सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील रयत सेवक चंद्रकांत सीताराम मलपे यांच्या शोधनिबंधास राष्ट्रीय पातळीवरील ‘अॅवॉर्ड ऑफ मेरीट’ हा पुरस्कार मिळाला. गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात नुकतीच नववी राष्ट्रीय टीचर्स सायन्स काँग्रेस पार पडली. यात त्यांनी सादर केलेल्या पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीवरील शोधनिबंधास हा विशेष पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
रयत सेवक मलपे यांचे एमएस्सी, बीएड, डीएसएमपर्यंत शिक्षण झाले आहे. अहमदाबादमध्ये आयोजित केलेल्या नवव्या नॅशनल टीचर्स सायन्स काँग्रेसमध्ये त्यांनी शेतीपूरक उपक्रमावर एक शोधनिबंध सादर केला होता. त्यांचा विषय ‘लर्निंग सायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’अंतर्गत ‘पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणे’ असा होता. त्यांच्या या शोधनिबंधास ‘अॅवॉर्ड ऑफ मेरीट’ हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला.
या नॅशनल टीचर्स सायन्स काँग्रेसमध्ये देशभरातील २५० शिक्षकांनी आपले शोधनिबंध सादर केले होते. त्यापैकी रयत शिक्षण संस्थेच्या १७ रयत शिक्षकांचा समावेश होता. यातील महाराष्ट्रातील केवळ दोनच रयत सेवकांच्या शोधनिबंधास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना अहमदाबादमधील पर्यावरण शिक्षण केंद्राचे संस्थापक संचालक पद्मश्री कार्तिकेया साराभाई, विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटरचे संचालक दिलीप सुरकर, नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स टीचर्स काँग्रेसचे संचालक पी. कुमार व सल्लागार शास्त्रज्ञ प्रोफेसर चंद्रमोहन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
रोपळेतील पाटील विद्यालयातील रयत सेवक मलपे यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, विभागीय चेअरमन संजीवकुमार पाटील, सचिव भाऊसाहेब कराळे, सहसचिव विलास महाडिक, विभागीय अधिकारी कमलाकर महामुनी, सहाय्यक विभागीय अधिकारी अब्बास मणेर, जनरल बॉडी सदस्य राजूबापू पाटील, बाळासाहेब पाटील, सरपंच दिनकर कदम, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य शिवाजीभाऊ पाटील, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, मुख्याध्यापक एस. एम. बागल, शिक्षक सहकारी, पालक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी मनोगत व्यक्त करताना मालपे म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्था ही नेहमीच आम्हा सेवकांना लोकांच्या जगण्याच्या उपयोगी पडणारे उपक्रम राबवण्यास प्रोत्साहन देत असते. म्हणूनच मला राष्ट्रीय पातळीवर शोधनिबंध सादर करता आला. माझ्या शोधनिबंधास राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार मिळाल्याच्या आनंदापेक्षा या कंपोस्ट खत बनवण्याच्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग होईल, याचा फारच आनंद होत आहे.’