पुणे : ‘इंदिरा संत अर्थात आक्का म्हणजे प्रतिभेची वीज अंगी बाळगून अनुभवाचे दाह सोसत त्याचे चटके बाहेर येऊ न देता कवितेची फुले देणारे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. आयुष्यातील कटू अनुभवांनी त्यांनी आपले अंतर्जीवन कधी गढूळ होऊ दिले नाही. अशा असामान्य प्रतिभेच्या सासूबाईंना माणूस म्हणून समजून घेऊन, एका सुनेने नव्हे, तर व्यक्तीने रेखाटलेले चित्र म्हणजे ‘आक्का मी आणि ...’ हे पुस्तक आहे. नातेसंबंधांकडे बघण्याची नवी दृष्टी यातून मिळते. आक्कांना समजून घेण्यासाठी आणखी एक दस्तऐवज यामुळे निर्माण झाला आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी पुण्यात केले.
‘महाराष्ट्र शारदा’ म्हणून ओळख असलेल्या प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांच्या सहवासातील आठवणींवर त्यांच्या स्नुषा वीणा संत यांनी लिहिलेल्या ‘आक्का, मी आणि....’ या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन रविवारी (११ ऑगस्ट) अरुणा ढेरे यांच्या हस्ते सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व झी वृत्तसमूहाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर उपस्थित होते. या वेळी लेखिका वीणा संत, त्यांचे पती रवींद्र संत, ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, संचालिका सुप्रिया लिमये, गौरी बापट, सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ व्यासपीठावर उपस्थित होते.
अरुणा ढेरे म्हणाल्या, ‘इंदिरा संत अर्थात आक्का यांच्याशी माझा अनेक वर्षांचा स्नेह होता. त्यामुळे अनेकदा त्यांच्या भेटी होत. सहजपणा हे आक्कांचे कवचकुंडल होते. त्यामुळेच साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न मिळणे त्यांनी ज्या सहजपणे स्वीकारले त्याच सहजपणे जनस्थान पुरस्कार मिळाल्याचा आनंदही स्वीकारला. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत त्या आनंद मानत असत. अनेक लोक त्यांनी जोडले होते. आपल्याकडे येणाऱ्या स्त्रीला साडी देणे त्यांना फार आवडायचे. तीच परंपरा वीणानेही जपली आहे. पशु, पक्षी, प्राणी, झाडे, फुले यांच्याबद्दलल त्यांना अतीव प्रेम होते. त्यामुळे दुर्गाबाई भागवत या अगदी विरोधी प्रकृतीच्या असूनही आक्कांचे आणि त्यांचे मैत्र जुळले होते. दोघी एकमेकींना पत्रातून प्राणी, पक्षी, निसर्गाबद्दल लिहायच्या.’
‘आक्कांनी आयुष्यात अनेक दुःखे भोगली; पण त्याचा कडवटपणा त्यांच्या वागण्यात कधीच उतरला नाही. त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींबाबतही नाही. त्यांच्या वागण्यातील सहजता कायम राहिली. वीणाने हे सर्व अनुभवले. आई, सासू, कवयित्री अशी त्यांची अनेक रूपे बघितली. फक्त एक सून म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून आपल्या असामान्य प्रतिभेच्या सासूबाईंना समजून घेऊन, एक व्यक्ती म्हणून आक्कांचे खरे चित्र तिने शब्दबद्ध केले आहे. आतापर्यंत आपल्याकडे इंदिरा संत यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी
त्यांच्या कविता आणि
‘मृद्गंध’ हे दोनच मार्ग होते. या पुस्तकाच्या रूपाने आता आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. ३५ वर्षांच्या सहवासात आक्कांच्या आठवणी, त्यांच्या आजूबाजूला वावरणारी माणसे, त्यांच्या प्रतिक्रिया असे असंख्य तपशील यात आहेत. मुख्य म्हणजे तो काळ यात उतरला आहे. अकृत्रिम साधेपणाने हे लिहिले असून, यात कोणावरही दोषारोप नाही. ‘थोड्याशा आईच्या रूपात त्या माझ्यात सामावल्या आहेत,’ असे वीणाने यात म्हटले आहे. हे सामावून घेणे खूप सुंदर आहे. ते या पुस्तकातून दिसून येते. त्यामुळे हे पुस्तक एकदा वाचायला घेतले की बाजूला ठेववत नाही,’ असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या.
या वेळी पुस्तकाच्या लेखिका वीणा संत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘एका पुस्तकात आक्कांबद्दलचे अनुदार उद्गार, विपर्यस्त माहिती देण्यात आली होती. त्यामुळे माझ्या पतींना आणि मला अतीव दुःख झाले. ही तगमग कशाने कमी करता येईल, याचा विचार केला. आपल्याला त्या जशा दिसल्या त्याचे यथार्थ चित्र आपण मांडले, तर मनाला शांतता वाटेल, या उद्देशाने हे पुस्तक लिहिले,’ अशा शब्दांत पुस्तक लेखनाबाबतची आपली भूमिका त्यांनी मांडली.
‘इंदिरा संत यांचे पुण्याशी असलेले घट्ट नाते, आपलीही नाळ पुण्याशी जोडली गेली असल्याने आणि इंदिरा संत यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते पुण्यात या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे ही तीव्र इच्छा असल्याने हा प्रकाशन सोहळा येथे आयोजित केला,’ असेही वीणा संत यांनी नमूद केले.
ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी आपल्या खास शैलीत खुमासदार भाषण केले. ते म्हणाले, ‘इंदिरा संत अर्थात आक्का यांचे बहुपेडी व्यक्तिमत्त्व वीणा संत यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. अनेक कटू अनुभवानंतरही आक्कांची कविता जिवंत राहिली. बाह्य जीवनातील आघातांनी ती गढुळली नाही. चिरेबंदी लेखन काय असते, हे इंदिरा संत यांच्या ‘मृद्गंध’मधील लेखांमधून पाहायला मिळते. अनेक चटके सोसूनही आपला साधेपणा कायम ठेवणाऱ्या आक्कांचे अंतरंग वीणाताईंनी एक व्यक्ती म्हणून जाणून घेतले आणि अगदी मनापासून त्यांनी ते या पुस्तकात उतरवले आहे.’
इंदिरा संत यांचा काळ, त्या काळातील व्यक्ती, त्यांची मूल्ये याबाबतच्या आठवणी कुवळेकर यांनी सांगितल्या. खास पुणेरी शैलीतील त्यांचे भाषण ऐकताना हशे आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता. इंदिरा संत यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या रसिक वाचकांनी सभागृह फुलून गेले होते. इंदिरा संत यांची भाची गीतांजली जोशी (ना. सी. फडके यांची कन्या) यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया लिमये यांनी आभार प्रदर्शन केले.
इंदिरा संत यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला बेळगावमध्ये १२ जुलैला प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ पत्रकार व झी वृत्तसमूहाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर, प्रा. माधुरी शानभाग यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.
(‘आक्का, मी आणि...’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)
(इंदिरा संत यांच्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा. इंदिरा संत यांच्या ‘रक्तामध्ये ओढ मातीची’ या कवितेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘दारा बांधता तोरण’ या कवितेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांची ‘गवतफुला रे गवतफुला’ ही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)