
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थानातर्फे चालवल्या जाणाऱ्या अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्रातर्फे रविवारी (१७ फेब्रुवारी) संस्कृत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या या संमेलनात गीत, नृत्य, समूहगायन, कथाकथन, नाटुकले आदी कार्यक्रमांचे रंगतदार सादरीकरण झाले. विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या.

कला शाखेच्या उपप्राचार्य तथा संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये म्हणाल्या, ‘संस्कृत शिक्षण घेण्यासोबत त्यातून सादरीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने हे संमेलन सर्वांना उपयुक्त ठरणार आहे.’
‘स्वप्नवासवदत्ता’ हे नाटक संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत सादर करू या, असे प्रमुख पाहुण्या इनामदार यांनी सुचवले होते. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी, संस्कृतप्रेमींनी एकत्र येऊन हे नाटक सादर करून बक्षीस मिळवले.

रेखा इनामदार म्हणाल्या, ‘यापूर्वी श्रीकांत वहाळकर यांनी रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक संघटना चालू ठेवली. सध्या संस्थेचे काम मी पाहत आहे. राज्यात अशी ही एकमेव संस्था आहे. शाळेत संस्कृत शिकवताना मुलांमध्ये प्रेरणा निर्माण करते. संस्कृत शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात.’
या वेळी सर्व कार्यक्रम संस्कृतमधूनच झाले. अनौपचारिक शिक्षण केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्य, समूहगीत, कथाकथन, स्वच्छ भारत या विषयांवर नाटुकली सादर केली. चित्रपटांमधील गीतांचा संस्कृत अनुवाद करूनही काही गीते सादर करण्यात आली. संस्कृत शिक्षणामुळे खूप फायदा होत असल्याचे मनोगत अनेकांनी व्यक्त केले. दहा वर्षांची ऊर्जा आपटे हिने संस्कृत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले.
(‘संस्कृत भारती’चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख शिरीष भेडसगावकर यांची विशेष मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
