कोट : ‘साहित्य संमेलने केवळ साहित्यापुरतीच मर्यादित नसतात, तर संस्कृतीशीही निगडित असतात. संस्कृती लोकांसमोर आणण्याचे काम ही संमेलने करतात. पुस्तके आणि साहित्याचे विविध प्रकार ग्रामीण भागातील नागरिक आणि मुलांपर्यंत संमेलनाच्या माध्यमातून पोहोचतात. त्यामुळेच साहित्याकडे पावले वळवण्याचे आणि लोकांमधून आस्वादक घडविण्याचे काम संमेलने करतात. म्हणूनच ग्रामीण साहित्य संमेलने महत्त्वाची आहेत,’ असे विचार लांजा येथील कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राहुल मराठे यांनी मांडले. कोट (ता. लांजा. जि. रत्नागिरी) येथे भरलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनात ते बोलत होते.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ गाव लांजा तालुक्यातील कोलधे (तांबे) असून, तिचे सासर कोट या गावी (नेवाळकर) आहे. या गावातच आयोजित करण्यात आलेले पाचवे ग्रामीण साहित्य संमेलन दोन आणि तीन फेब्रुवारी २०१९ रोजी पार पडले. मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि कोट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील साहित्य चळवळ वाढीला लागावी, या हेतूने गेली पाच वर्षे मुंबईच्या राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाकडून या दोन तालुक्यांतील विविध गावांमध्ये संमेलने भरवली जात आहेत. यंदा हे संमेलन झाशीच्या राणीच्या गावात आयोजित करण्यात आले आणि राणीलाच समर्पित करण्यात आले होते. या गावात राणीचे स्मारक व्हावे, अशी गावकऱ्यांची बऱ्याच वर्षांची मागणी असून, ती मागणी पुन्हा एकदा अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या गावात हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. गजानन वाघदरे हे संमेलनाचे अध्यक्ष, तर राणी लक्ष्मीबाईंचे वंशज राजू नेवाळकर हे स्वागताध्यक्ष होते.
मुंबईच्या राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुभाष लाड हे या संमेलनाचे संयोजक होते, तर रवींद्र हांदे आणि किरण बेर्डे यांनी संयोजनात साह्य केले. कोटचे माजी सरपंच आबा सुर्वे यांनी हे संमेलन गावात करण्यासाठी संघाला निमंत्रण दिले. त्यांच्यासह कोटचे विद्यमान सरपंच संजय पाष्टे, तसेच राजू नेवाळकर, मिलिंद पाध्ये, प्रकाश बाईत या सर्वांनी संमेलनाचे नियोजन केले होते.
‘ग्रामीण भागातून नवे साहित्यिक घडावेत’संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांच्या हस्ते झाले. ‘ग्रामीण भागातील साहित्य संमेलनाचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. अखिल भारतीय स्तरांवरील संमेलनांमध्येही जे मिळणार नाही, ते या संमेलनात मिळेल, असे कार्यक्रम पाहून वाटते. कारण मोठ्या संमेलनांमध्ये उत्सव होतो, साहित्यासाठीच्या गोष्टी ग्रामीण संमेलनांमध्ये खूप घडू शकतात. या संमेलनातील पुस्तके, शस्त्रे, चित्रे, छायाचित्रे यांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने गावातील लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या आहेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे,’ असे ते म्हणाले. या संमेलनातून ग्रामीण भागातील नवे, चांगले साहित्यिक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गजानन वाघदरे यांनी लिहिलेल्या ‘क्रौंच’ या कथासंग्रहाचे, तसेच नागेश साळवी यांच्या ‘मोहोर’ या कवितासंग्रहाचे, तसेच संमेलनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘पत्रिका’ या स्मरणिकेचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रकाश हर्चेकर आणि विजय हटकर यांनी या स्मरणिकेचे संपादन केले आहे.
‘संमेलन गावपातळीवर आयोजित केल्यामुळे एक प्रकारे मराठी भाषेचा, बोलीचा सन्मान वाढवला जात आहे. शहरांपासून दूर गावकुसात राहणाऱ्या साहित्यप्रेमींना, कवी-लेखकांना यामुळे प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळणार आहे. राजापूर-लांजा नागरिक संघाने कोणतेही शासकीय अनुदान न घेता ग्रामीण पातळीवर ही संमेलने यशस्वीरीत्या पार पाडली आहेत, ही मोलाची बाब आहे,’ असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष गजानन वाघदरे यांनी केले.
‘राणीचे स्मारक व्हावे, ही गावकऱ्यांची इच्छा’कोट गावचे सरपंच संजय पाष्टे यांनी गावात राणीचे स्मारक होण्याची गावकऱ्यांची अनेक वर्षांची इच्छा असल्याचे सांगितले. सगळ्या गावकऱ्यांच्या कष्टातूनच हे संमेलन उत्तमपणे आयोजित केले गेले आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘वीज म्हणाली धरतीला’संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांनी झाशीच्या राणीच्या आयुष्यावर लिहिलेल्या ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकाच्या संपादित अंशाचे अभिवाचन पहिल्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आले होते. अत्यंत प्रभावीपणे सादर झालेल्या या अभिवाचनाला उपस्थितांची दाद मिळाली. ‘कलांजली, पुणे’ प्रस्तुत असलेल्या या कार्यक्रमात अंजली लाळे, संज्ञा कुलकर्णी, वैशाली कानसकर आणि मधुरा शहाणे-बेडेकर यांनी अभिवाचनातून राणीचा इतिहास डोळ्यांसमोर उभा केला.
(‘वीज म्हणाली धरतीला’ या पुस्तकासाठी येथे क्लिक करा.) (या अभिवाचनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
उलगडला डॉ. श्रीकृष्ण जोशींचा लेखनप्रवाससंध्याकाळच्या सत्रात विविध मान्यवरांची व्याख्याने झाली. त्या वेळी रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी त्यांचा लेखनप्रवास उलगडला. लांजा तालुक्यातील हरचिरी या छोट्या गावात जन्म होऊनही त्यांनी स्वतःतील लेखकाला ओळखले, स्वतःला साहित्यिक म्हणून घडविले आणि उत्तम कामगिरी केली. त्यांनी जवळपास ३५ पुस्तकांचे लेखन केले असून, त्यात कोकणातील पार्श्वभूमीवरच्या, तसेच त्यांनी शिक्षकी पेशात अनुभवलेल्या अनेकविध गोष्टींच्या आधारे फुलवलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या शेंबी, कातळ, मानसकोंड यांसारख्या अनेक कादंबऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक संगीत नाटकेही लिहिली असून, ‘संगीत शांतिब्रह्म’सारख्या काही नाटकांना तर राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी रत्नागिरी आकाशवाणीसाठीही श्रुतिका, नभोनाट्यांसह विपुल लेखन केले असून, १९९६मध्ये त्यांच्या ‘डेथ ऑफ कॉमन सेन्स’ या नभोनाट्याला अखिल भारतीय स्तरावरील पारितोषिकही मिळाले होते. हा सगळा प्रवास त्यांनी उलगडला आणि नव्या लेखकांसाठी मार्गदर्शनपर अनेक गोष्टीही त्यांनी सांगितल्या.
‘अगदी शाळेत असल्यापासूनच मी कविता करायचो. पुढे त्यातील काही साप्ताहिक नवकोकणमध्ये छापूनही आल्या. स्वामी स्वरूपानंदांवर मी अभंग वृत्तात लिहिलेल्या कवितेला त्यांच्याकडून आशीर्वाद मिळाला होता. आमच्या घरात वाङ्मयीन वातारण होते. माझी आई फारशी शिकलेली नव्हती, तरीही तिच्या बोलण्यातून, तसेच वडिलांशी होणाऱ्या चर्चेतून नवे विषय मिळायचे आणि लेखन घडायचे. मी खूप पाहिले, ऐकले आणि त्याचाही लेखनासाठी खूप मोठा हातभार लागला. आपण समाजात वावरताना डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले, तर अनेक गोष्टी पाहता येतात, त्यातून कथानके घडत असतात. लेखकाने ती टिपायची असतात, त्याच्या साच्यात बसवायची असतात. लेखकाने स्वतःला घडवायचे असते आणि कायम जमिनीवर राहायचे असते. वेगवेगळे अनुभवही त्याला घडवत असतात. लेखकाला कंटाळा करून चालत नाही. त्याने समाजात जे काही वावगे घडते आहे, ते मांडण्यासाठी लिहायला हवे. पुस्तके तर वाचायला हवीतच, पण माणसेही वाचायला हवीत, अनुभवविश्व समृद्ध करायला हवे,’ असे डॉ. श्रीकृष्ण जोशी म्हणाले.
‘मी स्वतः छोट्या संमेलनांचा पुरस्कर्ता आहे. कारण त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात,’ असे प्रतिपादनही त्यांनी केले.
ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज‘ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज’ या विषयावर लांज्यातील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राहुल मराठे यांनी विचार व्यक्त केले. ‘ग्रामीण भागातील संस्कृती पुढे आणण्याचे साहित्याकडे पावले वळवण्याचे आणि लोकांमधून आस्वादक घडविण्याचे काम संमेलने करतात. म्हणूनच ग्रामीण साहित्य संमेलने महत्त्वाची आहेत. समाजातील अन्याय शोधून काढण्याची जबाबदारी लेखकाची असते. संवेदनशील कथांमधून त्याचे चित्रण झाल्यास त्याचा प्रभाव पडतो. कथा ज्या ठिकाणी संपते, तिथून ती वाचकाच्या मनात सुरू होते. कथांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन विकसित करण्याचे काम ही संमेलने करतात. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण जीवन मांडले. त्यांच्या निरीक्षणांतून मानवी भावनांचे व्यामिश्र दर्शन होते. ग्रामीण भागातील माणसे कोणताही आडपडदा न ठेवता वागतात. इरसाल नमुने गावखेड्यातच पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचे चित्रण ग्रामीण कथांच्या माध्यमातून लोकांसमोर यायला हवे. त्यासाठीचे व्यासपीठ ग्रामीण साहित्य संमेलनातून उपलब्ध होऊ शकते. साहित्य ही फक्त पुस्तकात बंद करून ठेवण्याची गोष्ट नसून, आस्वाद घेण्याची गोष्ट आहे. आस्वादक तयार होण्याचे काम या संमेलनांतून घडते. अस्तित्व विसरण्याची ताकद साहित्यात असते आणि साहित्य आस्वादनाची प्रक्रिया तिथूनच सुरू होते. साहित्य अभिवाचन किंवा अन्य विविध माध्यमांतून संमेलनातून सादर होते. या संमेलनांमुळे लोकांचे कान तयार होतात. साहित्याच्या प्रकारांची चर्चा होते. नव्या लोकांना व्यासपीठ मिळते,’ असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘मुले शहरात असल्यामुळे गावात आई-वडील एकटे असणाऱ्या घरांची संख्या अधिक आहे. एकटेपणामुळे कोकणातील गावांची अवस्था सध्या बिकट झाली असून, मोबाइलमुळे कुटुंबव्यवस्था कोलमडली आहे. वाचकवर्ग कमी होतोय आणि मोबाइलला जास्त वेळ दिला जातोय. अशा स्थितीत मुलांना, लोकांना पुस्तकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही ग्रामीण साहित्य संमेलने करतात. त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करतात,’ असे ते म्हणाले. ‘कोकणातील श्रद्धा, अंधश्रद्धा, परंपरा सांगणाऱ्या कथांचे वर्तमान, वैज्ञानिक संदर्भ शोधायला हवेत आणि त्यातून नवे जगण्याची प्रेरणा, दिशा मिळायला हवी,’ असा विचारही त्यांनी मांडला.
अन्य व्याख्याने...
‘महिलांनी उद्योगात गुंतले पाहिजे’ या विषयावर उद्योजिका उल्का विश्वासराव यांचे व्याख्यान झाले. ‘पुरुषांनी व्यवसाय केला, तर एक घर उभे राहते; मात्र स्त्रियांनी उद्योग केला, तर घरातील सर्व मंडळी त्यात येतात. त्यामुळे महिलांनी आपापले व्याप सांभाळून जरूर उद्योग क्षेत्रात यायला हवे. नोकरी करू नये, असे नाही; मात्र उद्योगातून आत्मविश्वास मिळतो, स्वतःच्या पायावर उभे राहता येते’ असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘आईची भूमिका आणि आजची आई’ या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या आणि राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय विचार मंचाच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर यांचे व्याख्यान झाले. मुलांवरील संस्कारात आईचे महत्त्व किती आहे, हे त्यांनी विशद केले.
भाजप जिल्हाध्यक्षांची भेट...माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनीही संमेलनाला भेट देऊन काही कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उपक्रमाचे कौतुक करून, कोट गावी राणी लक्ष्मीबाईंचे स्मारक होण्याच्या दृष्टीने सरकार पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
विविध प्रदर्शनांनी फुलली शाळा...
कोट गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या परिसरात संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनस्थळाला शहीद भानू देवू नारकर साहित्यनगरी असे नाव देण्यात आले होते.
शाळेच्या खोल्यांमध्ये पुस्तके, शस्त्रे, चित्रे आणि छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. व्यास क्रिएशन्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक कवी सुहास आयरे यांच्या हस्ते झाले.
बदलापूर येथील संग्राहक सुनील कदम यांच्या संग्रहातील विविध शस्त्रांचे प्रदर्शनही या वेळी आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन नयनसिंग राजपूत यांच्या हस्ते झाले.
मूळचे कोट येथील असलेले चित्रकार महेश करंबेळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मूळचे कोट गावचे असलेले अभिनेते अनिल सुतार यांच्या हस्ते झाले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ठाकरे’ चित्रपटात सुतार यांनी दादा कोंडके यांची भूमिका केली आहे. लांजा तालुक्यातील वनगुळे येथील पाचवीतील विद्यार्थी शंतनू डिंगणकर आणि लांज्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील सातवीतील विद्यार्थी विप्र मटकर यांनी काढलेली चित्रेही या चित्रप्रदर्शनात ठेवण्यात आली होती. चित्रकार महेश करंबेळे यांची चित्रे इटलीतील मिलान येथील प्रदर्शनातही झळकली आहेत.
लांज्यातील फोटोग्राफी असोशिएशनच्या वतीने छायाचित्र प्रदर्शनाचेही आयोजन संमेलनस्थळी करण्यात आले होते. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन लांज्याच्या न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक गणपत शिर्के यांच्या हस्ते झाले.
रात्रीच्या सत्रात स्थानिक कवींचे कविसंमेलन रंगले. स्नेहल आयरे यांनी कविसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर, भैरवी जाधव हिने ‘भूपाळी ते भैरवी’ हा सुगम संगीताचा कार्यक्रम भैरवी जाधव सादर केला. त्यालाही गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राजू नेवाळकर यांनी घेतलेली दादा कोंडके यांची (म्हणजेच अनिल सुतार यांची) मुलाखतही रंगली.
भव्य ग्रंथदिंडीदोन फेब्रुवारीला सकाळी संमेलनाची सुरुवात भव्य अशा ग्रंथदिंडीने करण्यात आली. त्यात लांज्यातील शिवगंध ढोलताशा पथक सहभागी झाले होते. डॉ. राणी खेडीकर झाशीच्या राणीच्या वेशात दिंडीत सहभागी झाल्या होत्या. कोटच्या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच लांज्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधील एमसीसी, तसेच एनएसएसचे विद्यार्थी-विद्यार्थिनीही यात सहभागी झाले होते. ही दिंडी राणी लक्ष्मीबाईंच्या घराच्या चौथऱ्यापाशी नेण्यात आली. रामोजी फिल्मसिटीमध्ये कार्यरत असलेले संदीप सावंत (मूळ गाव पुनस, ता. लांजा) यांनी बनविलेल्या लक्ष्मीबाईंच्या ब्राँझच्या पुतळ्याचे तेथे अनावरण करण्यात आले. तेथे राणी लक्ष्मीबाईंना वंदन करून, सलामी देऊन ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आली. त्यानंतर ध्वजारोहण होऊन संमेलनाला सुरुवात झाली.
संमेलनाच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक कार्यक्रमदरम्यान, संमेलनाच्या पूर्वसंध्येला एक फेब्रुवारीला रात्री गावातील मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच, नमन या लोककलेच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.
पुरस्कार वितरण
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, तीन फेब्रुवारी रोजी राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे समाजाच्या विविध स्तरांतील नागरिकांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, गृहिणी, कलाकार, महिला सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संस्था कार्यकर्ते, सरकारी कर्मचारी आदींना गौरविण्यात आले. त्या वेळी राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष धोंडू खांडेकर, आमदार राजन साळवी, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, मुंबईतील उद्योजक प्रसाद पाटोळे, लांजा पंचायत समितीचे सभापती संजय नवाथे, मागील संमेलनाध्यक्ष आणि नाटककार दशरथ राणे, आबा सुर्वे, ओणीच्या नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव पाटील, सापूचे तळे येथील कै. रा. सि. बेर्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मुंबईतील उद्योजक अनिल पत्याणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या दोन दिवसांत संमेलनाला हजेरी लावली. प्रकाश हर्चेकर, विजय हटकर आणि विपुल आढाव यांनी दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांचे निवेदन आणि सूत्रसंचालन केले. कोट गावासह आजूबाजूच्या गावातील, लांजा परिसरातील नागरिक संमेलनात सहभागी झाले होते.
(‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकाचे अभिवाचन, ग्रंथदिंडी, संमेलनाध्यक्षांचे भाषण, चित्रप्रदर्शन आदी विविध गोष्टींची झलक दर्शविणारे व्हिडिओ सोबत देत आहोत.)