचे पात्र आहे. ‘सेफ इंडिया इन्शुरन्स कंपनी’मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नोकरी करत असून, ते विमा एजंट म्हणूनही काम पाहत असलेले दिसते. दाभाडे यांचे दर्शनी रूप इतरांना आनंद देणारे असे आहे. कीर्तनकाराच्या कुटुंबात जन्माला आलेले हे पात्र तसे संस्कार आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये मन:पूर्वकतेने मिसळून टाकते. मध्यमवर्गीय दाभाडेचे दैनंदिन जीवन मध्यमवर्गीयाला साजेसेच आहे. आपण कोणाच्या अध्यात-मध्यात नसलो, की आपले आयुष्य सुखकर होते असे या पात्राचे जीवनविषयक मत आहे; पण असे मत असलेल्या या पात्राच्या आयुष्यात त्याचे राहते घर एक संकट होऊन सामोरे येते आणि त्याचे उर्वारित आयुष्य छिन्नविछिन्न करून टाकते.
विमा एजंट म्हणून काम पाहताना पॉलिसीच्या माध्यमातून तरुण, वृद्ध स्त्रिया यांच्या संपूर्ण संरक्षणाची आणि वृद्धांच्या अवघ्या म्हातारपणाचे उठल्यापासून निजेपर्यंतच्या सुरक्षित आयुष्याची हमी देण्याची भाषा करणारे हे पात्र आपल्या आयुष्याची आणि सुरक्षिततेची हमी आपली आपल्याला कधीच देऊ शकत नाही. त्याची ही स्थिती नाट्यगत वास्तवात शोककारक ठरते. इतरांनी पॉलिसी विकत घ्यावी म्हणून वेगवेगळे दृष्टांत देणाऱ्या दाभाडेंची स्थिती त्यांनीच सांगितलेल्या गोष्टीतील विहिरीत मोडून पडलेल्या, झाडाच्या फांदीच्या जाळीत अडकून पडलेल्या ‘पात्रा’प्रमाणे होते. दहशतीला घाबरून राहते घर सोडावे, तर मुंबईसारख्या महानगरात संपूर्णपणे निराधार होऊन जगावे लागेल, ही भीती आणि घरावरील अधिकार सोडायचा नाही म्हणून ठाम राहावे, तर मृत्यूशिवाय पर्याय नाही अशा गुंतागुंतीच्या भयानक स्थितीमध्ये हे पात्र सापडते.
या द्विनायककेंद्री नाटकात बबन येलमामे हा नाटकातील दुसरा नायक आहे. दाभाडे हा विशिष्ट स्थितीगतीचा भूतकाळ आहे, तर येलमामे तत्सदृश्य स्थिती-गतीचे वर्तमान आहे. ‘निवारा’ आणि तो हिसकावून घेणे, हे दोन मुद्दे या दोघांबाबतीत समान आहेत. एकाला (दाभाडे) आपल्या मालकीच्या निवाऱ्यासाठी, तर दुसऱ्याला (बबन येलमामेला) स्व-उन्नतीसाठी शहरात आल्यानंतर एक प्रकारच्या वाताहतीला सामोरे जावे लागते. स्व-कष्टाने उभारलेल्या कुटुंबाची दैन्यावस्था दाभाडे या पात्राला पाहावी लागते. बबन येलमामेला आपल्या पहिल्या अर्भकाला गमवावे लागते. ‘निवारा’ ही माणसाची प्राथमिक गरज असूनही त्याच्यासाठी कुटुंबासह स्वत:ची वाताहत विशिष्ट परिस्थितीत अनिवार्य ठरते. हे वास्तव भयग्रस्तेचा व अनिश्चिततेचा अनुभव देणारे आहे. दाभाडे, येलमामे आणि ‘कुसुमकुंज’मधील अन्य रहिवासी-पात्रे या सर्वांचाच मुख्य प्रश्न ‘निवाऱ्याचा’ आहे. त्यांना जिथे ‘राहायचे’ आहे, तिथे त्यांना ‘अर्थ’, ‘कायदा’, ‘सुव्यवस्था’ व ‘राजकारणी’ या वेगवेगळ्या सत्ताकेंद्रांनी ‘राहू देणे’ नाकारले आहे. सत्ताकेंद्रांनी सामान्यांच्या प्राथमिक गरजांना दिलेला नकार शोककारक आहे. पात्रांची परिस्थितीशरणता (‘कुसुमकुंज’मधील अन्य रहिवासी-पात्रे) अथवा परिस्थितीशी मुकाबला (दाभाडे) या दोन्ही वृत्ती शोकाचाच अनुभव देतात.
‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या नाटकात उद्योजक गृहस्थ असे एक पात्र येते. हे पात्र रंगमंचावर प्रत्यक्ष येत नाही; पण दाभाडे या पात्राच्या भावविश्वात हे पात्र जेव्हा प्रवेश करते तेव्हाच दाभाडे या पात्राचे ऱ्हासपर्व सुरू होते. विशेष म्हणजे दाभाडे व त्याची पत्नी या पात्रांच्या संवादांतूनच उद्योजक पात्राची ओळख वाचक-प्रेक्षकांना होते. रंगमंचावर एकदाही न आलेले पात्र खलपात्र म्हणूनच सामोरे येते. मराठी रंगभूमीवर ज्या प्रकारची खलपात्रे प्रचलित झाली, त्यापेक्षा हे पात्र वेगळे असल्याचे दिसते; मात्र स्वार्थांधता हा पारंपरिक विशेष प्रस्तुत खलपात्रातही आढळतो.
निवेदक, दाभाडे, बबन येलमामे व रंगमंचावर कधीच न येणारे गृहस्थ (खलपात्र) ही पात्रे वगळता ‘कुसुमकुंज’मध्ये राहणारे कुसाळकर, नाडकर्णी, स्त्री, पुरुष-१, पुरुष-२ ही पात्रे परिस्थितीशरण पात्रे आहेत. स्त्री, पुरुष-१, पुरुष-२ या पात्रांच्या नाट्यगत वास्तवातील त्यांच्या उक्ती-कृती या वरवर पाहाता कृतक अशा आहेत. गुंडगिरी करणे हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. राजकारणी आणि बिल्डर लॉबी यांनी आपल्या स्वार्थांधतेसाठी निर्माण केलेली ही साधने आहेत. त्यामुळे दाभाडेंविषयी त्यांना परिस्थितीशरणता ही त्यांच्या दारिद्र्यानेही निर्माण केलेली आहे. कुसाळकर, नाडकर्णी या पात्रांच्या ठायी परिस्थितीशरणता ही बदलत्या समाजवास्तवाने जन्मास घातलेली आहे. येथेच एक मुद्दा नोंदवायला हवा तो असा, अन्य पात्रांची परिस्थितीशरणता ही मुख्य पात्राच्या शोकांतिकेस कारणीभूत ठरते. ही बाब एकूण मराठी साहित्यसृष्टीत नवीन नाही. परंतु या नाटकातील परिस्थितीशरणतेचे स्वरूप वेगळे आहे. सर्वसाधारणपणे प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात न जाता समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या कालबाह्य मूल्यांना सर्वसामान्य वृत्ती-प्रवृत्तीची पात्रे शरण जात. त्यास पात्रांची परिस्थितीशरणता असे म्हटले जात असे. प्रस्तुत नाटकातील परिस्थिती ही स्वत:ला समाजव्यवस्थेत प्रभावी ठरवून घेतलेल्या राजकारण्यांनी व नव-भांडवलशाहीने निर्माण केलेली आहे. या प्रकारच्या परिस्थितीशरणतेचे स्वरूप हे जागतिकीकरणाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या बाजारीकरणाशी अन्योन्य संबंध राखणारे आहे.
‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या नाटकात एकमेकांना समांतर अशा घटना अभिनीत होत असल्यामुळे नाटकात स्थलयोजनाही विविध प्रकारांनी होताना दिसते. ‘कुसुमकुंज’मधील दाभाडे व अन्य फ्लॅटधारक, बबन येलमामे या पात्रांशी निगडित घटनांची स्थळे अनुक्रमे दाभाडेंचे ‘कुसुमकुंज’मधील घर आणि रंगमंचीय मोकळा स्थलावकाश ही आहेत. बदलत्या सत्ताकारणाला अधोरेखित करणारे गृहस्थ हे पात्र दाभाडे या पात्रास जेथे भेटते, ते हॉटेलमधील खोली हे स्थळ असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे रस्ता, शिवाजी पार्कचा कट्टा या स्थळपरिसरात काही घटना अभिनीत होतात. अर्थात या घटना ‘घर’ या स्थलावकाशात घडणे शक्यच नाही हेही लक्षात घ्यायला हवे. डॉक्टरांची केबिन आणि मुख्यमंत्र्यांची केबिन ही दोन्ही स्थळे दाभाडेंच्या वाताहतीला अधोरेखित करणारी आहेत. यापैकी ‘डॉक्टरची केबिन’ या स्थलावकाशात घडणारी घटना डॉक्टर व पेशंट यांच्यामधील भावनिक संबंध संपुष्टात येऊन त्या दोघांमध्ये केवळ व्यावहारिक संबंध उरले आहेत याचे प्रतिपादन करते. त्यामुळे हे ‘स्थळ’ बदलत्या आरोग्यविषयक वास्तवातील रुक्षता मुखरित करते.
तसेच नव-भांडवलशाहीच्या उदयाला पोषक ठरणारे राजसत्ताकारण खेळणारे राजकारणी प्रकाशात आणण्याचे कार्य मुख्यमंत्रांची केबिन या स्थलावकाशातील घटना करते. त्यामुळे हे स्थळही राजकारणी व सामान्य जनता यांच्यामधील ‘अंतराला’ अधोरेखित करते. बबन येलमामे या पात्राच्या संदर्भातील घटना ‘रस्ता’ या स्थलावकाशात घडणे अर्थपूर्ण ठरते. कारण मुंबईसारख्या महानगरात स्थलांतरित होऊ पाहणाऱ्या त्याची अस्थिरता, त्याचे उपरेपण त्यातून अधोरेखित होते. तसेच झोपडपट्टी, पोलीस स्टेशन आदी स्थळांचा त्यांच्या तोंडून झालेला उच्चार त्याच्या सद्य:स्थितीवर प्रकाश टाकणारा आहे. इतरांचा ‘निवारा’ हिसकावून घेणारी बिल्डर लॉबी आणि त्यांच्या पाठीशी असलेले राजकारणी यांमुळे दाभाडेसारख्याच्या आयुष्यात येणारा महानगरातील उपरेपणा आणि बबन येलमामेच्या आयुष्यात येणारा महानगरीय उपरेपणा यामध्ये कार्यकारण-भावतत्त्वाची निर्मिती होताना दिसते. नाट्यस्थलाचे हे कार्य अनोखे व अर्थपूर्ण ठरणारे आहे.
‘नाटक’ व ‘काळ’ यामधील संबंध बहुविध व बहुस्तरीय असतो. नाटकातील कथेला विशिष्ट काळाचे आवरण असते. नाटकातील सर्व उपव्यवस्थांना व घटनांना काळाचे एक विशिष्ट परिमाण असते. ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ या नाटकात नाटकातील काळाचे विभाजन राजीव नाईक यांनी सुचवल्याप्रमाणे - ‘संभाषण काळ व कथानक काळ’ असल्याचे दिसते. दाभाडे आणि येलमामे यांच्या जीवनातील वास्तवाचे व एकूण बदलत्या वास्तवातील प्रश्नांचे दर्शन घडवण्यासाठी दाभाडे व येलमामे या पात्रांच्या कथाविषयाच्या दृष्टीने समांतरपणे घडणाऱ्या घटना कल्पिलेल्या आहेत. दाभाडेंच्या जीवनातील कथानक काळ (प्लॉट टाइम) हा फ्लॅशबॅक तंत्राने उलगडत जातो, तर निवेदक व येलमामे, निवेदक व हवालदार, यांच्या संवादांतून प्रकट होणाऱ्या नाट्यदृश्यांमध्ये संभाषण काळ (डिस्कोर्स टाइम) महत्त्वाचा ठरतो. अर्थातच दाभाडेंच्या घटनांमध्ये एक अनुक्रमिक काळ (क्रोनॉलॉजिकल टाइम) गुंफला गेला असून, त्याला ऐतिहासिक काळाचे (हिस्टॉरिकल टाइम) परिमाण प्राप्त झालेले दिसते. स्क्रीनवरील दृश्य घटनांमधून काळाचे परिमाण याच पद्धतीने वापरले गेलेले दिसते. ‘बिल्डररत्न’ अॅवॉर्डची निर्मिती आणि दर वर्षी वेगवेगळ्या बिल्डरला ‘बिल्डररत्न’ अॅवॉर्ड मिळणे यामधूनही काळाची सातत्यशीलता प्रकट होते.
प्रस्तुत नाटकातील दाभाडे या पात्राने आपली राहती जागा टिकवण्यासाठी केलेल्या संघर्षाची कालगणना स्क्रीनवरील दृश्यांमधून किती बिल्डर्सना अॅवॉर्ड दिले जातात, यावरून ठरवावी लागेल. तसेच ठरवले तर दर वर्षी एक ‘बिल्डररत्न’ अॅवॉर्ड दिला जातो, असे गृहीत धरून नाट्यगत स्क्रीनवरील अॅवॉर्डची गणना केली, तर ते पाच असल्याचे दिसतात. याचा अर्थ दाभाडेंचा प्रत्यक्ष संघर्षकाल (कथानककाल) हा पाच वर्षांचा मानावा लागतो. तसेच पात्राला मानसोपचारतज्ज्ञाची गरज भासते असेही नाटककाराने कल्पिले आहे. मानसिक संतुलन बिघडण्याचा काळ हा निश्चितच दीर्घ असण्याची शक्यता आहे. यावरूनही दाभाडेचा संघर्षकाल (कथानककाल) हा दीर्घ असल्याचेच म्हणावे लागते. त्याचप्रमाणे बबन येलमामेचा महानगरात स्थिर होण्याचा (उपकथानक) काळ साधारणपणे तीन-साडेतीन वर्षांचा कल्पिता येतो. दोन पात्रांच्या संघर्षाच्या काळाची झालेली ही व्यामिश्र गुंफण नाट्यकथानकाला कलात्मता व सौंदर्यात्मता प्राप्त करून देते; मात्र दोन पात्रांच्या संघर्षकालाचे अंतिम परिणाम ‘संवादी’ नसून, ते विरोधात्मक आहेत. तसेच मुख्य कथानक आणि उपकथानक यामधील पात्रांच्या वृत्तिभिन्नतेला अधोरेखित करणारे आहेत.
- गौतम गमरे
...............
रंगवाचा त्रैमासिक ‘
काय डेंजर वारा सुटलाय’ या जयंत पवारलिखित नाटकाचे हे समीक्षण ‘रंगवाचा’ या केवळ रंगभूमीला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या फेब्रुवारी २०१७च्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ‘रंगवाचा’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. रंगभूमीशी संबंधित वैविध्यपूर्ण विषय या अंकात समाविष्ट असतात. एक हजार रुपये भरून या अंकाचे आजीव पालक होता येते. या अंकातील निवडक लेख दर पंधरा दिवसांनी, शुक्रवारी ‘
बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचता येतील.
संपर्क : वामन पंडित, संपादक (रंगवाचा) - ९४२२० ५४७४४.