पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले, तर ई-बुकचे प्रकाशन वैश्विक सिद्ध साधनेचे मार्गदर्शक आध्यात्मिक गुरू मिलिंद देव यांच्या हस्ते झाले. या वेळी पुस्तकाच्या लेखिका डॉ. वृषाली पटवर्धन उपस्थित होत्या.
राजा जनक आणि आत्मज्ञानी अष्टावक्र मुनी यांच्यातील संवादांचे मार्मिक विवेचन करून, साधकांना आत्मज्ञानाच्या दिशेने नेमका प्रवास कसा करावा हे सांगणारा हा ग्रंथ आहे.
या ग्रंथासंबंधी बोलताना मिलिंद देव म्हणाले, ‘हा जनकाचा आत्मसंवाद असून, अष्टावक्र म्हणजे आठ मितींनी व्यापलेले आत्मज्ञान होय. या ग्रंथामध्ये ज्ञान, मुक्ती आणि वैराग्य प्राप्तीसाठी काय केले पाहिजे याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. आध्यात्मिक आवड असणाऱ्या प्रत्येकाने याचा अभ्यास केला पाहिजे’.
मंदार जोगळेकर म्हणाले, ‘साहित्य हा प्रकार आपली संस्कृती जगभर पोहचवतो. स्वत:च्या प्रगतीसाठीही साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते. मराठी पुस्तक जगभर पोहोचवण्यासाठी ‘बुकगंगा’च्या मार्फत एक यंत्रणा उभारली आणि १५ हजार मराठी ई-बुक्स ‘बुकगंगा’तर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहेत’.
डॉ. वृषाली पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त करून ग्रंथांतील निवडक श्लोकांचे विवेचन केले. मिलिंद देव यांनी उपस्थित साधकांना ध्यानसाधनेसाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुरा देव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मनीषा कावतकर यांनी केले, तर संस्थेचे सचिव विनायक पटवर्धन यांनी आभार मानले.
(अष्टावक्र नाथगीता हे पुस्तक आणि ई-बुक बुकगंगा डॉट कॉमवरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)