Ad will apear here
Next
... आणि व्हीलचेअरवर लग्न लागलं...!


रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील नवेट-हरचिरी येथील चि. सौ. कां. सुवर्णा येरीम आणि शिरोळ (कोल्हापूर) येथील चि. योगेश खाडे यांचा विवाह नुकताच थाटात पार पडला. सुवर्णा पोलिओग्रस्त आहे, तर योगेशला अपघातामुळे अपंगत्व आलेले आहे. व्हीलचेअरवरून आलेल्या या नवरा-नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. आपल्या जीवनातील अपंगत्वाच्या मोठ्या आघातामुळे खचून न जाता या दोघांनी एकत्र येऊन नवा संसार सुरू केला आहे. त्यांना शुभेच्छा द्यायला विवाहसोहळ्याला मोठी उपस्थिती होती. रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला. 

लग्नाची धावपळ, मंगलाष्टके, नातेवाइकांची लगबग अन्य सर्व सोहळ्यांप्रमाणेच सुरू होती. व्हीलचेअरवरून नवरा-नवरी आल्यानंतर यथासांग धार्मिक विधींसह हा विवाह पार पडला. दोन्हीकडची वऱ्हाडी मंडळी लग्नाला उपस्थित होती. रत्नागिरी तालुक्यातील नवेट, हरचिरी येथे मुलीकडे हा सोहळा पार पडला. रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराने ही लग्नगाठ जुळली. संस्थेच्या सदस्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे व त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम संस्था २०१५ पासून करत आहे.



नवेट येथील सहदेव व सौ. सरस्वती येरीम यांची कन्या सुवर्णा ही रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनची सुरुवातीपासूनच सदस्या होती. रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांची दोन वर्षांपूर्वी एका मेळाव्यात कै. अण्णासाहेब खाडे (मु. पो. शिरोळ, कोल्हापूर) यांचा ज्येष्ठ पुत्र योगेश याच्याशी ओळख झाली. त्याला १९९९मध्ये एका अपघातामुळे अपंगत्व आले होते. त्याने रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिक फाउंडेशनचे सदस्यपद स्वीकारले. योगेश व सुवर्णाची पुढे चांगली मैत्री झाली. योगेशने सुवर्णाबरोबर लग्न करायचे असल्याचे सादिकभाईंना सांगितले. योगेशच्या घरची मंडळी तयार होती. दोघांचे विचार जुळले असल्याने आणि खाडे कुटुंबीयांकडून मागणी आल्याने येरीम कुटुंबीयांनीही परवानगी दिली. त्यानंतर सादिकभाईंच्या पुढाकाराने लग्न ठरले. सुवर्णाच्या घरीच लग्न असल्याने तयारीही जोरदार करण्यात आली होती.



शिरोळहून खाडे कुटुंबीय नातेवाईकांसह एक दिवस आधीच नवेट गावी दाखल झाले. शनिवारी (११ मे) साखरपुडा आणि रविवारी (१२) दुपारी ३.१८च्या मुहूर्तावर देवाब्राह्मणांच्या साक्षीने हे लग्न लागले. व्हीलचेअरवर बसून उभयतांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सर्वांनी नवदाम्पत्याला भरभरून आशीर्वाद दिले. रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनकडे यजमानपद असल्याने बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी लग्नाच्या तयारीतही हातभार लावला होता. 

‘अपंगांनी समाजात मिसळले पाहिजे. लोकांची केवळ सहानुभूती नको, तर मदतीचा हातही हवा आहे. याकरिताच रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनची २०१५मध्ये स्थापना करण्यात आली. संस्थेचे कार्य रत्नागिरी जिल्ह्यात जोमाने सुरू आहे. विविध ठिकाणी मेळावे, युनिक कार्ड नोंदणी, व्हीलचेअरचे वाटप, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता संस्था प्रयत्न करत आहे,’ असे संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी सांगितले. 

योगेश अपंग बांधवांना फोटोग्राफी शिकवणार 
योगेशला १९९९मध्ये स्कूटर अपघातामुळे अपंगत्व आले. अचानक झालेल्या या आघातामुळे योगेश खचून गेला नाही. त्याने आपला फोटोग्राफीचा व्यवसाय त्यानंतरही चालूच ठेवला आणि या क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानात स्वतःला ‘अपडेट’ ठेवण्याचे कामही त्याने केले. ‘माझे वडील १९६०पासून ब्लॅक अँड व्हाइट फोटोग्राफी करत होते. मी स्वतः १० वर्षे कलर फोटोग्राफी केली. अपंगत्व आल्यावरही मी फोटोग्राफी सुरूच ठेवली. डिजिटल फोटोग्राफीचे तंत्र अवगत केले. त्यातील नवनवे तंत्रही शिकत गेलो. आज मी घरीच बसून फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. माझा व्यवसाय चांगला होतो. अन्य कोणाचाही स्टुडिओ बंद असला, तरी माझा स्टुडिओ कायम सुरू असतो. कारण मी घरूनच काम करतो. अचानक अपंगत्व आल्यावर या फोटोग्राफीमुळेच मी पुढे काम करू शकलो. आता काय करू, असा प्रश्न मला पडला नाही. मी माझ्या अपंग बांधवांनाही अल्प भांडवलात फोटोग्राफी कशी करायची, हे शिकवणार आहे,’ असे योगेशने सांगितले. 

(या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ आणि वराचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZTKCA
Similar Posts
‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’ रत्नागिरी : ‘रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन संस्था सच्चा समाज निर्माण करण्याचे काम करत आहे. दिव्यांगांचे पुनर्वसन करण्यावर भर देते. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी समाज, शासकीय यंत्रणा, शासन-प्रशासनाने आत्मविश्‍वास दिला पाहिजे,’ असे प्रतिपादन डॉ. अलिमियाँ परकार यांनी केले.
राजापुरातील दिव्यांग मेळाव्याला प्रतिसाद राजापूर : राजापूर नगर परिषद आणि रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी राजापूरमध्ये नुकताच मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच विविध योजनांसाठीचे फॉर्मही भरून घेण्यात आले.
जागतिक दिव्यांग दिनी रत्नागिरीत समावेशित एकता दौड रत्नागिरी : जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने तीन डिसेंबर २०१९ रोजी रत्नागिरीत समावेशित एकता दौड आयोजित करण्यात आली होती. ती अत्यंत उत्साहात पार पडली. मूकबधिर, दिव्यांग आणि मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य विद्यार्थीही एकता दौडीत सहभागी झाले होते.
जिद्दीची वीण घालून ‘तिने’ साकारले स्वप्न! पुणे : मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा लढा सार्थ ठरवला आहे आणखी एका सावित्रीने. शेतमजुरी करून आयुष्य जगणाऱ्या, कुडाच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील सावित्री बाळासो ममदापुरे आज एका मोठ्या टेक्स्टाइल कंपनीत फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहे. तिची जिद्द तिला इथपर्यंत घेऊन आली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language