पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या वर्धापनदिनानिमित्त २२ जानेवारी २०२० रोजी शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा अनेक वर्षांनी उघडण्यात आला. बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक इतिहासप्रेमी नागरिकांसह पेशव्यांचे वंशज सहभागी झाले होते.
या कार्यक्रमानिमित्त रंगीबेरंगी रांगोळीने शनिवारवाड्यापुढील पटांगण खुलले होते. नानासाहेब पेशव्यांच्या हस्ते २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत झाली होती. त्यामुळे २२ जानेवारी हा दिवस शनिवारवाड्याचा वर्धापनदिन म्हणून साजरा करण्यात येतो. ब्रिटिशांनी भारत सोडताना शनिवारवाड्याचे दरवाजे बंद केले होते. एरव्ही १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि एक मे या तीन दिवशी ध्वजवंदनासाठी वाड्याचे दरवाजे उघडण्यात येतात; मात्र त्या वेळी पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. हा अपवाद वगळता इतर वेळी वाड्याचे दरवाजे कायमस्वरूपी बंद असतात.
या पार्श्वभूमीवर, २२ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सकाळी नऊ वाजता शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. काही वेळ हा दरवाजा खुला ठेवण्यात आला. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे या वेळी पूजन करण्यात आले. इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा यांच्यासह इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते. उघडलेल्या दरवाज्यातून वाड्यात प्रवेश करण्याची ही दुर्मीळ संधी घेऊन इतिहासप्रेमींनी वेगळ्या नजरेने शनिवारवाडा अनुभवला.
(शनिवारवाड्याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)