नंदुरबार : मिरचीची देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. यंदा सप्टेंबरमध्ये मिरची खरेदी सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत ३९ हजार क्विंटल मिरचीची खरेदी करण्यात आले आहे. दोन महिन्यांत झालेली ही गेल्या पाच वर्षांतील विक्रमी खरेदी असून, मिरची बाजार चांगलाच तेजीत आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत मिरचीची आवक कमी झाली होती. मिरची लागवडीचे कमी झालेले प्रमाण, पडलेले दर, मिरची सुकवण्याच्या जागेसाठीची कमतरता आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून जिल्ह्यातील मिरची पडून देण्याच्या प्रकारामुळे जिल्ह्यातील उद्योग संकटात आला होता; मात्र २०१८मध्ये या उद्योगाला पुन्हा ‘अच्छे दिन’ प्राप्त झाल्याचे चिन्ह आताच्या विक्रमी खरेदीवरून दिसते आहे.
या वर्षी असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात मिरचीचे उत्पादन घटले आहे. तरी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात मिरची विक्रीला आल्याने या वर्षी विक्रमी आवक पाहायला मिळते आहे. या वर्षी मिरचीला दोन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सुकवलेल्या लाल मिरचीला साडेपाच हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. एकूणच या वर्षी नंदुरबारच्या मिरची बाजारातील उलाढाल चांगली होत आहे.