Ad will apear here
Next
वाचणाऱ्यांनी वाचत जावे...
परदेशातील दिग्गज साहित्यिकांची पुस्तके आणि समग्र साहित्य ई-बुक किंवा ऑडिओ बुक स्वरूपात अनेक वेबसाइटवर मोफत उपलब्ध आहेत. आपल्याकडे राज्य सरकारने अनेक दुर्मीळ मराठी ग्रंथांच्या बाबतीत तो प्रयोग राबवला आहे. अर्थात त्याचा आणखी विस्तार व्हायला हवा असला, तरी सद्यस्थितीत भरपूर चांगले साहित्य वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे. ‘वाचणाऱ्यांनी वाचत जावे, त्यांना चांगल्या साहित्याची कमतरता भासणार नाही,’ अशी एकंदर परिस्थिती आहे. 
................
जागतिक पुस्तक दिन गेल्या आठवड्यात साजरा झाला. ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम झाले, व्याख्याने दिली गेली आणि बरेच काही उपक्रम राबवले गेले. हे नक्कीच चांगले आहे; मात्र कोणत्याही अन्य विशेष दिवसाप्रमाणे पुस्तक दिन वर्षातून एकदाच साजरा करणे पुरेसे नाही. ज्याला आयुष्यात काही तरी प्रगती करायची आहे, त्या प्रत्येकासाठी खरे तर रोजचा दिवसच पुस्तक दिन आणि वाचन दिन असला पाहिजे. पुस्तकांचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. ते प्रत्येकालाच माहिती आहे; पण त्याची आठवण करून देण्याची वेळ मात्र अलीकडे बऱ्याचदा येते. कारण पुस्तकांची आर्थिक उलाढाल वाढली असली, तरी वाचनाचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे निरीक्षण अनेक तज्ज्ञ नोंदवतात. याबद्दलचे विचार गेल्या आठवड्यातील लेखातही मांडले होते. आता पुन्हा त्याच विषयावर लिहायचे नाही; पण ज्यांना खरोखरच वाचायचे आहे, त्यांच्यासाठी किती पर्याय उपलब्ध आहेत, याची माहिती द्यायची आहे. 

पुस्तक विकत घेऊन स्वतःकडे विविध विषयांवरील पुस्तकांचा संग्रह करण्याची आवड अनेकांना असते. पुस्तकांची उपलब्धता हा आता काही विशेष कठीण मुद्दा राहिलेला नाही. पुस्तकांच्या दुकानांसोबतच ऑनलाइन शॉप्समधूनही पुस्तके खरेदी करता येतात; पण तरीही ज्यांना पुस्तके विकत घेणे शक्य नाही, त्यांच्यासाठी विविध ठिकाणची ग्रंथालये हा चांगला पर्याय असतो. याहून तिसरा महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्सचा. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ई-बुक आणि ऑडिओ बुक या संकल्पना प्रत्यक्षात आल्या आणि आता तर त्या सर्रास वापरल्या जाऊ लागल्या आहेत. या पुस्तकांची विक्री हा एक वेगळा मुद्दा आहे; पण इंटरनेटवर थोडे शांतपणे आणि विचारपूर्वक शोधले, तर मोफत उपलब्ध असलेली हजारो ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्सचा खजिना हाती लागू शकतो. प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार आणि हवे तितके वाचनसाहित्य पुरवू शकण्याची या प्रकल्पांची ताकद आहे. 

‘प्रोजेक्ट गटेनबर्ग’हा त्यापैकी एक प्रमुख प्रकल्प. आजच्या घडीला या वेबसाइटवर तब्बल ५३ हजार ई-बुक्स उपलब्ध आहेत आणि तीही चक्क मोफत. इलेक्ट्रॉनिक माध्यमात मोफत साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी जुलै १९७१मध्ये मायकेल हार्ट यांनी ‘प्रोजेक्ट गटेनबर्ग’ची (https://www.gutenberg.org/) सुरुवात केली. इंटरनेटवर माहिती पुरवणारा हा पहिला प्रकल्प होता आणि ती सर्वांत जुनी डिजिटल लायब्ररीही आहे. १९९०च्या दशकाच्या मध्यात इंटरनेट लोकप्रिय झाल्यानंतर या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. आजच्या घडीला ५५ भाषांतील पुस्तके यावर उपलब्ध असून, दररोज जगभरातून हजारो पुस्तके डाउनलोड केली जातात. ब्रिटनमधील क्लासिक लिटरेचर (http://classic-literature.co.uk/) हीदेखील एक अशीच साइट. विल्यम शेक्सपीअर, ज्यूल्स व्हर्न, शेरलॉक होम्स, सर ऑर्थर कॉनन डॉयल, मार्क ट्वेन अशा दिग्गज लेखकांसह अनेक ब्रिटिश, स्कॉटिश आणि अमेरिकन लेखकांचे साहित्य या वेबसाइटवर एकत्रितरीत्या उपलब्ध करण्यात आले आहे. (हो.. हो मोफतच...)

दी लिटरेचर नेटवर्क (http://www.online-literature.com/) या वेबसाइटवर २६७ लेखकांची साडेतीन हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. त्याशिवाय, लॉयल बुक्स (http://www.loyalbooks.com/) या वेबसाइटवर शेकडो दिग्गज साहित्यिकांची पुस्तके ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत. दी लिटरेचर प्रोजेक्ट (http://www.literatureproject.com/), ओपन लायब्ररी (https://openlibrary.org/) आणि अशा अनेक वेबसाइट्स आहेत, की ज्यावर हे दिग्गज लेखकांचे अमूल्य अक्षरधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

आता हे सगळे झाले इंग्रजी लेखकांचे. असेच प्रकल्प मराठीतही आहेत, असे सांगितले तर कदाचित त्यावर विश्वास बसणार नाही; पण ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारची मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय आणि मराठी भाषा विभाग या तीन संस्थांच्या वेबसाइटवर अनेक मराठी पुस्तके, कोश, दुर्मीळ ग्रंथ, श्राव्य पुस्तके (ऑडिओ बुक्स) मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वास्तविक या तिन्ही सरकारी संस्था असल्याने एकत्रितरीत्या काही तरी उपक्रम राबवू शकल्या असत्या; पण या तिन्ही संस्थांच्या साइटवर वेगवेगळे साहित्य उपलब्ध करण्यात आलेले दिसते. अर्थात, त्यामुळे त्यांच्या प्रकल्पाचे महत्त्व जराही कमी होत नाही. हे सगळे उपक्रम स्वागतार्ह असले, तरी त्यात आणखी सुधारणेला वाव आहे. कारण यातील बहुतांश साहित्य पीडीएफ स्वरूपात किंवा ई-पब स्वरूपात उपलब्ध आहे. युनिकोडमध्ये उपलब्धता नसल्याने मजकुरात काही शोधणे अवघड आहे; पण तरीही शेकडो पुस्तकांचे डिजिटायझेशन होणे आणि ती पुस्तके ‘पब्लिक डोमेन’मध्ये उपलब्ध होणे ही खचितच आनंददायी गोष्ट आहे.

लेखकाच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी त्याचे साहित्य कॉपीराइटमुक्त होते. असे साहित्य ‘पब्लिक डोमेन’ अर्थात नागरिकांसाठी मोफत खुले करण्याच्या कल्पनेतून यातील बहुतेक प्रकल्प राबवले जात आहेत. हा विचार आता आपल्याकडेही होऊ लागला आहे; पण त्याची वाढ व्हायला हवी. प्रादेशिक भाषांतील साहित्याचा ठेवा जतन करून ठेवण्यासाठी डिजिटायझेशनएवढाच युनिकोडचा वापरही महत्त्वाचा आहे. थोडक्यात काय, तर ‘वाचणाऱ्याने वाचत जावे, त्याला पुस्तके कधीच कमी पडणार नाहीत,’ अशीच एकंदर परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या वाचत नसणाऱ्यांनी ‘दिसामाजी काही तरी ते वाचावे’ असा संकल्प पुस्तक दिनाच्या औचित्याने करायला काही हरकत नसावी.  

महाराष्ट्र सरकारने मोफत उपलब्ध केलेल्या ई-बुक्ससाठी लिंक्स :

कॉपीराइटची मुदत संपलेले शेकडो दुर्मीळ ग्रंथ 

वेगवेगळ्या विषयांवरची ई-बुक्स 

यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णाकाठ’ (ऑडिओ)

दासबोध (ऑडिओ)

विंदांची कविता (ऑडिओ)

कुसुमाग्रजांची कविता (ऑडिओ)

भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेले कोश (शासन व्यवहार कोश, पदनाम कोश, न्याय व्यवहार कोश)

भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेले परिभाषा कोश 
(औषधशास्त्र, भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या, मानसशास्त्र, धातुशास्त्र, संख्याशास्त्र, गणितशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, कृषिशास्त्र, वृत्तपत्रविद्या, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्यशास्त्र, यंत्र अभियांत्रिकी, भूगोलशास्त्र, साहित्य समीक्षा, शरीरक्रियाशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन, भौतिकशास्त्र, भूशास्त्र, राज्यशास्त्र, जीवशास्त्र, राज्यशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, शिक्षणशास्त्र, न्यायवैद्यक व विषशास्त्र, शारीर या सर्व विषयांवरील परिभाषा कोश)

भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या शब्दावल्या
(कार्यदर्शिका, वित्तीय, शासनव्यवहार, विकृतिशास्त्र, प्रशासन वाक्प्रयोग)

भाषा संचालनालयाची अन्य प्रकाशने
(राजभाषा परिचय कार्यरूप व्याकरण, मंथन - राजभाषा वर्षातील वैचारिक ग्रंथांचे संकलन, शुद्धलेखन नियमावली, मराठी लघुलेखन, शासनव्यवहारात मराठी, मराठी टंकलेखन प्रवेशिका, प्रशासनिक लेखन, मराठी लघुलेखन मार्गदर्शिका, राजभाषा परिचय

मराठी शासनव्यवहार कोशाच्या साह्याने चालवलेली डिक्शनरी (इंग्रजी-मराठी युनिकोड)

मराठी विश्वकोश (युनिकोड)

कुमार विश्वकोश (ऑडिओ)

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ – मराठी शब्दकोश

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ४४४ पुस्तकांची ई-बुक्स 

विविध नेत्यांच्या चरित्रांची ई-बुक्स (बॅ. नाथ पै, शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, शंकरराव मोहिते-पाटील, पंडिता रमाबाई, तुळशीदास जाधव)

बुकगंगा डॉट कॉम 
मोफत ई-बुक्स : http://www.bookganga.com/eBooks/Books?FEB=1
मोफत ऑडिओ बुक्स : http://audio.bookganga.com/Books?FEB=1

.......................
‘बाइट्स ऑफ इंडिया’चे विशेष वार्तांकन 
जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने २३ एप्रिल ते ३० एप्रिल या एका आठवड्याच्या कालावधीत पुस्तकांच्या अनुषंगाने विविध विषयांना स्पर्श करणारे लेख आणि बातम्या प्रसिद्ध केल्या. पुस्तकांचे माध्यमांतर, बुक ट्रेलर आणि बुक कॅफे यांसारखे नवे ट्रेंड्स, अभिवाचनासाठी तरुणांकडून घेतला जात असलेला पुढाकार, टेक्स्ट बुक बँक, दुर्मीळ पुस्तकांच्या विक्रीत असलेल्या आठवले काकांच्या तीन पिढ्या, लहान मुलांना गोष्टी उपलब्ध करून देणारे ‘स्टोरीवीव्हर’ हे माध्यम, मराठीतील पहिला ग्रंथ असलेल्या ‘गाहा सत्तसई’वर आधारित कार्यक्रम सादर करण्याची संकल्पना, पुस्तकांचे गाव असे वीसहून अधिक वेगवेगळे विषय ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने या कालावधीत हाताळले. त्यातून वाचन आणि संदर्भासाठी चांगले साहित्य निर्माण झाले. वाचकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हे वार्तांकन एकत्रितरीत्या पुढील लिंकवर उपलब्ध आहे. http://www.bytesofindia.com/tag/?tagname=World%20Book%20Day%202017

ई-मेल : aniket.konkar@myvishwa.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AYYCBB
Similar Posts
बोलू ‘बोली’चे बोल! मराठी राजभाषा दिन (२७ फेब्रुवारी) आणि आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष (२०१९) या निमित्तानं ‘बाइट्स ऑफ इंडिया’चा विशेष उपक्रम -‘बोलू ‘बोली’चे बोल!’ मराठीच्या विविध बोलीभाषांचा आस्वाद आपल्याला या उपक्रमातल्या व्हिडिओंमधून घेता येईल. मराठीच्या विविध बोलीभाषांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल सांगणारा हा लेख
मराठी टिकवण्यासाठी एवढं करू याच! आज मराठी राजभाषा दिन सर्वत्र उत्साहात साजरा होतो आहे. त्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छांचे संदेश पाठवले जात आहेत. फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर तर अशा संदेशांना इतका ऊत आला आहे, की ते पाहिल्यावर मातृभाषेच्या प्रेमानं ऊर अगदी भरूनच यावा. भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीनं हा शुभसंकेतच म्हणायला हवा
कवितेचे भाषांतर, अनुवाद, रूपांतर किंवा अनुसर्जन गेली काही वर्षे इतर भारतीय भाषांतून, तसेच जगातील इतर भाषांतून मराठी भाषेत भाषांतरित होऊन आलेल्या पुस्तकांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली दिसते. कवितेतला माणूस असल्याने कवितेपुरते सांगायचे झाल्यास इतर भाषांतून मराठीत भाषांतरित होऊन आलेल्या कवितांच्या भाषांतराच्या दर्जाबद्दल माझ्या मनात एक कायम असमाधान असते
भाषेचे जगणे-मरणे... एका ज्येष्ठ पत्रकार मित्राची ‘अचूक मराठी’वरील एक नोंद वाचली आणि त्यांची तळमळ अस्वस्थ करून गेली. मराठीच्या चिंधड्या उडविण्याची स्पर्धा स्वजनांकडूनच सुरू असून माध्यमे - विशेषत: चित्रवाणी माध्यमे - त्या स्पर्धेत हिरीरीने उतरलेली दिसतात. त्या नोंदीमुळे मग एक स्वगत-चिंतन-होऊन गेले. सहज वाटलं, हा तर अपरिहार्य बदलाचा प्रभाव आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language