Ad will apear here
Next
रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी
भाट्ये खाडीत टिपलेले सूर्यास्ताचे विहंगम दृश्य

रत्नागिरी : रम्य कोकणातील रमणीय रत्नागिरी आणि आसपासचा परिसर पाहून हरखून जाणाऱ्या पर्यटकांना आता तेथील निसर्गसौंदर्याचा आणखी आस्वाद घेता येणार आहे. उंच कड्यावरून खाली अथांग पसरलेल्या समुद्राकडे झेप घेता येणाऱ्या ‘सी-व्हॅली क्रॉसिंग’पासून समुद्राखालच्या रंगीबेरंगी दुनियेचे दर्शन घडविणाऱ्या स्कूबा डायव्हिंगपर्यंतच्या विविध साहसी खेळांचे पर्याय रत्नागिरीत उपलब्ध झाले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीला ‘मँगो पर्यटन सिटी’ अशी नवी ओळख मिळवून दिली जाणार असून, त्यासाठी पर्यटन क्षेत्रात काम करत असलेले काही तरुण आणि त्यांच्या संस्था एकत्र आल्या आहेत. त्यांनी ‘मँगो सिटी रत्नागिरी पर्यटन भरारी’ नावाने गट स्थापन केला आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या उपक्रमाला भक्कम पाठिंबा दिला आहे.

सी-व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, स्कूबा डायव्हिंग, पॅरामोटरिंग, केव्हिंग (किनाऱ्याजवळच्या गुहेतील थरारक सैर), बॅकवॉटरमध्ये नौकाविहार अशा साहसी खेळांसह प्राचीन कोकणाचे दर्शन घडविणाऱ्या म्युझियमचाही यात समावेश आहे. ‘लाँग वीकेंड’निमित्त रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होऊन त्यांनी रत्नागिरीत थांबावे आणि त्यातून पर्यटन वाढावे, महसूल मिळावा, रोजगारनिर्मिती व्हावी ही यामागची संकल्पना आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या २६ जानेवारीच्या ‘लाँग वीकेंड’च्या आधी या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमात सहभागी असलेल्या काही घटकांशी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने संवाद साधला.

नगराध्यक्षांची भूमिका...

राहुल पंडितया उपक्रमाची माहिती देताना रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित म्हणाले, ‘रत्नागिरीत २०१७मध्ये आम्ही पहिला पर्यटन महोत्सव साजरा केला. या महोत्सवात रत्नागिरीकरांना न पाहिलेली रत्नागिरी पाहायला मिळाली. २०१८मध्ये ‘लाँग वीकेंड्स’ना येणाऱ्या पर्यटकांना विविध गोष्टी पाहायला मिळाव्यात आणि साहसी उपक्रम अनुभवता यावेत, यासाठी आमच्या टीमने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यात व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, स्कूबा डायव्हिंग, पॅरामोटरिंग, केव्हिंग, जलविहार अशा विविध गोष्टींचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. रत्नागिरीत पर्यटन वाढावे आणि पर्यायाने रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी ही सगळी मंडळी एकत्र आली आहेत. रत्नागिरी नगरपालिका त्यांच्यामागे ठामपणे उभी आहे. रत्नागिरीची आर्थिक उलाढालही यामुळे वाढणार आहे.’

गुहेत फेरफटका

ऐतिहासिक गुहेत सैर...

गुहेच्या सफरीबद्दल ‘रत्नदुर्ग माउंटेनीअर्स’चे गणेश चौगुले यांनी माहिती दिली. ‘रत्नदुर्ग म्हणजेच भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी एक नैसर्गिक गुहा आहे. गुहेचे तोंड अतिशय लहान असले, तरी आत गेल्यावर आपल्याला सरळ उभे राहता येते. गुहेत प्रवेश केल्यानंतर १० ते १५ फूट खाली गेल्यानंतर सुमारे पाच ते १० फुटांचे सरपटत जावे लागते. त्यानंतर सुमारे १० फूट उंचीचा दगड आहे. हा दगड चढून दोरखंडाच्या जिन्याने खाली उतरल्यानंतर सव्वादोनशे फुटांचा पाण्याचा प्रवाह चालू होतो. गुहेची लांबी एकूण ३०० फूट आहे. सव्वादोनशे फुटांचा प्रवास केल्यानंतर शेवटी गुहेचे तोंड बंद होते. तिथूनच आपला परतीचा प्रवास करावा लागतो. गुहेत वटवाघळे आणि इतर निशाचरांचे वास्तव्य आहे. काही ठिकाणी ब्लाइंड फिश (अंध मासे), अल्बिनो दिसतात. आम्ही यापूर्वी अनेक गुहा पाहिल्या आहेत, अभ्यासल्या आहेत. त्या गुहांमध्ये प्राणवायूच्या तुटवड्यामुळे गुदमरायला व्हायचे; मात्र या गुहेमध्ये मुबलक प्रमाणात प्राणवायू असल्याने ही गुहा आम्ही पर्यटकांसाठी खुली केली आहे. २००३पासून आमचे सदस्य आणि पर्यटक नियमितपणे गुहेत जात आहेत. गुहेत जाताना आम्ही पर्यटकांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेतो. प्रत्येकाला हेल्मेट आणि लाइफ जॅकेट घातले जाते. गुहेत जाण्याच्या सगळ्या मार्गावर कृत्रिम खिळे ठोकून दोरखंडाच्या साह्याने ते बसविले आहेत. तसेच आतमध्ये सर्व ठिकाणी मंद प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे.’

थरारक सी व्हॅली क्रॉसिंग

सी-व्हॅली क्रॉसिंग

गुहेची सफर आणि सी-व्हॅली क्रॉसिंग हे उपक्रम रत्नदुर्ग माउंटेनीअर्स आणि जिद्दी माउंटेनीअरिंग यांच्यातर्फे राबविले जातात. ‘सी-व्हॅली क्रॉसिंग’बद्दल रत्नदुर्ग माउंटेनीअर्सचे जितेंद्र शिंदे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘२००७ पासून ‘रत्नदुर्ग’मार्फत ‘व्हॅली क्रॉसिंग’ची सुविधा दिली जाते. त्याला पर्यटकांचाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी शहराजवळील भाट्ये येथून ‘सी-व्हॅली क्रॉसिंग’ केले जाते. समुद्रापासून २५० फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणावरून समुद्राची अथांगता पाहत ९०० फूट अंतराच्या ‘व्हॅली क्रॉसिंग’चा थरार अनुभवता येतो. ‘रत्नदुर्ग’च्या ११ सभासदांनी ‘मिम’ या नामांकित गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेचे पायाभूत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. नेत्रा राजेशिर्के यांनी अॅडव्हान्स प्रशिक्षणही पूर्ण केले आहेत. त्यामुळे या थराराचा अनुभव देतानाच पर्यटकांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते.’

प्राचीन कोकण
कोकणातील बारा बालुतेदारांचा जीवनपट उलगडून दाखवणारे प्राचीन कोकण हे अनोखे म्युझियम गणपतीपुळे येथे आहे. म्युझियमची माहिती वैभव सरदेसाई यांनी दिली. ते म्हणाले, ‘रत्नागिरीत प्रथमच अशा प्रकारचा हा उपक्रम राबवला जात आहे आणि तो खूप चांगला आहे. ‘गणपतीपुळे देवस्थानापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर यांचा तीन एकर परिसरात उभारलेला प्राचीन कोकण हा प्रकल्प एका गावाप्रमाणे आहे. या गावात प्रवेश करण्यापूर्वी एक गुहा लागते. ही गुहा म्हणजे काळाचे प्रतीक असून, आपण वर्तमानकाळातून भूतकाळात प्रवेश करतो. यात ५०० वर्षांपूर्वीचे कोकण, तेथील जीवनपद्धती, रोजगार, संस्कृती यांचे दर्शन घडविणाऱ्या मूर्ती/प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या गावाचे स्वतंत्र ग्रामदैवत आहे. खोताचे घर आहे, गवताचे छप्पर असणारे शेतकऱ्याचे घर आहे. येथे देवराई ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला असून, १७०हून अधिक झाडांची लागवड केली आहे. त्यांची मराठी, इंग्रजी नावे आणि त्यांची आयुर्वेदीय माहितीही दिली आहे. तसेच नक्षत्रबागेची संकल्पनाही राबवली आहे. समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या १६०हून अधिक शंख-शिपल्यांचे प्रदर्शनही येथे पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक वेगळा अनुभव आहे.’

नौकाविहार
‘सुशेगाद जलविहार’ यांच्यातर्फे बॅकवॉटरमध्ये नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘सुशेगाद’चे कौस्तुभ लिमये म्हणाले, ‘२०१० पासून ‘सुशेगाद’मार्फत जलविहार सेवा सुरू करण्यात आली आहे. कर्ला जेट्टी येथून सुरू होणारी ही जलसफर साधारण चार तासांची असते. सफर सुरू झाल्यानंतर कर्ला येथून काही अंतरावर असलेल्या जुवे गावाजवळ ही बोट थांबते. तेथे असलेले दत्ताचे पुरातन मंदिर आणि पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या चुन्याच्या भट्ट्या पाहायला मिळतात. बोट जसजशी पुढे जाते, तसतसे आपल्याला खारफुटी आणि चिपीची बेटे आणि तेथे स्वच्छंद विहार करणारे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. पक्षीमित्रांसाठी ही एक पर्वणीच आहे. हे सर्व न्याहाळत ही बोट चिंचखरी गावातील दत्त मंदिराजवळ थांबते. बोटीतून उतरून १० मिनिटांच्या कच्च्या रस्त्याने चालत गेल्यानंतर पुरातन दत्त मंदिर पाहायला मिळते. तेथे काही काळ थांबल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतो. येताना बोट काही काळ पाण्यात उभी केली जाते. त्यामुळे जलविहाराचा आनंद पर्यटकांना लुटता येतो.’

स्कूबा डायव्हिंग
रत्नागिरीत नव्यानेच सुरू झालेल्या स्कूबा डायव्हिंग या समुद्रातील साहसी क्रीडाप्रकाराची माहिती ‘हर्षा स्कूबा डायव्हिंग’चे महेश शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, ‘नव्यानेच सुरू केलेल्या या केंद्राला अल्पावधीतच पर्यटकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे, मुंबई, नागपूरपासून ते अगदी जळगाव, जालना अशा ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांना स्कूबा डायव्हिंगचा लाभ घेता येतोय. यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणे घेतली आहेत. येथे असलेले डायव्हर्सही ‘पॅडी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र घेतलेले आहेत. डायव्हिंगला जाण्याच्या आधी बोटीत पर्यटकांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातात; तसेच पाण्यातही त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते.’

पॅरामोटरिंग

त्याशिवाय गणपतीपुळ्याजवळच्या मालगुंड किनाऱ्यावर पॅरामोटरिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, त्यामुळे पक्ष्याप्रमाणे आकाशात विहार करत निसर्गसौंदर्य न्याहाळता येते. या सर्वांसह सुहास ठाकूरदेसाई, सचिन देसाई, धीरज पाटकर, राजा घाडीगावकर, प्रशांत परब, भाई रिसबूड, वीरेंद्र वणजू यांचाही या गटात समावेश आहे. एकंदरीत, रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांना या उपक्रमांमुळे एक अविस्मरणीय सहल अनुभवता येणार आहे.

(या सर्व प्रकारांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZOHBK
Similar Posts
रत्नदुर्ग किल्ल्यावर मुलांनी गिरवले धाडसाचे धडे रत्नागिरी : गिर्यारोहण क्षेत्रात रत्नागिरीत कार्यरत असलेल्या रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या संस्थेने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने संस्थेने मुला-मुलींसाठी रत्नदुर्ग किल्ल्यावर तीन दिवसांच्या साहसी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण शिबिरात स्थानिक मुला-मुलींसह मुंबई,
रत्नागिरीतील भाट्ये पुलावरून झिपलाइन, रॅपलिंग रत्नागिरी : महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून, दोन ऑक्टोबर २०१८ रोजी रत्नदुर्ग माउंटेनीअर्स संस्थेने रत्नागिरीतील भाट्ये पुलावरून झिपलाइन व रॅपलिंग या दोन साहसी क्रीडा प्रकारांचे आयोजन केले होते. रत्नागिरीतील पर्यटनवाढीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता
रत्नागिरीत ‘झिपलाइन’ला मुलांचा प्रतिसाद रत्नागिरी : रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या संस्थेतर्फे प्रजासत्ताकदिनी भाट्ये पुलावरून भाट्ये किनार्‍यापर्यंत झिपलाइन या गिर्यारोहणातील साहसी क्रीडा प्रकाराचे आयोजन केले. संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त संस्थेने अनेक साहसी उपक्रम हाती घेतले आहेत.
ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार रत्नागिरी : ‘नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने २०१२ साली घेतला होता. तो बदलून आता नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल,’ असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित करण्यात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language