शुभ्र सुवासिक फुले पाहून अनेकांना हा महाकाय वृक्ष असतो याचे आश्चर्य वाटते. सदाहरित जंगलांतील उंच वाढणाऱ्या वृक्षांच्या यादीत द्वितीय श्रेणी पटकावणारा, अत्यंत सावकाश वाढणारा, गर्द सदाहरित वृक्ष, नागचाफा...
सर रोबेर्ट ट्रोप या ब्रिटीश अधिकाऱ्याने १९१० च्या आसपास सह्याद्रीत या वृक्षाची मोजलेली सर्वाधिक उंची १४५ फुट होती, तर व्यास जवळपास ३.५ फुट एवढा होता. असा एखादा वृक्ष जर फुलांनी बहरून आला असेल तर पाहणाऱ्याचे भान हरखल्याखेरीज राहणार नाही. एवढा नाही पण साधारण ५०-६० फुट उंच एक वृक्ष मी पूर्वी पाहिला होता सिंधुदुर्गातच. त्याचा फोटो मुद्दाम येथे देतोय.
नागचाफ्याच्या खोडाची साल आतून लालसर असते आणि तिला एक प्रकारचा मंद सुवास असतो. नवीन येणारी पालवी मंद राणी रंगाची काहीवेळा कुंकवासारखी, काहीवेळा गडद गुलाबी, तर काहीवेळा जांभळी छटा असलेली, अत्यंत नाजूक, मेसुरच्या पुड्यातील कागदापेक्षा तलम. मात्र पान पक्व झाले की गडद हिरवे आणि खालून चांदीच्या रंगाचे. दालचिनीच्या पानाप्रमाणे कटकन मोडणारे. नागचाफ्याच्या पानाचे आयुष्य साधारण २ वर्षे. जानेवारी ते मार्च दरम्यान फुलणारी फुले, साधारण २ ते अडीच इंच व्यासाची. चार शुभ्र पाकळ्या आणि मध्ये पिवळसर भगव्या केसरांच्या गुच्छात लपलेली शुभ्र स्त्री-केसर. काही दुर्मिळ वृक्ष पावसाळ्यात देखील फुलतात. या फुलांचा मादक सुगंध अनुभवल्याशिवाय कळत नाही आणि अनुभवला तरी वर्णन करता येत नाही. केवळ अप्रतिम.
बिया रुजवून तयार केलेली रोपे १० ते १२ वर्षांनी फुलू लागतात. १५ वर्षानंतर फळे आणि रुजवण-योग्य बिया मिळू लागतात. मोठी झाडे भरपूर बिया देतात. झाडावरून फळ पडल्यावर बिया शक्यतो लगेचच रुजत घालणे आवश्यक असते. जेवढे दिवस त्या साठवून राहतील तशी त्यांची रुजवण क्षमता कमी कमी होत जाते. रानडुक्कर, वानर, खारुताई, वटवाघळे अनेक प्राणी या बिया आवडीने खातात. या झाडास लहान असताना किमान ६० टक्के सावली आवश्यक असते. मोकळ्या ठिकाणी भर उन्हात ही झाडे जगत नाहीत. या झाडाची वाढ एवढी सावकाश असते की पहिल्या वर्षी हे जेमतेम ५ इंच वाढते. २५ वर्षाच्या झाडाची उंची जेमतेम १६ ते १७ फुट असते. तर खोड ८ इंच व्यासाचे होते. १०० वर्ष वयाच्या झाडाचा व्यास दोन फुट होतो. सदाहरित वृक्षांची एक मोठी गंमत असते. रोप जमिनीवर जेवढे दिसते त्याच्या जवळपास ३ पट खोल त्याचे सोटमूळ पहिल्या एका महिन्यातच गेलेले असते. मी कॉलेज मध्ये असताना नागचाफ्याच्या बिया रुजवल्या होत्या.
नागचाफ्याचे लाकूड अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असते. ब्रिटिशांनी पूर्वी ते 'रेल्वे-स्लीपर'साठी वापरले असल्याची नोंद आहे.
नागचाफ्याची फुले आणि पाने सर्पदंशावर वापरतात असे वाचले आहे. म्हणूनच कदाचीन या वृक्षाचे नाव ‘नाग’चाफा असावे. या फुलांतील केसर सावलीत वाळवून विक्री केल्यास रु.१४०० प्रती किलो एवढा दर मिळतो. वेंगुर्ले परिसरात अनेक व्यापारी हे केशर विकत घेतात. बियांमध्ये साधारण ७०% तेल असते. हे तेल आपण वेगळे केले तर दिव्यात देखील वापरू शकतो.
फुलांत मध किती असतो माहित नाही, पण भरपूर मधमाशा या फुलांवर असतात. कदाचित परागकण गोळा करीत असाव्यात. कोकणातील कुळागरांमध्ये एखादा नागचाफ्याचा वृक्ष मुद्दाम लावला जातो. बागेतील झाडांचे परागीकरण वाढते असे म्हणतात.
- मिलिंद पाटील