Ad will apear here
Next
दादा कोंडके, इरोम चानू शर्मिला, अल्बर्ट आइन्स्टाइन
बहुरंगी व्यक्तिमत्त्व असलेले कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके यांचा १४ मार्च हा स्मृतिदिन. तसेच, मणिपूरमधील सामाजिक कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला आणि महान भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा १४ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय... 
........... 
दादा कोंडके
आठ ऑगस्ट १९३२ रोजी दादा कोंडके यांचा जन्म झाला. ‘अपना बाजार’ दुकानात दरमहा साठ रुपये पगारावर कामावर असतानाच दादा कोंडके सेवा दलाच्या बँडमध्ये काम करू लागले. तेथे कलेचा नाद शांत बसू देईना. म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवा दलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली आणि सेवा दलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टायमिंगवर हशा उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवा दलातील काही साथीदारांना पाहवले नाही. 

‘खणखणपूरचा राजा’मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादा कोंडके यांनी स्वतःचा फड उभारला. दादा कोंडके वसंत सबनीसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादा कोंडके यांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. ‘विच्छा’चे १५०० हून अधिक प्रयोग झाले आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे दादा कोंडके यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. 

‘सोंगाड्या’ ही दादा कोंडके यांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खूप गाजला. दादांनी मराठीत एकूण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नव्हती. गीतं, संवाद, लेखनं यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि एक उत्तम माणूस अशी दादा कोंडके यांची ओळख होती. 

मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे दादा कोंडके यांची कारकीर्द. दादांनी प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडवलेदेखील. मराठी चित्रसृष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षांनंतरदेखील तितकीच श्रवणीय आहेत. 
‘एकटा जीव’ हे दादा कोंडके यांच्या जीवनावरील पुस्तक. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रगल्भ, बहुआयामी होतं. पडद्यावरचं त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल, पण दादा पडद्यामागे कसे होते, याची ओळख लेखिका अनिता पाध्ये यांनी या पुस्तकात करून दिली आहे. 

दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी निधन झाले. 
.......... 


इरोम चानू शर्मिला
१४ मार्च १९७२ रोजी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म झाला. त्या मणिपूरमधील सामाजिक कार्यकर्त्या, तसेच कवी आहेत. मणिपूर राज्यात दहशतवाद्यांमुळे अशांत झालेल्या प्रदेशात सैन्याला विशेष हक्क देणारा कायदा. तो मागे घेण्यात यावा या मागणीसाठी इरोम दोन नोव्हेंबर २०००पासून उपोषण करीत होत्या. सलग १६ वर्षे उपोषण करणाऱ्या इरोम चानू शर्मिला या जगातील सर्वात जास्त काळ उपोषण करणाऱ्या व्यक्ती आहेत. १६ वर्षे शर्मिला यांना नाकातून अन्न दिले जात होते. त्यांना मणिपूरची ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखले जाते. 

१६ वर्षांनंतर शर्मिला यांनी उपोषण सोडून राजकारणात येऊन हा प्रश्न सोडवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.; मात्र त्यांना फक्त ९० मते मिळाली. 
......... 
अल्बर्ट आइन्स्टाइन
१४ मार्च १८७९ रोजी दक्षिण जर्मनीतील उल्म या गावात अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्म झाला. त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतामुळे आपल्या विश्वासंबंधीच्या कल्पनेमध्ये अतिशय आमूलाग्र आणि क्रांतिकारक बदल झाला. 

अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणजे हर्मान आणि त्यांची पत्नी पौलिन यांचा पहिला मुलगा. त्याच्या डोक्याचा आकार जर वेगळा होता. इतर मुलांच्या मानाने बोलायला उशीरा लागल्याने त्याच्या आईला तो मतिमंद असावा अशी भीती वाटत असे. इतर मुलांबरोबर खेळ खेळल्यावर मी दमतो अशी तो तक्रार त्याच्या आई जवळ करीत असे. तो खूप शांत आणि एकांत प्रिय होता. मस्ती करण्यापेक्षा वाचन आणि संगीत ऐकणे हा त्याचा छंद होता. अल्बर्ट नेहमी धीरगंभीर पण निश्चयी स्वभावाचा होता. अतिशय एकाग्रतेने तो पत्याचा बंगला बनवीत असे. पण लहानपणी तो शांत असला तरी सहनशील नव्हता. पाच वर्षांचा असताना त्याने रागाच्या भरात त्याच्या शिक्षिकेला खुर्ची फेकून मारली होती. या घटनेचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला आणि निश्चयपूर्वक तो विवेकी बनला. 

अल्बर्ट याचे त्याची बहीण माजा आणि त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होते. आई-वडिलांना आणि बहिणीला त्याने कधीही अंतर दिले नाही. अल्बर्टची आई बुद्धिमान होती. वडील अभियंते होते. अल्बर्टचा भाऊ जेकब आणि त्याच्या वडिलांचा एक कारखाना होता. अल्बर्टच्या वडिलांनी लहानपणी त्याला एक होकायंत्र दिले होते. होकायंत्राची सुई नेहमी उत्तर-दक्षिण दिशाच दाखवते हे लक्षात आल्यावर त्याला खूप कुतूहल वाटले. तो या घटनेने इतका उत्तेजित झाला, की त्याच्या अंगाला कंप सुटला. त्या वेळी तो जेमतेम सहा वर्षांचा होता. त्याला ते सर्व गूढ वाटले आणि गूढ शक्तीची उकल करण्याचा ध्यास त्याने घेतला. काही वर्षांनी गणितातील संख्यांच्या बाबतीतसुद्धा काही तरी गूढ आहे असे त्याला वाटू लागले. गणित आणि विज्ञान याचे आकर्षण वाढले आणि अंधार कसा पडतो? सूर्याचे किरण कशाचे बनलेले आहेत, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तो शोधण्याचा प्रयत्न करू लागला. यासंबंधी प्रश्न विचारून तो त्याच्या वडील आणि काकांना भंडावून सोडत असे. 
अल्बर्ट शाळेतल्या इतर मुलांबरोबर रमत नसे; पण अभ्यासात तो खूप हुशार होता. त्याचा वर्गात नेहमी पहिला नंबर येत असे.

अल्बर्टच्या आई-वडिलांनी कारखान्यात खोट आल्याने म्युनिचमधील आपला व्यवसाय गुंडाळला आणि ते इटलीला गेले. अल्बर्ट शिक्षण पूर्ण करण्यासाठी जर्मनीतच राहिला. परंतु वयाच्या १७व्या वर्षी लष्करात भरती व्हावे लागेल म्हणून त्याने जर्मनी सोडली आणि तो आपल्या आई-वडिलांकडे इटलीला गेला. अल्बर्टला युद्ध, रक्तपात, हिंसा हे अत्यंत पाप आहे असे वाटे. त्याच्या मनात दुसऱ्याला मारणाऱ्या लोकांबद्दल घृणा उत्पन्न झाली. अल्बर्ट पदवीधर झाल्यावर नोकरी शोधत होता. जवळ जवळ वर्षभर त्याला नोकरी मिळाली नाही. शेवटी एका शाळेत त्यास शिक्षकाची हंगामी नोकरी मिळाली. त्याला ती नोकरी प्रथम आवडली नव्हती पण नंतर त्याला शिक्षकी पेशा आवडू लागला. अध्यापन करताना त्याने आपले संशोधनाचे कार्य सुरू ठेवले. 

अल्बर्टच्या विज्ञान विषयाच्या कल्पना भन्नाट असायच्या. तो नियतकालिकांतून लेख लिहायचा. १९०१मध्ये त्याने झुरिच विद्यापिठात पीएचडीसाठी पाठवलेला प्रबंध झुरिच विद्यापीठाने नाकारला. अल्बर्ट निराश झाला; पण ऐन वेळी त्याचा जिवलग मित्र मार्सेल ग्रोसमान त्याच्या मदतीला धावून आला. त्याचे वडील स्वित्झर्लंडमधील बडे प्रस्थ होते. त्यांनी बर्न शहरातील आपल्या मित्राकडे अल्बर्ट ची शिफारस केली. ते संशोधनाच्या पेटंट देणा-या कार्यालयाचे प्रमुख होते. १९०२ मध्ये अल्बर्टला त्या संस्थेत नोकरी मिळाली. स्विस संशोधकांनी पेटंट मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची नोंदणी आणि छाननी ही संस्था करीत असे. या संस्थेत अल्बर्ट तंत्र विषयक तज्ज्ञ तिसरा वर्ग (कनिष्ठ) म्हणून नोकरीला लागला. या कार्यालयात अल्बर्ट आइन्स्टाइनला तंत्रविषयक सल्लागार (दुसरा वर्ग) अशी पदोन्नती मिळाली. ते काम करताना त्याला स्वतःचे संशोधन करण्यासाठी खूप वेळ मिळू लागला. याच अल्बर्ट आइन्स्टाइन याने नंतरच्या काळात जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताने संपूर्ण जगाचे लक्ष त्याने वेधून घेतले. 

E = mc² उर्जा =वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग, हे अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे जगप्रसिद्ध सूत्र. कोणतीही गोष्ट प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जात नाही, हे या सूत्राने स्पष्टपणे दाखवून दिले. अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी न्यूटनचा निरपेक्ष काळाचा सिद्धांत मोडीत काढला, गणिताच्या आधारे ते सिद्ध केला. 

संत ज्ञानेश्वर यांना जसा धर्ममार्तंड लोकांचा विरोध सहन करावा लागला, तसाच अल्बर्ट आइन्स्टाइन यांना तो सहन करावा लागला. 

जर्मनी ही श्रेष्ठ आर्य वंशाच्या लोकांची भूमी असून ज्यू, जिप्सी, किवा अन्य कोणत्याही धर्माच्या लोकांना जर्मनीत राहता येणार नाही असा फतवा हिटलर ने काढला. अनेक ज्यू लोकांनी तेथून पळ काढला तर अनेक भूमिगत झाले. या नाझी वादाशी मुकाबला करण्यासाठी अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी आपले सारे वैज्ञानिक ज्ञान वापरले. १९३९ साली त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांना पत्र लिहिले. अणुशक्तीवर आधारित शस्त्रे तयार करणे शक्य आहे हे त्यांनी रुझवेल्ट यांना सांगितले. १९४१ साली रुझवेल्ट यांनी त्यांच्या सरकारी शास्त्रज्ञ समूहाला अणुबॉम्ब तयार करण्यास सांगितले. १९४३ साली आइन्स्टाइन यांची अतिशय उच्च दर्जाच्या स्फोटकविषयक सल्लागार समितीचा प्रमुख म्हणून अमेरिकेने नेमणूक केली. जर्मनांना अणुबॉम्ब तयार करता येणार नाही याची पुसटशी जरी कल्पना मला असती, तरी अणुबॉम्ब तयार करा असे मी अमेरिकेला सुचवले नसते असे निराश उद्गार आइन्स्टाइन यांनी नंतर काढले होते. 

खरे तर आइन्स्टाइन हे शांततेचे भोक्ते होते. त्यांना रक्तपात आवडत नसे म्हणूनच दुसऱ्या महायुद्धानंतर आइन्स्टाइन यांनी, ज्या देशांनी अण्वस्त्रे बनवली होती त्या त्या देशांनी ती नष्ट करावीत यासाठी जोरदार मोहीम उभारली. आपण एक अतिशय विनाश करणारी शक्ती मोकळी केली याचे शल्य जन्मभर आइन्स्टाइन यांना होते. अणुशक्तीचा उपयोग विध्वंस करण्यासाठी न करता शांतते साठी आणि लोकांच्या दैनंदिन व्यवहारात जगाच्या भल्या साठी करावा असे त्यांचे मत होते. त्यांच्यातला ‘विवेक’ आपण लोकांच्या हातात हे काय ज्ञान देऊन बसलो याची खंत करीत असे. 

आइन्स्टाइन यांचा मेंदू त्याच्या निधनानंतर नंतर प्रिन्स्टन हॉस्पिटलच्या पॅथोलॉजी प्रयोगशाळेत परीक्षण करण्यासाठी जतन केला गेला. त्यांच्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचे नमुने तपासले गेले त्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी उघड झाल्या. अजूनही त्यावर संशोधन सुरू आहे. आइन्स्टाइन यांचे १८ एप्रिल १९५५ रोजी निधन झाले. 

माहिती संकलन : संजीव वेलणकर






 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZTBCK
Similar Posts
रघुवीर मुळगावकर, वा. गो. मायदेव, ग. वा. बेहेरे, डेवीट वॅलेस, नागेश कुकनूर ख्यातनाम चित्रकार रघुवीर शंकर मुळगावकर, कविवर्य वासुदेव गोविंद उर्फ वा. गो. मायदेव, मराठी लेखक आणि झुंझार पत्रकार गणपती वासुदेव उर्फ ग. वा. बेहेरे, ‘रीडर्स डायजेस्ट’चे जनक डेवीट वॅलेस यांचा ३० मार्च हा स्मृतिदिन. तसेच, चित्रपट निर्माते नागेश कुकनूर यांचा ३० मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
आर. के. नारायण, श्री श्री रविशंकर, शेखर गायकवाड, मनहर उधास प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांचा १३ मे हा स्मृतिदिन. तसेच, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, पुणे महापालिकेचे विद्यमान आयुक्त शेखर गायकवाड आणि ज्येष्ठ गायक मनहर उधास यांचा १३ मे हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
राजा गोसावी, कवी संजीव, कमला नेहरू ख्यातनाम मराठी अभिनेते राजा गोसावी, मराठी कवी व गीतकार कवी संजीव आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा २८ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language