
मार्च 2020, कोरोनाने सगळ्या जगाला वेठीला धरले. सगळीकडे अनिश्चितता, भीती, संभ्रम, हतबल वातावरण होते. सोशल मीडियामुळे लोकं एकमेकांच्या संपर्कात होते. त्यातही नवनवीन उपक्रम सुरू होते. त्यातच कधी नव्हे ते मी फेसबूक उघडून पहायला लागले. नाहीतर माझं फेसबूक अकाऊंट अगदी मृतवत झालं होतं. फेसबूकवरील एक-दोन समुहांमध्येदेखील सामील झाले. आणि विद्याधर आठवले ह्यानी लिहिलेले त्यांच्या अष्टविनायक यात्रेबद्दल लेख वाचनात आले. त्यांनी पायी चालत अष्टविनायक यात्रा केली होती. प्रदीर्घ अशी लेख मालिका होती. त्याच बरोबर बैलगाडी डेज म्हणून दुसरी प्रदीर्घ मालिका वाचनात आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिगरीने त्यांच्या पूर्ण कुटुंबाने मार्ग कसा मार्ग काढला ह्याचे चित्तवेधक चित्रण होते. कुठेही रडगाणे बिलकुल नाही पण जागोजागी स्वाभिमान, हिम्मत आणि संस्कार ह्यांचेच दर्शन होत राहिले. अत्यंत सुंदर लेखन शैली! त्यामुळे अक्षरश: नादिष्टपणाने त्यांचे लेख वाचत राहिले. कॉर्पोरेट जगतात प्रवेश करून तिथे लोकांचे इगो, काही अपप्रथा ह्यांना सामोरे जात त्यांनी नवीन सिस्टीम कशा प्रस्थापित केल्या, बरोबरीच्या लोकांना कशी प्रेरणा दिली, अचानक आलेल्या वादळांना हिमतीने तोंड देत सर्वांना बरोबर घेत कसे यश गाठले, Good Administration and Bad Administration ह्यांच्यातील संघर्ष हयाबद्दल त्यांचे लेख येत होते. त्यातूनच मग हे पुस्तक तयार झाले- *गोमुचा नाच अत्यंत उत्कंठावर्धक, कॉर्पोरेट जगातील शह-प्रतिशह ह्यांची थरारक कहाणी सांगणारे हे पुस्तक लेखक विद्याधर गणेश आठवले 1972 ते 1987 ह्या कालखंडात भारतीय हवाई दलात ज्युनिअर वॉरंट ऑफिसर म्हणून कार्यरत होते. पुढे सिप्ला लिमिटेड, ग्लाक्सो इंडिया लिमिटेड इत्यादि कंपन्यांमधून फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर, पर्सोनेल अँड अॅडमिनिस्ट्रेटीव मॅनेजर, फॅक्टरी मॅनेजर अशा जबाबदारीच्या पदांवरून काम करून निवृत्त झाले आहेत. 1989 चा पाताळगंगा महापुर, मोरवी धरण स्खलन अशा आणीबाणीच्या प्रसंगी हजारो माणसांचे, प्राण्यांचे प्राण त्यांनी प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात उतरून वाचवले आहेत.
गोमुचा नाच हा कोकणातील लोकनृत्याचा खेळ आहे. त्यामध्ये दोन संघ असतात गोमुचं सोंग घेतलेला पुरुष असतो. गोमू नाचता नाचता एक पौराणिक कथा सांगत असते आणि तिचे सहकारी तिच्याभोवती फेर धरून नाचत असतात. कथेमध्ये ट्विस्ट असेल तिथे ती कथा थांबवते आणि “येथून कथाभाग फुडे राहिला” असं पालुपद म्हणत पुढची कथा सांगायचं आव्हान दुसऱ्या संघातील गोमुला देते. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना उच्चशिक्षित लोक मूळ उद्देश विसरून एकमेकावर कुरघोडी करण्याच्या नादात असलेले लेखकाने पाहिले त्यावरूनच ह्या पुस्तकाला हे नाव मिळाले.
चांगला मोठा 1200 स्क्वेयर फूटाचा फ्लॅट, हिरवीगार कॉलनी, मुलाच्या शिक्षणाची उत्तम सोय अशा सगळ्या सुविधा सोडून नवीन आव्हान पेलण्यासाठी लेखकाने नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी त्यांना वेड्यातच काढले. लेखकाने अविश्रांत परिश्रम घेऊन मुलाखत देण्याचे एक विशिष्ट तंत्र आत्मसात केले होते. सर्वसाधारणपणे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न हे आपणच पाठवलेल्या रेझ्युमेवर आधारित असतात. प्रत्येक जॉबच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्यामुळे सरधोपटपणे एकच रेझ्युमे सगळीकडे पाठवायचा नसतो. जॉब प्रोफाइल समजून घेत त्या जॉबसाठी आपणच सर्वोत्तम उमेदवार कसे आहोत हे प्रकर्षाने अधोरेखित व्हायला हवे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना ते अशा मुद्द्यावर आणून सोडायचं की पुढचा प्रश्न पुन्हा त्याच मुद्द्यावर विचारला जाईल आणि मुलाखत आपल्या स्ट्रेग्थभोवती फिरत राहील. ह्याच तंत्राचा वापर करत एका बड्या कंपंनीचा अॅडमिनिस्ट्रेटीव मॅनेजर म्हणून नोकरी मिळवली.
नोकरीच्या पाहिल्याच दिवशी समजलं की पूर्वीचा अॅडमिनिस्ट्रेटीव मॅनेजर अजूनही कार्यरत आहे. त्याला काढून टाकण्याची प्रोसेस पूर्ण होत आली होती आणि त्याचीच जागा लेखकला घ्यायची होती.. हा लेखकासाठी मोठा धक्का होता. कंपंनीच्या कारभारात काहीतरी घोळ सुरू होता पण तो काय घोळ होतोय हे लक्षात येत नव्हतं. ह्या मॅनेजरचे हात बरबटले होते पण मास्टर माइंड कोण हे कळत नव्हते आणि ते शोधून काढण्याची जबाबदारी लेखाकावर सोपविण्यात आली.
हा मॅनेजर बाहेर पडताच लेखकाचा फोन कामासाठी अव्याहत वाजू लागला. पद्धतशीरपणे लेखाकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. मार्केटिंग डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या मागण्या पुरवता पुरवता लेखकाच्या नाकी नऊ यायला लागले. फर्मास्युटिकल कंपनीत काम करताना लेखक सौजन्याने अदबशीर बोलायला शिकले होते. घरी, हवाईदलात असतांनादेखील एका अदबशीर पद्धतीने बोलण्याचे, ऐकण्याचे संस्कार होते. इथे मात्र जो तो उर्मटपणे, उद्दामपणे बोलत होता. जनरल मॅनेजर भट सर आणि सीइओ कश्यप सर हे दोघे सोडून कोणालाही लेखकाची झालेली नियुक्ती आवडली नव्हती. आधीचे जे मॅनेजर होते त्यांनी स्वत:ची मुद्दाम ‘देवमाणूस’ अशी प्रतिमा तयार केली होती जेणेकरून त्यांच्या कृष्णकृत्यावर पडदा पडावा. पण त्यांचा कर्ताकरविता मात्र पडद्याआडच होता. आणि आपली सूत्र हलवून लेखकाला सळो की पळो करून सोडत होता. ह्या अज्ञात शत्रूशी लढायचं तरी कसं ह्या विचारात लेखकाची झोप उडाली.
अचानक एक दिवस त्यांना ग्यानबाची मेख सापडली. उत्तम प्रशासन म्हणजे प्रत्येक कामाला कडक शिस्त आणि पळवाटांची नाकेबंदी. ह्या कंपनीत सुयोग्य सिस्टीम नसल्याने आर्थिक बेशिस्त माजली होती. सगळेच सगळ्याला जबाबदार म्हणजे कोणीच जबाबदार नाही अशी परिस्थिति होती.
लेखकाने सेक्युरिटी सिस्टम चोख केली. साधारण वजना मध्ये गफलत करून गैरव्यवहार करणे शक्य असते. आलेल्या प्रत्येक रिकाम्या गाडीचे वजन केले जात असे आणि माल भरून नेताना पुन्हा वजन केले जाई. गाडी लोड करताना पण वजन केले जाई. दोन्ही एंट्री ताडून बघितल्यावर सुपरवायझर सही करत असे. असे सगळे असताना ह्यातून काही गैरप्रकार होत असेल ह्याची कोणाला सुतरामदेखील शक्यता वाटणार नाही. चोरी कशाची होते, कशात गैरव्यवहार होतोय हे देखील समजत नव्हते पण कंपनीचे नुकसान मात्र होत होते.
लेखकाने एक डाव टाकला. सेक्युरिटी गेटवर घडणार्यात प्रत्येक लहान सहान व्यवहारांचे डॉक्युमेंटेशन सुरू केले. जो विभाग सर्वात जास्त विरोध करेल त्या विभागात काहीतरी गडबड आहे हे निश्चित. पण शत्रूदेखील भोळा नव्हता. त्यांना अंदाज होता की असा काहीतरी सापळा लावला जाणार. त्यामुळे त्यांनी पूर्ण सिस्टीमलाच विरोध करायला सुरुवात केली. पण एवढं तर निश्चित झालं की रॉ मटेरियल , स्क्रॅप ह्याच्या व्यवहारात कुठेतरी गडबड आहे. प्रचंड विरोध व्हायला लागल्यावर शस्त्रे खाली ठेवण्याचा आविर्भाव लेखकाने आणला. शत्रूला देखील तेच हवे होते. सेक्युरिटीला सूचना दिल्या की कोणी विरोध केला तर अडवू नका पण त्या घटनेच्या नोंदी ठेवा.
ISO सर्टिफिकेशनच्या निमित्ताने रॉ मटेरियल, स्क्रॅप, प्रॉडक्शन, आणि सेल ह्यांच्यातल्या विविध घडामोडींसाठी आणि त्यात कुठेही काही तफावत दिसली तर ताबडतोब लक्षात येईल असे monitoring सॉफ्टवेअर बनवून घेऊन ताबडतोब वापरत आणले. ISO स्टीयरिंग कमिटीचा सदस्य म्हणून सगळ्या डिपार्टमेंटच्या कामकाजाची खडानखडा माहिती समजून घ्यायला सुरुवात केली. सेक्युरिटी मधला कम्प्युटर मध्यवर्ती सॉफ्टवेअरला संलग्न केल्याने सगळ्या गोष्टींची नोंद होत होती.
गैरव्यवहार करणाऱ्या लोकांना फार काळ स्वस्थ बसवत नाही. त्याप्रमाणे अक्कौंट्स मधल्या एका मोठ्या अधिकाऱ्याने अत्यंत हुशारीने अक्कौंट्स मध्ये एक गफलत केली स्क्रॅप विकल्यानंतर जमा झालेली रक्कम एकूण निर्माण झालेल्या मूळ स्क्रॅपच्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त फीड केली ताबडतोब कम्प्युटर सिस्टीमने मिसमॅचचा सिग्नल दिला. ताबडतोब चौकशी सुरू झाली. मोडस ओपेरेंडि साधी होती. कंपनीत येणाऱ्या आयात केलेल्या रॉ मटेरियल पैकी काही मटेरियल कंपनीत येण्यापूर्वी स्पर्धक कंपनीला चढया भावाने विकून टाकायचे. गेट पास वर लिहिलेलं वजन मिळालं असं दाखवायचं आणि ताळा नीट व्हावा म्हणून कमी पडणारं वजन स्क्रॅपच्या नावाखाली अॅडजस्ट करायचं स्क्रॅप घेऊन जाणार्याव गाडीमध्ये जेवढं वजन असेल तेवढ्याचा डमी गेटपास सेक्युरिटीला द्यायचा म्हणजे सेक्युरिटीला संशय येण्याचं कारण नाही, कारण गाडीचं वजन आणि गेटपास मध्ये लिहिलेलं वजन तंतोतंत असायचं! अशा पद्धतीने इन्द्र आणि तक्षक असा दोघांचा बंदोबस्त केला.
पुढे ठाण्याच्या फॅक्टरीत युंनियनच्या मनमानी कारभारामुळे मालकांनी फॅक्टरी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आणि फॅक्टरी सुरळीत बंद करावी म्हणून लेखकाची नेमणूक झाली होती. युंनियनच्या लोकांचा सखोल अभ्यास करून लेखकाने एक योजना बनवली. स्थानिक पोलिसांची देखील मदत मागून ठेवली. युंनियनच्या धमक्यांमधली हवा तर काढून घेतलीच पण त्यांच्या नेत्याला कसं नेस्तनाबूत केलं ते अगदी एखाद्या चित्रपटात शोभवे असेच आहे. पण मंडळी तुम्हाला वाटतं तसं त्या व्यक्तीला नेस्तनाबूत नाही केलं बरं का! त्या व्यक्तीच्या अरेरावीला नमवलं. त्या व्यक्तीतले चांगले गुण हेरून फॅक्टरीच्या प्रगतीसाठी काम करण्यासाठी प्रवृत्त केले. चांगले आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा दिली आणि चक्क जी फॅक्टरी बंद करावी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती ती उत्तम प्रकारे चालू केली. अनेक कामगारांची रोजी रोटी कायम राहिली. युंनियनला आपल्याकडे वळवून घेतानाच्या प्रसंगात त्यांनी आखलेल्या योजना एखाद्या युद्धनीतीप्रमाणे आहेत.
आपले काम पार पडत असताना कामगार आणि मॅनेजमेंट दोघांचा फायदा व्हावा, लोकांमधला आत्मविश्वास वाढून त्यांना त्यांच्यातील कौशल्यांची जाणीव व्हावी, एक उमदे व्यक्तिमत्त्व घडावे म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. हा सगळा प्रवास, ह्या घडामोडी वाचणे अत्यंत रंजक आहे, विचारप्रवृत्त करणारे आहे. हा गोमुचा नाच आपल्यालाही त्या खेळात ओढून घेतो.
श्रेया राजवाडे (परिचयकर्ती)
30-4-2023
बुकगंगा.कॉम वरून ‘गोमूचा नाच’ याचे प्रिंट पुस्तक आणि ई-बुक विकत घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा-